Revised Common Lectionary (Semicontinuous)
भाग पांचवा
((स्तोत्रसंहिता 107-150)
107 परमेश्वराला धन्यवाद द्या.
कारण तो चांगला आहे.
त्याचे प्रेम कायम राहाणार आहे.
2 परमेश्वराने ज्याचा उध्दार केला आहे अशा प्रत्येक माणसाने हे शब्द म्हटले पाहिजेत.
परमेश्वराने त्यांना त्यांच्या शत्रूपासून वाचवले.
3 परमेश्वराने त्याच्या माणसांना वेगवेगळ्या देशातून गोळा करुन आणले.
त्याने त्यांना पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण या दिशांतून आणले.
4 त्यांतले काही वाळवंटात फिरले.
ते राहण्यासाठी जागा शोधत होते पण त्यांना शहर सापडले नाही.
5 ते खूप भुकेले आणि तान्हेले होते
आणि अशक्त होत होते.
6 नंतर त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली
आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटातून वाचवले.
7 देव त्यांना सरळ जेथे त्यांना राहायचे होते त्या शहरात घेऊन गेला.
33 देवाने नदीचे वाळवंटात रुपांतर केले.
देवाने झऱ्यांचे वाहाणे बंद केले.
34 देवाने सुपीक जमिनीचे क्षारयुक्त ओसाड जमिनीत रुपांतर केले.
का? कारण त्या ठिकाणी वाईट लोक राहात होते.
35 देवाने वाळवंटाचे पाण्याची तळी असलेल्या जमिनीत रुपांतर केले.
देवाने कोरड्या जमिनीतून पाण्याचे झरे वाहायला लावले.
36 देवाने भुकेल्या लोकांना चांगल्या प्रदेशातून नेले
आणि त्यांनी तिथे राहाण्यासाठी शहर वसवले.
37 त्या लोकांनी त्यांच्या शेतात बी पेरले त्यांनी त्यांच्या शेतात द्राक्षं पेरली
आणि त्यांना चांगले उत्पन्न आले.
देव यहोशवाची नेमणूक करतो
1 मोशे परमेश्वराचा सेवक होता. नूनाचा पूत्र यहोशवा मोशेचा मदतनीस होता. मोशेच्या निधनानंतर परमेश्वर यहोशवाशी बोलला. परमेश्वर म्हणाला, 2 “माझा सेवक मोशे मरण पावला आहे आता तू आणि हे लोक यार्देन नदी पलीकडे जा. मी इस्राएल लोकांना देणार असलेल्या प्रदेशात तू गेले पाहिजेस. 3 तुम्हाला हा प्रदेश द्यायचे मी मोशेला कबूल केले आहे. तेव्हा ज्याठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हाला दिले. 4 वाळवंट व लबानोन पासून फरात महानदीपर्यंतचा हित्ती यांचा सर्व प्रदेश तुमचाच होईल. तसेच येथपासून पश्चिमेकडील भूमध्य समुद्रापर्यंत म्हणजेच मावळतीपर्यंतचा देश तुमच्या हद्दीत असेल. 5 मोशेला दिली तशीच तुलाही मी साथ देईन. तुला आता कोणी तुझे आयुष्य असेपर्यंत अटकाव करू शकणार नाही. मी तुला सोडणार नाही, तुला अंतर देणार नाही.
6 “यहोशवा, तू खंबीर हो, हिंमत धर. या लोकांचे नेतृत्व कर म्हणजे ते तो देश घेऊ शकतील. हा देश त्यांना द्यायचे मी त्यांच्या पूर्वजांना कबूल केले आहे. 7 पण आणखी एका गोष्टीबद्दल तू खंबीर आणि समर्थ असले पाहिजेस. माझा सेवक मोशे याने तुला दिलेल्या आज्ञा कटाक्षाने पाळ. त्यांचे तंतोतंत पालन केलेस तर तू हाती घेतलेल्या सर्व कार्यात यशस्वी होशील. 8 नियमशास्त्राच्या त्या ग्रंथात लिहिलेल्या सर्व गोष्टी नेहमी लक्षात ठेव. रात्रंदिवस त्या ग्रंथाचे मनन कर म्हणजे तुझ्या हातून त्याचे पालन होईल. असे वागलास तर अंगिकारलेल्या सर्व गोष्टीत सफल होशील. 9 खंबीर आणि निर्भय राहण्याची मी तुला आज्ञा केली आहे ना? तेव्हा कचरू नकोस. परमेश्वर तू जेथे जाशील तेथे तुझ्या बरोबर आहे.”
यहोशवा नेतुत्व स्वीकारतो
10 तेव्हा यहोशवाने लोकांमधील अधिकाऱ्यांना आज्ञा दिल्या. तो म्हणाला, 11 “छावणीतून फिरुन लोकांना अन्न वगैरेची तयारी करुन सज्ज व्हायला सांगा. तीन दिवसाच्या आत आपल्याला यार्देन नदी पार करायची आहे. परमेश्वर देव देत आहे तो देश ताब्यात घ्यायला आपण निघत आहोत.”
यहूदी आणि नियमशास्त्र
17 परंतु आता तुम्ही जे स्वतःला यहूदी समजता आणि नियमशास्त्रावर विश्वास ठेवता व आपण देवाच्या जवळचे आहोत असा अभिमान बाळगता, 18 त्या तुम्हांला त्याची इच्छा कळते आणि ज्या सर्वोत्तम गोष्टी आहेत, त्या तुम्ही स्वीकारता कारण नियमशास्त्राद्वारे तुम्हांला शिक्षण मिळाले आहे. 19 तुम्हाला वाटतें की ज्यांना योग्य मार्ग माहित नाही त्यांचे तुम्ही मार्गदर्शक आहात, जे लोक अंधारात (पापांत) आहेत, त्यांचा तुम्ही प्रकाश आहात आणि तुमची खात्री झाली आहे की तुम्ही आंधळ्यांचें पुढारी, जे अंधारात आहेत त्यांचा प्रकाश, 20 मूर्खांचे शिक्षक, बालकांचे गुरु आहात, कारण नियमशास्त्रात तुम्हांला ज्ञान आणि सत्याचे मूर्त स्वरुप मिळाले आहे. 21 तर मग तुम्ही जे दुसऱ्यांना शिकविता ते तुम्ही स्वतःला का शिकवित नाही? तुम्ही चोरी करु नये असा उपदेश करता पण तुम्ही स्वतः चोरी का करता? 22 तुम्ही व्यभिचार करु नये असे म्हणता ते तुम्ही व्यभिचार का करतां? तुम्ही मूर्तिचा तिरस्कार करता पण देवळात चोरी करता? 23 तुम्ही नियमशास्त्राविषयी बढाई मारता, ते तुम्ही नियमशास्त्र मोडून देवाचा अपमान का करता? 24 शास्त्रलेखात लिहिल्यानुसार तुमच्यामुळे “विदेशी लोकांमध्ये देवाच्या नावाचा अपमान होत आहे.” [a]
25 तुम्ही नियमशास्त्र पाळीत असला तर सुंतेला मोल आहे. पण जर तुम्ही नियमशास्त्र पाळीत नाही तर, तुमची सुंता न झाल्यासारखी आहे. 26 सुंता न झालेला मनुष्य जर नियमशास्त्राचे पालन करतो, तर त्याची सुंता न होणे हे सुंता झाल्याप्रमाणे समजण्यात येणार नाही काय? 27 ज्या मनुष्याची शारीरिक रीतीने सुंता झाली नाही आणि जो नियमशास्त्र पूर्ण करतो, तो ज्या तुम्हांला लिखित नियम व सुंता आहे, तरी नियमशास्त्र मोडता त्या तुमचा न्याय करील.
28 कारण जो बाहेरुन यहूदी आहे तो खरोखर यहूदी नाही व देहाची बाह्यत्कारी सुंता ही सुंता नव्हे. 29 पण जो अंतःकरणाचा यहूदी, तो यहूदी आहे आणि खरी सुंता लेखी नियमांद्वारे नव्हे तर आत्म्याने अंतःकरणाची केलेली सुंता होय, त्याची प्रशंसा माणसांकडून नव्हे, तर देवाकडून होते.
2006 by World Bible Translation Center