Revised Common Lectionary (Semicontinuous)
97 परमेश्वर राज्य करतो आणि पृथ्वी आनंदित होते.
दूरदूरचे प्रदेश आनंदित होतात.
2 परमेश्वराच्या भोवती दाट काळे ढग आहेत.
चांगुलपणा आणि न्याय त्याच्या राज्याला मजबुती आणतात.
3 अग्नी परमेश्वराच्या पुढे जातो
आणि शत्रूंचा नाश करतो.
4 त्याची वीज आकाशात चमकते.
लोक ती बघतात आणि घाबरतात.
5 परमेश्वरा समोर पर्वत मेणासारखे वितळतात.
ते पृथ्वीच्या मालकासमोर वितळतात.
6 आकाशांनो, त्याच्या चांगुलपणा विषयी सांगा
प्रत्येक माणसाला देवाचे वैभव बघू द्या.
7 लोक त्यांच्या मूर्तीची पूजा करतात.
ते त्यांच्या “देवाला” नावजतात.
परंतु त्या लोकांना लाज वाटेल.
त्यांचे “देव” परमेश्वरापुढे झुकतील आणि त्याची प्रार्थना करतील.
8 सियोन ऐक आणि आनंदी हो यहुदाच्या शहरांनो, आनंदी व्हा का?
कारण परमेश्वर योग्य निर्णय घेतो.
9 परात्पर परमेश्वरा, तू खरोखरच पृथ्वीचा राजा आहेस.
तू इतर “देवापेक्षा” खूपच चांगला आहेस.
10 जे लोक परमेश्वरावर प्रेम करतात त्यांना वाईट गोष्टी आवडत नाहीत म्हणून देव त्याच्या लोकांना वाचवतो.
देव त्याच्या भक्तांना दुष्टांपासून वाचवतो.
11 चांगल्या लोकांवर प्रकाश
आणि सुख चमकते.
12 चांगल्या माणसांनो, परमेश्वरात आनंदी व्हा.
त्याच्या पवित्र नावाला मान द्या.
15 मग मोशे पर्वतावरुन खाली उतरला; कराराच्या दोन सपाट पाट्या त्याच्या जवळ होत्या; त्या पाट्यावर पुढे व मागे अशा दोन्ही बाजूंना आज्ञा लिहिलेल्या होत्या. 16 देवाने स्वतःच त्या पाट्या तयार केल्या होत्या व त्याने स्वतःच त्यांच्यावर कोरुन आज्ञा लिहिलेल्या होत्या.
17 यहोशवाने लोकांचा गोंगाट ऐकला व तो मोशेला म्हणाला, “छावणीत लोकांच्या लढाईसारखा आवाज ऐकू येत आहे.”
18 मोशेने उत्तर दिले, “एखाद्या सैन्याच्या विजयाचा हा आवाज नाही किंवा एखाद्या सैन्याच्या पराभवचा हा आक्रोश नाही; मला जो आवाज ऐकू येत आहे तो नाचगाण्यांचा आहे.”
19 मोशे छावणीजवळ येऊन पोहोंचल्यावर त्याने ते सोन्याचे वासरु व लोकांच्या नाच गाण्यांचा धिंगाणा पाहिला आणि तो भयंकर संतापला; त्याने आपल्या हातातल्या दगडी पाट्या खाली फेकून दिल्या; तेव्हा त्या डोंगराच्या पायथ्यावर पडून फुटल्या व त्यांचे तुकडे तुकडे झाले. 20 नंतर लोकांनी बनविलेल ते सोन्याचे वासरु मोशेने तोडून फोडून टाकले व ते अग्नीत वितळवले; त्याचा कुटून त्याने भुगाभुगा केला; मग तो त्याने पाण्यात टाकला व ते पाणी त्याने इस्राएल लोकांस प्यावयास लावले.
21 मोशे अहरोनास म्हणाला, “ह्या लोकांनी तुझे असे काय केले होते की तू त्यांना असे भयंकर पाप करावयास लावलेस?”
22 अहरोन मोशेला म्हणाला, “स्वामी, असे माझ्यावर रागावू नका; हे लोक जे वाईट ते करावयास तत्पर असतात, हे आपणास माहीत आहे. 23 लोक मला म्हणाले, ‘मोशेने आम्हाला मिसर देशातून काढून बाहेर आणले; परंतु आता त्याचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही; तेव्हा आमच्यापुढे चालतील असे देव तू आमच्यासाठी करुन दे.’ 24 तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘जर तुम्हाकडे सोन्याची कुंडले असतील तर ती मला द्या.’ तेव्हा लोकांनी मला त्यांच्याकडील सोने दिले; मी सोने भट्टीत टाकले आणि तिच्यातून हे वासरु बाहेर आले!”
25 मोशेने पाहिले की अहरोनाने लोकांवरचे नियंत्रण ढिले केले त्यामुळे ते बेभान होत गेले आणि त्यांच्या मूर्खपणाच्या आचरणाचा तमाशा त्यांच्या शत्रुंनी पाहिला. 26 तेव्हा मोशे छावणीच्या दाराजवळ उभा राहिला आणि म्हणाला, “ज्या कोणाला परमेश्वराच्या मागे यावयाचे असेल, त्याने मजकडे यावे,” आणि लगेच लेवी वंशाचे सर्व लोक मोशेकडे पळत गेले.
27 मग मोशे त्यांना म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर काय म्हणतो ते मी तुम्हांस सांगतो, ‘प्रत्येक माणसाने आपली तलवार घ्यावी आणि छावणीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यत अवश्य जावे आणि प्रत्येक माणसाने आपला भाऊ, मित्र व शेजारी यांना अवश्य जिवे मारावे.’”
28 लेवी वंशाच्या लोकांनी मोशेची आज्ञा पाळली आणि त्या दिवशी सुमारे तीन हजार इस्राएल लोक मेले. 29 मग मोशे म्हणाला, “आपली मुले व आपले भाऊ यांच्याविरुद्ध तुम्ही उठला आणि स्वतःला कृपापात्र केलेत.”
30 दुसऱ्या दिवशी सकाळी मोशेने लोकांना सांगितले, “तुम्ही भयंकर पाप केले आहे! परंतु आता मी परमेश्वराकडे पर्वतावर जातो; काही तरी करून कदाचित् परमेश्वराकडून मला तुमच्या पापांची क्षमा मिळविता येईल.” 31 तेव्हा मोशे माघारी परमेश्वराकडे जाऊन म्हणाला, “परमेश्वरा, कृपा करून माझे ऐक; ह्या लोकांनी आपणासाठी सोन्याचे देव केले हे फार वाईट पाप केले; 32 तरी आता तू त्यांच्या ह्या पापांची क्षमा कर! परंतु जर तू त्यांच्या पापांची क्षमा करणार नसशील तर मग तू लिहिलेल्या जीवनी पुस्तकातून माझे नांव काढून टाक.”
33 परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “जे मजविरुद्ध पाप करतात केवळ त्या लोकांचीच नांवे मी माझ्या पुस्तकातून काढून टाकतो. 34 तेव्हा तू आता खाली जा आणि मी सांगतो तेथे लोकांना घेऊन जा; माझा दूत तुजपुढे चालेल व तुला मार्ग दाखवील जेव्हा पाप केलेल्या लोकांना शिक्षा करण्याची वेळ येईल तेव्हा त्यांना शिक्षा केली जाईल.” 35 लोकांनीच आपल्यासाठी अहरोनाला सोन्याचे वासरु बनवावयास सांगितले म्हणून परमेश्वराने लोकांवर भयंकर रोगराई आणली.
सावधानतेचा इशारा आणि करावयाच्या गोष्टी
17 पण, तुम्ही प्रियजनहो, आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेले शब्द आठवा. 18 त्यांनी सांगितले, “काळाच्या शेवटी देवाविषयी थट्टेने बोलणारे लोक असतील, ते त्यांच्या स्वतःच्याच अधार्मिक इच्छांच्या मागे जातील.” 19 असे लोक फूट पाडतात. ते त्यांच्या मूळ स्वभावाप्रमाणे चालतात. त्यांना आत्मा नाही.
20 पण तुम्ही प्रिय मित्रांनो, आपल्यापवित्र शिकविण्यात आलेल्या विश्वासात परस्परांना आध्यात्मिक रीतीने बळकट करा. पवित्र आत्म्याने युक्त होऊन प्रार्थना करा. 21 आणि तुम्हांला अनंतकाळच्या जीवनात घेऊन जाणाऱ्या आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या कृपेची वाट पाहत, देवाच्या प्रीतीत स्वतःला राखा.
22 विश्वासात डळमळीत असलेल्या लोकांवर दया करा. 23 त्यांना अग्नीतून ओढून काढून वाचवा. पण दया दाखविण्याच्या वेळी काळजी घ्या. आणि त्यांच्या दैहिक पापामुळे मळीन झालेल्या कपड्यांचा तिरस्कार करा.
देवाची स्तुति करा
24 आता, तुम्ही पडू नये म्हणून तुम्हाला राखावयास जो समर्थ आहे आणि तुम्हाला आपल्या गौरवी समक्षतेत शुद्ध असे सादर करायला जो मोठ्या आनंदाने तयार आहे, त्याला आणि आपले तारण करणारा जो 25 एकच देव आहे, त्याला आपला प्रभु येशू ख्रिस्त याच्याद्वारे गौरव, मान, पराक्रम आणि अधिकार काल, आज आणि अनंतकाळ असो. आमेन.
2006 by World Bible Translation Center