Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 42

भाग दुसरा

(स्त्रोतसंहिता 42-72)

प्रमुख गायकासाठी कोरहाच्या कुटूंबाकडून मास्कील

42 हरणाला झऱ्याच्या पाण्याची तहान लागते.
    त्याचप्रमाणे देवा माझा आत्मा तुझ्यासाठी तहानेला आहे.
माझा आत्मा जिवंत देवासाठी तहानेला आहे.
    मी त्याला भेटायला केव्हा जाऊ शकेन?
रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे.
    सर्व वेळ माझा शत्रू थट्टा करुन म्हणत आहे, “कुठे आहे तुझा देव?”

म्हणून मला या सर्व गोष्टी आठवू दे.
मला माझे मन रिकामे करु दे.
    जमावाला मी देवाच्या मंदिरापर्यत नेल्याची मला आठवण आहे.

खूप लोकांबरोबर स्तुतीचे आनंदी गाणे गाऊन
    सण साजरा केल्याची मला आठवण आहे.

5-6 मी दु:खी का व्हावे?
    मी इतके का तळमळावे?
मी देवाकडून मदतीसाठी थांबले पाहीजे.
    त्याची स्तुती करण्याची मला पुन्हा संधी मिळेल.
    तो मला वाचवेल!
देवा, मी खूप दु:खी आहे म्हणूनच मी तुला बोलावले.
    मी यार्देनच्या दरीपासून हर्मोनच्या डोंगरावर आणि मिसहारच्या टेकडीवर गेलो.
या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत मी तुझ्या लाटांचा आपटण्याचा आवाज ऐकला.
    समुद्रातल्या लाटांसारखी संकटे माझ्यावर पुन्हा कोसळली,
परमेश्वरा तुझ्या लाटा माझ्यावर चहु बाजूंनी आदळत आहेत.
    तुझ्या लाटांनी मला पूर्णपणे झाकले आहे.

दररोज व रात्रीही परमेश्वर त्याचे खरे प्रेम दाखवतो म्हणून
    माझ्याजवळ त्याच्यासाठी एक गीत आहे व एक प्रार्थना आहे.
मी देवाशी माझ्या खडकाशी बोलतो मी म्हणतो,
    “परमेश्वरा, तू मला का विसरलास?
    माझ्या शत्रूच्या क्रूरतेमुळे मी इतके दु:ख का सहन करावे?”
10 माझ्या शत्रूंनी मला मारण्याचा प्रयत्न केला, “तुझा देव कुठे आहे?”
    असे जेव्हा ते मला विचारतात तेव्हा ते माझा तिरस्कार करत आहेत असे दाखवतात.

11 मी इतका दु:खी का आहे?
    मी इतका खिन्न का आहे?
मी देवाच्या मदतीची वाट बघितली पाहिजे.
    त्याची स्तुती करण्याची संधी मला पुन्हा मिळेल.
    तो मला वाचवेल.

निर्गम 18:13-27

13 दुसऱ्या दिवशी मोशेला लोकांचा न्यायनिवाडा करण्याचे विशेष काम होते. लोक खूप असल्यामुळे त्यांना दिवसभर मोशेसमोर उभे रहावे लागले.

14 मोशेला इस्राएल लोकांचा न्यायनिवाडा करताना इथ्रोने पाहिले तेव्हा त्याने त्याला विचारले, “तू असे का करीत आहेस? तू एकटाच न्यायनिवाडा का करीत आहेस? आणि लोक न्यायनिवाड्यासाठी दिवसभर तुझ्याकडे का येतात?”

15 मोशे आपल्या सासऱ्यास म्हणाला, “आपल्या अडचणी व आपले प्रश्न या संबंधी देवाचा काय निर्णय आहे ते विचारण्यासाठी लोक माझ्याकडे येतात. 16 लोकांचा काही भांडणतंटा असेल तर ते माझ्याकडे येतात तेव्हा कोणत्या माणसाचे म्हणणे खरे आहे हे मी ठरवितो. ह्याप्रमाणे मी लोकांना देवाचे नियम व विधी यांचे शिक्षण देतो.”

17 परंतु मोशेचा सासरा त्याला म्हणाला, “हे तू करतोस ते चांगले नाही. 18 तुझ्या एकट्यासाठी हे काम फार आहे त्यामुळे तू थकून जातोस व लोकही थकून जातात हे काम तुला एकट्याला करवणार नाही. 19 तू लोकांची गाऱ्हाणी ऐकत असावेस व त्याचबरोबर त्यांसंबंधी देवाकडे बोलतही रहावेस असा मी तुला सल्ला देतो, त्यात देव तुझ्याबरोबर असो अशी मी प्रार्थना करतो. 20 तू लोकांना देवाचे नियम व विधी या संबंधी शिक्षण दे; आणि ते त्यांनी मोडू नयेत अशी ताकीद त्यांना दे; लोकांनी आपल्या जीवनात योग्य मार्गाने चालावे व त्यासाठी त्यांनी काय करावे याविषयी त्यांना तू समजावून सांग.

21 “तू लोकांमधून कर्तबगार देवाला भिणारे, व विश्वासू, पैसे खाऊन आपला निकाल बदलून अन्याय न करणारे असे लोक निवडून घे; त्यांना हजार लोकांवर, शंभर लोकावर, पन्नास लोकावर आणि दहा लोकांवर नायक म्हणून नेम. 22 ह्या नायक लोकांनी लोकांचा न्यायनिवाडा करावा; जर अगदी महत्वाची बाब असेल तर तिचा न्यायनिवाडा करण्याकरिता तो वाद नायकांनी तुझ्याकडे आणावा, परंतु साध्या प्रकरणांसंबंधी त्यांनी स्वतः निर्णय द्यावेत. अशा प्रकारे तुझे काम सोपे होईल तसेच तुझ्या कामात ते वाटेकरी होतील. 23 तू असे करशील व परमेश्वराची तशी इच्छा असेल तर तुझे काम करीत राहणे तुला शक्य होईल, आणि त्याचवेळी लोकांचे प्रश्न सुटून ते घरी जाऊ शकतील.”

24 तेव्हा मोशेने इथ्रोच्या म्हणण्याप्रमाणे केले. 25 त्याने इस्राएल लोकांतून चांगले लोक निवडले आणि त्यांना हजार हजार, शंभर शंभर पन्नास पन्नास व दहादहावर नायक म्हणून नेमले. 26 ते लोकांवर न्यायाधीश झाले. लोक सतत नायकाकडे आपली गाऱ्हाणी आणू लागले व मोशेला फार महत्वाच्या प्रकणांबद्दलच निकाल देण्याचे काम करावे लागे.

27 मग थोड्याच दिवसांनी मोशेने आपला सासरा इथ्रो याला निरोप दिला आणि इथ्रो माघारी आपल्या घरी गेला.

फिलिप्पैकरांस 1:15-21

15 हे खरे आहे की त्याच्यातील काही जण हेव्याने व वैरभावने ख्रिस्ताचा संदेश देतात, पण इतर चांगल्या भावनेने ख्रिस्ताचा संदेश देतात. 16 हे लोक प्रेमापोटी असे करतात, कारण त्यांना माहीत आहे की, सुवार्तेचे समर्थन करण्यासाठी देवाने मला येथे ठेवले आहे. 17 पण दुसरे ख्रिस्ताची घोषणा स्वार्थी ध्येयाने करतात आणि प्रामाणिकपणे करीत नाहीत, कारण त्यांना वाटते की, मी तुरुंगात असताना मला त्रास देणे त्यांना शक्य होईल. 18 पण त्यामुळे काय होते? महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, प्रत्येक मार्गाने चांगला हेतू असो की वाईट हेतू असो, ख्रिस्त गाजविला जातो. आणि त्यामुळे मला आनंद होतो.

आणि मला आनंद होतच राहील. 19 कारण मला माहीत आहे तुमच्या प्रार्थनेमुळे आणि येशू ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे येणाऱ्या मदतीमुळे याचा परिणाम माझ्या सुटकेत होणार आहे. 20 हे माझ्या उत्सुक अपेक्षेप्रमाणे व आशेप्रमाणे आहे, कारण मला खात्री आहे, की, माझी निराशा होणार नाही, पण आता नेहमीसारखे माझ्या सर्व धैर्याने माझ्या जगण्याने किंवा मरण्याने ख्रिस्ताचा माझ्या शरीराद्वारे महिमा होईल. 21 कारण माझ्यासाठी जगणे म्हणजे ख्रिस्त आणि मरणे म्हणजे लाभ आहे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center