Revised Common Lectionary (Semicontinuous)
7 परमेश्वर तेव्हा यहोशवाला म्हणाला, “आज मी सर्व इस्राएल लोकांच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढविण्यास सुरूवात करीन. म्हणजे मग मोशेला मी साथ दिली तशीच तुलाही देणार आहे हे लोकांना कळेल. 8 याजक कराराचा कोश वाहून नेतील. त्यांना सांग यार्देन नदीच्या किनाऱ्यापर्यंत जा आणि प्रवाहात थांबा.”
9 यहोशवा मग इस्राएल लोकांना म्हणाला, “इकडे या आणि आपल्या परमेश्वराची वचने लक्षपूर्वक ऐका. 10 देव आपल्या संगती आहे याची ती साक्ष होय. तो कनानी, हिती, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी अमोरी व यबूसी या आपल्या शत्रूंचा खात्रीने पराभव करील. त्यांना त्या प्रदेशातून हुसकावून लावील. 11 तुम्ही यार्देन पार करत असताना या परमेश्वराच्या कराराचा कोश तुमच्या समोर असेल. 12 आता, प्रत्येक कुळातील एक याप्रमाणे इस्राएल लोकांच्या बारा कुळातून बारा जणांची निवड करा. 13 याजक परमेश्वराच्या कराराचा कोश वाहतील. परमेश्वर म्हणजे साऱ्या विश्वाचा मालक होय. यार्देन नदीतून तुमच्यापुढे तो कोश नेतील. जेव्हा त्यांच्या टाचा नदीच्या प्रवाहाला स्पर्श करतील तेव्हा प्रवाह वाहायचा थांबेल. पाणी आहे त्याठिकाणी थांबून मागच्या मागे धरणाप्रमाणे अडवले जाईल.”
14 कराराचा कोश वाहणारे याजक निघाले आणि नदी पार करून जाण्यासाठी सर्व लोकांनी मुक्काम हलवला. त्या लोकांनी यार्देन नदी पार करायला सुरूवात केली. 15 (सुगीच्या दिवसात यार्देन दुथडी भरून वाहात असते त्याप्रमाणे तिचा प्रवाह फुगलेला होता.) कोश वाहणारे याजक नदीकाठी आले. त्यांनी पाण्यात पाऊल टाकले. 16 आणि लगेच पाणी वाहायचे थांबले. पाण्याची जणू भिंत होऊन ते मागे अडवले गेले. थेट आदाम (सारातान जवळचे एक नगर) नगरापर्यंत पाणी सर्वदूर साठून राहिले. यरीहोजवळ लोकांनी नदी पार केली. 17 तेथील जमीन कोरडी झाली. याजक परमेश्वराच्या कराराचा कोश घेऊन नदीच्या मध्यावर आले व थांबले. सर्व इस्राएल लोक कोरड्या जमिनीवरून यार्देन पलीकडे निघून जाईपर्यंत ते तिथेच थांबले.
भाग पांचवा
((स्तोत्रसंहिता 107-150)
107 परमेश्वराला धन्यवाद द्या.
कारण तो चांगला आहे.
त्याचे प्रेम कायम राहाणार आहे.
2 परमेश्वराने ज्याचा उध्दार केला आहे अशा प्रत्येक माणसाने हे शब्द म्हटले पाहिजेत.
परमेश्वराने त्यांना त्यांच्या शत्रूपासून वाचवले.
3 परमेश्वराने त्याच्या माणसांना वेगवेगळ्या देशातून गोळा करुन आणले.
त्याने त्यांना पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण या दिशांतून आणले.
4 त्यांतले काही वाळवंटात फिरले.
ते राहण्यासाठी जागा शोधत होते पण त्यांना शहर सापडले नाही.
5 ते खूप भुकेले आणि तान्हेले होते
आणि अशक्त होत होते.
6 नंतर त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली
आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटातून वाचवले.
7 देव त्यांना सरळ जेथे त्यांना राहायचे होते त्या शहरात घेऊन गेला.
33 देवाने नदीचे वाळवंटात रुपांतर केले.
देवाने झऱ्यांचे वाहाणे बंद केले.
34 देवाने सुपीक जमिनीचे क्षारयुक्त ओसाड जमिनीत रुपांतर केले.
का? कारण त्या ठिकाणी वाईट लोक राहात होते.
35 देवाने वाळवंटाचे पाण्याची तळी असलेल्या जमिनीत रुपांतर केले.
देवाने कोरड्या जमिनीतून पाण्याचे झरे वाहायला लावले.
36 देवाने भुकेल्या लोकांना चांगल्या प्रदेशातून नेले
आणि त्यांनी तिथे राहाण्यासाठी शहर वसवले.
37 त्या लोकांनी त्यांच्या शेतात बी पेरले त्यांनी त्यांच्या शेतात द्राक्षं पेरली
आणि त्यांना चांगले उत्पन्न आले.
9 बंधूंनो, आम्ही देवाकडून आलेली सुवार्ता सांगत असताना, तुम्हाला आठवत असेल की आम्ही रात्रंदिवस किती कष्ट केले. आमचे कष्ट आणि श्रम तुम्ही जाणता ते यासाठी केले की, तुम्ही कोणावरही भार पडू नये.
10 तुम्ही साक्षी आहात आणि देवसुद्धा साक्षी आहे की, आम्ही किती धार्मिकतेने, न्यायाने आणि निर्दोष रीतीने तुम्हा विश्वासणाऱ्यांबरोबर वागलो. 11 आणि तुम्हाला हे चांगले माहीत आहे की, जसा पिता आपल्या मुलांना वागवितो तसे आम्ही तुम्हातील प्रत्येकाला वागविले आहे. 12 अशा प्रकारे आम्ही तुम्हांला उत्तेजन दिले, सांत्वन केले. आणि तुम्हांला साक्ष दिली की, देवाला आवडेल अशा प्रकारे वागा. जो त्याच्यात व गौरवात तुम्हाला बोलावितो.
13 आणि, या कारणासाठी आम्हीसुद्धा देवाचे सातत्याने आभार मानतो, कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडून देवाचा संदेश ऐकला, तेव्हा तुम्ही तो मनुष्याकडून आलेला म्हणून स्वीकारला नाही, तर देवापासून आलेला जसा खरा होता तसाच स्वीकारला. देवाचा संदेश, जो तुम्हा विश्वास णाऱ्यांच्यामध्ये सुद्धा कार्य करीत आहे.
येशू धार्मिक पुढाऱ्यांवर टीका करतो(A)
23 मग येशू लोकांशी व त्याच्या शिष्यांशी बोलला, तो म्हणाला, 2 “नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांना मोशेच्या नियमशास्त्राचे स्पष्टीकरण करण्याचे अधिकार आहेत. 3 म्हणून ते जसे सांगतात तसे तुम्ही करा. पण ते जसे करतात तसे करू नका. मी असे म्हणतो याचे कारण ते बोलतात पण त्याप्रमाणे करत नाहीत. 4 वाहावयास अवघड असे ओझे ते बांधतात व ते ओझे लोकांच्या खांद्यांवर देतात व ते स्वतः ते ओझे उचलायला एक बोटदेखील लावत नाहीत.
5 “ते त्यांचे सर्व चांगले काम लोकांनी पाहावे म्हणून करतात. ते पवित्र शास्त्र लिहिलेल्या लहान पेट्या [a] मोठमोठ्या बनवितात आणि लोकांनी पाहावे म्हणून लांब झगे घालतात. 6 मेजवानीच्या ठिकाणी आपल्याला विशेष मानाची जागा मिळावी असे त्यांना वाटते. तसेच यहूद्यांचे सभास्थानात मोक्याच्या जागी बसायला त्यांना फार आवडते. 7 बाजारातील मुख्य रस्त्याने जाता येता लोकांनी आपल्याला मान द्यावा याची त्यांना फार आवड असते आणि लोकांनी त्यांना गुरुजी म्हणावे असे त्यांना वाटते.
8 “परंतु तुम्ही स्वतःला ‘गुरूजी’ म्हणवून घेऊ नका. तुम्ही सर्व एकमेकांचे बहीण भाऊ आहात, तुमचा गुरू एकच आहे. 9 आणि जगातील कोणालाही ‘पिता’ म्हणू नका. कारण तुमचा पिता एकच आहे व तो स्वर्गात आहे. 10 तुम्ही स्वतःला ‘मालक’ म्हणून घेऊ नका. तुमचा मालक ख्रिस्त आहे. 11 तुमच्यातील जो सेवक बनून तुमची सेवा करतो तो तुमच्यात सर्वात मोठा होय. 12 जो स्वतःला मोठा समजेल त्याला कमी लेखले जाईल. स्वतःला लहान समजणारा प्रत्येक जण मोठा गणला जाईल.
2006 by World Bible Translation Center