Revised Common Lectionary (Semicontinuous)
मोशे परमेश्वराचे तेज पाहातो
12 मोशे परमेश्वराला म्हणाला, “ह्या लोकांना घेऊन जाण्यास तू मला सांगितलेस, परंतु तू माझ्याबरोबर कोणाला पाठविणार ते तू सांगितले नाहीस; तू मला म्हणालास, ‘मी तुला तुझ्या नांवाने ओळखतो आणि तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.’ 13 जर मी तुला खरोखर संतोष दिला असेल तर तू मला तुझे मार्ग शिकव. तुला जाणून घेण्याची माझी इच्छा आहे मग तुला सतत संतोष देणे मला जमेल. हे सर्व लोक तुझे आहेत याची तू आठवण ठेव.”
14 परमेश्वराने उत्तर दिले, “मी स्वतः तुझ्या बरोबर येईन व तुला विसावा देईन.”
15 मग मोशे परमेश्वराला म्हणाला, “जर तू आमच्याबरोबर येणार नाहीस तर मग आम्हाला या ठिकाणापासून पुढे पाठवू नकोस. 16 तसेच तू माझ्या विषयी व लोकांविषयी संतुष्ट आहेस ते आम्हाला कसे कळेल? जर तू आमच्याबरोबर येशील तर मग मात्र आम्हाला खातरीने कळेल! जर तू आमच्याबरोबर येणार नाहीस तर मग मी व हे लोक त्यांच्यात आणि पृथ्वीवरल कोणत्याही लोकात काही फरक राहणार नाही.”
17 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मागतोस त्याप्रमाणे मी करीन, कारण मी तुजवर संतुष्ट आहे आणि मी तुला तुझ्या नांवाने ओळखतो.”
18 नंतर मोशे म्हणाला, “आता कृपा करून मला तुझे तेज दाखव.”
19 मग परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, “मी माझे सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; मी परमेश्वर आहे आणि हे माझे नांव मी जाहीर करीन म्हणजे तू ते ऐकशील कारण मी निवडलेल्या कोणावरही दया करीन व त्यांच्यावर प्रेम करीन. 20 परंतु तू माझा चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण माझा चेहरा पाहिलेला कोणीही माणूस जगणार नाही.
21 “माझ्याजवळ ह्या ठिकाणी एक खडक आहे; तू त्यावर उभा राहा. 22 माझे तेज त्या जागेजवळून पुढे जाईल तेव्हा मी तुला त्या खडकातील मोठ्या भेगेत ठेवीन; आणि मी निघून जाईपर्यत माझ्या हाताने तुला झाकीन; 23 नंतर मी माझा हात काढून घेईन आणि तू माझी पाठपाहाशील; परंतु तू माझा चेहरा पाहाणार नाहीस.”
99 परमेश्वर राजा आहे
म्हणून राष्ट्रांना भीतीने थरथरु द्या.
देव करुबांच्यावर राजा म्हणून बसतो
म्हणून जगाला भीतीने थरथरु द्या.
2 सियोन मधला परमेश्वर महान आहे.
तो सर्व लोकांवरचा महान नेता आहे.
3 सर्व लोकांना तुझ्या नावाचा जयजयकार करु दे.
देवाचे नाव भीतीदायक आहे.
देव पवित्र आहे.
4 बलवान राजाला न्यायीपणा आवडतो.
देवा, तू चांगुलपणा निर्माण केलास तू चांगुलपणा आणि
प्रमाणिकपणा याकोबमध्ये (इस्राएलमध्ये) आणलास.
5 परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि
त्याच्या पवित्र पादासनाजवळ त्याची उपासना करा.
6 मोशे आणि अहरोन हे त्याचे याजक होते
आणि शमुवेल त्याचे नाव घेणाऱ्यांपैकी एक होता.
त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली
आणि त्याने त्यांना उत्तर दिले.
7 देव उंच ढगांतून बोलला.
त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या
आणि देवाने त्यांना नियम दिले.
8 परमेश्वरा, देवा, तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलेस,
तू त्यांना दाखवलेस की तू क्षमाशील देव आहेस
आणि तू वाईट गोष्टी केल्याबद्दल लोकांना शिक्षा करतोस.
9 त्याच्या पवित्र पर्वतासमोर वाका आणि त्याची प्रार्थना करा.
परमेश्वर, आपला देव खरोखरच पवित्र आहे.
1 पौल, सिल्वान आणि तीमथ्य यांच्या द्वारे देव जो पिता त्यामध्ये तसेच प्रभु येशू ख्रिस्तामध्ये दृढ असलेल्या थेस्सलनीकाच्या मंडळीस,
देवाची कृपा व शांति लाभो.
थेस्सलनीकाकरांचा विश्वास आणि जीवन
2 आम्ही नेहमीच प्रार्थनामध्ये तुमची आठवण करुन तुम्ही सर्वांसाठी देवाचे आभार मानतो. 3 आम्ही आमचा देव व पित्यासमोर तुमचे विश्वासाचे कार्य, तुम्ही प्रेमाने केलेले श्रम, आणि आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावरील दृढ आशेने सोशिकपणे धरलेला धीर याची सतत आठवण करतो.
4 माझ्या बंधूनो, देवाने प्रीतित केलेली तुमची निवड ही आम्हाला माहीत आहे. 5 कारण आमची सुवार्ता तुमच्याकडे केवळ शब्दांनी आली नाही तर पवित्र आत्म्याने व पूर्ण खात्रीने आली हे तुम्हांला माहीत आहे, आम्ही तुमच्यामध्ये कसे राहिलो तुम्हांला माहीत आहे. ते तुमच्या फायद्यासाठी होते. 6 आणि तुम्ही आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला, पवित्र आत्म्याकडून मिळणाऱ्या आनंदात तुम्ही मोठ्या कष्टाने संदेश स्वीकारलात.
7 त्याचा परिणाम म्हणजे तुम्ही सर्व विश्वासणाऱ्यासाठी जे मासेदोनियात व अखियात होते त्यांच्यासाठी आदर्श असे झालात 8 कारण तुमच्याकडून गाजविण्यात आलेला संदेश केवळ मासेदिनिया आणि अखियातच ऐकला गेला असे नाही तर तुमचा देवावरील विश्वास सगळीकडे माहीत झाला आहे. म्हणून आम्हांला काही सांगण्याची गरज नाही. 9 कारण ते स्वतःच आमच्याविषयी सांगत आहेत म्हणजे कशा प्रकारे तुम्ही आमचे स्वागत केले तसेच तुम्ही मूर्तिपासून देवाकडे कसे वळलात व खऱ्या आणि जिवंत देवाची सेवा करण्यासाठी कसे वळलात. 10 आणि आता ज्याला देवाने मेलेल्यांतून उठविले त्या त्याच्या स्वर्गातून येणाऱ्या पुत्राची तुम्ही वाट पाहत आहात. तोच येशू देवाच्या येणाऱ्या क्रोधापासून आपले रक्षण करतो.
काही यहूदी पुढारी येशूला फसवू पाहतात(A)
15 मग परूशी गेले आणि येशूला कसे पकडावे याचा कट करू लागले. त्याला शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू लागले. 16 परूशांनी येशूला फसविण्याच्या हेतूने काही माणसे त्याच्याकडे पाठविली. त्यांनी आपली काही माणसे (शिष्य) आणि हेरीदी गटाच्या काही लोकांना येशूकडे पाठविले. ते म्हणाले, “गुरुजी, आम्हांला माहीत आहे की आपण सत्यवचनी आहात, आणि तुम्ही देवाचा मार्ग प्रामाणिकपणे शिकविता, व दुसरे काय विचार करतात याची तुम्ही पर्वा करीत नाही. तुम्ही सर्वाना समान मानता. 17 म्हणून तुमचे मत आम्हांला सांगा, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?”
18 येशूला त्यांचा दुष्ट उद्देश माहीत होता, म्हणून तो म्हणाला, “ढोंग्यांनो, तुम्ही माझी परीक्षा का घेत आहात? 19 कर भरण्यासाठी जे नाणे वापरले जाते ते मला दाखवा.” त्या लोकांनी येशूला चांदीचे एक नाणे दाखविले. 20 तेव्हा येशूने विचारले, “या नाण्यावर कोणाचे चित्र आहे? आणि या नाण्यावर कोणाचे नाव लिहिलेले आहे?”
21 त्या लोकांनी उत्तर दिले, “त्यावर कैसराचे चित्र व नाव दिले आहे.”
यावर येशू त्यांना म्हणाला, “जे कैसराचे आहे ते कैसराला द्या. आणि जे देवाचे आहे ते देवाला द्या!”
22 येशू जे म्हणाला ते त्या लोकांनी ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि तेथून निघून गेले.
2006 by World Bible Translation Center