Revised Common Lectionary (Semicontinuous)
11 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “मी स्वतःच त्यांचा मेंढपाळ होईन. मी माझ्या मेंढ्यांचा शोध घेईन. मी त्यांच्यावर लक्ष ठेवीन. 12 मेंढपाळ जर मेंढ्यांबरोबर असेल, तर त्या भरकटू लागताच, तो त्यांचा शोध घेईल, त्याचप्रमाणे, मी करीन. मी माझ्या मेंढ्यांना वाचवीन. त्या अंधाऱ्या व ढगाळ दिवशी, त्या जेथे जेथे विखुरल्या असतील, तेथून तेथून मी त्यांना परत आणीन. 13 त्या त्या राष्ट्रांतून मी त्यांना परत आणीन. निरनिराळ्या देशांतून मी त्यांना एकत्र आणीन. मी त्यांना त्यांच्या भूमीत परत आणीन. मी त्यांना इस्राएलच्या डोंगरांवर, झऱ्यांकाठी आणि लोक राहत असलेल्या सर्व ठिकाणी चरु देईन. 14 मी त्यांना चांगल्या कुरणांत नेईन. इस्राएलच्या डोंगरावरील उंच ठिकाणी त्या जातील. तेथे चांगल्या डोंगरावरील उत्तम हिरवळीवर त्या चरतील. 15 हो! मी माझ्या कळपाला खायला घालीन. आणि त्यांना विश्रांतीच्या जागी घेऊन जाईन.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
16 “हरवलेल्या मेंढ्यांचा मी शोध घेईन. भटकलेल्यांना मी परत आणीन. जखमी झालेल्या मेंढ्यांना मी मलमपट्टी करीन. दुर्बलांना मी सबळ करीन. मी त्या लठ्ठ व मत्त मेंढपाळांचा मात्र नाश करीन. त्यांना योग्य अशीच शिक्षा मी देईन.”
20 म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, त्यांना म्हणतो, “मी स्वतः लठ्ठ मेंढी आणि बारीक मेंढी ह्यांच्यात निवाडा करीन. 21 तुम्ही बाजूने व खांद्याने ढकलता. तुमच्या शिंगांनी तुम्ही दुर्बळ मेंढ्यांना खाली पाडता. तुम्ही, त्यांना ढकलून दूर घालवून देता. 22 म्हणून, मी माझ्या कळपाला वाचवीन. यापुढे हिंस्र पशू त्यांना पकडणार नाहीत. मी मेंढ्या-मेंढ्यात न्यायनिवाडा करीन. 23 मग मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन. माझा सेवक दावीद, ह्याला मी मेंढपाळ म्हणून नेमीन. तो त्यांना खायला घालील व त्यांच्या मेंढपाळ होईल. 24 मग मी, परमेश्वर व प्रभू, त्यांच्या देव होईन. माझा सेवक, दावीद राजा म्हणून त्यांच्यात राहील हे माझे परमेश्वराचे शब्द आहेत.
धन्यवाद स्तोत्र.
100 हे पृथ्वी, परमेश्वरासाठी गा.
2 परमेश्वराची सेवा करताना आनंदी राहा.
परमेश्वरासमोर आनंदी गाणी घेऊन या.
3 परमेश्वरच देव आहे हे लक्षात घ्या.
त्यानेच आपल्याला निर्माण केले.
आपण त्याची माणसे आहोत.
आपण त्याची मेंढरे आहोत.
4 त्याच्या शहरात धन्यवादाची गाणी घेऊन या.
त्याच्या मंदिरात स्तुतिगीते घेऊन या.
त्याला मान द्या.
त्याच्या नावाचा जयजयकार करा.
5 परमेश्वर चांगला आहे.
त्याचे प्रेम चिरंजीव आहे.
आपण त्याच्यावर कायम विश्वास टाकू शकतो.
पौलाची प्रार्थना
15-16 यासाठी, जेंव्हापासून मी तुमच्या प्रभु येशूवरील विश्वासाविषयी ऐकले आणि देवाच्या लोकांबद्दलच्या तुमच्या प्रेमाविषयी ऐकले, तेव्हापासून तुमच्यासाठी देवाचे उपकार मानण्याचे मी थांबविले नाही. 17 मी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, तुम्हाला ज्ञान व प्रकटीकरणाचे आध्यात्मिक सामर्थ्य जे पित्याविषयीचे ज्ञान तुम्हांला पुरवील, ते देवो.
18 मी असे सांगतो की, तुमच्या अंतःकरणाचे डोळे प्रकाशित होवोत यासाठी की तुम्हाला तुमच्या पाचारणाची आशा व संतांमध्ये त्याच्या वतनाच्या वैभवाची श्रीमंती किती आहे हे कळावे. 19 आणि आम्हांला विश्वासणाऱ्यांसाठी त्याचे अतुलनीय सामर्थ्य किती महान आहे, जणू काय त्याच्या प्रचंड सामर्थ्याचा तो सराव आहे. 20 जो तो ख्रिस्तामध्ये करतो. जेव्हा त्याला (ख्रिस्ताला) मरणातून उठविले आणि स्वर्गाच्या राज्यात देवाच्या उजव्या हाताला बसविले. 21 देवाने ख्रिस्ताला प्रत्येक अधिपती, अधिकारी, सामर्थ्य, प्रभूत्व आणि प्रत्येक सामर्थ्याचे नाव जे या युगातच नव्हे तर येणाऱ्या युगातही दिले जाईल त्या सर्वांपेक्षा उंच ठिकाणी ठेवले. 22 आणि देवाने ख्रिस्ताला मंडळीचा सर्वोच्च प्रमुख केले. 23 मंडळी ख्रिस्ताचे शरीर आहे. जी पूर्णता त्याने सर्व गोष्टींमध्ये सर्व रीतीने भरली आहे, ती पूर्णता तो मंडळीला देतो.
मनुष्याचा पुत्र सर्वाचा न्याय करील
31 “मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी आसनावर बसेल. 32 मग सर्व राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र जमतील. त्यांना तो एकमेकांपासून विभक्त करील. ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढरे शेरडांपासून वेगळी करतो. 33 तो मेंढरांना आपल्या उजवीकडे बसवील पण शेरडांना तो डावीकडे बसवील.
34 “मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या, जे तुम्ही माझ्या पित्याचे आशीर्वादित आहात! जे तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा. हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तयार केले आहे. 35 हे तुमचे राज्य आहे कारण जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले. मी प्रवासी असता तुम्ही माझा पाहुणचार केलात 36 मी कपड्यांशिवाय होतो तेव्हा तुम्ही मला कपडे दिलेत. मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतलीत. मी तुरूंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे समाचारासाठी आलात.
37 “मग जे नीतिमान आहेत ते उत्तर देतील, ‘प्रभु आम्ही तुला केव्हा भुकेला व तहानेला पाहिला आणि तुला खायला आणि प्यायला दिले? 38 आम्ही तुला प्रवासी म्हणून कधी पाहिले आणि तुझा पाहुणचार केला? किंवा आम्ही तुला केव्हा उघडे पाहिले व कपडे दिले? 39 आणि तू आजारी असताना आम्ही तुला कधी भेटायला आलो? किंवा तुरूंगात असताना कधी तुझ्या समाचारास आलो?’
40 “मग राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खरे सांगतो: येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.’
41 “मग राजा आपल्या डाव्या बाजूच्यांना म्हणेल, ‘माझ्यापासून दूर जा, तुम्ही शापित आहात, अनंतकाळच्या अग्नीत जा. हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे. 42 ही तुमची शिक्षा आहे कारण मी भुकेला होतो पण तुम्ही मला काही खायला दिले नाही, मी तहानेला होतो पण तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही. 43 मी प्रवासी असता माझा पाहुणचार केला नाही. मी वस्त्रहीन होतो. पण तुम्ही मला कपडे दिले नाहीत. मी आजारी आणि तुरूंगात होतो पण तुम्ही माझी काळजी घेतली नाही.’
44 “मग ते लोक सुद्धा त्याला उत्तर देतील, ‘प्रभु आम्ही कधी तुला उपाशी अगर तहानेले पाहिले किंवा प्रवासी म्हणून कधी पाहिले? किंवा वस्त्रहीन, आजारी किंवा तुरूंगात कधी पाहिले आणि तुला मदत केली नाही?’
45 “मग राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खरे सांगतो: माझ्या अनुयायांतील लहानातील लहानाला काही करण्याचे जेव्हा जेव्हा तुम्ही नाकारले, तेव्हा तेव्हा ते तुम्ही मला करण्याचे नाकारले.’
46 “मग ते अनीतिमान लोक अनंतकाळच्या शिक्षेसाठी जातील, पण नीतिमान अनंतकाळच्या जीवनासाठी जातील.”
2006 by World Bible Translation Center