Revised Common Lectionary (Semicontinuous)
सोन्याचे वासरु
32 इस्राएल लोकांनी असे पाहिले की बराच वेळ होऊन गेला तरी मोशे पर्वतावरून खाली आला नाही; तेव्हा सर्व लोक अहरोनाभोवती जमले व त्याला म्हणाले, “पाहा, मोशेने आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले परंतु मोशेचे काय झाले ते आम्हांस कळत नाही, म्हणून आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी तयार कर; आम्ही त्यांच्या मागे जाऊ.”
2 अहरोन लोकांना म्हणाला, “तुम्ही तुमच्या बायका मुले व मुली यांच्या कानातील सोन्याची कुंडले मजकडे आणा.”
3 मग सर्व लोकांनी त्यांच्या कडील सोन्याची कुंडले गोळा करून अहरोनाकडे आणली. 4 अहरोनाने लोकांकडून ते सोने घेतले; आणि ते ओतून व कोरणीने कोरुन त्यापासून वासराची मूर्ती केली.
मग लोक म्हणाले, “हे इस्राएल, पाहा; हा तुमचा देव! यानेच तुला मिसर देशातून बाहेर आणले.”
5 अहरोनाने हे सर्व पाहिले तेव्हा त्याने त्या वासरापुढे एक वेदी बांधली आणि जाहीर करून तो म्हणाला, “तुमच्या परमेश्वराच्या सन्मानाकरता उद्या मोठा उत्सव होणार आहे.”
6 लोक दुसऱ्या दिवशी पहाटेच उठले; त्यांनी जनावरांचा वध केला व होमार्पण व शांत्यर्पणे वाहिली. मग ते खाण्यापिण्यास बसले; नंतर उठून ते खेळायला लागले.
7 त्याच वेळी परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू पर्वत उतरुन लवकर खाली जा, कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिसर देशातून बाहेर आणले त्यांनी महाभयंकर पाप केले आहे. 8 मी त्यांना करावयास संगितलेल्या गोष्टीपासून किती लवकर ते दूर गेले आहेत! त्यांनी आपल्यासाठी सोने वितळवून वासराची मूर्ती केली आहे; ते त्याची पूजा करीत आहेत व त्याला अर्पणे वाहात आहेत; ते म्हणत आहेत, ‘हे इस्राएल, ह्याच देवांनी तुला मिसर देशातून बाहेर आणले आहे.’”
9 परमेश्वर मोशेला म्हणाला, “ह्या लोकांना मी पाहिले आहे; ते फार ताठमानेचे लोक आहेत; ते नेहमी मजविरुद्ध उठतात. 10 तर आता मला त्यांना माझ्या रागाच्या तडाख्याने नष्ट करु दे! नंतर मी तुझ्यापासून एक महान राष्ट्र निर्माण करीन.”
11 परंतु काकुळतीने विनंती करुन मोशे आपला देव परमेश्वर ह्याला म्हणाला, “परमेश्वरा, तुझ्या रागाने तुझ्या लोकांचा नाश न होवो; तू तुझ्या महान शक्तीने व सामर्थ्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणलेस 12 आणि आता तू त्यांचा नाश केलास तर मिसर देशाचे लोक म्हणतील, ‘परमेश्वराने त्यांचे वाईट करण्यासाठी, डोंगरावर त्यांना ठार मारण्यासाठी व पृथ्वीवरुन त्यांचा नायनाट करण्यासाठी त्यांना मिसर देशातून बाहेर नेले’ म्हणून तू त्यांच्यावर रागावू नकोस; तुझा राग तू सोडून टाक; तुझ्याच लोकांचा तू नाश करु नयेस; 13 तुझे सेवक अब्राहाम, इसहाक व याकोब, यांची आठवण कर; तू तुझ्या नांवाने शपथ वाहिली होतीस; तू म्हणाला होतास, ‘मी तुमची संतती आकाशातील ताऱ्या इतकी करीन, मी वचन दिलेला देश त्यांना देईन व तो कायमचेच त्यांचे वतन होईल.’”
14 तेव्हा परमेश्वराला लोकांबद्दल वाईट वाटले आणि आधी म्हटल्याप्रमाणे त्याने त्यांचा नाश केला नाही.
106 परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याला धन्यवाद द्या.
देवाचे प्रेम सदैव राहील.
2 परमेश्वर खरोखरच किती महान आहे याचे वर्णन कुणीही करु शकणार नाही.
देवाची जितकी स्तुती करायला हवी तितकी कुणीही करु शकणार नाही.
3 जे लोक देवाच्या आज्ञा पाळतात ते सुखी असतात.
ते लोक सदैव चांगली कृत्ये करतात.
4 परमेश्वरा, तू जेव्हा तुझ्या माणसांशी दयाळू असतोस तेव्हा माझी आठवण ठेव.
मलाही वाचवायचे आहे हे लक्षात ठेव.
5 परमेश्वरा, तू तुझ्या माणसांसाठी
ज्या चांगल्यागोष्टी करतोस त्यांत मला वाटेकरी होऊ दे.
मला तुझ्या माणसांबरोबर आनंदी होऊ दे.
मला ही तुझ्या माणसांबरोबर तुझा अभिमान वाटू दे.
6 आम्ही आमच्या पूर्वजांसारखेच पाप केले.
आम्ही चुकलो.
आम्ही दुष्कृत्ये केली.
19 त्या लोकांनी होरेब पर्वतावर सोन्याचे वासरु केले.
त्यांनी मूर्तीपूजा केली.
20 त्या लोकांनी त्याच्या वैभवशाली देवाची गवतखाणाऱ्या
बैलाच्या मूर्तीबरोबर अदलाबदल केली.
21 देवाने आमच्या पूर्वजांना वाचवले.
पण ते मात्र त्याला पूर्णपणे विसरले.
ज्या देवाने मिसरमध्ये चमत्कार केले त्या देवाला ते विसरले.
22 देवाने हामच्या देशात अद्भुत गोष्टी केल्या.
देवाने लाल समुद्राजवळ भयानक गोष्टी केल्या.
23 देवाला त्या लोकांचा नाश करायची इच्छा होती.
परंतु मोशेने त्याला थोपवले.
मोशे देवाचा निवडलेला सेवक होता.
देव खूप रागावला होता.
पण मोशेने त्याचा मार्ग अडविला म्हणून देवाने लोकांचा नाश केला नाही. [a]
काही गोष्टी करणे
4 म्हणून माझ्या प्रिय आणि भेटीस आतुर झालेल्या बंधूंनो, माझा आनंद आणि मुकुट असलेल्यांनो मी तुम्हांला सांगितल्याप्रमाणे प्रभूमध्ये स्थिर राहा.
2 मी युवदीया आणि संतुखेला सुद्धा प्रभूमध्ये बहिणी या नात्याने एकच विचार करण्यासाठी उत्तेजन देत आहे. 3 माझ्या विश्वासू सहकाऱ्यांनो, मी तुम्हाला सांगतो की, ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर सुवार्तेच्या प्रसारासाठी कष्ट घेतले आणि ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहेत त्यांना कृपा करुन मदत करा.
4 प्रभूमध्ये नेहमी आनंद करा.
5 मी पुन्हा म्हणेनः आनंद करा! तुमची सौम्यता सर्व लोकांना समजावी. प्रभु जवळ आहे. 6 कशाचीही काळजी करु नका, तर प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना आणि विनंत्या उपकार मानून तुमच्या विनंत्या देवाला कळवा. 7 जी शांति देवापासून येते, जी शांति सर्व मानवी समजबुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमचे अंतःकरण व मन ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित ठेवील.
8 शेवटी, बंधूंनो, जे काही सत्य आहे, जे काही उदात्त आहे, जे काही योग्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही सुंदर आहे, जे काही प्रशंसनीय आहे, जर सदगुण आहे, आणि जर काही स्तुति आहे, या गोष्टींनी तुमची मने भरुन टाका. 9 जे काही तुम्ही शिकला आहात, जे तुम्हांला मिळाले आहे व जे माझ्याकडून ऐकले आहे आणि जे मी करताना तुम्ही पाहिले आहे, त्या गोष्टी करीत राहा. आणि देव जो शांतीचा उगम आहे तो तुमच्याबरोबर राहील.
लोकांना भोजनाला दिलेल्या आमंत्रणाची बोधकथा(A)
22 येशूने त्यांच्याशी बोलण्यास सूरुवात करून पुन्हा एकदा बोधकथेचा वापर केला. तो म्हणाला, 2 “स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे, त्याने त्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त भोजनाचे आमंत्रण दिले. 3 त्याने त्याच्या नोकरांना पाठवून, ज्यांना लग्नाचे आमंत्रण होते अशांना बोलाविण्यास सांगितले. पण लोकांनी राजाच्या मेजवानीस येण्यास नकार दिला.
4 “नंतर राजाने आणखी काही नोकरांना पाठवून दिले. राजा नोकरांना म्हणाला, ‘मी त्या लोकांना अगोदरच आमंत्रण दिले आहे म्हणून आता जा आणि त्यांना सांगा, पाहा, मेजवानी तयार आहे. मी चांगल्यातील चांगले बैल आणि वासरे कापली आहेत आणी सगळे तयार आहे. लग्नाच्या मेजवानीस या!’
5 “नोकर गेले आणि त्यांनी लोकांस येण्यास सांगितले, पण त्यांनी नोकरांच्याकडे लक्ष दिले नाही. ते आपापल्या कामास निघून गेले. एक शेतात काम करायला गेला, तर दुसरा व्यापार करायला गेला. 6 काहींनी मालकाच्या उरलेल्या नोकरांना पकडून मार दिला व जिवे मारले. 7 राजा फार रागावला. त्याने त्याचे सैन्य पाठविले आणि त्यांनी त्या खुन्यांना ठार मारले. त्यांनी त्यांचे शहर जाळले.
8 “मग राजा त्याच्या नोकरांना म्हणाला, ‘मेजवानी तयार आहे, पण ज्यांना बोलाविले होते ते पात्र नव्हते, 9 म्हणून रस्त्यांच्या कोपऱ्यांवर जा आणि तेथे तुम्हांला जे भेटतील त्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा.’ 10 मग ते नोकर रस्त्यावर गेले. त्यांना जे जे लोक भेटले त्यांना जमा केले. ज्या ठिकाणी लग्नाची मेजवानी तयार होती तेथे नोकरांनी चांगल्या आणि वाईट लोकांना जमा केले आणि ती जागा भरून गेली.
11 “मग त्या सर्वांना भेटण्यास राजा तेथे आला. मेजवानीसाठी साजेल असा पोशाख न केलेला एक मनुष्य राजाला तेथे आढळला. 12 राजा त्याला म्हणाला, ‘मित्रा, तुला तेथे कोणी व कसे येऊ दिले? मेजवानीला साजेसे कपडे नसताना तू येथे कसा आलास?’ पण तो गप्प राहिला. 13 तेव्हा राजाने नोकरांना सांगितले, ‘या मनुष्याचे हात व पाय बांधा आणि त्याला बाहेर अंधारात टाका, तेथे रडणे आणि दातखाणे चालेल.’
14 “कारण बोलाविलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडे.”
2006 by World Bible Translation Center