Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
निर्गम 17:1-7

17 सर्व इस्राएल लोक सीनच्या रानातून एकत्र प्रवास करत गेले, परमेश्वराने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे ते ठिकठिकाणाहून प्रवास करत रफीदीम येथे गेले आणि त्यांनी तेथे तळ दिला; तेथे त्यांना प्यावयास पाणी नव्हते. तेव्हा इस्राएल लोक मोशेविरुद्ध उठले व त्याच्याशी भांडू लागले. ते म्हणाले, “आम्हाला प्यावयास पाणी दे.”

मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याविरुद्ध का उठला आहात? तुम्ही परमेश्वराची परीक्षा का पाहात आहात?”

परंतु लोक तहानेने कासावीस झाले होते म्हणून ते मोशेकडे कुरकुर करीतच राहिले; ते म्हणाले, “तू आम्हाला मिसर देशातून बाहेर का आणलेस? आमची मुलेबाळे, गुरेढोरे यांना पाण्यावाचून मारण्यासाठी तेथून आम्हाला तू येथे आणलेस काय?”

तेव्हा मोशे परमेश्वराकडे धावा करून म्हणाला, “मी ह्या लोकांना काय करु? ते मला ठार मारावयास उठले आहेत.”

परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांपुढे जा. त्यांच्यापैकी काही वडीलधारी म्हणजे पुढारी माणसे तुजबरोबर घे. नाईल नदीच्या पाण्यावर तू जी काठी आपटली होतीस ती तू तुझ्याबरोबर घे. होरेब डोंगरावरील एका खडकावर म्हणजे सिनाय डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन, त्या खडकावर ती आपट म्हणजे त्या खडकातून पाणी बाहेर येईल. मग लोकांनी ते प्यावे.”

मोशेने हे सर्व केले आणि इस्राएल लोकांच्या वडिलधाऱ्या माणसांनी म्हणजे पुढाऱ्यांनी ते पाहिले. मोशेने त्या ठिकाणाचे नांव मरीबा व मस्सा ठेवले; कारण या ठिकाणी इस्राएल लोकांनी परमेश्वराविरुद्ध बंड केले आणि त्यांनी त्याची परीक्षा पाहिली. परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे किंवा नाही हे त्यांना पाहावयाचे होते.

स्तोत्रसंहिता 78:1-4

आसाफाचे मास्कील.

78 लोकहो! माझी शिकवण ऐका,
    मी काय सांगतो ते ऐका!
मी तुम्हांला ही गोष्ट सांगेन.
    मी तुम्हांला ही जुनी गोष्ट सांगेन.
आम्ही ती गोष्ट ऐकली आणि आम्हाला ती चांगली माहीत आहे.
    आमच्या वाडवडिलांनी आम्हाला ती गोष्ट सांगितली होती.
आणि आम्ही ती विसरणार नाही.
    आमचे लोक शेवटच्या पिढीपर्यंत ती गोष्ट सांगत राहातील.
आम्ही परमेश्वराची स्तुती करु
    आणि त्याने केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल सांगत राहू.

स्तोत्रसंहिता 78:12-16

12 मिसर देशातल्या सोअन प्रांतात देवाने
    त्यांच्या वाडवडिलांना त्याची महान शक्ती दाखवली.
13 देवाने लाल समुद्र दुभंगला आणि लोकांना पलिकडे नेले.
    पाणी एखाद्या भिंतीसारखे त्यांच्या दोन्ही बाजूला उभे होते.
14 देव रोज त्यांना उंच मेघाच्या साहायाने दिवसा
    व रात्री अग्नीच्या प्रकाशात मार्ग दाखवीत नेत असे.
15 देवाने वाळवंटात पाषाण फोडला
    त्याने लोकांना पृथ्वीच्या गर्भातून पाणी दिले.
16 देवाने खडकातून नदीसारखे
    खळखळणारे पाणी बाहेर आणले.

फिलिप्पैकरांस 2:1-13

संघटित व्हा आणि एकमेकांची काळजी घ्या

जर मग ख्रिस्तात तुमच्यामध्ये काही उत्तेजन आहे, जर तुमच्यामध्ये तुमच्या प्रीतितून वाढणारे सांत्वन आहे, जर तुमच्यामध्ये आत्म्यात काही भाग आहे, जर तुमच्यामध्ये जिव्हाळा व कळवळा आहे, तर मला पूर्णपणे आनंदी करा. मी सांगतो की, तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करता, एकमेकांविषयी सारखेच प्रेम आहे तर आत्म्यात एक व्हा, आणि एकच उद्देश असू द्या. हेवा किंवा पोकळ व्यर्थ अभिमानाने काहीही करु नका. उलट नम्रतेने एकमेकांना स्वतःपेक्षा चांगले माना. प्रत्येक व्यक्तीने केवळ आपलेच हित पाहू नये, तर प्रत्येकाने दुसऱ्यांचे हितसुद्धा पाहावे.

ख्रिस्ताकडून निस्वार्थी होण्याचे शिका

ख्रिस्त येशूच्या ठायी जे विचार होते तसेच तुमचेही असू द्या.

जरी तो देवाच्या स्वरुपाचा होता,
    तरी देवासारखे असणे हे संपत्ती राखून ठेवण्यासारखे मानले नाही.
उलट त्याने सर्व काही सोडून दोल,
    आणि त्याने गुलामाचे स्वरुप धारण केले आणि मनुष्याचे रुप धारण केले
व तो आपल्या दिसण्यात मनुष्यासारखा झाला.
    त्याने स्वतःला नम्र केले.
    आणि मरेपर्यंत तो आज्ञाधारक राहिला.
    होय, वधस्तंभावरच्या मरणापर्यंत तो नम्र झाला.
म्हणून देवाने सुद्धा त्याला अत्युच्च केले,
    व सर्व नावाहून जे नाव श्रष्ठ आहे ते त्याला दिले.
10 यासाठी की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे आहेत
    त्या सर्वांनी येशूच्या नावाच्या महिम्यासाठी गुडघे टेकावेत.
11 व प्रत्येक जिभेने जाहीर करावे की,
    “येशू खिस्त हा देव पिता आहे.”

देवाला पाहिजे तसे लोक व्हा

12 म्हणून माझ्या प्रियांनो, जसे तुम्ही मी प्रत्यक्ष असतानाच नव्हे तर आता दूर असतानासुद्धा आज्ञा पाळता तसे भीतीने कापत तुमचे तारण पूर्ण होण्यासाठी कार्य करीत राहा. 13 कारण देवच असा एक आहे जो तुमच्यामध्ये कार्य करण्याची इच्छा निर्माण करतो व तो संतुष्ट होईल अशा रीतीने कार्य पूर्णत्वास नेतो.

मत्तय 21:23-32

यहूदी पुढारी येशूच्या अधिकाराविषयी शंका घेतात(A)

23 येशू मंदिरात गेला, येशू तेथे शिक्षण देत असताना मुख्य याजक व वडीलजन येशूकडे आले. ते येशूला म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?”

24 येशू म्हणाला, “मी सुद्धा तुम्हांला एक प्रश्न विचारतो. जर तुम्ही मला उत्तर दिले तर मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मी तुम्हाला सांगेन. 25 तुम्ही मला सांगा, योहान लोकांना बाप्तिस्मा देत असे. तेव्हा त्याला तो देण्याचा अधिकार कोठून आला- देवाकडून की मनुष्यांकडून?”

येशूच्या या प्रश्नावर ते चर्चा करू लागले. ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा देवाकडून होता असे म्हणावे तर येशू म्हणले, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ 26 पण जर तो मनुष्यांकडून होता असे आपण म्हणालो तर सर्व लोक आपल्यावर रागावतील. आपल्याला लोकांची भीति आहे. कारण योहान हा एक संदेष्टा होता असे ते सर्व जण मानतात.”

27 म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, “योहानाचा अधिकार कोठून होता हे आम्हांला माहीत नाही.”

तेव्हा येशू म्हणाला, “मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मीही तुम्हांला सांगणार नाही.

येशू दोन पुत्रांचा दाखला सांगतो

28 “याविषयी तुम्हांला काय वाटते ते मला सांगा. एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो मनुष्य आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू माझ्या द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काम कर.’

29 “मुलाने उत्तर दिले, ‘मी जाणार नाही.’ परंतु नंतर त्या मुलाने जायचे ठरविले व तो गेला.

30 “नंतर वडील आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेले आणि म्हणाले, ‘माझ्या मुला, आज तू जाऊन माझ्या द्राक्षाच्या मळ्यात काम कर.’ त्या मुलाने उत्तर दिले, ‘होय बाबा, मी जातो.’ पण तो गेला नाही.

31 “त्या दोघांपैकी कोणत्या मुलाने वडीलांची आज्ञा पाळली?”

ते म्हणाले, “पहिल्या मुलाने.”

येशू त्यांना म्हणाला, “मी खरे सांगतो, जकातदार व वेश्या हे वाईट लोक आहेत असे तुम्हांला वाटते, पण ते तुमच्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात जातील. 32 जीवनाचा खरा रस्ता कोणता हे तुम्हांला दाखवावे म्हणून योहान आला आणि तुम्ही योहानाला मानले नाही. जकातदार व वेश्या यांनी योहानावर विश्वास ठेवला हे तुम्ही पाहिले पण तरी देखील तुम्ही आपले मन बदलण्यास आणि योहानावर विश्वास ठेवण्यास तयार झाला नाही.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center