Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “भूकमळे” या चालीवर बसवलेले आसाफाचे स्तोत्र.
80 इस्राएलाच्या मेंढपाळा, माझे ऐक.
तू योसेफाच्या मेंढ्यांना (माणासांना) मार्ग दाखवतोस.
राजा म्हणून तू करुबांच्या आसनावर बसतोस.
आम्हाला तुला बघू दे.
2 इस्राएलाच्या मेंढपाळा, तुझे मोठेपण एफ्राइम आणि बन्यामीन व मनश्शे यांच्यासमोर दाखव.
ये आणि आम्हाला वाचव.
3 देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर
आणि आम्हाला वाचव.
4 सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, तू आमच्या प्रार्थना कधी ऐकशील?
आमच्यावर तू सदैव रागावलेलाच राहाणार आहेस का?
5 तू तुझ्या लोकांना अन्न म्हणून अश्रू दिलेस.
तेच त्यांचे प्यायचे पाणी होते.
6 तू आम्हाला आमच्या शेजाऱ्यांच्या भांडणाचे निमित्त केलेस.
आमचे शत्रू आम्हाला हसतात.
7 सर्वशक्तिमान देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर.
आमचा स्वीकार कर आणि आम्हाला वाचव.
17 देवा, तुझ्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
तू वाढवलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
18 तो तुला सोडून परत जाणार नाही.
त्याला जगू दे आणि तो तुझ्या नावाचा धावा करेल.
19 सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, आमच्याकडे परत ये.
आमचा स्वीकार कर. आम्हाला वाचव.
लोकांचे दुष्ट बेत
2 पाप करण्याचे बेत करणाऱ्यांवर संकट येईल.
ते लोक आपल्या शय्येवर दुष्ट बेत करीत पडतात
आणि सकाळी फटफटताच, योजलेली वाईट कर्मे करतात.
का? कारण त्यांच्या इच्छेप्रमाणे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या हाती आहे म्हणून.
2 त्यांना शेते हवे असतात, म्हणून ते ती घेतात.
घरे हवी असतात, म्हणून घरे घेतात.
ते एखाद्याला फसवितात आणि त्याचे घर घेतात.
एखाद्याची फसवणूक करुन त्याची जमीन घेतात.
लोकांना शिक्षा करण्याची परमेश्वराच्या योजना
3 म्हणूनच परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो.
“पाहा! ह्या कुटुंबाला संकटात टाकण्याचे मी योजीत आहे.
तुम्ही स्वतःला वाचवू शकणार नाही. [a]
तुमचे गर्वहरण होईल.
का? कारण वाईट वेळ येत आहे.
4 मग लोक तुमच्यावर गाणी रचतील.
लोक ही शोकगीते म्हणतील:
‘आमचा विनाश झाला!
परमेश्वराने आमची भूमी काढून घेतली आणि ती दुसऱ्यांना दिली.
हो खरेच! त्याने माझी जमीन काढून घेतली.
परमेश्वराने आमची शेते घेऊन आमच्या शत्रूंमध्ये त्यांची वाटणी केली.
5 म्हणून आता आम्ही जमिनीचे मोजमाप करुन
त्या जमिनीची वाटणी परमेश्वराच्या लोकात करु शकत नाही.’”
मीखाला उपदेश करण्यास मनाई
6 लोक म्हणतात, “आम्हाला उपदेश करु नको.
आमच्याबद्दल वाईट गोष्टी सांगू नकोस
आमचे काहीही वाईट होणार नाही.”
7 पण याकोबच्या लोकांनो,
मला ह्या गोष्टी सांगितल्याच पाहिजेत.
तुमच्या वाईट कृत्यांमुळे
परमेश्वराची सहनशीलता संपुष्टात येत आहे.
तुम्ही नीट वागलात,
तर मी तुमच्यासाठी चांगली बातमी आणीन.
परमेश्वराचे लोकच त्याचे शत्रू होतात
8 माझ्या लोकांनो, तुम्ही शत्रू म्हणून (परमेश्वराचे अथवा एकमेकाचे) उभे राहिलात.
स्वतःला सुरक्षित समजणाऱ्या, जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचे तुम्ही कपडे चोरता.
पणे ते युध्दकैदी असल्यासारखे मानून
तुम्ही त्यांच्या वस्तू काढून घेता.
9 तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रियांकडून
चांगली घरे काढून घेतलीत.
त्यांच्या लहान मुलांपासून
माझे वैभव काढून घेतले.
10 उठा आणि चालते व्हा!
ही तुमची विसाव्याची जागा असणार नाही.
का? कारण तुम्ही ही जागा उद्ध्वस्त केलीत.
तुम्ही ती अस्वच्छ केलीत.
म्हणून तिचा नाश होईल.
आणि तो विनाश भयंकर असेल.
11 ह्या लोकांना माझे ऐकावयाचे नाही.
पण एखादा खोटे सांगू लागला,
तर ते स्वीकारतील.
जर खोटा संदेष्टा येऊन म्हणाला,
“भविष्यकाळात चांगले दिवस येतील, द्राक्षरस आणि मद्याचा सुकाळ होईल, तर ते त्या खोट्या प्रेषितावर विश्वास ठेवतील.”
परमेश्वर त्याच्या लोकांना एकत्र आणील
12 हो! खरेच! मी याकोबच्या माणसांना एकत्र आणीन.
वाचलेल्या इस्राएल लोकांना मी एकत्र करीन.
कुरणातील कळपाप्रमाणे वा मेंढवाड्यातील मेंढराप्रमाणे मी त्यांना एकत्र ठेवीन.
मग पुष्कळ लोकांच्या गोंगाटाने ही जागा भरुन जाईल.
13 फोडणारा लोकांना ढकलून पुढे जाईल व लोकांच्या पुढे चालेल.
तो वेशीचे दार फोडील आणि लोक ते गाव सोडतील.
त्या लोकांचा राजा त्यांच्यापुढे चालेल.
परमेश्वर सर्व लोकांच्या पुढे असेल.
15 “दानीएल संदेष्ट्याने एका अमंगळ गोष्टीविषयी सांगितले की, जिच्यामुळे नाश ओढवेल. अशी अमंगळ गोष्ट ही पवित्र जागी- मंदिरामध्ये उभी असलेली तुम्ही पाहाल.” (तुम्ही लोक जे हे वाचाल ते याचा अर्थ समजून घ्या.) 16 “त्यावेळी यहूदातील लोकांनी डोंगरावर पळून जावे. 17 जो कोणी छपरावर असेल त्याने घरातील सामान घेण्यासाठी उतरु नये. 18 जर कोणी शेतात असेल तर त्याने आपला सदरा घेण्यासाठी परत जाऊ नये.
19 “त्याकाळी गर्भवती असलेल्या अगर तान्ही बालके असलेल्या स्रियांना फार कठीण जाईल. 20 जेव्हा या गोष्टी होतील आणि तुम्हांला पळून जावे लागेल तेव्हा थंडीचे दिवस नसावेत अथवा शब्बाथ दिवस नसावा यासाठी प्रार्थना करा. 21 कारण त्याकाळी फार पीडा येतील. जगाच्या आरंभापासून कधीही झाली नाही आणि पुन्हा कधी होणार नाही अशी पीडा त्या काळी भोगावी लागेल.
22 “आणखी, देवाने ते दिवस जर थोडेच ठेवले नसते तर कोणीच वाचले नसते. परंतु त्याच्या निवडलेल्यांमुळे तो ते दिवस थोडे करील.
23 “त्या वेळी जर एखाद्याने तुम्हांला म्हटले, ‘पहा! ख्रिस्त येथे आहे,’ किंवा ‘तो तेथे आहे’, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. 24 खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांना ते चिन्हे दाखवतील व लोकांना एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील. 25 या गोष्टी होण्या अगोदरच मी तुम्हांला सावध केले आहे.
26 “एखादा मनुष्य तुम्हांला सांगेल, ‘पाहा, मशीहा ओसाड रानात आहे.’ तर तेथे जाऊ नका. किंवा जर ते म्हणाले, पाहा, ‘ख्रिस्त, आतल्या खोलीत लपला आहे’, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. 27 मी हे म्हणतो कारण वीज जशी पूर्वेकडून पश्चिमेकडे चमकताना सर्वाना दिसते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणेदेखील असेल. 28 जेथे कोठे प्रेत असेल तेथे गिधाडेही असतील.
29 “छळानंतर लगेच, असे घडेल:
‘सूर्य अंधकारमय होईल
व चंद्र प्रकाश देणार नाही.
आकाशातील तारे व नक्षत्रे गळून पडतील आकाशातील सर्व शक्ती डळमळतील.
आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल.’ (A)
30 “त्यावेळेला मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व लोक शोक करतील. मनुष्याच्या पुत्राला सर्व जण मेघावर बसून येताना पाहतील. तो महासामर्थ्य आणि वैभव यांच्यासह येईल. 31 मनुष्याचा पुत्र तुतारीचा मोठा नाद करून आपले दूत पृथ्वीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील.
2006 by World Bible Translation Center