Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
निर्गम 14:19-31

परमेश्वर मिसरी सैन्याचा पराभव करतो.

19 इस्राएल लोकांना घेऊन जाण्यासाठी नेहमीप्रमाणे त्यांच्या पुढे चालणारा परमेश्वराचा दूत इस्राएल लोकांच्या मागे जाऊन उभा राहिला, तेव्हा तो उंच मेघस्तंभ इस्राएल लोकांच्या आघाडीवरून त्यांच्या पिछाडीस गेला. 20 अशा रीतीने तो उंच ढग मिसरचे लोक व इस्राएल लोक यांच्यामध्ये उभा राहिला; तेव्हा इस्राएल लोकांना प्रकाश मिळाला परंतु मिसरच्या लोकांभोवती अंधार राहिला; त्यामुळे त्या रात्री मिसरचे लोक इस्राएल लोकांना गाठण्यासाठी जराही त्यांच्या जवळ जाऊ शकले नाहीत.

21 मग मोशेने तांबड्या समुद्रावर आपला हात उगारला व परमेश्वराने पूर्वेकडून जोराचा वारा वाहावयास लाविला. तो रात्रभर वाहिला. तेव्हा समुद्र दुभंगला आणि त्यातील मार्ग वाऱ्यामुळे सुकून कोरडा झाला. 22 आणि इस्राएल लोक कोरड्या वाटेवरून भर समुद्रातून पार गेले. समुद्राचे पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला भिंती सारखे उभे राहिले. 23 त्यानंतर फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार यांनी समुद्रातून इस्राएल लोकांचा पाठलाग केला. 24 तेव्हा त्या दिवशी भल्या पहाटे परमेश्वराने मेघस्तंभातून व अग्नीस्तंभातून खाली मिसरच्या सैन्याकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडवून त्यांचा पराभव केला. 25 रथांची चाके रुतल्यामुळे रथावर ताबा ठेवणे मिसरच्या लोकांना कठीण झाले; तेव्हा ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “आपण येथून लवकर निघून जाऊ या! कारण परमेश्वर इस्राएलच्या बाजूने आम्हाविरुद्ध लढत आहे.”

26 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात समुद्रावर उगार म्हणजे भिंतीसारखे उभे राहिलेले पाणी खाली पडून एकत्र होईल व ते फारोचे घोडे, रथ व स्वार यांना बुडवून टाकील.”

27 म्हणून दिवस उजाडण्याच्या आत मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा पाणी पहिल्यासारखे समान पातळीवर आले; तेव्हा मिसरच्या लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु परमेश्वराने त्यांना पाण्यात बुडवून टाकले. 28 पाणी पूर्ववत झाले व त्याने घोडे, रथ व स्वारांना गडप केले आणि इस्राएल लोकांचा पाठलाग करणाऱ्या सर्व सैन्याचा नाश झाला, त्यातले कोणीही वाचले नाही.

29 परंतु इस्राएली लोक कोरड्या भूमिवरुन भरसमुद्र ओलांडून पार गेले. ते पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या हाताला भिंतीप्रमाणे उभे राहिले. 30 तेव्हा अशा रीतीने त्या दिवशी परमेश्वराने मिसरच्या लोकांपासून इस्राएल लोकांना वाचविले व त्यांनी ताबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर मिसरच्या लोकांची प्रेते पडलेली पाहिली. 31 तसेच परमेश्वराने आपल्या महान सामर्थ्याने मिसरच्या लोकांचा पराभव केला तेही त्यांनी पाहिले; तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि त्यांनी त्याच्यावर व त्याचा सेवक मोशे याच्यावरही विश्वास ठेवला.

स्तोत्रसंहिता 114

114 इस्राएलने मिसर देश सोडला.
    याकोबाने (इस्राएल) तो परका देश सोडला.
यहुदा त्याचे निवडक राष्ट्र बनले इस्राएल त्याचे राज्य झाले.
लाल समुद्राने हे पाहिले आणि तो पळून गेला.
    यार्देन नदी वळली आणि पळाली.
पर्वत मेंढ्यांसारखा नाचला.
    टेकड्या कोकरासारख्या नाचल्या.

लाल समुद्रा, तू का पळून गेलास?
    यार्देन नदी तू का वळलीस आणि का पळून गेलीस?
पर्वतांनो तुम्ही मेंढ्यांसारखे का नाचलात?
    आणि टेकड्यांनो तुम्ही कोकरासारखे का नाचलात?

पृथ्वी प्रभुसमोर, याकोबाच्या
    देवासमोर थरथर कापली.
देवानेच खडकातून पाणी वहायला लावले.
    देवानेच कठीण खडकातून झरे वाहायला लावले.

निर्गम 15:1-11

मोशेचे गीत

15 नंतर मोशे व इस्राएल लोक परमेश्वराला हे गीत गाऊ लागले:

“मी परमेश्वराला गीत गाईन
    कारण त्याने महान कृत्ये केली आहेत;
घोडा व स्वार यांना
    त्याने समुद्रात फेकून दिले आहे.
परमेश्वर माझे सामर्थ्य आहे.
    तो माझे रक्षण करितो.
    मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन; [a]
परमेश्वर माझा देव आहे;
    तो माझ्या पूर्वजाचा देव आहे;
मी त्याचे गौरव करीन.
परमेश्वर महान योद्धा आहे;
    त्याचे नांव याव्हे आहे.
त्याने फारोचे रथ व स्वार यांना
    समुद्रात फेकून दिले;
त्याने फारोचे उत्तम लष्करी
    अधिकारी तांबड्या समुद्रात बुडविले.
खोल पाण्याने त्यांना बुडविले;
    ते खोल पाण्यात दगडाप्रमाणे तळापर्यंत बुडाले.

“हे परमेश्वर तुझा उजवा हात आश्चर्यकारकरीत्या बलशाली आहे;
    त्या हाताने तू शत्रूंचा चुराडा करून टाकलास.
तुझ्या वैभवशाली सामर्थ्याने तू तुझ्याविरुद्ध बंड करून
    उठणाऱ्यांचा नाश करतोस;
अग्नीने वाळलेल्या गवताच्या काड्या जाळाव्या तसे
    तू त्यांना तुझ्या रागाने जाळून भस्म करतोस.
तू वाहविलेल्या जोराच्या वाऱ्याने
    पाणी राशी सारखे उंच उभे राहिले
व जोराने वाहणाऱ्या पाण्याची टणक भिंत झाली;
    समुद्राचे पाणी अगदी खोलवर घट्ट टणक बनले.

“शत्रु म्हणाला,
    ‘मी त्यांचा पाठलाग करीन, त्यांना गाठीन,
मी त्यांची सर्व संपत्ती लुटून घेईन; त्यामुळे माझा जीव तृप्त होईल.
    माझ्या तलवारीने त्यांचे सर्व काही हिरावून घेईन;
    माझ्या हातांनी त्यांचे सर्वकाही मी स्वतः करिता घेईन.’
10 परंतु तू त्यांच्यावर फुंकर वायु सोडलास
    आणि समुद्राच्या पाण्याने त्यांना गडप केले;
ते शिशाप्रमाणे समुद्रात खोल
    पाण्यात तळापर्यंत बुडाले.

11 “परमेश्वरासारखा, देवतांमध्ये कोण देव आहे का?
    नाही! परमेश्वरा तुझ्या समान कोणी देव नाही;
    तू आश्चर्यकारक, अति पवित्र देव आहेस!
    तुझे सामर्थ्य आश्चर्यकारक आहे!
    तू महान चमत्कार करतोस!

निर्गम 15:20-21

20 त्यानंतर अहरोनाची बहीण मिर्याम संदेष्टी हिने डफ घेतला आणि ती व इतर स्त्रिया गाऊ व नाचू लागल्या. मिर्याम हे गीत पुन्हा पुन्हा गात होती;

21 “परमेश्वराला गीत गा;
    कारण त्याने महान कृत्ये केली आहेत.
त्याने घोडा व घोडेस्वार यांना
    समुद्रात फेकून दिले आहे....”

रोमकरांस 14:1-12

इतर लोकांवर टीका करु नका

14 जो विश्वासात दुर्बल आहे त्याचा स्वीकार करा. पण मतभेदावरुन भांडणाच्या हेतूने नव्हे. एखाद्याचा विश्वास असा असतो की, तो सर्व गोष्टी खाऊ शकतो, परंतु दुर्बल मनुष्य भाजीच खातो. जो कोणत्याही प्रकारचे अन्र खातो त्याने जो काही विशिष्ट गोष्टी खात नाही, त्याला तुच्छ मानू नये. आणि जो काही विशिष्ट गोष्टी खातो त्याने त्याला दोष देऊ नये कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे. दुसऱ्याच्या नोकराला दोष लावणारा तू कोण आहेस? त्याच्या मालकाच्या दृष्टीने तो स्थिर राहील किंवा त्याचे पतन झाले असताही स्थिर राहील. कारण त्याला स्थिर करण्यास मालक समर्थ आहे.

एखादा मनुष्य एक दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो परंतु दुसरा मनुष्य प्रत्येक दिवस सारखाच मानतो. प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करुन घ्यावी. जो विशेष दिवस पाळतो तो प्रभूचा मान राखण्यासाठी पाळतो आणि जो कोणत्याही प्रकारचे अन्र खातो तो प्रभूचा मान राखण्यासाठी खातो. विशिष्ट प्रकारचे अन्र खात नाही तो प्रभूचा मान ठेवण्यासाठी खात नाही. तो सुद्धा देवाचे आभार मानतो.

कारण कोणीही स्वतःसाठी जगत नाही, किंवा मरत नाही, जर आपण जगतो तर प्रभुचे लोक म्हणून जगतो आणि मरतो तर प्रभूचे लोक म्हणून मरतो. म्हणून जर आपण जगतो किंवा मरतो तर आपण प्रभूचे आहोत. ख्रिस्त मेला आणि जिवंत झाला यासाठी की त्याने जे आता मेलेले आहेत आणि जे अजूनही जिवंत आहेत त्या दोघांचा प्रभु व्हावे.

10 तेव्हा तू आपल्या बलवान भावाला दोष का लावतो? किंवा जो अशक्त आहे त्या भावाला तुच्छ का मानतोस? कारण आपण सर्व जण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. 11 असे लिहिले आहे की,

“प्रभु म्हणतो खात्रीने मी जिंवत आहे
    ‘प्रत्येक गुडघा माझ्यासमोर टेकला जाईल
    आणि प्रत्येक जीभ देवाचे उपकार मानील.’” (A)

12 म्हणून प्रत्येक जण आपापल्यासंबंधी देवाला हिशेब देईल.

मत्तय 18:21-35

क्षमा नकरणाऱ्या नोकराचा दाखला

21 नंतर पेत्र येशूकडे आला आणि त्याने विचारले, “जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी त्याला किती वेळा क्षमा करावी? मी त्याला सात वेळा क्षमा करावी काय?”

22 येशूने उत्तर दिले, “मी तुला सांगतो, फक्त सातच वेळा नाही तर उलट त्याने तुझ्यावर 77 वेळा [a] अन्याय केला तरी तू त्याला क्षमा करीत राहा.”

23 “म्हणून स्वर्गाच्या राज्याची तुलना एका राजाशी करता येईल. आपले जे नोकर आपले देणे लागत होते त्यांच्याकडून त्या राजाने पैसे परत घेण्याचे ठरविले. 24 जेव्हा त्याने पैसे जमा करायला सुरूवात केली, तेव्हा एक देणेकरी ज्याच्याकडे 10,000 चांदीच्या नाण्याचे कर्ज होते त्याला त्याच्याकडे आणण्यात आले. 25 त्या देणेकऱ्याकडे राजाचे पैसे परत करण्यासाठी काहीच नव्हते, तेव्हा मालकाने आज्ञा केली की त्याला, त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलांना आणि जे काही त्याच्याकडे आहे ते सर्व विकले जावे आणि जे पैसे येतील त्यातून कर्जाची परतफेड व्हावी.

26 “परंतु त्या नोकराने पाया पडून, गयावया करीत म्हटले, ‘मला थोडी सवलत द्या. जे काही मी तुमचे देणे लागतो ते तुम्हांला परत करीन.’ 27 त्या मालकाला आपल्या नोकराबद्दल वाईट वाटले, म्हणून त्याने त्या नोकराचे सर्व कर्ज माफ केले आणि त्याला सोडले.

28 “नंतर त्याच नोकराचे काही शेकडे रुपये देणे लागत असलेला दुसरा एक नोकर पहिल्या नोकराला भेटला. त्याने त्या दुसऱ्या नोकराचा गळा पकडला आणि तो त्याला म्हाणाला, ‘तू माझे जे काही पैसे देणे लागतोस ते सर्व आताच्या आता दे.’

29 “परंतु दुसरा नोकर गुडघे टेकून गयावया करीत म्हणाला, ‘मला थोडी सवलत द्या. जे काही पैसे मी तुम्हांला देणे लागतो ते परत करीन.’

30 “पण पहिल्या नोकराने दुसऱ्या नोकराला सांभाळून घेण्यास साफ नकार दिला. उलट तो गेला आणि त्याने त्याला तुरूंगात टाकले. तेथे त्याला त्याचे कर्ज फिटेपर्यंत राहावे लागणार होते. 31 घडलेला हा प्रकार जेव्हा दुसऱ्या नोकरांनी पाहिला तेव्हा ते फार दु:खी झाले, तेव्हा ते गेले आणि त्यांनी जे सर्व घडले होते ते मालकाला सांगितले.

32 “तेव्हा पहिल्या नोकारच्या मालकाने त्याला बोलाविले व तो त्याला म्हणाला, ‘दुष्टा, तू माझे कितीतरी देणे लागत होतास, परंतु मी तुझे देणे माफ करावे अशी विनंती तू मला केलीस तेव्हा मी तुझे सर्व कर्ज माफ केले. 33 म्हणून तू तुझ्याबरोबरच्या नोकारालाही तशीच दया दाखवायची होतीस.’ 34 मालक फार संतापला, शिक्षा म्हणून मालकाने पहिल्या नोकाराला तुरूंगात टाकले, आणि त्याने सर्व कर्ज फेडीपर्यंत त्याला तुरूंगातून सोडले नाही.

35 “जसे या राजाने केले तसेच माझा स्वर्गीय पिता तुमचे करील. तुम्ही आपला भाऊ अगर बहीण यांना क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हांला क्षमा करणार नाही.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center