Revised Common Lectionary (Semicontinuous)
वाव
41 परमेश्वरा, मला तुझे खरे प्रेम दाखव.
कबूल केल्याप्रमाणे तू मला वाचव.
42 त्यावेळी ज्या लोकांनी माझा पाणउतारा केला होता त्यांना द्यायला माझ्याजवळ उत्तर असेल.
परमेवरा, तू सांगतोस त्या गोष्टींवर माझा खरोखरच विश्वास आहे.
43 मला नेहमी तुझ्या खऱ्या शिकवणी बद्दल बोलू दे.
परमेश्वरा, मी तुझ्या शहाणपणाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
44 परमेश्वरा, मी सदैव तुझ्या शिकवणुकी प्रमाणे चालेन.
45 म्हणजे मी मुक्त होईन का?
कारण मी तुझे नियम पाळायचा आटोकाट प्रयत्न करतो.
46 मी तुझ्या कराराबद्दल राजांजवळ बोलेन
आणि ते मला शरमिंदे करणार नाहीत.
47 मला तुझ्या आज्ञांचा अभ्यास करायला आवडते.
परमेश्वरा, मला त्या आज्ञा आवडतात.
48 परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञांची स्तुती करतो.
मला त्या आवडतात आणि मी त्यांचा अभ्यास करीन.
परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करा
16 “तुम्ही हे सर्व नियम व विधी पाळावे अशी तुमचा देव परमेश्वर ह्याची तुम्हाला आज आज्ञा आहे. ते सर्व तुम्ही मनःपूर्वक पाळा. 17 परमेश्वर हाच तुमचा देव असे आज तुम्ही म्हणाला आहात. त्याच्या मार्गाने चालायचे तुम्ही मान्य केले आहे. त्याच्या शिकवणीनुसार वागायचे त्याचे नियम व आज्ञा पाळायचे तुम्ही वचन दिले आहे. तो जे जे सांगेल त्याप्रमाणे आचरण ठेवायचे तुम्ही कबूल केले आहे. 18 परमेश्वराने आज तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपली खास प्रजा म्हणून आपलेसे केले आहे. माझ्या सर्व आज्ञा पाळाव्या असेही तुम्हाला त्याने सांगितले आहे. 19 इतर सर्व राष्ट्रांपेक्षा तो तुम्हाला महान करणार आहे. तो तुम्हाला प्रशंसा, नावलौकिक, सन्मान बहाल करील. आणि त्याच्याच सांगण्याप्रमाणे तुम्ही त्याची खास प्रजा व्हाल.”
लोकांसाठी स्मारक शिला
27 मोशे आणि इस्राएलमधील वडीलधारे लोकांशी बोलले. मोशे म्हणाला, “आज मी देणार असलेल्या सर्व आज्ञा पाळा. 2 तुमचा देव परमेश्वर देणार असलेल्या प्रदेशात तुम्ही लौकरच यार्देन नदी ओलांडून जाणार आहात. त्यादिवशी मोठ्या शिला उभारा. त्यांना गिलावा करा. 3 त्यावर या आज्ञा आणि शिकवण लिहून काढा. यार्देन नदी उतरुन जाल त्या दिवशी हे करा. नंतरच परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे, तो देणार असलेल्या त्या धनधान्यसंपन्न भूमीत पाऊल टाका. परमेश्वर, तुमच्या पूर्वजांचा देव ह्याने हा प्रदेश तुम्हाला देण्यासाठी वचन दिले आहे.
4 “यार्देन नदी ओलांडून गेल्यावर माझ्या आजच्या आज्ञा पाळा. एबाल पर्वतावर या गिलावा केलेल्या शिला उभारा. 5 तसेच तुमचा देव परमेश्वर ह्यासाठी दगडी वेदी तयार करा. दगड फोडण्यासाठी लोखंडी हत्यार वापरु नका. 6 वेदी अखंड, न घडलेल्या दगडाची असावी. आणि त्यावर होमबली अर्पण करा. 7 तेथे शांत्यार्पणांचे यज्ञ करुन भोजन करा. सर्वजण आनंदाने एकत्र जमून हे करा.
एक श्रीमंत मनुष्य येशूला अनुसरण्याचे नाकारतो(A)
16 एक मनुष्य येशूकडे आला आणि त्याने विचारले, “गुरूजी अनंतकाळचे जीवन मिळावे म्हणून मी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत?”
17 येशूने उत्तर दिले, “काय चांगले आहे असे मला का विचारतोस? फक्त देव एकच चांगला आहे पण जर तुला अनंतकाळचे जीवन पाहिजे तर सर्व आज्ञा पाळ.”
18 त्याने विचारले, “कोणत्या आज्ञा?”
येशूने उत्तर दिले, “‘खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको. 19 आपल्या आईवडिलांना मान दे’b आणि ‘जशी स्वतःवर प्रीति करतोस तशी इतंरावर प्रीति कर.’” [a]
20 तो तरुण म्हणाला, “या सर्व आज्ञा मी पाळत आलो आहे. मी आणखी काय करावे?”
21 येशूने उत्तर दिले, “तुला जर परिपूर्ण व्हायचे असेल तर जा आणि तुझे जे काही आहे ते विकून टाक. आणि ते पैसे गरीबांना वाटून दे. म्हणजे स्वर्गात तुला मोठा ठेवा मळेल. मग ये आणि माझ्यामागे चालू लाग.”
22 पण जेव्हा त्या तरूणाने हे ऐकले, तेव्हा त्याला फार दु:ख झाले. कारण तो खूप श्रीमंत होता, म्हणून तो येशूला सोडून निघून गेला.
2006 by World Bible Translation Center