Revised Common Lectionary (Semicontinuous)
भाग दुसरा
(स्त्रोतसंहिता 42-72)
प्रमुख गायकासाठी कोरहाच्या कुटूंबाकडून मास्कील
42 हरणाला झऱ्याच्या पाण्याची तहान लागते.
त्याचप्रमाणे देवा माझा आत्मा तुझ्यासाठी तहानेला आहे.
2 माझा आत्मा जिवंत देवासाठी तहानेला आहे.
मी त्याला भेटायला केव्हा जाऊ शकेन?
3 रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे.
सर्व वेळ माझा शत्रू थट्टा करुन म्हणत आहे, “कुठे आहे तुझा देव?”
4 म्हणून मला या सर्व गोष्टी आठवू दे.
मला माझे मन रिकामे करु दे.
जमावाला मी देवाच्या मंदिरापर्यत नेल्याची मला आठवण आहे.
खूप लोकांबरोबर स्तुतीचे आनंदी गाणे गाऊन
सण साजरा केल्याची मला आठवण आहे.
5-6 मी दु:खी का व्हावे?
मी इतके का तळमळावे?
मी देवाकडून मदतीसाठी थांबले पाहीजे.
त्याची स्तुती करण्याची मला पुन्हा संधी मिळेल.
तो मला वाचवेल!
देवा, मी खूप दु:खी आहे म्हणूनच मी तुला बोलावले.
मी यार्देनच्या दरीपासून हर्मोनच्या डोंगरावर आणि मिसहारच्या टेकडीवर गेलो.
7 या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत मी तुझ्या लाटांचा आपटण्याचा आवाज ऐकला.
समुद्रातल्या लाटांसारखी संकटे माझ्यावर पुन्हा कोसळली,
परमेश्वरा तुझ्या लाटा माझ्यावर चहु बाजूंनी आदळत आहेत.
तुझ्या लाटांनी मला पूर्णपणे झाकले आहे.
8 दररोज व रात्रीही परमेश्वर त्याचे खरे प्रेम दाखवतो म्हणून
माझ्याजवळ त्याच्यासाठी एक गीत आहे व एक प्रार्थना आहे.
9 मी देवाशी माझ्या खडकाशी बोलतो मी म्हणतो,
“परमेश्वरा, तू मला का विसरलास?
माझ्या शत्रूच्या क्रूरतेमुळे मी इतके दु:ख का सहन करावे?”
10 माझ्या शत्रूंनी मला मारण्याचा प्रयत्न केला, “तुझा देव कुठे आहे?”
असे जेव्हा ते मला विचारतात तेव्हा ते माझा तिरस्कार करत आहेत असे दाखवतात.
11 मी इतका दु:खी का आहे?
मी इतका खिन्न का आहे?
मी देवाच्या मदतीची वाट बघितली पाहिजे.
त्याची स्तुती करण्याची संधी मला पुन्हा मिळेल.
तो मला वाचवेल.
मोशेचा सासरा सल्ला देतो
18 मोशेचा सासरा इथ्रो, मिद्यानाचा याजक होता. मोशे व इस्राएल लोक यांना देवाने अनेक मार्गानी मदत केली तसेच त्यांना त्याने मिसर देशातून सोडवून बाहेर आणले यासंबंधी इथ्रोने ऐकले; 2 तेव्हा तो देवाच्या पर्वताजवळ म्हणजे होरेब किंवा सीनाय पर्वताजवळ, जेथे मोशेने तळ दिला होता तेथे मोशेला भेटावयास गेला इथ्रोने मोशेची बायको सिप्पोरा हिलाही बरोबर आणले; (सिप्पोरा मोशे बरोबर नव्हती कारण त्याने तिला माहेरी पाठवले होते.) 3 इथ्रोने मोशेच्या दोन मुलांनाही बरोबर आणले. पहिल्या मुलाचे नांव गेर्षोम होते कारण त्याचा जन्म झाला त्यावेळी मोशे म्हणाला होता, “मी या देशात परका आहे.” 4 दुसऱ्या मुलाचे नांव एलीएजर असे होते, कारण तो जन्मला तेव्हा मोशे म्हणाला होता, “माझ्या वडिलांचा देव याने मला मदत केली व मला मिसरच्या राजाच्या हातातून वाचविले.” 5 तेव्हा इथ्रो रानात देवाच्या पर्वताजवळ म्हणजे सीनाय पर्वताजवळ जेथे मोशेने तळ दिला होता तेथे मोशेची बायको सिप्पोरा व त्याची दोन मुले यांना बरोबर घेऊन गेला.
6 इथ्रो ने मोशेला निरोप पाठवला, “मी तुझा सासरा, इथ्रो, तुझी बायको व तिची दोन मुले यांना घेऊन तुझ्याकडे आलो आहे.”
7 तेव्हा मोशे आपल्या सासऱ्याला भेटावयास सामोरा गेला; त्याने त्याच्यापुढे लवून त्याला नमन केले, आणि त्याचे चुंबन घेतले. त्या दोघांनी एकमेकांची खुशाली विचारली. नंतर ते अधिक बोलणे करावयास मोशेच्या तंबूत गेले. 8 परमेश्वराने इस्राएली लोकांसाठी जे जे केले ते सर्व मोशेने इथ्रोस सांगितले. मिसर देशाचा राजा फारो व त्याचे लोक ह्यांचे परमेश्वराने काय केले तसेच मिसरहून प्रवास करताना काय काय संकटे आली व कसा त्रास झाला आणि परमेश्वराने त्या सर्वांतून दरवेळी इस्राएल लोकांना कसे वाचवले ती सर्व हकीकत मोशेने इथ्रोस सांगितली.
9 परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या ऐकल्यावर आणि मिसरच्या लोकांपासून परमेश्वराने इस्राएल लोकांना स्वतंत्र केले म्हणून इथ्रोला फार आनंद झाला. 10 तो म्हणाला,
“परमेश्वराची स्तुती असो
कारण त्याने फारोच्या तावडीतून
व मिसरच्या लोकांपासून तुम्हाला स्वतंत्र केले आहे.
11 परमेश्वर सर्व देवांहून महान आहे
हे आता मला कळाले, कारण इस्राएल लोकापेक्षा स्वतःला चांगले मानीत असलेल्या इतर लोकांचे त्याने काय केले हे मला समजले.”
12 मग इथ्रोने देवाला यज्ञ व अर्पणे केली. नंतर अहरोन व इस्राएल लोकांमधील वडीलधारी माणसे म्हणजे पुढारी देवाची विशेष उपासना करावी म्हणून मोशेचा सासरा इथ्रो याच्याबरोबर जेवावयास आले.
पौलाची प्रार्थना
3 प्रत्येक वेळी जेव्हा मी तुमची आठवण करतो, तेव्हा देवाचे आभार मानतो. 4 नेहमीच तुमच्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रार्थनेच्यावेळी मी आनंदाने प्रार्थना करतो. 5 कारण अगदी पहिल्या दिवसांपासून ते आजपर्यंत सुवार्तेच्या कामात तुमचा सहभाग आहे. 6 मला याची खात्री आहे की, ज्या देवाने तुमच्यामध्ये अशा प्रकारचे चांगले कार्य सुरु केले आहे, तो ख्रिस्त येशू येण्याच्या वेळेपर्यंत ते पूर्ण करीत आणीला.
7 तुम्हा सर्वांविषयी असा विचार करणे मला योग्य वाटते कारण तुम्ही माझ्या हृदयात आहात. आणि मी तुरुंगात असतानाच केवळ नव्हे तर जेव्हा मी सुवार्तेचे सत्य ठासून सिद्ध करीत होतो, तेव्हा ही देवाने जी कृपा मला दिली आहे त्यात तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर वाटेकरी होता. 8 देव माझा साक्षी आहे, कारण ख्रिस्त येशूने जे प्रेम दाखविले त्यामुळे तुम्हां सर्वांसाठी मी अधीर झालो होतो.
9 आणि माझी हीच प्रार्थना आहे:
की तुमचे प्रेम अधिकाधिक वाढत जाईल पूर्ण ज्ञान व सर्व प्रकारच्या समजबुद्धीने वाढत जाईल. 10 मी अशी प्रार्थना करतो की, तुमच्याठायी हे गुण असावेत, यासाठी की जे शुद्ध व निर्दोष ते तुम्ही निवडावे, आणि अशा प्रकारे ख्रिस्ताच्या येण्याच्या दिवसासाठी तुम्ही शुद्ध व निर्दोष असावे, 11 आणि देवाच्या गौरवासाठी, स्तुति साठी आणि नीतिमत्त्वाचे फळ देण्यासाठी भरुन जावे.
पौलाच्या त्रासामुळे प्रभूच्या कार्याला मदत होते
12 बंधूनो, जे काही माझ्या बाबतीत घडले त्यामुळे सुवार्ताकार्यात प्रत्यक्ष वाढ झाली हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छ आहे. 13 याचा परिणाम असा झाला की, राजवाड्याच्या सर्व पहारेकऱ्यांना व येथे असणाऱ्या सर्वांना हे माहीत झाले की, मी ख्रिस्ताला अनुसरतो म्हणून मला तुरुंगवास भोगावा लागत आहे. 14 शिवाय, पुष्कळशा बांधवांना माझ्या तुरुंगवासामुळे उत्तेजन मिळाले. व ते बोलण्यात ख्रिस्तामध्ये अधिकाधिक धीट होत चालले आहेत व न भिता संदेश देत आहेत.
2006 by World Bible Translation Center