Revised Common Lectionary (Semicontinuous)
105 परमेश्वराला धन्यावाद द्या.
त्याच्या नावाचा धावा करा.
राष्ट्रांना तो करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगा.
2 परमेश्वराला गाणे गा; त्याची स्तुतिगीते गा.
तो ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल सांगा.
3 परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा.
तुम्ही लोक परमेश्वराला शोधत आला, सुखी व्हा.
4 शक्तीसाठी परमेश्वराकडे जा.
मदतीसाठी नेहमी त्याच्याकडे जा.
5 तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्याची आठवण ठेवा त्याचे चमत्कार
आणि त्याचे शहाणपणाचे निर्णय याची आठवण ठेवा.
6 तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशज आहात.
तुम्ही याकोबाचे, देवाने निवडलेल्या माणसाचे वंशज आहात.
37 नंतर देवाने त्यांच्या माणसांना मिसरबाहेर काढले.
त्यांनी बरोबर सोने आणि चांदी आणली.
देवाचा कुठलाही माणूस ठेच लागून पडला नाही.
38 देवाचे लोक गेल्याचे पाहून मिसरला आनंद झाला.
कारण त्यांना देवाच्या लोकांची भीती वाटत होती.
39 देवाने ढग पांघरुणासारखे पसरले.
देवाने अग्नीच्या खांबाचा रात्री प्रकाशासाठी उपयोग केला.
40 लोकांनी अन्नाची मागणी केली आणि देवाने लावे आणले.
देवाने त्यांना स्वर्गातली भाकरी भरपूर दिली.
41 देवाने खडक फोडला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले.
वाळवटांत नदी वाहू लागली.
42 देवाला त्याच्या पवित्र वचनाची आठवण होती.
देवाला त्याचा सेवक अब्राहाम याला दिलेल्या वचनाची आठवण आली.
43 देवाने त्याच्या माणसांना मिसरमधून बाहेर आणले.
लोक आनंदाने नाचत बागडत, गाणी म्हणत बाहेर आले.
44 देवाने त्याच्या माणसांना इतर लोक राहात असलेला देश दिला.
देवाच्या माणसांना इतरांनी काम करुन मिळवलेल्या वस्तू मिळाल्या.
45 देवाने असे का केले?
त्याच्या माणसांनी त्याचे नियम पाळावे म्हणून त्यांनी त्याची
शिकवण काळजीपूर्वक आचरावी म्हणून,
परमेश्वराची स्तुती करा.
22 शुक्रवारी लोकांनी दुप्पट अन्न म्हणजे दर माणशी सोळा वाट्या किंवा दोन ओमर अन्न गोळा केले. तेव्हा सर्व पुढारी लोक मोशेकडे आले व त्यांनी हे त्याला कळविले.
23 मोशेने त्यांना सांगितले, “हे असे होईल असे परमेश्वराने सांगितले होते; हे असे झाले कारण उद्या शब्बाथ दिवस आज तुम्हाला लागणारे सर्व अन्न शिजवून तयार ठेवावे परंतु उरलेले दुसऱ्या दिवशी सकाळसाठी ठेवावे.”
24 म्हणून लोकांनी उरलेले अन्न दुसऱ्या दिवसाकरिता ठेवले आणि त्यातील थोडे ही वाईट झाले नाही किंवा त्यात कोठेही किडे पडले नाहीत.
25 शनिवारी मोशेने लोकांना सांगितले, “आज शब्बाथ दिवस म्हणजे विसावा घेण्याचा आणि परमेश्वराची उपकार स्तुती करण्याचा विशेष दिवस आहे; तेव्हा तुम्हापैकी कोणीही बाहेर जाऊ नये तर तुम्ही काल गोळा केलेल्या अन्नातून जेवण खावे. 26 तुम्ही सहा दिवस अन्न गोळा करावे परंतु आठवड्याचा सातवा दिवस हा विसाव्याचा दिवस आहे; या दिवशी अन्न मिळणार नाही.”
27 शनिवारी काही लोक अन्न गोळा करावयास बाहेर गेले परंतु त्यांना काहीच मिळाले नाही. 28 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझ्या आज्ञा व माझे नियम पाळावयास तुम्ही कोठवर नाकारणार? 29 पाहा तुम्ही विसावा घ्यावा यासाठी परमेश्वराने शब्बाथ दिवस बनविला आहे; म्हणून शुक्रवारी परमेश्वर तुम्हाला दोन दिवस पुरेल एवढे अन्न देतो, तेव्हा शब्बाथ दिवशी तुम्ही आहात तेथे बसून विसावा घ्यावा.” 30 म्हणून मग लोक शब्बाथ दिवशी विसावा घेऊ लागले.
23 तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हाला खरे सांगतो, धनवान माणासाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे फार कठीण जाईल. 24 मी तुम्हांला सांगतो की, धनवानाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नेढ्यातून जाणे जास्त सोपे आहे.”
25 जेव्हा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार आश्चर्यचकित झाले. त्यांनी येशूला विचारले, “मग कोणाचे तारण होईल?”
26 येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि तो म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे, पण देवासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत.”
27 पेत्र येशूला म्हणाला, “पाहा, आम्ही सर्व काही सोडले आणि तुमच्या मागे आलो आहोत; मग आम्हांला काय मिळेल.?”
28 येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, नव्या युगात जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या गौरवी सिंहासनावर बसेल तेव्हा तुम्ही जे सर्व माझ्यामागे आलात ते सर्व बारा आसनांवर बसाल आणि इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय कराल. 29 ज्याने ज्याने माझ्या मागे येण्याकरिता आपले घर, भाऊ, बहीण, आईवडील, मुले, शेतीवाडी सोडली असेल तर त्याला त्यापेक्षा कितीतरी जास्तपटीने लाभ होईल व त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल. 30 पण पुष्कळसे जे आता पहिले आहेत ते शेवटचे होतील आणि जे शेवटचे आहेत ते पहिले होतील.
2006 by World Bible Translation Center