Revised Common Lectionary (Semicontinuous)
99 परमेश्वर राजा आहे
म्हणून राष्ट्रांना भीतीने थरथरु द्या.
देव करुबांच्यावर राजा म्हणून बसतो
म्हणून जगाला भीतीने थरथरु द्या.
2 सियोन मधला परमेश्वर महान आहे.
तो सर्व लोकांवरचा महान नेता आहे.
3 सर्व लोकांना तुझ्या नावाचा जयजयकार करु दे.
देवाचे नाव भीतीदायक आहे.
देव पवित्र आहे.
4 बलवान राजाला न्यायीपणा आवडतो.
देवा, तू चांगुलपणा निर्माण केलास तू चांगुलपणा आणि
प्रमाणिकपणा याकोबमध्ये (इस्राएलमध्ये) आणलास.
5 परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि
त्याच्या पवित्र पादासनाजवळ त्याची उपासना करा.
6 मोशे आणि अहरोन हे त्याचे याजक होते
आणि शमुवेल त्याचे नाव घेणाऱ्यांपैकी एक होता.
त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली
आणि त्याने त्यांना उत्तर दिले.
7 देव उंच ढगांतून बोलला.
त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या
आणि देवाने त्यांना नियम दिले.
8 परमेश्वरा, देवा, तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलेस,
तू त्यांना दाखवलेस की तू क्षमाशील देव आहेस
आणि तू वाईट गोष्टी केल्याबद्दल लोकांना शिक्षा करतोस.
9 त्याच्या पवित्र पर्वतासमोर वाका आणि त्याची प्रार्थना करा.
परमेश्वर, आपला देव खरोखरच पवित्र आहे.
दर्शन मंडप
7 मोशे छावणी बाहेर बऱ्याच अंतरावर तंबू लावत असे. मोशेने त्याला “दर्शन मंडप” असे नांव दिले होते; ज्या कोणाला परमेश्वराला काही विचारावयाचे असेल तो छावणीबाहेरील दर्शन मंडपाकडे जाई. 8 ज्या ज्या वेळी मोशे छावणीतून दर्शन मंडपाकडे जाई त्या त्यावेळी सर्व लोक आपापल्या तंबूच्या दारात उभे राहात आणि मोशे दर्शन मंडपात जाईपर्यत त्याला बघत. 9 जेव्हा मोशे तंबूत जाई तेव्हा उंच ढग खाली उतरून येई आणि दर्शन मंडपाच्या दारापाशी तो उभा राही; ह्याप्रमाणे परमेश्वर मोशेशी बोलत असे. 10 जेव्हा लोक दर्शन मंडपाच्या दारात ढग बघत तेव्हा ते आपापल्या तंबूच्या दारात उभे राहून देवाला नमन करीत.
11 ज्याप्रमाणे एखादा माणूस आपल्या मित्राशी बोलतो त्याप्रमाणे परमेश्वर मोशेबरोबर समोरासमोरबोलत असे. परमेश्वराशी बोलल्यानंतर मोशे नेहमीआपल्या छावणीत माघारी जाई तरी मोशेचा मदतनीस. नूनाचा मुलगा यहोशवा हा तरुण मंडप सोडून बाहेर येत नसे.
9 मी मंडळीला पत्र लिहिले पण दियत्रेफस ज्याला त्यांचा नेता व्हायचे आहे व जे सांगतो ते तो स्वीकारीत नाही. 10 या कारणामुळे जेव्हा मी येतो तेव्हा तो जो करीत आहे ते दाखवून देईन. तो वाईट शब्दांनी खोटेपणाने माझ्याविरुद्ध बोलत आहे व एवढ्यावरच तो समाधान मानीत नाही, तर त्यात भर म्हणून बंधूंचा तो स्वीकार करीत नाहीच उलट मंडळीतील जे लोक त्यांचा स्वीकार करु इच्छितात त्यांना अडथळा करतो, आणि त्यांना मंडळीबाहेर घालवितो!
11 माझ्या प्रिय मित्रा, जे चांगले आहे त्याचे अनुकरण कर. वाइटाचे अनुकरण करु नको. जे चांगले आहे ते जो करतो, तो देवाचा आहे. जो वाईट करतो त्याने देवाला पाहिले नाही.
12 प्रत्येक जण देमेत्रियाविषयी चांगली साक्ष देतात व सत्यदेखील तसेच सांगते. आणि आम्ही देखील त्याच्याविषयी तसेच म्हणतो, आणि तुम्हांला माहीत आहे की, आमची साक्ष खरी आहे.
2006 by World Bible Translation Center