Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 83:1-4

आसाफाचे स्तोत्र

83 देवा, गप्प राहू नकोस.
    तुझे कान बंद करु नकोस.
    देवा, कृपा करुन काही तरी बोल.
देवा, तुझे शत्रू तुझ्याविरुध्द योजना आखत आहेत.
    ते लवकरच हल्ला करतील.
ते तुझ्या लोकांविरुध्द गुप्त योजना आखत आहेत.
    ते तू ज्या माणसांवर प्रेम करतोस त्या माणसांविरुध्दच्या योजनाची चर्चा करत आहेत.
ते शत्रू म्हणत आहेत, “या त्यांचा पूर्णनिपात करु.
    यानंतर कोणालाही ‘इस्राएल’ या शब्दाची आठवण सुध्दा येणार नाही.”

स्तोत्रसंहिता 83:9-10

देवा, तू जसा मिद्यानचा, सीसरा व याबीन यांचा
    किशोन नदीजवळ पराभव केलास तसाच तू शत्रूचा पराभव कर.
10 तू त्यांचा एन-दोर येथे पराभव केलास
    आणि त्यांची प्रेते जमिनीवर कुजली आणि त्यांचे खत बनले.

स्तोत्रसंहिता 83:17-18

17 देवा, त्या लोकांना खूप घाबरवून सोड आणि त्यांना कायमचे लज्जित कर.
    त्यांना काळीमा फास आणि त्यांचा नाश कर.
18 नंतर त्यांना तू देव आहेस हे कळेल.
    तुझे नाव यहोवा आहे हे त्यांना कळेल.
तू सर्वशक्तिमान देवच सर्व जगाचा देव आहेस
    हे ही त्यांना कळेल.

एस्तेर 7

हामानला फाशी

तेव्हा राजा आणि हामान राणी एस्तेरकडे भोजनाला गेले. मेजवानीच्या या दुसऱ्या दिवशी ते द्राक्षारस घेत असताना राजाने पुन्हा एस्तेरला विचारले, “राणी एस्तेर, तुला काय हवे आहे? काहीही माग. ते तुला मिळेल. काय हवे तुला? तुला मी काहीही देईन. अगदी अर्धे राज्य देखील.”

तेव्हा राणी म्हणाली, “राजा, तुला मी आवडत असेन आणि तुझी मर्जी असेल तर कृपा करून मला जगू दे. माझ्या लोकांनाही जगू दे. एवढेच माझे मागणे आहे. कारण, पुरते नेस्तनाबूत होण्यासाठी, मारले जाण्यासाठी मी आणि माझे लोक विकले गेलो आहोत. आमची नुसती गुलाम म्हणून विक्री झाली असती तरी मी गप्प राहिले असते. कारण राजाला तसदी देण्याइतकी ती समस्या गंभीर ठरली नसती.”

तेव्हा राजा अहश्वेरोशने राणी एस्तेरला विचारले, “असे तुमच्या बाबतीत कोणी केले? तुझ्या लोकांच्या बाबतीत असे करण्याचे धाडस करणारा कोण तो माणूस?”

एस्तेर म्हणाली, “तो आपल्या समोरच आहे. हाच तो दुष्ट हामान आमचा शत्रू.”

तेव्हा राजा आणि राणीसमोर हामान भयभीत झाला. राजाला अतिशय संताप आला. द्राक्षारस तसाच टाकून तो उठला आणि बाहेर राजबागेत गेला. पण हामान आपले प्राण वाचवण्याची याचना करत आत राणी एस्तेरजवळच थांबला. राजाने आपला वध करायचे ठरवले आहे याची कल्पना असल्यामुळे तो आपल्या प्राणांची भीक मागू लागला. बागेतून राजा मेजवानीच्या दालनात येत असतानाच, ज्या आसनावर एस्तेर बसली होती त्यावर हामानला पडताना राजाने पाहिले. तेव्हा संतापून राजा म्हणाला, “मी घरात असतानाच राणीवर जबरदस्ती करणार आहेस की काय?”

राजा असे म्हणाल्याबरोबर सेवक आत आले आणि त्यांनी हामानचे तोंड झाकले. हर्बोना नावाचा राजाचा खोजा म्हणाला, “हामानच्या घराजवळ पंचाहत्तर फूट उंचीचा वधस्तंभ उभारला आहे. मर्दखयला फाशी द्यायला त्याने तो उभारला होता. तुम्हाला ठार करायचा कट उघडकीला आणून ज्याने तुम्हाला मदत केली तोच हा मर्दखय.”

राजा म्हणाला, “हामानला त्या स्तंभावरच फाशी द्या.”

10 तेव्हा मर्दखयसाठी उभारलेल्या स्तंभावर हामानला फाशी देण्यात आली. राजाचा क्रोध शमला.

मत्तय 24:45-51

चांगला व वईट सेवक(A)

45 “शहाणा आणि विश्वासू सेवक कोण बरे? दुसऱ्या सेवकांना वेळेवर जेवण देण्याचे काम मालक एका सेवकावर सोपवितो. हे काम करण्यासाठी मालक कोणाला विश्वासाने सांगेल? 46 मालक आल्यावर आपले दिलेले काम करीत असलेला सेवक खरोखर धन्य! 47 मी तुम्हांला सांगतो: मालक आपल्या सर्व मालमत्तेवर त्या सेवकाची नेमणूक करील.

48 “पण जर सेवक वाईट निघाला आणि आपला मालक लवकर घरी परत येणार नाही असे म्हणाला तर काय होईल? 49 तो सेवक इतर सेवकांना मारहाण करील आणि आपल्यासारख्या लोकांबरोबर जेवण करील आणि दारू पिऊन मस्त होईल. 50 आणि तो सेवक तयारीत नसेल अशा वेळी मालक येईल. 51 मग मालक त्या सेवकाचे तुकडे करील. त्या सेवकाला मालक ढोंगी लोकांबरोबर राहायला पाठवील. आणि त्या ठिकाणी रडणे व दात खाणे चालेल.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center