Revised Common Lectionary (Semicontinuous)
आसाफाचे स्तोत्र
83 देवा, गप्प राहू नकोस.
तुझे कान बंद करु नकोस.
देवा, कृपा करुन काही तरी बोल.
2 देवा, तुझे शत्रू तुझ्याविरुध्द योजना आखत आहेत.
ते लवकरच हल्ला करतील.
3 ते तुझ्या लोकांविरुध्द गुप्त योजना आखत आहेत.
ते तू ज्या माणसांवर प्रेम करतोस त्या माणसांविरुध्दच्या योजनाची चर्चा करत आहेत.
4 ते शत्रू म्हणत आहेत, “या त्यांचा पूर्णनिपात करु.
यानंतर कोणालाही ‘इस्राएल’ या शब्दाची आठवण सुध्दा येणार नाही.”
9 देवा, तू जसा मिद्यानचा, सीसरा व याबीन यांचा
किशोन नदीजवळ पराभव केलास तसाच तू शत्रूचा पराभव कर.
10 तू त्यांचा एन-दोर येथे पराभव केलास
आणि त्यांची प्रेते जमिनीवर कुजली आणि त्यांचे खत बनले.
17 देवा, त्या लोकांना खूप घाबरवून सोड आणि त्यांना कायमचे लज्जित कर.
त्यांना काळीमा फास आणि त्यांचा नाश कर.
18 नंतर त्यांना तू देव आहेस हे कळेल.
तुझे नाव यहोवा आहे हे त्यांना कळेल.
तू सर्वशक्तिमान देवच सर्व जगाचा देव आहेस
हे ही त्यांना कळेल.
मोशे बाळ
2 लेवी वंशातील एक माणूस होता. त्याने लेवी वंशातीलच मुलगी बायको केली. 2 ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला; तो मुलगा फार सुंदर व देखणा आहे असे पाहून त्याच्या आईने त्याला तीन महिने लपवून ठेवले. 3 तो बाळ मुलगा असल्यामुळे सापडला जाईल व मारला जाईल अशी त्याच्या आईला भीती वाटली. तीन महिन्यानंतर तिने एक लव्हाव्व्याची पेटी तयार केली; ती पाण्यावर तरंगावी म्हणून तिने तिला आतून व बाहेरून डांबर लावले. तिने त्या तान्ह्या बाळाला पेटीत ठेवले; नंतर तिने ती पेटी नदीत उंच लव्हाव्व्यात ठेवली. 4 त्या बाळाची बहीण, त्याचे पुढे काय होते ते पाहण्यासाठी तेथून दूर बाजूला उभी राहिली.
5 त्याच वेळी फारोची मुलगी (राजकन्या) आंघोळ करण्यासाठी नदीवर गेली. तिच्या दासी नदीच्या किनाऱ्यावर फिरत होत्या. राजकन्येने उंच लव्हाव्व्यात ती पेटी पाहिली; आणि एका दासीला तिकडे जाऊन ती पेटी आणण्यास सांतगितले. 6 राजकन्येने ती पेटी उघडली तेव्हा तिला तिच्यात एक लहान बाळ दिसले, ते बाळ रडत होते, म्हणून तिला त्याच्याबद्दल फार वाईट वाटले! ती म्हणाली, “हा बाळ कोणातरी इब्री म्हणजे इस्राएलच्या कुटुंबात जन्मलेला मुलगा आहे.”
7 मग आतापर्यत लपून बसलेली ती बाळाची बहीण राजकन्येकडे गेली व म्हणाली, “या बाळाची काळजी घेण्यासाठी मी जाऊन एखादी इब्रीदाई शोधून आणू का?”
8 राजकन्येने उत्तर दिले, “होय कृपाकरून लवकर घेऊन ये.”
तेव्हा ती मुलगी गेली व त्या बाळाच्या आईलाच घेऊन आली.
9 राजकन्या त्या बाईला म्हणाली, “बाई, ह्या बाळाला घरी घेऊन जा, व माझ्याकरिता त्याला दूध पाज आणि त्याची चांगली काळजी घे; त्याबद्दल मी तुला मोबदला देईन.”
तेव्हा त्या बाईने ते बाळ घेतले आणि त्याची योग्य काळजी घेतली. 10 ते मूल वाढले. मग काही काळानंतर एके दिवशी ती बाई त्या बाळाला घेऊन राजकन्येकडे आली; तेव्हा राजकन्येने ते बाळ घेतले आणि त्याला आपला स्वतःचा मुलगा म्हणून स्वीकारले; तिने त्याचे नांव मोशे ठेवले कारण तिने त्याला पाण्यातून उचलून घेतले होते.
शेवटच्या सूचना आणि सलाम
12 परंतु बंधूंनो, आम्ही तुम्हांला विनंति करतो, की जे तुम्हामध्ये श्रम व प्रभुमध्ये मार्गदर्शन करतात आणि शिक्षण देतात, त्यांना तुम्ही मान द्या. 13 आम्ही तुम्हाला अशी विनंति करतो की, त्यांनी तुमच्याबरोबर केलेल्या कामामुळे त्यांना प्रेमाने मोठा मान द्या.
एकमेकांबरोबर शांतीने राहा. 14 बंधूंनो, आम्ही तुम्हाला आग्रह करतो की, “आळशी लोकांना ताकीद द्या.” भित्र्यांना उत्तेजन द्या आणि अशक्तांना मदत करा. व सर्व लोकांबरोबर सहनशीलतेने राहा. 15 कोणीही वाईटाची फेड वाईटाने करु नये म्हणून लक्षात ठेवा. परंतु नेहमी एकमेकांचे आणि सर्व लोकांचे चांगले करण्याचा प्रयत्न करा.
16 सर्वदा आनंद करा. 17 नेहमी प्रार्यना करीत राहा. 18 प्रत्येक परिस्थितीत देवाचे उपकार माना.
2006 by World Bible Translation Center