Revised Common Lectionary (Semicontinuous)
भाग चौथा
(स्तोत्रसंहिता 90-106)
देवाचा माणूस मोशे याची प्रार्थना
90 प्रभु तू सदैव आमचे घर बनून राहिला आहेस.
2 देवा, पर्वत जन्मण्याआधी आणि
पृथ्वी व जग निर्माण होण्याआधी तूच देव होतास देवा,
तू पूर्वी होतास आणि पुढे देखील असशील.
3 तूच लोकांना या जगात आणतोस आणि
तूच त्यांची पुन्हा माती करतोस.
4 तुझ्यासाठी हजारो वर्षे
म्हणजे कालचा दिवस, कालची रात्र.
5 तू आम्हाला झाडून टाकतोस. आमचे आयुष्य स्वप्नासारखे आहे.
सकाळ झाली की आम्ही मेलेलो असतो.
आम्ही गवतासारखे आहोत.
6 गवत सकाळी उगवते आणि
संध्याकाळी ते वाळते व मरणाला टेकते.
13 परमेश्वरा, नेहमी आमच्याकडे परत
ये तुझ्या सेवकाशी दयेने वाग.
14 तुझ्या प्रेमाने आम्हांला रोज सकाळी न्हाऊ घाल.
आम्हाला सुखी होऊ दे आणि समाधानाने आयुष्य जगू दे.
15 तू आम्हाला आयुष्यात खूप संकटे आणि खिन्नता दिलीस.
आता आम्हांला सुखी कर.
16 तू तुझ्या सेवकांसाठी कोणत्या अद्भुत गोष्टी करु
शकतोस ते त्यांना बघू दे.
17 देवा, प्रभु, आमच्यावर दया कर.
आम्ही जे जे करतो त्यात आम्हाला यश दे.
परमेश्वराचे मोशे व यहोशवाला बोलावतो
14 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा मृत्यू आता समीप आला आहे. यहोशवाला घेऊन दर्शनमंडपात ये. म्हणजे मी त्याला आज्ञा देईन.” तेव्हा मोशे व यहोशवा दर्शन मंडपात गेले.
15 दर्शन मंडपाच्या प्रवेशद्वारी असलेल्या मेघस्तंभात परमेश्वर प्रगट झाला. 16 तो मोशेला म्हणाला, “तू आता लौकरच मरण पावशील व आपल्या पूर्वजांना भेटशील. तेव्हा हे लोक माझ्यापासून परावृत्त होतील. ते माझ्याशी केलेला पवित्र करार मोडतील. माझी साथ सोडून त्या देशातील इतर खोट्या दैवतांची पूजा करायला लागतील. 17 तेव्हा माझा त्यांच्यावर कोप होऊन मी त्यांना सोडून जाईन. मी त्यांना मदत करायचे नाकारल्याने त्यांचा नाश होईल. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यांच्यावर संकटे कोसळतील. तेव्हा ते म्हणतील की आपल्याला परमेश्वराची साथ नाही म्हणून आपल्यावर आपत्ती येत आहेत. 18 पण त्यांनी इतर दैवतांची पूजा केल्याने, दुष्कृत्ये केल्यामुळे मी त्यांना मदत करणार नाही.
19 “तेव्हा तुम्ही हे गीत लिहून घ्या व इस्राएल लोकांना शिकवा. त्यांच्याकडून ते तोंडपाठ करुन घ्या. म्हणजे इस्राएल लोकांविरुद्ध ही माझ्याबाजूने साक्ष राहील. 20 त्यांच्या पूर्वजांना कबूल केलेल्या भूमीत मी त्यांना नेणार आहे. ही भूमी दुधामधाने समृद्ध आहे. तेथे त्यांची अन्नधान्याची चंगळ होईल. ते संपन्न जीवन जगतील. पण मग ते इतर दैवतांकडे वळतील व त्यांची पूजा करतील. माझ्यापासून ते परावृत होतील व कराराचा भंग करतील. 21 त्यामुळे त्यांच्यावर आपत्ती कोसळतील. त्यांना अनेक अडचणी येतील. त्याही वेळी हे गीत त्यांच्यामुखी असेल आणि त्यांच्या चुकीची साक्ष त्यांना पटेल. मी त्यांना त्या भूमीत अजून नेलेले नाही. पण त्यांच्या मनात तेथे गेल्यावर काय काय करायचे या बद्दल जे विचार चालू आहेत ते मला अगोदरच माहीत आहेत.”
22 तेव्हा त्याचदिवशी मोशेने ते गीत लिहून काढले, आणि इस्राएल लोकांना ते शिकवले.
तीताचे क्रेतातील कार्य
5 मी तुला क्रेत येथे सोडून या कारणासाठी आलो: की जे अजून अपूर्ण राहिले होते ते तू व्यवस्थित करावेस व मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे प्रत्येक गावी वडील नेमावेत. 6 ज्याच्यावर दुराचरणाचा दोष नसेल, ज्याला एकच पत्नी असेल, ज्याला मुले असून ती विश्वासणारी असतील. ज्याच्यावर स्वैर जीवन जगल्याचा आरोप नसेल, अशा प्रकारच्या व्यक्तीस नेमावे. 7 कारण अध्यक्ष (सर्वांगीण काळजीवाहक) हा देवाचा कारभारी असल्यामुळे तो दोषी नसावा. तो उद्धट नसावा, त्याला लवकर राग येऊ नये; तो मद्यपान करणारा नसावा, तो भांडणाची आवड नसणारा, अप्रामाणिकपणे पैसे मिळविण्याची आवड नसणारा असावा. 8 तर तो आदरातिथ्य करणारा, चांगुलपणावर प्रेम करणारा, शहाणा, नीतिमान, भक्तीशील व स्वतःवर संयम ठेवणारा असावा. 9 विश्वसनीय संदेश जसा तो शिकविला गेला त्याला दृढ धरून राहावे यासाठी की, हितकारक शिक्षणाने लोकांना बोध करण्यास समर्थ असावे. व जे विरोध करतात, त्यांची चूक कौशल्याने त्यांना पटवून द्यावी.
10 हे महत्त्वाचे आहे कारण पुष्कळ लोक बंड करणारे आहेत. जे व्यर्थ गोष्टीविषयी बडबड करतात व लोकांना फसवितात. मी विशेषेकरून, जे सुंता झालेले आहेत त्यांना संबोधून बोलत आहे. 11 त्यांची तोंडे बंद केलीच पाहिजेत, ज्या गोष्टी शिकवू नयेत त्या ते शिकवीत आहेत. ते हे यासाठी करीत आहेत की, अयोग्य मार्गाने पैसे मिळवावेत. अशा रीतीने ते संपूर्ण घराण्याचा नाश करीत आहेत. 12 त्यांच्यापैकीच एक क्रेतीय संदेष्टा (भविष्यवादी) स्वतःम्हणाला, ʇक्रेतीय नेहमीच खोटारडे आहेत. दुष्ट पशू आणि आळशी, खादाड आहेत.ʈ 13 हे वाक्य खरे आहे. म्हणून नेहमीच त्यांना कडक रीतीने धमकाव. यासाठी की, त्यांनी विश्वासात खंबीर व्हावे. 14 आणि यहूदी भाकडकथा व जे सत्य नाकारतात अशा लोकांच्या आज्ञांकडे लक्ष देऊ नये.
15 शुद्ध असणाऱ्या सर्वांना, सर्व गोष्टी शुद्ध आहेत; पण ज्यांचे विचार व विवेकभाव ही दोन्हीही पापाने भ्रष्ट झाली आहेत व जे विश्वास ठेवीत नाहीत त्यांना काहीच शुद्ध नाही. 16 ते देवाला ओळखत असल्याचा दावा करतात, पण ते त्यांच्या कृत्यांनी देवाला ओळखल्याचे नाकारतात. ते अमंगळ व आज्ञा मोडणारे, व कोणतेच चांगले कृत्य करण्यास लायक नसलेले असे त्यांचे त्यांनीच दाखवून दिले आहे.
2006 by World Bible Translation Center