Revised Common Lectionary (Semicontinuous)
97 परमेश्वर राज्य करतो आणि पृथ्वी आनंदित होते.
दूरदूरचे प्रदेश आनंदित होतात.
2 परमेश्वराच्या भोवती दाट काळे ढग आहेत.
चांगुलपणा आणि न्याय त्याच्या राज्याला मजबुती आणतात.
3 अग्नी परमेश्वराच्या पुढे जातो
आणि शत्रूंचा नाश करतो.
4 त्याची वीज आकाशात चमकते.
लोक ती बघतात आणि घाबरतात.
5 परमेश्वरा समोर पर्वत मेणासारखे वितळतात.
ते पृथ्वीच्या मालकासमोर वितळतात.
6 आकाशांनो, त्याच्या चांगुलपणा विषयी सांगा
प्रत्येक माणसाला देवाचे वैभव बघू द्या.
7 लोक त्यांच्या मूर्तीची पूजा करतात.
ते त्यांच्या “देवाला” नावजतात.
परंतु त्या लोकांना लाज वाटेल.
त्यांचे “देव” परमेश्वरापुढे झुकतील आणि त्याची प्रार्थना करतील.
8 सियोन ऐक आणि आनंदी हो यहुदाच्या शहरांनो, आनंदी व्हा का?
कारण परमेश्वर योग्य निर्णय घेतो.
9 परात्पर परमेश्वरा, तू खरोखरच पृथ्वीचा राजा आहेस.
तू इतर “देवापेक्षा” खूपच चांगला आहेस.
10 जे लोक परमेश्वरावर प्रेम करतात त्यांना वाईट गोष्टी आवडत नाहीत म्हणून देव त्याच्या लोकांना वाचवतो.
देव त्याच्या भक्तांना दुष्टांपासून वाचवतो.
11 चांगल्या लोकांवर प्रकाश
आणि सुख चमकते.
12 चांगल्या माणसांनो, परमेश्वरात आनंदी व्हा.
त्याच्या पवित्र नावाला मान द्या.
7 परमेश्वर देवाच्या इच्छेविरुध्द इस्राएल लोकांनी पापे केली होती. म्हणून असे घडले. मिसरचा राजा फारो याच्या जाचातून परमेश्वराने इस्राएल लोकांची सुटका केली होती. तरी इस्राएली लोकांनी इतर दैवतांचे भजनपूजन सुरु केले. 8 इतर लोकांचे ते अनुकरण करु लागले. त्या लोकांना परमेश्वराने इस्राएलीखातर तेथून हुसकावून लावले होते. शिवाय देवाऐवजी इस्राएल लोकांनी राजाची सत्ता पत्करली. 9 इस्राएल लोकांनी परमेश्वर देवाविरुध्द ज्या गोष्टी चोरुन केल्या त्या निषिध्द होत्या.
लहान गावापासून मोठ्या शहरापर्यंत सर्व ठिकाणी त्यांनी उंचस्थानावरील पुजास्थळे बांधली. 10 प्रत्येक टेकडीवर आणि हिरव्यागार झाडाखाली त्यांनी स्मृतिस्तंभ आणि अशेराचे खांब उभारले. 11 या सर्व ठिकाणी ते धूप जाळत. इस्राएली लोकांनी तेथे येण्याआधी परमेश्वराने ज्या राष्ट्रांना त्या भूमीतून घालवून दिले होते त्यांच्यासारखेच वर्तन इस्राएल लोकांनी केले. त्या नीच कृत्यांनी परमेश्वर क्रुध्द झाला. 12 त्यांनी मूर्तीपूजा आरंभली. “ती कधीही करु नये” म्हणून परमेश्वराने त्यांना बजावले होते.
13 इस्राएल आणि यहूदा यांना समज देण्यासाठी परमेश्वराने सर्व संदेष्टे आणि द्रष्टे यांचा उपयोग केला. त्यांच्यामार्फत लोकांना सांगितले, “या गैरकृत्यांपासून मागे फिरा. माझ्या आज्ञा आणि नियम पाळा. तुमच्या पूर्वजांना जे नियम मी घालून दिले त्यांचे पालन करा. ते नियमशास्त्र मी माझे सेवक असलेले संदेष्टे यांच्यामार्फत तुम्हांला सांगितले आहे.”
14 पण लोकांनी या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. आपल्या पूर्वजांसारखाच आडमुठेपणा त्यांनी केला. त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्यावर त्यांचा विश्वास नव्हता. 15 या लोकांनी परमेश्वराने पूर्वजांशी केलेले करार आणि नियम धुडकावून लावले. परमेश्वराने बजावून सांगितले तिकडे दुर्लक्ष केले. क्षुद्र दैवतांच्या नादी लागून त्यांनी काहीच साधले नाही. आपल्या भोवतालच्या राष्ट्रांचे त्यांनी अनुकरण चालवले. परमेश्वराने इस्राएल लोकांना जे करु नका म्हणून सांगितले होते तेच ही राष्ट्रे करत होती.
16 परमेश्वर देवाच्या आज्ञा पाळणे इस्राएल लोकांनी अजिबातच थांबवले. त्यांनी वासरांच्या दोन सुवर्णमूर्ती केल्या, अशेराचे खांब उभारले, आकाशातील सर्व ताऱ्यांची आणि बालदेवतेची त्यांनी पूजा केली. 17 आपल्या पोटच्या मुलामुलींचा अग्नित बळी दिला. भविष्याचे कुतूहल शमवण्यासाठी जादूटोणा आणि मंत्रतंत्र यांचा अवलंब केला. परमेश्वराने ज्या कृत्यांचा धिक्कार केला तेच करण्यापायी स्वतःलाही विकले आणि परमेश्वराचा कोप ओढवून घेतला. 18 या गोष्टींनी परमेश्वर क्रुध्द झाला आणि त्याने यहूदाचे घराणे वगळता सर्व इस्राएलांना नामशेष करुन टाकले.
यहूदा लोकांचेही अपराध
19 पण यहूदातील लोकांनीही परमेश्वराच्या आज्ञा मानल्या नाहीत. त्यांनी इस्राएल लोकांचा कित्ता गिरवला.
20 परमेश्वराने सर्व इस्राएल लोकांचा धिक्कार केला. त्यांना संकटात लोटले. इतरांकरवी त्यांचा नाश केला आणि अखेर इतरत्र हाकलून दृष्टीआड केले.
येशू जीवनाची भाकर
25 लोकांना येशू सरोवराच्या दुसऱ्या काठावर भेटला. लोक म्हणाले, “गुरुजी, तुम्ही इकडे कधी आलात?”
26 येशूने उत्तर दिले, “तुम्ही माझा शोध का करता? माझे सामर्थ्य सिद्ध करणारे चमत्कार पाहिले म्हणून तुम्ही माझा शोध करता का? मी तुम्हांस खरे सांगतो, तुम्ही मला शोधता, कारण तुम्ही भाकरी खाल्या आणि तुमची तृप्ती झाली. 27 ऐहिक अन्न नाश पावते. म्हणून नाश पावणाऱ्या अन्नासाठी कष्ट करु नका. परंतु जे अन्न कायम टिकते आणि अनंतकाळचे जीवन देते, अशा अन्नासाठी तुम्ही कष्ट करा. मनुष्याचा पुत्र ते अन्न तुम्हांला देईल. देव जो पिता याने दाखवून दिले आहे की, तो मनुष्याच्या पुत्राबरोबर आहे.”
28 लोकांनी येशूला विचारले, “आम्ही कोणत्या गोष्टी कराव्यात अशी देवाची इच्छा आहे?”
29 येशूने उत्तर दिले, “तुम्ही जे काम करावे अशी देवाची इच्छा आहे, ते हेच की, देवाने ज्याला पाठविले, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.”
30 मग लोक येशूला म्हणाले, “देवाने तुम्हांलाच पाठविले आहे हे पटविण्यासाठी तुम्ही कोणता चमत्कार कराल? तुम्हांला एखादा चमत्कार करताना जर आम्ही पाहिले तर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू. तुम्ही काय कराल? 31 अरण्यात आमच्या पूर्वजांनी देवाने दिलेला मान्ना खाल्ला. पावित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, देवाने त्यांना स्वर्गातील भाकर खायाला दिली.”
32 येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो. मोशेने तुमच्या लोकांना स्वर्गातील भाकर दिली नाही. माझा पिता तुम्हांला खरी स्वर्गीय भाकर देतो. 33 देवाची भाकर कोणती? देवाची भाकर म्हणजे जो स्वर्गातून खाली उतरतो आणि जगाला जीवन देतो, तोच ती भाकर.”
34 ते लोक येशूला म्हणाले, “महाराज, आम्हांला हीच भाकर नेहमी द्या.”
35 मग येशू म्हणाला. “मीच ती जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही. आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही.
2006 by World Bible Translation Center