Revised Common Lectionary (Semicontinuous)
मोशेचा मृत्यू
34 मवाबातील यार्देन खोऱ्यातून पिसग पर्वताच्या माथ्यावरील नबो नामक शिखरावर मोशे चढून गेला. यरीहो समोरील यार्देन पलीकडचा हा भाग. परमेश्वराने मोशेला गिलादपासून दानपर्यंत सर्व प्रदेश दाखवला. 2 नफताली, एफ्राईम व मनश्शेचा सर्व प्रदेश दाखवला. पश्चिमेकडल्या भूमध्य समुद्रापर्यंतचा यहूदाचा सर्व प्रदेश दाखवला. 3 तसेच नेगेव आणि सोअरा पासून यरीहो या खजुराच्या झाडांच्या नगरापर्यंतचे खोरे हे ही दाखवले. 4 परमेश्वर मोशेला म्हणाला, “अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना कबूल केलेला हाच तो प्रदेश. त्यांच्या वंशजांना तो द्यायचे मी त्यांना वचन दिले आहे. तुला मी तो पाहू दिला पण तू तेथे जाणार नाहीस.”
5 मग परमेश्वराचा सेवक मोशे त्या मवाबाच्या प्रदेशात मरण पावला. असे घडणार हे परमेश्वराने त्याला सांगितले होतेच. 6 मवाबात मोशेचे परमेश्वराने दफन केले. बेथ-पौरासमोरच्या खोऱ्यात हा भाग आला. पण मोशेची कबर नेमकी कोठे आहे हे आजतागायत कोणाला कळलेले नाही. 7 मोशे वारला तेव्हा एकशेवीस वर्षाचा होता. तेव्हाही त्याची तब्बेत ठणठणीत होती व दृष्टी चांगली होती. 8 इस्राएल लोकांनी त्याच्यासाठी तीस दिवस शोक केला. त्या काळात ते मवाबातील यार्देन खोऱ्यात राहिले.
नवा नेता यहोशवा
9 मोशेने यहोशवावर आपले हात ठेवून त्याला नवा नेता म्हणून नेमले होते. त्यामुळे नूनचा पुत्र यहोशवा याला ज्ञानाचा आत्मा प्राप्त झाला होता. म्हणून इस्राएल लोक त्याच्या आज्ञेत वागू लागले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी आचरण ठेवले.
10 इस्राएलला मोशे सारखा दुसरा संदेष्टा मिळाला नाही. परमेश्वराला मोशेचा प्रत्यक्ष परिचय होता. 11 मिसरमध्ये महान चमत्कार करुन दाखवायला परमेश्वराने मोशेला पाठवले. मिसरमध्ये फारो, त्याचे सेवक व सर्व लोकांनी हे चमत्कार पाहिले. 12 मोशेने करुन दाखवले तसे चमत्कार व आश्चर्यकारक गोष्टी दुसऱ्या कोणा संदेष्ट्याने करुन दाखवल्या नाहीत. इस्राएलच्या सर्व लोकांनी त्याची ही कृत्ये पाहिली.
भाग चौथा
(स्तोत्रसंहिता 90-106)
देवाचा माणूस मोशे याची प्रार्थना
90 प्रभु तू सदैव आमचे घर बनून राहिला आहेस.
2 देवा, पर्वत जन्मण्याआधी आणि
पृथ्वी व जग निर्माण होण्याआधी तूच देव होतास देवा,
तू पूर्वी होतास आणि पुढे देखील असशील.
3 तूच लोकांना या जगात आणतोस आणि
तूच त्यांची पुन्हा माती करतोस.
4 तुझ्यासाठी हजारो वर्षे
म्हणजे कालचा दिवस, कालची रात्र.
5 तू आम्हाला झाडून टाकतोस. आमचे आयुष्य स्वप्नासारखे आहे.
सकाळ झाली की आम्ही मेलेलो असतो.
आम्ही गवतासारखे आहोत.
6 गवत सकाळी उगवते आणि
संध्याकाळी ते वाळते व मरणाला टेकते.
13 परमेश्वरा, नेहमी आमच्याकडे परत
ये तुझ्या सेवकाशी दयेने वाग.
14 तुझ्या प्रेमाने आम्हांला रोज सकाळी न्हाऊ घाल.
आम्हाला सुखी होऊ दे आणि समाधानाने आयुष्य जगू दे.
15 तू आम्हाला आयुष्यात खूप संकटे आणि खिन्नता दिलीस.
आता आम्हांला सुखी कर.
16 तू तुझ्या सेवकांसाठी कोणत्या अद्भुत गोष्टी करु
शकतोस ते त्यांना बघू दे.
17 देवा, प्रभु, आमच्यावर दया कर.
आम्ही जे जे करतो त्यात आम्हाला यश दे.
पौलाचे थेस्सलनीकातील कार्य
2 बंधूंनो, तुमचे तुम्हांलाच माहीत आहे की, आम्ही तुम्हाला दिलेली भेट व्यर्थ झाली नाही. 2 पण तुम्हाला माहीत आहे की, आम्हांला मागे फिलिप्पै येथे त्रास आणि अपमान सहन करावा लागला. पण देवाच्या साहाय्याने मोठा विरोध झाला असताना देवाकडून येणारी सुवार्ता सांगण्यासाठी आम्हांला धैर्य प्राप्त झाले. 3 खरोखर आमची घोषणा आमच्याकडून झालेल्या चुकांमुळे किंवा अशुद्ध हेतूने किंवा भ्रमाने येत नाही. 4 उलट, ज्याप्रमाणे देवाने पसंत केलेले, सुवार्तेचे कार्य सोपविलेले असे आम्ही आहोत म्हणून आम्ही बोलतो. आम्ही मनुष्याला संतुष्ट करण्यासाठी नाही, तर देवाला, जो आमच्या उद्दिष्टांची परीक्षा घेतो
5 खरोखर, तुम्हांला माहीत आहे की, आम्ही तुमच्यासमोर खुशामत करणाऱ्या शब्दांनी बोललो नाही, किंवा आमचे उपदेश करणे हे आमचा लोभ झाकण्याचे खोटे कारण नव्हते, कारण देव आमचा साक्षी आहे! 6 किंवा आम्ही लोकांकडून, तुमच्याकडून किंवा दुसऱ्या कोणाकडून सन्मान मिळावा म्हणून अपेक्षा करीत नव्हतो. ख्रिस्ताचे प्रेषित या नात्याने, जरी आम्हांला आमचा अधिकार तुमच्यावर दाखविता आला असता.
7 तरीही आम्ही तुमच्यामध्ये आई जशी प्रेमाने तिच्या मुलाला स्वतःचे दूध पाजते आणि काळजी घेते, तसे आम्ही तुमच्यात सौम्य होतो. [a] असे लिहिले आहे. 8 कारण आम्हाला तुमच्याविषयी इतके प्रेम वाटले की, आम्ही तुमच्याबरोबर देवाकडून येणारी सुवार्ताच नव्हे तर आमचे स्वतःचे जीवनसुद्धा देण्यास तयार होतो. याचे कारण म्हणजे, तुम्ही आमच्यासाठी प्रिय झाला होता.
कोणती आज्ञा सर्वात महत्त्वाची आहे?(A)
34 येशूने सदूकी लोकांना अशा बोधकथा सांगितल्या की त्यांना वाद घालता येईना. हे परूश्यांनी ऐकले. म्हणून परूश्यांनी एकत्र येऊन मसलत केली. 35 एक परूशी नियमशास्त्राचा जाणकार होता. त्या परूश्यानी येशूची परीक्षा पाहावी म्हणून प्रश्न केला. 36 त्याने विचारले, “गुरूजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वांत महत्त्वाची आहे?”
37 येशूने उत्तर दिले, “‘प्रभु तुमचा देव याजवर प्रीति करा. तुम्ही त्याजवर पूर्ण हृदयाने, पूर्ण जिवाने, पूर्ण मनाने प्रीती करा.’ [a] 38 ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे. 39 हिच्यासारखी दुसरी एक आहे: ‘जशी आपणावर तशी इतरांवर प्रीति करा.’ [b] 40 सर्व नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे लिखाण या दोन आज्ञांवरच अवलंबून आहे.”
ख्रिस्त दावीदाचा पुत्र असेल काय?(B)
41 म्हणून परूशी एकत्र उभे असताना, येशूने त्यांना प्रश्न केला. 42 येशू म्हणाला, “ख्रिस्ताविषयी तुमचे काय मत आहे? तो कोणाचा पुत्र आहे?”
परूश्यांनी उत्तर दिले, “ख्रिस्त हा दाविदाचा पुत्र आहे.”
43 त्यावर येशू त्यांना म्हणाला, “मग दाविदाने त्याला ‘प्रभु’ असे का म्हटले? दाविदाच्या अंगी पवित्र आत्मा आला असता तो म्हणाला,
44 ‘प्रभु माझ्या प्रभूला (ख्रिस्ताला) म्हणाला,
मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत,
माझ्या उजव्या बाजूला बैस.’ (C)
45 आता, मग जर दाविद त्याला ‘प्रभु’ म्हणतो तर तो दाविदाचा पुत्र कसा होऊ शकतो?”
46 पण परूश्यांपैकी कोणीही त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही. त्या दिवसानंतर त्याला आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कोणीही केले नाही.
2006 by World Bible Translation Center