Revised Common Lectionary (Semicontinuous)
यहोशवाचा अखेरचा निरोप
24 यहोशवाने इस्राएल लोकांच्या सर्व वंशांना शखेम येथे एकत्र बोलावले. इस्राएलीं पैकी वडीलधारी मंडळी, न्यायाधीश, प्रमुख, अधिकारी या सर्वांना पुढे बोलावले. ही मंडळी परमेश्वरासमोर उभी राहिली.
2 मग यहोशवा सर्वांशी बोलला. तो म्हणाला, “इस्राएलच्या परमेश्वर देवाचे तुम्हाला काय सांगणे आहे ते आता मी तुम्हाला कळवतो. फार पूर्वी तुमचे पूर्वज फरात नदीच्या पलीकडे राहात होते. अब्राहाम आणि नाहोर यांचा बाप तेरह याच्या काळातील लोकांविषयी मी बोलत आहे. त्यावेळी हे लोक इतर दैवतांची पूजा करत होते. 3 पण मी, परमेश्वराने, तुमचा पूर्वज अब्राहाम याला नदीपलीकडल्या प्रदेशातून बाहेर काढले. कनान देशात त्याला बराच प्रवास घडवला आणि त्याला बरीच मुलेबाळे दिली. त्याला मी इसहाक हा त्याचा पुत्र दिला.
14 मग यहोशवा लोकांना म्हणाला, “तुम्ही आत्ताच परमेश्वराचे शब्द ऐकलेत. तुम्ही त्याची आदरपूर्वक उपासना केली पाहिजे आणि प्रामाणिक पणाने त्याची सेवा केली पाहिजे. तुमच्या पूर्वजांनी ज्या खोट्या दैवतांची पूजा केली त्यांचा त्याग करा. फरात नदीच्या पलीकडे आणि मिसरमध्ये ते फार पूर्वी घडून गेले. आता फक्त या परमेश्वराचीच सेवा करा.
15 “पण कदाचित् या परमेश्वराची सेवा करणे तुमच्या मनात नसेल. तर ती निवड आजच करा. कोणाची उपासना करायची ते ठरवा. फरात नदीच्या पलीकडच्या तीरावर तुमचे पूर्वज राहात असताना त्यांनी ज्या दैवतांची पूजा केली त्यांना तुम्ही भजणार का? की या प्रदेशात राहणाऱ्या अमोऱ्यांचे दैवत आपले मानणार? तुमचे तुम्हीच ते ठरवा. मी आणि माझे कुटुंबीय यांच्यापुरते बोलायचे तर आम्ही याच परमेश्वराची सेवा करु.”
16 मग लोकांनी उत्तर दिले, “हाच आमचा परमेश्वर त्याच्या सेवेत खंड पडणार नाही आम्ही इतर दैवतांची पूजा करण्यासाठी आपल्या परमेश्वराला सोडणार नाही. 17 आमच्या पूर्वजांना याच परमेश्वर देवाने मिसरमधून बाहेर आणले. ते आम्ही जाणतो. तेथे आम्ही दास होतो. पण परमेश्वराने तेथे आमच्यासाठी चमत्कार घडवले. आम्हाला तेथून बाहेर आणले. एवढेच नव्हे तर इतर प्रदेशांतून आम्ही प्रवास करताना त्यानेच आमचे रक्षण केले. 18 तेथील रहिवाश्यांना पराभूत करायला त्यानेच आम्हाला साहाय्य केले. आता आम्ही आहोत त्या भूमीवरील अमोरी लोकांचा पराभव करायलाही परमेश्वराचीच आम्हाला मदत झाली. तेव्हा आम्ही याच परमेश्वराची सेवा करणार. तोच आमचा देव आहे.”
19 त्यावर यहोशवा म्हणाला, “हे खरे नाही. सतत या परमेश्वराची सेवा करत राहणे तुम्हाला जमणार नाही. हा परमेश्वर देव पवित्र आहे. आपल्या लोकांनी इतर दैवतांची पूजा करण्याचा त्याला तिरस्कार वाटतो. तुम्ही त्याच्याकडे पाठ फिरवलीत तर तो तुम्हाला क्षमा करणार नाही. 20 तुम्ही या परमेश्वराचा त्याग करुन इतर दैवतांच्या भजनी लागलात तर तुमच्यावर संकटे कोसळतील. परमेश्वर तुमचा नाश करील. आजवर त्याने तुमचे भले केले आहे पण त्याच्या विरुद्ध गेलात तर तो तुमचा नाश करील.”
21 तेव्हा लोक यहोशवाला म्हणाले, “नाही! आम्ही या परमेश्वराचीच सेवा करु.”
22 यहोशवा त्यांना म्हणाला, “एकदा प्रत्येकाने स्वतःकडे आणि येथे जमलेल्या लोकांकडे पाहावे. या परमेश्वराचीच सेवा करायचे ठरवले आहे याबद्दल तुमच्या सर्वांच्या मनात खात्री आहे का? तुम्ही सर्वजण याला साक्षी आहात का?”
लोक उत्तरले, “होय निःसंशय! आम्ही सर्वांनी याच परमेश्वराची सेवा करायचे ठरवले आहे.”
23 तेव्हा यहोशवाने त्यांना सांगितले, “तर मग तुमच्यापैकी कोणाजवळ खोटे दैवत असतील तर ते टाकून द्या. इस्राएलांच्याच परमेश्वर देवावर मनोभावे निष्ठा ठेवा.”
24 लोक यहोशवाला म्हणाले, “आम्ही या परमेश्वर देवालाच मानतो. आम्ही त्याचेच फक्त ऐकू.”
25 मग यहोशवाने त्या दिवशी शखेम या नगतरात लोकांशी करार केला. त्यांनी पाळायचे नियम सांगितले.
आसाफाचे मास्कील.
78 लोकहो! माझी शिकवण ऐका,
मी काय सांगतो ते ऐका!
2 मी तुम्हांला ही गोष्ट सांगेन.
मी तुम्हांला ही जुनी गोष्ट सांगेन.
3 आम्ही ती गोष्ट ऐकली आणि आम्हाला ती चांगली माहीत आहे.
आमच्या वाडवडिलांनी आम्हाला ती गोष्ट सांगितली होती.
4 आणि आम्ही ती विसरणार नाही.
आमचे लोक शेवटच्या पिढीपर्यंत ती गोष्ट सांगत राहातील.
आम्ही परमेश्वराची स्तुती करु
आणि त्याने केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल सांगत राहू.
5 परमेश्वराने याकोबा बरोबर करार केला.
देवाने इस्राएलला कायदा दिला.
देवाने आमच्या पूर्वजांना आज्ञा दिल्या.
त्याने आमच्या पूर्वजांना त्यांच्या वंशजांना नियम शिकवायला सांगितला.
6 नवीन मुले जन्माला येतील, तीच पुढे मोठी होतील आणि ती त्यांच्या मुलांना गोष्टी सांगतील
या प्रमाणे लोकांना अगदी शेवटच्या पिढीपर्यंत नियम समजेल.
7 म्हणून ते सगळे लोक देवावर विश्वास ठेवतील.
देवाने जे केले ते ते विसरणार नाहीत.
ते अत्यंत सावधगिरीने त्याच्या आज्ञा पाळतील.
प्रभूचे येणे
13 बंधूंनो, तुम्हाला हे माहीत असावे अशी माझी इच्छा आहे, जे मेलेले आहेत, अशांसाठी इतरांसारखे दु:ख करु नये. कारण इतरांना आशा नाही. 14 कारण जर आम्ही विश्वास ठेवतो की येशू मेला होता आणि नंतर मरणातून पुन्हा जिवंत झाला, तसेच देवही येशूबरोबर, त्याच्यावर (येशूवर) विश्वास ठेवून मेलेले आहेत, त्यांना त्याप्रमाणे परत जिवंत करील.
15 आता आम्ही जे तुम्हांला सांगत आहोत तो एक संदेश आहे. जे आम्ही जिवंत आहोत, ते आम्ही प्रभूच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेपर्यंत तग धरु. जे मेलेले आहेत त्यांच्या अगोदर आम्ही निश्चितच जाणार नाही. 16 कारण, जेव्हा मोठ्याने मुख्य देवदूताच्या आवाजात आणि देवाच्या कर्ण्याच्या आवाजात आज्ञा दिली जाईल, तेव्हा, प्रभु स्वतः स्वर्गातून खाली उतरेल आणि जे ख्रिस्तात मेले होते ते प्रथम उठतील. 17 मग आपल्यापैकी जे जिवंत असतील ते प्रभूला अंतराळात भेटण्यासाठी त्यांच्याबरोबर ढगात वर घेतले जातील. आणि अशा प्रकारे आम्ही प्रभूबरोबर सदासर्वकाळ राहू. 18 म्हणून या शब्दांनी एकमेकाचे समाधान करा.
दहा कुमारिकांची बोधकथा
25 “त्या दिवसांत स्वर्गाचे राज्य दहा कुमारिकांसारखे असेल, त्यांनी त्यांचे दिवे घेतले व वराला भेटण्यास गेल्या. 2 त्या दहा मुलींपैकी पाच मुर्ख होत्या आणि पाच शहाण्या होत्या. 3 मूर्ख मुलींनी आपले दिवे घेतले, पण दिव्यासाठी तेल घेतले नाही. 4 शहाण्या मुलींनी दिव्याबरोबर तेलही घेतले. 5 वराला उशीर झाल्याने सर्वच मुलींना डुलक्या लागल्या व त्या झोपी गेल्या.
6 “मध्यरात्री कोणीतरी घोषणा केली, ‘वर येत आहे! बाहेर जाऊन त्याला भेटा!’
7 “सर्व मुली जाग्या झाल्या आणि त्यांनी आपले दिवे तयार केले. 8 पण मूर्ख मुली, हुशार मुलींना म्हणाल्या, ‘तुमच्यातील काही तेल अम्हांला द्या. आमचे दिवे विझत आहेत.’
9 “पण उत्तरादाखल हुशार मुली म्हणाल्या, ‘नाही, आम्ही तुम्हांला काहीच देऊ शकत नाही, नाही तर तुम्हांला व आम्हांलाही पुरणार नाही. त्याऐवजी ते विकणाऱ्याकडे जा आणि आपणांसाठी तेल विकत आणा.’
10 “पाच मूर्ख मुली तेल विकत घ्यायला निघाल्या तेव्हा वर आला. तेव्हा ज्या मुली तयार होत्या त्या मेजवानीसाठी त्याच्याबरोबर आत गेल्या. मग दार बंद झाले.
11 “शेवटी उरलेल्या पाच मुली आल्या आणि म्हणाल्या, ‘महाराज! महाराज! दार उघडा!’
12 “पण तो त्यांना उत्तरादाखल म्हणाला, ‘मी तुम्हांला खरे सांगतो:मी तुम्हांला ओळखत नाही!’
13 “म्हणून नेहमी तयार असा. कारण मनुष्याचा पुत्र कधी येणार तो दिवस व ती वेळ तुम्हांला माहीत नाही.
2006 by World Bible Translation Center