Revised Common Lectionary (Semicontinuous)
2 लोक पुन्हा, रानात मोशे व अहरोन यांच्याकडे कुरकुर करु लागले; 3 ते म्हणाले, “परमेश्वराने आम्हाला मिसरमध्येच मारून टाकले असते तर बरे झाले असते कारण तेथे आम्हास खावयास लागणारे सर्व प्रकारचे अन्न भरपूर होते; परंतु तुम्ही आम्हांस येथे रानात आणले आहे; येथे आम्ही सर्वजण भुकेने तडफडून मरून जाऊ.”
4 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुम्हाला खाण्याकरिता मी आकाशातून अन्न पडावे असे करीन; दर दिवशी लोकांनी आपल्याला त्या दिवसाला पुरेल एवढे अन्न बाहेर जाऊन गोळा करावे. मी सांगतो त्याप्रमाणे लोक करतात की नाही हे पाहण्यासाठी मी हे करीन. 5 दरदिवशी लोकांनी एक दिवस पुरेल एवढेच अन्न गोळा करावे, परंतु शुक्रवारी जेव्हा ते जेवण तयार करतील तेव्हा मात्र ते जेवण दोन दिवस पुरेल इतके करावे.”
6 म्हणून मोशे व अहरोन लोकांना म्हणाले, “आज रात्री तुम्ही परमेश्वराचे सामर्थ्य पाहाल; तेव्हा मिसरमधून तुम्हाला वाचविणारा परमेश्वर हाच आहे हे तुम्हाला कळेल. 7 उद्या सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल; तुम्ही परमेश्वराकडे तक्रार केली आणि त्याने ती ऐकली; आणि तुम्ही उगीच आम्हाकडे पुन्हा पुन्हा तक्रार करीत आला आहात. आता आपण जरा आराम करु या.”
8 आणि मोशे म्हणाला, “तुम्ही एक सारखी तक्रार करीत आहात; परमेश्वराने तर तुमची तक्रार ऐकली आहे; तेव्हा आज रात्री परमेश्वर तुम्हाला मांस देणार आहे; आणि दर दिवशी सकाळी तुम्हाला पाहिजे तेवढ्या भाकरी मिळतील; तुम्ही अहरोनाकडे व मजकडे तक्रार करीत आहात तुम्ही माझ्या किंवा अहरोनाच्याविरुद्ध कुरकुर करीत नाही तर परमेश्वराविरुद्ध तक्रार करीत आहात हे लक्षात घ्या.”
9 मग मोशे अहरोनाला म्हणाला, “तू इस्राएल लोकांशी बोल; त्यांना सांग, तुम्ही परमेश्वराकडे एकत्र या कारण त्याने तुमच्या तक्रारी ऐकल्या आहेत.”
10 मग अहरोन सर्व इस्राएल लोकांशी बोलला. ते सर्वजण एके ठिकाणी जमले होते; अहरोन बोलत असताना सर्व लोकांनी वळून रानाकडे पाहिले; आणि त्यांना एका ढगात परमेश्वराचे तेज दिसले.
11 परमेश्वर मोशेला म्हणाला, 12 “मी इस्राएल लोकांच्या तक्रारी ऐकल्या आहेत तेव्हा त्यांना सांग, ‘रात्री तुम्ही मांस खाल आणि दररोज सकाळी तुम्हाला पाहिजे तितक्या भाकरी खाल; मग परमेश्वर मी तुमचा देव आहे हे तुम्हाला समजेल.’”
13 त्या संध्याकाळच्या वेळी, रात्र पडण्याच्या सुमारास तेथे लावे पक्षी आले व छावणीभर ते पसरले (आणि त्यांना खाण्याकरिता इस्राएल लोकांनी ते पकडले) आणि सकाळी छावणीच्या सभोंवती जमिनीवर दंव पडले. 14 सूर्य उगवल्यावर दंव विरून गेले परंतु त्या नंतर जमिनीवर खवल्यासारखे हिमकणा एवढे कण दिसले. 15 ते पाहून इस्राएल लोकांनी एकमेकांना विचारले, “ते काय आहे?” [a] त्यांनी असे विचारले कारण ते काय आहे हे त्यांना माहीत नव्हते. तेव्हा मोशेने त्यांना सांगितले, “परमेश्वर हे अन्न तुम्हाला खाण्याकरिता देत आहे.
105 परमेश्वराला धन्यावाद द्या.
त्याच्या नावाचा धावा करा.
राष्ट्रांना तो करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगा.
2 परमेश्वराला गाणे गा; त्याची स्तुतिगीते गा.
तो ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल सांगा.
3 परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा.
तुम्ही लोक परमेश्वराला शोधत आला, सुखी व्हा.
4 शक्तीसाठी परमेश्वराकडे जा.
मदतीसाठी नेहमी त्याच्याकडे जा.
5 तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्याची आठवण ठेवा त्याचे चमत्कार
आणि त्याचे शहाणपणाचे निर्णय याची आठवण ठेवा.
6 तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशज आहात.
तुम्ही याकोबाचे, देवाने निवडलेल्या माणसाचे वंशज आहात.
37 नंतर देवाने त्यांच्या माणसांना मिसरबाहेर काढले.
त्यांनी बरोबर सोने आणि चांदी आणली.
देवाचा कुठलाही माणूस ठेच लागून पडला नाही.
38 देवाचे लोक गेल्याचे पाहून मिसरला आनंद झाला.
कारण त्यांना देवाच्या लोकांची भीती वाटत होती.
39 देवाने ढग पांघरुणासारखे पसरले.
देवाने अग्नीच्या खांबाचा रात्री प्रकाशासाठी उपयोग केला.
40 लोकांनी अन्नाची मागणी केली आणि देवाने लावे आणले.
देवाने त्यांना स्वर्गातली भाकरी भरपूर दिली.
41 देवाने खडक फोडला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले.
वाळवटांत नदी वाहू लागली.
42 देवाला त्याच्या पवित्र वचनाची आठवण होती.
देवाला त्याचा सेवक अब्राहाम याला दिलेल्या वचनाची आठवण आली.
43 देवाने त्याच्या माणसांना मिसरमधून बाहेर आणले.
लोक आनंदाने नाचत बागडत, गाणी म्हणत बाहेर आले.
44 देवाने त्याच्या माणसांना इतर लोक राहात असलेला देश दिला.
देवाच्या माणसांना इतरांनी काम करुन मिळवलेल्या वस्तू मिळाल्या.
45 देवाने असे का केले?
त्याच्या माणसांनी त्याचे नियम पाळावे म्हणून त्यांनी त्याची
शिकवण काळजीपूर्वक आचरावी म्हणून,
परमेश्वराची स्तुती करा.
21 कारण माझ्यासाठी जगणे म्हणजे ख्रिस्त आणि मरणे म्हणजे लाभ आहे. 22 पण जर मी या शरीरातच राहिलो तर त्याचा अर्थ असा की, माझ्या कामाचे फळ, आनंद मी अनुभवीन. मला माहीत नाही की मी काय निवडीन. 23 या दोन पर्यायातून निवडण्यासाठी माझ्यावर मोठा दबाव आहे. माझी अशी इच्छा आहे की, या जीवनातून जाऊन ख्रिस्ताबरोबर असावे कारण ते फार फार चांगले होईल. 24 पण तुमच्यासाठी या शरीरात राहणे हे माझ्यासाठी अधिक आवश्यक आहे. 25 आणि मला याची खात्री असल्याने मला माहीत आहे की मी येथेच राहीन व तुमच्याबरोबर असेन. 26 यासाठी की तुमच्याबरोबर पुन्हा असण्याचा परिणाम म्हणून तुम्हांला अभिमान बाळगण्यास अधिक योग्य कारण मिळेल.
27 पण कोणत्याही परिस्थितीत ख्रिस्ताच्या सुवार्तेला योग्य अशा प्रकारे तुम्ही वागा. यासाठी की, जरी मी तुम्हांला येऊन भेटलो किंवा तुमच्यापासून दूर असलो तरी मला तुमच्याविषयी असे ऐकायला मिळो की तुम्ही एका आत्म्यात खंबीर असे उभे आहात, तुम्ही सुवार्तेच्या विश्वासाने, एकजीवाने धडपड करीत आहात. 28 आणि जे तुम्हांला विरोध करतात त्यांना तुम्ही भ्याला नाहीत. तुमचे हे धैर्य त्यांच्या नाशाचा पुरावा होईल. पण तुमच्या तारणाचा पुरावा होईल. आणि हे देवाकडून असेल. 29 कारण, ख्रिस्ताच्या वतीने केवळ त्याच्यावर विश्वास ठेवणे एवढेच नव्हे तर त्याच्यासाठी दु:ख भोगणे असा हक्क तुम्हांला देण्यात आलेला आहे. 30 माझ्यामध्ये चाललेले युंद्ध तुम्ही अनुभवलेले आहे आणि पाहिले आहे आताही ते माझ्यामध्ये चालले असल्याचे तुम्ही ऐकत आहात.
येशू शेतमजुराच्या बोधकथेचा वापर करतो
20 “स्वर्गाचे राज्य हे कोण्या शेतमालकासारखे आहे. जो अगदी पहाटे त्याच्या द्राक्षमळ्यासाठी मोलाने मजूर आणण्यासाठी गेला. 2 त्या मनुष्याने एक दिवसाच्या मजुरीकरिता प्रत्येकाला चांदीचे एक नाणे [a] देण्याचे कबूल केले. आणि त्याने द्राक्षाच्या मळ्यात कामास पाठविले.
3 “सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो मनुष्य बाजारात गेला तेव्हा तेथे काही माणसे उभी असलेली त्याला दिसली. त्या लोकांना काहीच काम नव्हते. 4 मग तो त्यांना म्हणाला, ‘तुम्हीसुद्धा माझ्या द्राक्षमळ्यात कामाला जा आणि जी योग्य मजुरी आहे ती मी तुम्हांला देईन.’ 5 मग ते काम करण्यास मळ्यात गेले.
“तो मनुष्य बारा वाजता आणि तीन वाजता बाजारात गेला आणि त्या मनुष्याने आपल्या मळ्यात काम करण्यासाठी काही लोकांना दोन वेळा जाऊन मजुरीवर घेतले. 6 पाच वाजता तो मनुष्य परत एकदा बाजारात गेला तेव्हा आणखी काही लोक उभे असलेले त्याला आढळले. त्याने त्यांना विचारले, ‘तुम्ही काही काम न करता दिवसभर येथे का बरे उभे राहिला आहात?’
7 “त्या लोकांनी उत्तर दिले, ‘आम्हांला कोणी काम दिले नाही.’
“तो मनुष्य त्यांना म्हणाला, ‘तर मग तुम्ही जाऊन माझ्या मळ्यात काम करा.’
8 “संध्याकाळी मळ्याचा मालक मुकादमाला म्हणाला, ‘मजुरांना बोलवा आणि त्यांना त्यांची मजुरी देऊन टाका! मी ज्यांना अगदी शेवटी कामावर आणले त्यांना अगोदर मजुरी द्या. नंतर बाकीच्या सर्वांना मजुरी द्या. मी कामावर रोजगारीने पहिल्याने बोलाविलेल्यांना सर्वात शेवटी मजुरी द्या.’
9 “जे मजूर संध्याकाळी साधारण पाच वाजता कामावर घेतले होते ते आपली मजुरी घेण्यासाठी आले. प्रत्येकाला एक चांदीचे नाणे मजुरी मिळाली. 10 मग ज्यांना सुरूवातीला कामावर घेण्यात आले होते, ते आपली मजुरी घेण्यासाठी आले. त्यांना वाटत होते की, इतरांपेक्षा त्यांना जास्त पैसे मिळतील, पण त्यां सर्वांना एकच चांदीचे नाणे मजुरी मिळाली. 11 त्यांनी ते घेतले व मालकाकडे तक्रार करू लागले. 12 ते म्हणाले, ‘ज्यांना शेवटी कामावर घेतले त्यांनी केवळ एक तासच काम केले. परंतु तुम्ही त्यांना आमच्या बरोबरीने मजुरी दिली. आम्ही मात्र दिवसभर उन्हात राबलो.’
13 “परंतु मळ्याचा मालक त्यांच्यातील एकाला म्हाणाला, ‘मित्रा मी तुझ्याबाबतीत अन्याय करीत नाही. आपण यावर सहमत झालो नाही का की, मी तुला एक चांदीचे नाणे मजुरी देईन? 14 जे तुझे आहे ते घे आणि घरी जा. तुम्हांला दिली तितकीच मजुरी मला या शेवटच्या माणसाला द्यायची आहे. 15 मी माझ्या पैशाचा वापर मला पाहिजे तसा करू शकत नाही का? मी लोकांशी चांगला आहे म्हणून, तुला हेवा वाटतो का?’
16 “म्हणून आता जे शेवटचे आहेत ते पहिले होतील आणी पहिले ते शेवटचे होतील.”
2006 by World Bible Translation Center