Revised Common Lectionary (Semicontinuous)
दबोरा, स्त्री न्यायाधीश
4 एहूदच्या मृत्यूनंतर पुन्हा लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने निंद्य वर्तन करायला सुरुवात केली. 2 तेव्हा परमेश्वराने कनानी राजा याबीन याला इस्राएल लोकांचा पराभव करु दिला. हासोर नावाच्या नगरात हा राजा राज्य करत होता. सीसरा हा त्याचा सेनापती होता. हरोशेथ या नगरात सीसरा राहात होता. 3 सीसराकडे नऊशे लोखंडी रथ होते. त्याच्या जुलमी राजवटीत इस्राएल लोक वीस वर्षे होते. तेव्हा त्यांनी परमेश्वराकडे मदतीची याचना केली.
4 तेव्हा दबोरा नांवाची एक संदेष्ट्री होती. ती लप्पिदोथ नांवाच्या माणसाची पत्नी होती. ती इस्राएल लोकांची न्यायाधीश होती. 5 एक दिवस ती खजुरीच्या झाडाखाली बसलेली असताना सीसराबद्दल विचार विनिमय करण्यासाठी इस्राएल लोक तिच्याकडे आले. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रामा व बेथल यांच्यामध्ये हे खजुरीचे झाड होते. 6 तिने बाराक नामक माणसाला बोलावणे पाठवले. बाराक हा अबीनवामचा मुलगा होता. तो नफतालीच्या भागातील केदेश या नगरात राहात असे. दबोरा त्याला म्हणाली, “इस्राएल लोकांच्या परमेश्वराची तुला आज्ञा आहे की, नफताली आणि जबुलून यांच्या वंशातील दहाहजार पुरुषांना गोळा कर. त्यांना घेऊन ताबोर डोंगराकडे जा. 7 मी सेनापती सीसरा याला रथ आणि सैन्य यासह किशोन नदीकडे तुझ्या दिशेला यायला लावीन. तेथे सीसराचा पराभव करायला मी तुला मदत करीन.”
वर व मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र.
123 देवा, मी वर बघून तुझी प्रार्थना करतो.
तू स्वर्गात राजा म्हणून बसतोस.
2 गुलाम त्यांना लागणाऱ्या वस्तूंसाठी
मालकावर अवलंबून असतात.
3 त्याच प्रमाणे आपण परमेश्वरावर, आपल्या देवावर अवलंबून असतो.
आपल्यावर दया करावी म्हणून आपण देवाची वाट बघतो.
4 परमेश्वरा, आमच्याशी दयाळू राहा.
खूप काळापासून आमचा अपमान होत आला आहे म्हणून तू दयावंत हो.
५गर्विष्ठ लोकांनी आमचा खूप काळ अपमान केला.
ते इतर लोकांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटते.
प्रभूच्या येण्यासाठी तयार राहा
5 बंधूंनो, वेळ आणि तारीखवार मी तुम्हांला लिहिण्याची गरज नाही. 2 कारण तुम्ही स्वतःचे हे चांगल्या प्रकारे जाणता की, प्रभूच्या परत येण्याचा दिवस येईल. तो जणू काय रात्रीचा चोर जसा येतो तसा येईल. 3 जेव्हा लोक म्हणतात, “सगळीकडे शांतता व सुरक्षितता आहे.” तेव्हा त्यांच्यावर अचानक विनाश ओढवेल, ज्याप्रमाणे गर्भवती स्त्रिला अचानक वेदना होतात व मग ते सूटू शकणार नाहीत!
4 परंतु बंधूनो, त्या दिवसाने चोराप्रमाणे अचानक येऊन आपल्याला गाठून आश्चर्यात टाकावे अशा प्रकारे आपण अंधारात नाही. 5 कारण तुम्ही सर्वजण प्रकाशाचे पुत्र आहात व दिवसाचे पुत्र आहा, आम्ही अंधाराचे किंवा रात्रीचे नाही. 6 म्हणून आपण इतरांसारखे झोपू नये. उलट आपण सावध राहू व आमच्या स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करु. 7 कारण जे झोपतात ते रात्री झोपतात व जे दारु पितात ते रात्री दारु पितात, 8 परंतु आपण दिवसाचे असल्याने स्वःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करु या. आपण विश्वास आणि प्रीतिचे छातीला उरस्त्राण घालू या. आणि आमचे शिरस्त्राण म्हणून तारणाची आशा ठेवू या.
9 कारण देवाने आम्हाला त्याचा क्रोध सहन करण्यासाठी निवडले नाही, तर आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे तारण मिळावे म्हणून निवडले आहे. 10 तो आमच्यासाठी मरण पावला यासाठी की, आम्ही मेलेले असू किंवा जिवंत असू, जेव्हा येशू येईल तेव्हा आम्हाला त्याबरोबर एकत्र राहता यावे. 11 म्हणून एकमेकांना उत्तेजन द्या. आणि जसे आता तुम्ही करीत आहात तसे आध्यात्मिक रीतीने एकमेकांना पूर्ण मनाने बळकट करा.
तीन नोकरांची बोधकथा(A)
14 “स्वर्गाचे राज्य अशा मनुष्यासारखे आहे, जो प्रवासाला जाण्याअगोदर आपल्या नोकरांना बोलावून आपल्या मालमत्तेवर लक्ष देण्यास सांगणाऱ्या मनुष्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. 15 त्याच्यांतील एकाला त्याने पाच थैल्या रुपये दिले. दुसऱ्याला त्याने दोन थैल्या रुपये दिले आणि तिसऱ्याला त्याने एक थैली रुपये दिले. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे त्याने पैसे दिले. मग तो आपल्या प्रवासाला गेला. 16 ज्याला पाच थैल्या रुपये दिले होते त्याने त्याप्रमाणे काम करायला सुरूवात केली आणि आणखी पाच थैल्या रुपये त्याने मिळविळे. 17 त्याचप्रमाणे, ज्याला दोन थैल्या रूपये मिळले होते त्याने आणखी दोन थैल्या रुपये कमविले. 18 पण ज्याला एक थैली मिळाली होती, त्याने जमिनीत एक खड्डा खोदला आणि मालकाचे पैसे त्यात लपविले.
19 “बराच काळ लोटल्यांनंतर त्या नोकरांचा मालक आला व त्याने त्यांचा हिशेब घ्यायला सुरुवात केली. 20 ज्याला पाच थैल्या रुपये मिळाले होते, त्याने मालकाकडे रुपयाच्या आणखी पाच थैल्या आणून दिल्या, तो म्हणाला, ‘मालक, तुम्ही दिलेल्या रुपयांवर मी आणखी पाच थैल्या रुपये मिळविले.’
21 “त्याचा मालक म्हणाला, ‘शाब्बास, चांगल्या आणि इमानी दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य नोकर आहेस. त्या थोड्या पैशांचा तू चांगला वापर केलास म्हणून मी पुष्कळांवर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो!’
22 “नंतर ज्या मनुष्याला रुपयांच्या दोन थैल्या मिळाल्या होत्या, तो मालकाकडे आला आणि म्हणाला, ‘मालक, तुम्ही मला रुपयांच्या दोन थैल्या दिल्या होत्या त्यापासून मी आणखी दोन थैल्या कमाविल्या.’
23 “मालक म्हणाला, ‘चांगल्या आणि इमानी दासा! तू थोड्या पैशाविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी तुझी आणखी पुष्कळशा गोष्टींवर नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो!’
24 “नंतर ज्याला रुपयाची एक थैली मिळाली होती तो मालकाकडे आला व म्हणाला, ‘मालक, मला माहीत होते की आपण एक करड्या शिस्तीचे मनुष्य आहात. जेथे पेरणी केली नाही तेथे तुम्ही कापणी करता आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेता. 25 मला आपली भीति होती. म्हणून मी जाऊन तुमच्या रुपयाची थैली जमिनीत लपवून ठेवली. हे घ्या! हे तुमचेच आहेत!’
26 “मालकाने उत्तर दिले, ‘अरे वाईट आणि आळशी नोकरा! मी जेथे पेरणी केली नाही तेथे कापणी करतो आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेतो, हे तुला माहीत होते. 27 तर तू माझे पैसे पेढीत ठेवायचे होतेस म्हणजे मी घरी आल्यावर मला व्याजासहित पैसे मिळाले असते.’
28 “म्हणून मालकाने दुसऱ्या नोकरांना सांगितले, ‘याच्याजवळची रुपयांची थैली घ्या आणि ज्याच्याजवळ रुपयांच्या दहा थैल्या आहेत त्याला द्या. 29 कारण आपल्याकडे जे आहे, त्याचा वापर करणाऱ्याला आणखी देण्यात येईल, आणि त्याला त्याच्या गरजेपेक्षा जास्त मिळेल. पण जो आपल्याजवळ असलेल्याचा उपयोग करीत नाही त्याच्याजवळ जे काही असेल ते सर्व त्याजपासून काढून घेण्यात येईल.’ 30 नंतर मालक म्हणाला, ‘त्या निकामी नोकराला बाहेरच्या अंधारात घालवून द्या. तेथे रडणे व दात खाणे चालेल.’
2006 by World Bible Translation Center