Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे स्तोत्र.
28 परमेश्वरा, तू माझा खडक आहेस.
मी तुला मदतीसाठी बोलवीत आहे.
माझ्या प्रार्थनेला तुझे कान बंद करु नकोस.
तू जर माझ्या मदतीच्या हाकेला उत्तर दिले नाहीस
तर मी थडग्यातल्या मेलेल्या माणसासारखा आहे असे लोकांना वाटेल.
2 परमेश्वरा, मी माझे बाहू उभारुन तुझ्या पवित्र जागेकडे तोंड करुन प्रार्थना करतो.
मी तुला साद घालीन त्यावेळी
माझे ऐक माझ्यावर दया दाखव.
3 परमेश्वरा, मी वाईट कृत्ये करणाऱ्या
दुष्ट लोकांसारखा आहे असे मला वाटत नाही.
ते लोक त्यांच्या शेजाऱ्यांना “शांती” या शब्दाने अभिवादन करतात.
परंतु मनात मात्र ते शेजाऱ्यांचे वाईटच चिंतीत असतात.
4 परमेश्वरा, ते लोक दुसऱ्यांचे वाईट करतात
म्हणून त्यांचे वाईट होऊ दे.
त्यांना त्यांच्या कर्माप्रमाणे शिक्षा कर.
5 वाईट लोकांना परमेश्वराची चांगली कृत्ये कळत नाहीत.
नाही, त्यांना ते कळू शकत नाही.
ते फक्त नाश करण्याचा प्रयत्न करतात.
6 परमेश्वराची स्तुती कर.
त्याने माझी दयेसाठी केलेली प्रार्थना ऐकली.
7 परमेश्वर माझी शक्ती आहे. तो माझी ढाल आहे.
मी त्याच्यावर विश्वास ठेवला व त्याने मला मदत केली.
मी खूप आनंदी आहे
आणि मी त्याची स्तुती करणारी गाणी गातो.
8 परमेश्वर त्याने निवडलेल्या लोकांचे रक्षण करतो.
परमेश्वर त्याला वाचवतो.
परमेश्वर त्याची शक्ती आहे.
9 देवा, तुझ्या लोकांना वाचव
जे तुझे आहेत त्यांना आशीर्वाद दे.
त्यांना वाट दाखव व त्यांना सदैव क्षमा कर, त्यांना उचलून घे.
10 “राष्ट्रांनो, परमेश्वराकडून आलेला संदेश ऐका!
समुद्राकडील दूरच्या देशांत हा संदेश पोहोचवा.
‘देवाने इस्राएलच्या लोकांना पांगविले.
पण देव त्यांना पुन्हा गोळा करील
आणि तो आपल्या कळपावर (लोकांवर)
मेंढपाळाप्रमाणे लक्ष ठेवील.’
11 परमेश्वर याकोबाला परत आणील.
परमेश्वराच्या लोकांपेक्षा बलवान असलेल्या लोकांपासून परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करील.
12 इस्राएलचे लोक सियोनच्या शिखरावर येतील
आणि आनंदाने आरोळ्या ठोकतील.
परमेश्वराने दिलेल्या चांगल्या गोष्टींमुळे
त्यांचे चेहरे आनंदाने उजळतील.
परमेश्वर त्यांना धान्य, ताजा द्राक्षरस,
ताजे तेल, कोकरे आणि गाई देईल.
भरपूर पाणी मिळालेल्या बागेप्रमाणे त्यांची स्थिती होईल.
इस्राएलच्या लोकांना पुन्हा कधीही त्रास होणार नाही.
13 मग इस्राएलमधील तरुणी
आनंदित होऊन नाचतील
आणि तरुण व वृद्ध
त्यांच्या नाचात सामील होतील.
मी त्यांचे दु:खाचे सुखात रुपांतर करीन.
मी इस्राएलच्या लोकांना समाधानात ठेवीन.
मी त्यांच्या दु:खाचे सुखात रुपांतर करीन.
14 मी याजकांना भरपूर अन्न देईन.
मी दिलेल्या चांगल्याचुंगल्या गोष्टींमुळे माझ्या लोकांचे समाधान होईल.”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
येशूला देवाचा अधिकार आहे
19 परंतु येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे सांगतो. पुत्र जरी सर्व करु शकत असला, तरी पित्याच्या इच्छेला डावलून एकटा काही करु शकत नाही. पिता करतो त्या गोष्टी पुत्रही करतो. 20 पिता पुत्रावर प्रीति करतो आणि ज्या गोष्टी पिता करतो त्या सर्व तो पुत्राला दाखवितो. हा मनुष्य बरा झाला, परंतु यापेक्षाही मोठमोठ्या गोष्टी करण्याचे पिता पुत्राला दाखवील. तेव्हा तुम्ही सर्व जण चकित व्हाल. 21 पिता लोकांना मेलेल्यांतून उठवितो आणि जीवन देतो. तसेच पुत्रही त्याला, ज्यांना द्यायला पाहिजे, त्यांना जीवन देतो.
22 “याशिवाय, पिता कोणाचाही न्याय करीत नाही. परंतु न्याय करण्याचा सर्व अधिकार पित्याने पुत्राला दिलेला आहे. 23 देवाने हे अशासाठी केले की, लोक जसा पित्याचा सन्मान करतात, तसा त्यांनी पुत्राचाही करावा. जर कोणी पुत्राचा मान राखीत नाही, तर तो पित्याचाही मान राखीत नाही. पित्यानेच पुत्राला पाठविले आहे.
24 “मी तुम्हांला खरे तेच सांगतो: जो माझे ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंतकालचे जीवन मिळेल. त्याला दोषी ठरविले जाणार नाही. तर त्याने मरणातून निघून जीवनात प्रवेश केला आहे. 25 मी तुम्हांला खरे सांगतो. अशी महत्वाची वेळ येत आहे. ती वेळ जवळजवळ आलेलीच आहे. जे लोक पापामध्ये मृत आहेत ते देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि देवाच्या पुत्राकडून ऐकलेल्या गोष्टी जे लोक स्वीकारतील त्यांना अनंतकाळचे जीवन मिळेल. 26 खुद्द पित्यापासून (देवापासून) जीवनाचा लाभ होतो. म्हणून पित्याने पुत्रालाही जीवन देण्याची देणगी दिली आहे. 27 आणि पुत्राने सर्व लोकांचा न्यायनिवाडा करावा असा अधिकार पित्याने पुत्राला दिला आहे. कारण तो पुत्र मनुष्याचाही पुत्र आहे.
28 “तुम्ही याचे आश्चर्य मानू नका. अशी वेळ येत आहे की, सर्व लोक जे मेलेले आहेत व आपल्या कबरेत आहेत ते त्याची वाणी ऐकतील. 29 मग ते आपल्या कबरेतून बाहेर येतील. ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात चांगली कामे केली, ते उठतील आणि त्यांना अनंतकाळचे जीवन मिळेल. परंतु ज्या लोकांनी वाइट कामे केली ते शिक्षा भोगण्यासाठी उठतील.
30 “मी एकटा काहीच करु शकत नाही. मला सांगितल्याप्रमाणेच मी न्याय करतो, म्हणून माझा न्याय योग्य आहे. कारण मी स्वतःच्या समाधानासाठी नाही; परंतु ज्याने मला पाठविले त्याच्या समाधानासाठी न्याय करतो.”
येशू यहूदी लोकांशी बोलणे चालू ठेवतो
31 “जर मी स्वतःच माझ्याविषयी लोकांना सांगितले तर लोक त्या गोष्टी मानणार नाहीत. 32 परंतु लोकांना याविषयी सांगणारा दुसरा एक जण आहे. आणि तो माझ्याविषयी ज्या गोष्टी सांगतो त्या खऱ्या आहेत, हे मला माहीत आहे.”
33 “तुम्ही योहानाकडे काही लोकांना पाठविले आणि सत्याविषयी त्याने तुम्हांला सांगितलेच आहे. 34 माझ्याविषयी लोकांना सांगण्यास मला कोणाही माणसाची गरज नाही. परंतु तुमचे तारण व्हावे म्हणून मी या गोष्टी तुम्हांला सांगतो. 35 पेटलेला दिवा प्रकाश देतो, तसाच योहान होता आणि तुम्हांला त्याच्या प्रकाशाकडून काही काळ आनंद मिळाला.
36 “परंतु मजजवळ माझ्याविषयी योहानापेक्षाही मोठा पुरावा आहे. जी कामे मी करतो तीच माझा पुरावा आहेत. या गोष्टी माझ्या पित्याने मला करण्यासाठी दिलेल्या आहेत. त्या गोष्टींवरुन हे सिद्ध होते की, पित्याने मला पाठविले आहे. 37 आणि ज्या पित्याने मला पाठविले त्याने स्वतःही माझ्याविषयी साक्ष दिलेली आहे. परंतु तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही, तो कसा दिसतो हे तुम्ही कधी पाहिले नाही. 38 पित्याची शिकवण तुमच्यामध्ये राहात नाही. कारण पित्याने ज्या एकाला तुमच्याकडे पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवीत नाही, 39 तुम्ही शास्त्राचा काळजीपूर्वक अभ्यास करता. त्या शास्त्राच्या द्वारे आपल्याला अनंतकाळचे जीवन मिळते, असे तुम्हांला वाटते, तेच शास्त्र माझ्याविषयी सांगते! 40 तरी तुम्ही अनंतकालचे जीवन मिळण्यासाठी मजकडे येण्यास नकार देता.”
2006 by World Bible Translation Center