Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 78

आसाफाचे मास्कील.

78 लोकहो! माझी शिकवण ऐका,
    मी काय सांगतो ते ऐका!
मी तुम्हांला ही गोष्ट सांगेन.
    मी तुम्हांला ही जुनी गोष्ट सांगेन.
आम्ही ती गोष्ट ऐकली आणि आम्हाला ती चांगली माहीत आहे.
    आमच्या वाडवडिलांनी आम्हाला ती गोष्ट सांगितली होती.
आणि आम्ही ती विसरणार नाही.
    आमचे लोक शेवटच्या पिढीपर्यंत ती गोष्ट सांगत राहातील.
आम्ही परमेश्वराची स्तुती करु
    आणि त्याने केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल सांगत राहू.
परमेश्वराने याकोबा बरोबर करार केला.
    देवाने इस्राएलला कायदा दिला.
    देवाने आमच्या पूर्वजांना आज्ञा दिल्या.
    त्याने आमच्या पूर्वजांना त्यांच्या वंशजांना नियम शिकवायला सांगितला.
नवीन मुले जन्माला येतील, तीच पुढे मोठी होतील आणि ती त्यांच्या मुलांना गोष्टी सांगतील
    या प्रमाणे लोकांना अगदी शेवटच्या पिढीपर्यंत नियम समजेल.
म्हणून ते सगळे लोक देवावर विश्वास ठेवतील.
    देवाने जे केले ते ते विसरणार नाहीत.
    ते अत्यंत सावधगिरीने त्याच्या आज्ञा पाळतील.
जर लोकांनी त्यांच्या देवाच्या आज्ञा त्यांच्या मुलांना शिकविल्या तर ती मुले त्यांच्या पूर्वजांसारखी होणार नाहीत.
    त्यांचे पूर्वज देवाविरुध्द गेले.
त्यानी देवाच्या आज्ञा पाळायचे नाकारले.
    ते लोक फार हट्टी होते ते देवाच्या आत्म्याशी प्रामाणिक नव्हते.

एफ्राइमच्या लोकांजवळ शस्त्रे होती.
    परंतु ते रणांगणावरुन पळून गेले.
10 त्यांनी देवाबरोबर झालेला त्यांचा करार पाळला नाही.
    त्यांनी त्याची शिकवण आचरायला नकार दिला.
11 एफ्राईमचे लोक देवाने केलेल्या महान गोष्टी विसरले.
    देवाने दाखवलेल्या अद्भुत गोष्टी ते विसरले.
12 मिसर देशातल्या सोअन प्रांतात देवाने
    त्यांच्या वाडवडिलांना त्याची महान शक्ती दाखवली.
13 देवाने लाल समुद्र दुभंगला आणि लोकांना पलिकडे नेले.
    पाणी एखाद्या भिंतीसारखे त्यांच्या दोन्ही बाजूला उभे होते.
14 देव रोज त्यांना उंच मेघाच्या साहायाने दिवसा
    व रात्री अग्नीच्या प्रकाशात मार्ग दाखवीत नेत असे.
15 देवाने वाळवंटात पाषाण फोडला
    त्याने लोकांना पृथ्वीच्या गर्भातून पाणी दिले.
16 देवाने खडकातून नदीसारखे
    खळखळणारे पाणी बाहेर आणले.
17 परंतु लोकांनी देवाविरुध्द पाप करणे चालूच ठेवले.
    ते वाळवंटात सुध्दा सर्वशक्तिमान परमेश्वराच्या विरुध्द गेले.
18 नंतर त्या लोकांनी देवाची परीक्षा घ्यायचे ठरवले.
    त्यांनी त्यांची भूक भागवण्यासाठी देवाकडे अन्नाची मागणी केली.
19 त्यांनी देवाविरुध्द तक्रारी केल्या.
    ते म्हणाले, “देव आम्हांला वाळवंटात अन्न देऊ शकेल का?
20 त्याने दगडाला प्रहार केला आणि त्यातून पुरासारखे पाणी बाहेर येऊ लागले
    तो आम्हांला भाकरी आणि मांस नक्कीच देईल.”
21 त्या लोकांनी म्हटलेले परमेश्वराने ऐकले.
    देव याकोबावर फार रागावला देव इस्राएलवर फार रागावला.
22     का? कारण लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.
देव त्यांना वाचवील यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही.
23-24 पण नंतर देवाने ढग बाजूला केले
    आणि त्यातून त्याने त्यांच्यावर अन्नासाठी मान्नाचा वर्षाव केला.
आकाशाचे दरवाजे उघडावेत तसा हा प्रकार होता
    आणि आकाशातील गोदामातून धान्याचा वर्षाव होत राहिला.
25 लोकांनी देवदूताचे अन्न खाल्ले.
    देवाने त्यांचे समाधान करण्यासाठी भरपूर अन्न पाठवले.
26-27 देवाने पूर्वेकडचा घोंगावणारा वारा पाठवला
    आणि त्यांच्यावर लावे पक्षी पावसाप्रमाणे कोसळले
देवाने दक्षिणेकडून वारा वाहायला लावला
    आणि निळे आकाश काळे झाले कारण आकाशात खूप पक्षी होते.
28 ते पक्षी छावणीच्या अगदी मध्य भागी,
    त्या लोकांच्या तंबूच्या अवती भोवती पडले.
29 त्यांच्याकडे भरपूर खायला होते
    परंतु त्यांनी त्यांच्या भुकेलाच पाप करायला लावले.
30 त्यांना त्यांची भूक आवरली नाही,
    म्हणून त्यांनी ते पक्षी रक्त काढल्याशिवायच खाल्ले.
31 देव त्यांच्यावर खूप रागावला आणि त्याने त्यांतल्या अनेकांना मारुन टाकले.
    त्यातल्या अनेक निरोगी तरुण माणसांना देवाने मारले.
32 परंतु लोकांनी पुन्हा पाप केले.
    देव ज्या अद्भुत गोष्टी करतो त्यांवर ते अवलंबून राहिले नाहीत.
33 म्हणून देवाने त्यांचे कवडी मोलाचे
    आयुष्य भयानक संकटात संपवले.
34 देवाने जेव्हा जेव्हा त्यातल्या काहींना ठार मारले तेव्हा तेव्हा उरलेले लोक पुन्हा त्याच्याकडे वळले.
    ते देवाकडे धावत परतले.
35 देव त्यांचा खडक आहे याची आठवण त्यांना आली.
    सर्वशक्तिमान देवाने त्यांना वाचवले याची त्यांना आठवण झाली.
36 आपण देवावर प्रेम करतो असे ते म्हणाले परंतु ते खोटे बोलले,
    ते मनापासून बोलत नव्हते.
37 त्यांचे मन खरोखरच देवाजवळ नव्हते.
    ते कराराशी प्रामाणिक नव्हते.
38 परंतु देव दयाळू होता.
    देवाने त्यांना त्यांच्या पापांबद्दल क्षमा केली आणि त्याने त्यांचा नाश केला नाही.
देवाने अनेक वेळा स्वत:चा राग आवरला.
    त्याने स्वत:ला खूप राग येऊ दिला नाही.
39 ती केवळ माणसेच आहेत याची देवाने आठवण ठेवली.
    लोक वाऱ्याप्रमाणे आहेत. तो वाहातो आणि ओसरतो.
40 त्या लोकांनी वाळवंटात देवाला अनेक संकटांत टाकले
    त्यांनी त्याला खूप दु:खी केले.
41 मग लोकांनी पुन्हा पुन्हा देवाच्या सहनशक्तीची परीक्षा घेतली,
    त्यांनी इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराला खूप दु:ख दिले.
42 ते लोक देवाची शक्ती विसरले.
    देवाने त्यांचा किती वेळा त्यांच्या शत्रूंपासून बचाव केला हे ते विसरले.
43 मिसर देशातल्या चमत्कारा बाबत ते विसरले.
    सोअन प्रांतातला चमत्कारही ते विसरले.
44 देवाने नद्यांचे रक्तात रुपांतर केले.
    मिसरमधले लोक पाणी पिऊ शकले नाहीत.
45 देवाने चावणाऱ्या माशांचे थवे पाठवले.
    ते मिसरमधल्या लोकांना चावले, देवाने बेडूक पाठवले.
    त्यांनी मिसरमधल्या लोकांच्या आयुष्याचा नाश केला.
46 देवाने त्यांची पिके नाकतोड्यांच्या हवाली केली
    आणि इतर झाडांवर टोळ धाड पाठवली.
47 देवाने त्यांच्या द्राक्षवेलींचा नाश करण्यासाठी गारांचा पाऊस पाडला
    आणि झाडांचा नाश करण्यासाठी त्याने बर्फाचा उपयोग केला.
48 देवाने गारांच्या वर्षावाने त्यांच्या प्राण्यांचा नाश केला
    आणि त्यांच्या पशुधनावर त्याने वीज पाडली.
49 देवाने मिसरच्या लोकांना आपला राग दाखवला.
    त्याने त्याचे विध्वंसक दूत त्यांच्याविरुध्द पाठवले.
50 देवाने आपला राग व्यक्त करण्यासाठी एक मार्ग शोधला.
    त्याने त्या लोकांपैकी कुणालाही जगू दिले नाही.
    त्याने त्यांना एका भयंकर रोगाचे बळी केले.
51 देवाने मिसरमध्ये जन्मलेल्या सर्व पहिल्या मुलांना मारुन टाकले.
    त्याने हाम कुटुंबात जन्मलेल्या पहिल्या मुलांनाही मारले.
52 नंतर देवाने इस्राएलला मेंढपाळा सारखे नेले.
    त्याने त्याच्या लोकांना मेंढ्यासारखे वाळवंटात नेले.
53 त्याने त्याच्या माणसांना काळजीपूर्वक मार्गदर्शन केले
    देवाच्या माणसांना कशाचीच भीती वाटली नाही.
    देवाने त्यांच्या शत्रूंना लाल समुद्रात बुडविले.
54 देवाने त्याच्या माणसांना त्याच्या पवित्र देशात
    त्याने त्याच्या सामर्थ्याने घेतलेल्या डोंगरावर नेले.
55 देवाने इतर देशांना ती जमीन सोडून जायला भाग पाडले.
    देवाने प्रत्येक कुटुंबाला जमिनीचा त्यांचा हिस्सा दिला.
    देवाने इस्राएलाच्या प्रत्येक कुटुंबाला राहायला स्वःतचे घर दिले.
56 परंतु त्यांनी सर्वशक्तिमान देवाची परीक्षा घेतली आणि त्याचे त्याला खूप वाईट वाटले.
    त्या लोकांनी देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत.
57 इस्राएलाच्या लोकांनी देवाकडे पाठ फिरवली.
    जसे त्याचे पूर्वज त्याच्याविरुध्द गेले तसेच ते त्याच्या विरुध्द गेले.
    ते वाकवलेल्या धनुष्याप्रमाणे अतिशय वाईट होते.
58 इस्राएलाच्या लोकांनी प्रार्थनेसाठी उंच जागा बांधल्या आणि देवाला क्रोधित केले.
    त्यांनी चुकीच्या देवाचे पुतळे केले आणि देवाला असूया आणली.
59 देवाने हे ऐकले आणि तो खूप रागावला,
    देवाने इस्राएलला पूर्णपणे झिडकारले.
60 देवाने शिलोहचा पवित्र तंबू सोडून दिला.
    देव लोकांच्या बरोबर त्यांच्या तंबूत राहिला.
61 देवाने इतर देशांना त्याच्या माणसांना पकडू दिले.
    शत्रूंनी देवाचे “सुंदर रत्न” घेतले.
62 देवाने त्याच्या माणसांवरचा त्याचा राग व्यक्त केला,
    त्याने त्यांना युध्दात मरु दिले.
63 तरुण माणसे जळून मेली आणि ज्या मुलींशी ते लग्न करणार होते
    त्यांनी विवाहाची गाणी म्हटली नाहीत.
64 याजक मारले गेले पण विधवा
    त्यांच्यासाठी रडल्या नाहीत.
65 शेवटी आमचा प्रभु झोपेतून उठलेल्या माणसासारखा,
    खूप द्राक्षारस प्यायलेल्या सैनिकासारखा उठला.
66 देवाने त्याच्या शत्रूंना माघार घ्यायला भाग पाडले आणि त्यांचा पराभव केला.
    देवाने त्याच्या शत्रूचा पराभव केला आणि त्यांना कायमची नामुष्की आणली.
67 परंतु देवाने योसेफाच्या कुटुंबाला झिडकारले,
    देवाने एफ्राईमच्या कुटुंबाचा स्वीकार केला नाही.
68 नाही, देवाने यहुदाच्या कुटुंबाला निवडले,
    देवाने त्याच्या आवडत्या सियोन पर्वताची निवड केली.
69 देवाने त्याचे पवित्र मंदिर उंच पर्वतावर बांधले.
    देवाने त्याचे मंदिर पृथ्वीसारखे कायमचे राहील असे बांधले.
70 देवाने दावीदाला स्वत:चा खास सेवक म्हणून निवडले.
    दावीद मेंढ्यांच्या वाड्यांचे रक्षण करीत होता.
    परंतु देवाने त्याला त्याच्या कामापासून दूर नेले.
71 दावीद मेंढ्यांची काळजी घेत होता.
    परंतु देवाने त्याला त्या कामापासून दूर नेले.
देवाने दावीदाला त्याच्या माणसांकडे, याकोबाच्या माणसांकडे,
    इस्राएलाच्या माणसांकडे आणि देवाच्या मालमत्तेकडे लक्ष देण्याचे काम करायला सांगितले.
72 आणि दावीदाने त्यांना शुध्द मनाने मार्ग दाखवला,
    त्याने त्यांना शहाणपणाने मार्ग दाखवला.

यहोशवा 24:25-33

25 मग यहोशवाने त्या दिवशी शखेम या नगतरात लोकांशी करार केला. त्यांनी पाळायचे नियम सांगितले. 26 त्याने ही वचने परमेश्वराच्या नियमशास्त्रात लिहिली. मग एक मोठा दगड निवडून तो परमेश्वराच्या निवासस्थाना जवळच्या एला वृक्षाखाली उभा केला. हा दगड या कराराची साक्ष होय.

27 मग यहोशवा सर्वांना उद्देशून म्हणाला, “आज आपण जे बोललो ते सर्व या दगडामुळे तुमच्या लक्षात राहील. परमेश्वर आज आमच्याशी बोलला तेव्हा हा दगड येथेच होता. तेव्हा आजच्या घटनेचे स्मरण म्हणून हा दगड राहिल. तुमच्याविरुद्ध हा साक्ष राहील. तुम्ही परमेश्वर देवाकडे पाठ फिरवायला लागलात तर हा तुम्हाला थोपवील.”

28 एवढे झाल्यावर यहोशवाने लोकांना घरी परतायला सांगितले. तेव्हा सर्वजण आपापल्या ठिकाणी परत गेले.

यहोशवाचा मृत्यू

29 यानंतर नूनाचा पूत्र यहोशवा मरण पावला. त्याचे वय तेव्हा एकशेदहा वर्षे होते. 30 तिम्नथ सेरह या आपल्या वतनाच्या गावी त्याचे दफन करण्यात आले. गाश डोंगराच्या उत्तरेला एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात हे ठिकाण आहे.

31 यहोशवाच्या हयातीत आणि त्याच्या निधनानंतरही इस्राएल लोकांनी परमेश्वराची सेवा केली. परमेश्वराने इस्राएलासाठी काय केले हे पाहिलेली वडीलधारी माणसे जिवंत असताना लोक परमेश्वराची उपासना करत राहिले.

योसेफ घरी परततो

32 इस्राएल लोकांनी मिसरमधून बाहेर पडताना योसेफच्या अस्थी बरोबर बाळगल्या होत्या. त्या त्यांनी शखेम येथे पुरल्या. शखेम नावाच्या माणसाचे वडील हमोर याच्या मुलाबाळांकडून याकोबने हा भूभाग शंभर रौप्यमुद्रांना विकत घेतला होता. हा प्रदेश योसेफच्या मुलाबाळांच्या मालकीचा झाला.

33 अहरोनाचा मुलगा एलाजार हाही मरण पावला. एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील गिबा येथे त्याचे दफन करण्यात आले. एलाजारचा पुत्र फिनहास याला गिबा हा प्रदेश मिळाला.

1 करिंथकरांस 14:20-25

20 बंधूनो, तुमच्या विचार करण्यात मुलासारखे असू नका. त्याऐवजी दुष्टतेच्या बाबतीत लहान बाळासारखे निरागस परंतु आपल्या विचारात प्रौढ व्हा. 21 नियमशास्त्र म्हणते,

“इतर भाषा बोलणाऱ्याचा
    उपयोग करुन,
मी या लोकांशी बोलेन
    तरीसुद्धा ते माझे ऐकणार नाहीत.” (A)

हे असे प्रभु म्हणतो.

22 म्हणून इतर भाषांमध्ये बोलण्याचे दान हे विश्वासणाऱ्यांसाठी नसून अविश्वासणाऱ्यांसाठी आहे. 23 म्हणून जर संपूर्ण मंडळी एकत्र येते व प्रत्येकजण दुसऱ्या भाषेत बोलत असेल (आणि) जर एखादा बाहेरचा किंवा अविश्वासणारा आत आला, तर तुम्ही वेडे आहात असे ते तुम्हाला म्हणणार नाही का? 24 परंतु जर प्रत्येक जण संदेश देऊ लागला आणि जर अविश्वासणारा किंवा बाहेरचा आत आला, तर सर्वजण जे बोलत असतील त्यामुळे त्या ऐकणाऱ्याला त्याच्या पापाची जाणीव होते, ते सर्व त्याचा न्याय करतात; 25 त्याच्या अंतःकरणातील गुपिते माहीत होतात. आणि मग तो पालथा पडतो आणि देवाची उपासना करतो व म्हणतो “खरोखर देव तुमच्यामध्ये आहे!”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center