Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे एक स्तोत्र तो यहुदाच्या रानात होता त्या वेळचे
63 देवा, तू माझा देव आहेस
आणि तू मला खूप हवा आहेस.
माझा आत्मा आणि माझे शरीर तुझ्यासाठी शुष्क,
बरड आणि पाणी विरहित जमिनी प्रमाणे तहाननेले आहे.
2 होय, मी तुला तुझ्या मंदिरात पाहिले.
मी तुझी शक्ती आणि तुझे गौरव पाहिले.
3 तुझे प्रेम आयुष्यापेक्षा चांगले आहे.
माझे ओठ तुझी स्तुती करतात.
4 होय, मी जीवनात तुझी स्तुती करीन
तुझ्या नावासाठी मी माझे बाहू प्रार्थनेत उभारीन.
5 चांगले अन्न खाल्ल्याप्रमाणे मी तृप्त होईन,
आणि माझे तोंड तुझी स्तुती करील.
6 अंथरुणावर झोपल्यावर मला तुझी आठवण येईल,
मध्यरात्री मी तुझी आठवण काढेन.
7 तू मला खरोखरच मदत केली आहेस.
तू माझे रक्षण केलेस म्हणून मी आनंदी आहे.
8 माझा आत्मा तुला धरुन ठेवतो
आणि तू माझा हात धरतोस.
हेर कनान देशात जातात
13 परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “कनान देश हेरण्यासाठी काही लोकांना पाठव. हाच देश मी इस्राएल लोकांना देणार आहे. त्यांच्या बारा वंशानुसार प्रत्येकी एका नेत्याला पाठव.”
17 मोशेने कनान देश हेरण्यास पाठविताना लोकांना सांगितले की “तुम्ही येथून नेगेबमधून निघा आणि मग डोंगराळ प्रदेशात जा. 18 देश कसा आहे? तेथील लोक कसे आहेत! ते बलवान आहेत किंवा दुबळे आहेत? ते थोडे आहेत किंवा फार आहेत? ते पाहा व समजून घ्या. 19 ते राहतात तो देश कसा आहे? तो चांगला आहे किंवा वाईट आहे? ते लोक कशा प्रकारच्या नगरात राहतात? संरक्षणासाठी त्या नगरांभोवती कोट आहेत का? त्या नगरांची संरक्षण व्यवस्था बलवान आहे का? ह्या सर्व गोष्टी पाहा व समजून घ्या. तेथील जमीन पीक घेण्यास 20 योग्य आहे का? त्या प्रदेशात झाडे आहेत का? तेथील काही फळे बरोबर घेऊन या.” (हे पहिली द्राक्षे पिकण्याच्या वेळी घडले.)
21 म्हणून ते तो प्रदेश शोधायला निघाले. त्यांनी सीन वाळवंटापासून रहोब आणि लेबोहामाथपर्यंतच्या प्रदेशाचा शोध घेतला. 22 त्यांनी नेगेवमधून त्या प्रदेशात प्रवेश केला आणि ते हेब्रोनला गेले. (हेब्रोन शहर मिसर देशातल्या सोअन शहराच्या सात वर्षे आधी बांधले होते.) अहीमन शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज तेथे राहात होते. 23 नंतर ते लोक अष्कोलच्या खोऱ्यात गेले. तेथे त्यांनी द्राक्षाच्या वेलीची एक फांदी तोडली. त्या फांदली द्राक्षाचा घड लागलेला होता. त्यांनी ती फांदी एका खांबावर ठेवली आणि दोघे जण ती आपल्या मधोमध ठेवून घेऊन गेले. त्यांनी बरोबर काही डाळींबे व अंजीर ही घेतली. 24 त्या जागेला अष्कोल खोरे असे म्हणतात कारण तिथे इस्राएल लोकांनी द्राक्षाचा घड तोडला होता.
25 त्या लोकांनी त्या प्रदेशाचा 40 दिवस शोध घेतला. नंतर ते आपल्या छावणीत परत गेले. 26 इस्राएल लोकांची छावणी पारानच्या वाळवंटात कादेशजवळ होती ते लोक मोशे, अहरोन आणि इस्राएलच्या सर्व लोकांजवळ गेले. त्यांनी मोशे, अहरोन आणि इतर लोकांना त्यांनी पाहिलेल्या गोष्टीविषयी सांगितले आणि त्या प्रदेशातली फळे त्यांना दाखवली. 27 ते लोक मोशेला म्हणाले, “तू आम्हाला पाठवलेस त्या प्रदेशात आम्ही गेलो. तो प्रदेश अनेक चांगल्या गोष्टींनी भरलेला [a] आहे. त्या प्रदेशात होणारी ही काही फळे पाहा. 28 पण तेथे राहणारे लोक खूप शक्तिशाली आहेत. शहरे खूप मोठी आहेत. शहरांचे रक्षण चांगल्या प्रकारे होते. काही अनाकांच्या वंशाजानाही आम्ही पाहिले. 29 अमालेकी लोक नेगेबमध्ये राहतात. हित्ती, यबूसी आणि अमोरी डोंगराळ भागात राहतात. आणि कनानी लोक समुद्राजवळ आणि यार्देन नदीच्या काठावर राहतात.”
30 मोशेजवळच्या लोकांना गप्प बसायला सांगून कालेब म्हणाला, “परत जाऊन तो प्रदेश आपण घ्यायला पाहिजे. आपण तो प्रदेश सहज घेऊ शकू.”
31 पण जे लोक त्याच्याबरोबर तेथे गेले होते ते म्हणाले, “आपण त्यांच्याशी लढू शकणार नाही. ते आपल्यापेक्षा खूप शक्तिशाली आहेत.” 32 आणि त्या माणसांनी इस्राएलच्या सर्व लोकांना सांगितले की त्या प्रदेशातल्या लोकांचा पराभव करण्याइतके शक्तिशाली आपण नाहीत. ते म्हणाले, “आम्ही जो प्रदेश पाहिला तो शक्तिशाली लोकांनी भरलेला आहे. ते लोक तिथे जाणाऱ्या कुठल्याही माणसाचा सहज पराभव करण्याइतके शक्तिमान आहेत. 33 आम्ही तिथे खूप नेफीलीम लोक पाहिले. (अनाकाचे वंशज नेफीलीम लोकांपासून आलेले आहेत) त्यांनी आमच्याकडे आम्ही जणू नाकतोडे आहोत अशा नजरेने पाहिले. होय! त्यांच्या दृष्टीने आम्ही नाकतोडेच होतो.”
लोक पुन्हा तक्रार करतात
14 त्या रात्री छावणीतले सगळे लोक जोरजोरात आक्रोश करायला लागले. 2 इस्राएल लोकांनी मोशे आणि अहरोन विरुद्ध तक्रारी केल्या. सगळे लोक एकत्र आले आणि मोशेला व अहरोनाला म्हणाले, “आम्ही मिसरमध्ये किंवा वाळवंटात मरुन जायला हवे होते. या नवीन प्रदेशात मारले जाण्यापेक्षा ते अधिक चांगले झाले असते. 3 या नवीन प्रदेशात युद्धात जाण्यासाठीच परमेश्वराने आम्हाला इथे आणले का? शत्रू आम्हाला मारून टाकील आणि आमच्या बायका मुलांना घेऊन जाईल. मिसर देशात परत जाणेच आमच्या दृष्टीने जास्त बरे आहे.”
4 नंतर लोक एकमेकांना म्हणाले, “आपण आता दुसरा नेता निवडू आणि मिसर देशात परत जाऊ.”
5 तिथे जमलेल्या सर्व लोकांसमोर मोशे आणि अहरोन पालथे पडले. 6 यहोशवा आणि कालेब यांनी आपले कपडे फाडले (तक्रारी ऐकून झालेल्या दु:खप्रदर्शनासाठी) नूनाचा मुलगा यहोशवा आणि यफुन्नेचा मुलगा कालेब हे ही या प्रदेशाच्या शोधात गेलेल्या लोकांपैकी होते. 7 या दोघांनी तिथे जमलेल्या इस्राएल लोकांना सांगितले, “आम्ही जो प्रदेश बघितला तो खूप चांगला आहे. 8 तो प्रदेश चांगल्या चांगल्या गोष्टींनी संपन्न आहे. आणि जर परमेश्वर आपल्यावर प्रसन्न झाला तर तो आपल्याला त्या प्रदेशात नेईल आणि तो प्रदेश आपल्याला देईल. 9 म्हणून परमेश्वराविरुद्ध जाऊ नका. त्या प्रदेशातल्या लोकांची भीती बाळगू नका. आपण त्यांचा पराभव करु शकू. त्यांच्याकडे कसलेही संरक्षण नाही. सुरक्षित राहण्यासाठी काहीही नाही. परंतु आपल्याजवळ परमेश्वर आहे. म्हणून घाबरु नका.”
येशू स्वतःच्या मरणाविषयी बोलतो(A)
22 जेव्हा ते एकत्र गालीलात आले तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती विश्वासघाताने धरून दिला जाणार आहे. 23 ते त्याला जिवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठविला जाईल.” तेव्हा शिष्य फार दु:खी झाले.
येशू कर देण्याविषयी शिकवितो
24 येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमास आले तेव्हा मंदिराचा कर वसूल करणारे आले, ते पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचा गुरू कराचा रूपया देत नाही काय?”
25 त्याने म्हटले, “होय देतो.”
मग तो घरात आल्याबरोबर तो बोलण्याअगोदर येशू म्हणाला, “शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा कर कोणाकडून घेतात, आपल्या मुलांकडून की परक्याकडून?”
26 जेव्हा तो म्हणाला, “परक्याकडून.”
तेव्हा येशूने त्याला म्हटले, “तर मग मुले मोकळी आहेत. 27 तरी आपण त्यांना अडखळण आणू नये, म्हणून पाण्यात जाऊन गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला दोन रूपयांचे एक नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल दे.”
2006 by World Bible Translation Center