Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 119:49-56

जायिन

49 परमेश्वरा, तू मला दिलेल्या वचनाची आठवण ठेव.
    ते वचन माझ्या मनात आशा निर्माण करते.
50 मी पीडित होतो, दु:खी होतो.
    आणि तू माझे सांत्वन केलेस.
    तुझ्या शब्दांनी मला परत जगायला लावले.
51 जे लोक स्वत:ला माझ्यापेक्षा चांगले समजतात त्यांनी माझा सतत अपमान केला.
    पण मी तुझ्या शिकवणी नुसार वागणे सोडले नाही.
52 मी नेहमी तुझ्या राहाणपणाच्या निर्णयांची आठवण ठेवतो.
    परमेश्वरा, तुझे निर्णय मला समाधान देतात, माझे सांत्वन करतात.
53 दुष्ट लोक तुझी शिकवण आचरणे
    सोडून देतात ते पाहिले की मला राग येतो.
54 घरात तुझे नियम हीच माझी गाणी आहेत.
55 परमेश्वरा, रात्री मला तुझे नाव
    आणि तुझी शिकवण आठवते.
56 असे घडते कारण मी अगदी काळजी पूर्वक तुझी आज्ञा पाळतो.

अनुवाद 6:10-25

10 “अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना तुम्हांला हा देश देण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने वचन दिले होते. तो तुम्हांला मिळेल. तुम्ही स्वतः वसवलेली नाहीत अशी मोठी, समृध्द नगरे तो तुम्हाला देईल. 11 उत्तम वस्तूंनी भरलेली घरे परमेश्वर तुम्हाला देईल. तुम्हाला खोदाव्या न लागलेल्या विहिरी परमेश्वर तुम्हांला देईल. तुम्ही लागवड न केलेले द्राक्षांचे आणि जैतून वृक्षांचे मळे तुम्हाला देईल. आणि मुबलक अन्नधान्याने तुम्ही तृप्त व्हाल.

12 “पण सावध राहा! परमेश्वराला विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता पण तेथून त्याने तुम्हांला बाहेर आणले. 13 त्याचा आदर ठेवा व त्याचीच सेवा करा. शपथ घेताना त्याच्या नावाने शपथ वाहा, खोट्या देवांच्या नावाने घेऊ नका. 14 तुमच्या आसपासच्या राष्ट्रातील लोकांच्या दैवतांच्या नादी लागू नका. 15 तुमचा देव परमेश्वर सतत तुमच्या बरोबर आहे. त्याच्या लोकांनी इतर दैवतांची पूजा केलेली परमेश्वराला आवडत नाही. भलत्याच दैवतांची तुम्ही पूजा केल्यास त्याचा कोप होईल. त्या क्रोधाने तो तुम्हाला पृथ्वीच्या पाठीवरुन नष्ट करील.

16 “मस्सा येथे तुम्ही आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहिलीत, तसे इथे करु नका. 17 त्याच्या आज्ञा कटाक्षाने पाळा. त्याच्या शिकवणीचे व नियमांचे पालन करा. 18 उचित आणि चांगले आहे तेच करा. त्यानेच परमेश्वर प्रसन्न होतो. त्याने तुमचे कल्याण होईल. परमेश्वराने जो चांगला प्रदेश तुम्हांला द्यायचे तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे, त्यात तुमचा प्रवेश होईल. 19 परमेश्वराने कबूल केल्याप्रमाणे, तुम्ही आपल्या शत्रूंना हुसकावून लावाल.

देवाने जे केले ते मुलांना शिकवा

20 “आपल्या परमेश्वर देवाने जी शिकवण दिली, विधी नियम सांगितले त्याचा अर्थ काय असे पुढे तुमची मुले विचारतील. 21 तेव्हा त्यांना सांगा की आम्ही मिसरमध्ये फारोचे गुलाम होतो. परंतु परमेश्वराने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हाला तेथून बाहेर आणले. 22 त्याने मिसरी लोक, फारो व त्याचे कुटुंब यांच्याविरुद्ध मोठे प्रभावी चमत्कार करुन दाखवले ते आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहेत. 23 आपल्या पूर्वजांना कबूल केलेला प्रदेश आपल्याला द्यायला त्याने आम्हांला मिसरमधून बाहेर आणले. 24 ही सर्व शिकवण पाळायची आज्ञा परमेश्वराने आम्हाला दिली आहे. आपण आपला देव परमेश्वर ह्याचा आदर बाळगला पाहिजे. मग तो आपल्याला कायम जीवंत ठेवील व भले करील. 25 जर आपण काळजीपूर्वक परमेश्वराचे सर्व नियम पाळले तर आपण फार चांगली गोष्ट [a] केली आहे असे तो म्हणेल.

योहान 11:45-57

यहूदी पुढारी येशूला ठार मारण्याचा कट करतात(A)

45 जे यहूदी मरीयेकडे आले होते, त्यांनी येशूने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. 46 पण त्यांच्यातील काहींनी परुश्यांकडे जाऊन येशूने जे केले होते ते त्यांना सांगितले. 47 तेव्हा मुख्य याजकांनी व परुश्यांनी सभा भरवून म्हटले, “हा मनुष्य पुष्कळ चमत्कार करीत आहे. 48 आम्ही त्याला असेच राहू दिले तर सर्व लोक त्याच्यार विश्वास ठेवतील आणि रोमी येऊन आमचे मंदिर व राष्ट्र दोन्हीही घेतील.”

49 तेव्हा त्यांच्यातील कयफा नावाची व्यक्ति त्या वर्षी प्रमुख याजक होती. तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला काहीच माहिती नाही! 50 तुम्ही हे लक्षात घेत नाही की, सर्व लोकांसाठी एका माणसाने मरणे हे सर्व राष्ट्राचा नाश होण्यापेक्षा हिताचे आहे.”

51 तो हे स्वतः होऊन बोलला नाही तर त्यावर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने संदेश दिला की, येशू त्या राष्ट्राकरिता मरणार आहे. 52 केवळ त्या राष्ट्रासाठी असे नाही, तर यासाठी की, त्याने देवाच्या पांगलेल्यांना एकत्र करावे, म्हणून तो मरणार आहे.

53 म्हणून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याची मसलत केली. 54 यामुळे येशू तेव्हापासून उघडपणे यहूघांमध्ये फिरला नाही. त्याऐवजी तो रानाजवळच्या प्रदेशातील ऐफ्राईम नावाच्या नगरात गेला व तेथे शिष्यांसह राहिला.

55 तेव्हा यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता आणि सणाअगोदर पुष्कळ लोक आपणांस शुद्ध करायला देशातून वर यरुशलेमेस गेले. 56 ते येशूचा शोध करीत राहीले, आणि मंदिरात उभे असताना एकमेकास म्हणाले, “तुम्हाला काय वाटते? तो सणाला येणार नाही काय?” 57 पण मुख्य याजक व परुश्यांनी अशी आज्ञा केली होती की, येशू कोठे आहे हे ज्याला कळेल त्याने त्यांना कळवावे, म्हणजे ते त्याला पकडू शकतील.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center