Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमूख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
19 स्वर्ग देवाचा महिमा गातात.
आणि आकाश देवाने आपल्या हाताने ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या दाखवते.
2 प्रत्येक नवा दिवस त्या गोष्टींबद्दल अधिक काही सांगतो
आणि प्रत्येक रात्र देवाच्या सामर्थ्याची अधिकाधिक रुपे दाखवते.
3 तुम्हांला एखादे भाषण किंवा शब्द खरोखरच ऐकू येत नाही.
तुम्हांला ऐकू येण्यासारखा एखादा आवाज ते करीत नाहीत.
4 परंतु त्यांचा “आवाज” सर्व जगभर जातो
त्यांचे “शब्द” पृथ्वीच्या टोकापर्यंत जातात.
आकाश म्हणजे जणू सूर्याचे घरच आहे.
5 सूर्य त्याच्या झोपायच्या खोलीतून आनंदी नवऱ्या मुलासारखा बाहेर येतो.
सूर्य त्याच्या परिक्रमेची सुरुवात अधीर झालेल्या
एखाद्या धावपटू सारखी करतो.
6 सूर्य आकाशाच्या एका कोपऱ्यापासून सुरुवात करतो
आणि तो आकाशाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जातो.
त्याच्या उष्णतेपासून काहीही लपून राहू शकत नाही.
परमेश्वराची शिकवणही तशीच आहे.
7 परमेश्वराची शिकवण अतिशय योग्य आहे.
ती देवाच्या लोकांना शक्ती देते.
परमेश्वराच्या करारावर विश्वास ठेवणे शक्य आहे.
त्यामुळे मूर्ख लोकांना शहाणे बनण्यास मदत होते.
8 परमेश्वराचे नियम योग्य आहेत
ते लोकांना सुखी करतात.
परमेश्वराच्या आज्ञा चांगल्या आहेत
त्या लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात.
9 परमेश्वराची भीती शुध्द आहे.
ती अखंड सहन करावी लागेल.
परमेश्वराचे निर्णय चांगले आणि योग्य आहेत.
ते संपूर्णत बरोबर आहेत.
10 परमेश्वराची शिकवण अतिशय शुध्द अशा सोन्यापेक्षा ही किंमती आहे.
ती मधाच्या पोळ्यातून मिळणाऱ्या, शुध्द मधापेक्षाही गोड आहे.
11 परमेश्वराच्या शिकवणी ने त्याच्या सेवकाला इशारा मिळतो.
चांगल्या गोष्टींचे पालन केल्यामुळे चांगले फळ मिळते.
12 कोणालाही आपल्या सगळ्या चुका दिसू शकत नाहीत.
म्हणून मला गुप्त पाप करु देऊ नकोस.
13 परमेश्वरा, जी पापे करायची इच्छा मला होते, ती मला करु देऊ नकोस.
त्या पापांना माझ्यावर राज्य करु देऊ नकोस.
तू जर मला मदत केलीस तर मी शुध्द होईन आणी माझ्या पापांपासून मुक्त होईन.
14 माझ्या शब्दांनी आणि माझ्या विचारांनी तुला आनंद व्हावा असे मला वाटते.
परमेश्वरा, तू माझा खडक आहेस.
मला वाचवणारा फक्त तूच आहेस.
विशेष सुट्ट्यां
10 “सहा वर्षे जमिनीची मशागत करा; पेरणी करा; धान्य पिकवा; चांगला हंगाम येऊ द्या. 11 परंतु सातव्या वर्षी जमीन पडीक ठेवा; सातवे वर्ष हे जमिनीसाठी खास विसाव्या वर्ष ठेवा. त्यावर्षी शेतात काहीही पेरू नये. जर शेतात काही उगवले तर ते गरीबांना घेऊ द्या; व राहिलेले वनपशूंना खाऊ द्या; तुमचे द्राक्षमळे व जैतुनाची बने यांच्या बाबतीतही असेच करावे.
12 “तुम्ही सहा दिवस काम करावे, व सातव्या दिवशी विसावा घ्यावा; त्यामुळे तुमच्या गुलामांना व इतर कामकऱ्यांनाही विसावा मिळेल व त्यांना मोकळे मोकळे वाटेल; तुमच्या बैलांना व गाढवानांही विसावा मिळेल.
13 “हे सर्व नियम तुम्ही अवश्य व कटाक्षाने पाळावेत; इतर दैवतांची उपासना करु नका; त्यांची नांवेही तुमच्या तोंडाने उच्चारू नका.
लोक येशूविषयी वाद करतात
40 येशूने सांगितलेल्या या गोष्टी लोकांनी ऐकल्या. काही लोक म्हणाले, “हा माणूस खरोखरच संदेष्टा आहे.”
41 दुसरे म्हणाले, “हा ख्रिस्त आहे.”
तर दुसरे काहीजण म्हणाले, “ख्रिस्त हा गालील प्रांतातून येणार नाही.” 42 पवित्र शास्त्रात असेही लिहिले आहे की, “ख्रिस्त दावीद राजाच्या घराण्यातून येईल.” 43 आणि पवित्र शास्त्रात असेही लिहिले आहे की, “दावीद राजा राहत असे त्या बेथलहेम गावातून ख्रिस्त येईल.” तेव्हा येशूमुळे लोकांचे एकमत होईना. 44 काहींना येशूला अटक करायचे होते पण तसा प्रयत्न कोणीच केला नाही.
यहूदी पुढारी येशूवर विश्वास ठेवण्यास नकार देतात
45 मंदिराचे शिपाई मुख्य याजकांकडे आणि परुश्यांकडे परत गेले. मुख्य याजकांनी व परुश्यांनी शिपायांना विचारले, “तुम्ही येशूला का आणले नाही?”
46 मंदिराचे शिपाई म्हणाले, “तो बोलतो त्या गोष्टी कोणत्याही मानवी शब्दांपेक्षा महान आहेत!”
47 मग परुशी म्हणाले, “म्हणजे येशूने तुम्हांलासुद्धा मूर्ख बनविले! 48 पुढाऱ्यांपैकी एकाने तरी येशूवर विश्वास ठेवला का? नाही! आम्हा परुश्यांपैकी एकाने तरी त्याच्यावर विश्वास ठेवला का? नाही! 49 परंतु बाहेरच्या लोकांना नियसशास्त्राची माहिती नाही, त्यांच्यावर देवाचा कोप होईल!”
50 परंतु त्या घोळक्यात निकदेम हजर होता. यापूर्वी हा निकदेमच येशूला भेटायला आला होता [a] निकदेम म्हणाला, 51 “एखाद्या माणसाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय त्याला आपल्या नियसशास्त्राप्रमाणे दोषी ठरवता येत नाही. त्याने काय केले हे कळल्याशिवाय आपण त्याचा न्याय करु शकत नाही.”
52 यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “तू सुद्धा गालील प्रांतामधील आहेस काय? पवित्र शास्त्र वाचून पाहा! गालीलातून एकही संदेष्टा येणार नाही. हे तुला कळेल.”
2006 by World Bible Translation Center