Revised Common Lectionary (Semicontinuous)
114 इस्राएलने मिसर देश सोडला.
याकोबाने (इस्राएल) तो परका देश सोडला.
2 यहुदा त्याचे निवडक राष्ट्र बनले इस्राएल त्याचे राज्य झाले.
3 लाल समुद्राने हे पाहिले आणि तो पळून गेला.
यार्देन नदी वळली आणि पळाली.
4 पर्वत मेंढ्यांसारखा नाचला.
टेकड्या कोकरासारख्या नाचल्या.
5 लाल समुद्रा, तू का पळून गेलास?
यार्देन नदी तू का वळलीस आणि का पळून गेलीस?
6 पर्वतांनो तुम्ही मेंढ्यांसारखे का नाचलात?
आणि टेकड्यांनो तुम्ही कोकरासारखे का नाचलात?
7 पृथ्वी प्रभुसमोर, याकोबाच्या
देवासमोर थरथर कापली.
8 देवानेच खडकातून पाणी वहायला लावले.
देवानेच कठीण खडकातून झरे वाहायला लावले.
14 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “इस्राएल लोकांना असे सांग की, तुम्ही मागे फिरून मिग्दोल व (तांबडा) समुद्र यांच्यामध्ये व बालसफोना जवळ असलेल्या पी-हहीरोथ येथे तळ देऊन रात्री मुक्काम करावा. 3 त्यामुळे इस्राएल लोक रानात वाट चुकले आहेत व गोंधळल्यामुळे राहण्यासाठी त्यांना जागा सापडत नाही असे फारोला वाटेल. 4 मी फारोचे मन कठीण करीन व तो तुमचा पाठलाग करील परंतु मी फारो व त्याची सेना यांचा पराभव करून गौरवशाली होईन मग मिसरच्या लोकांना समजेल की मी परमेश्वर आहे.” तेव्हा इस्राएल लोकांनी देवाच्या आज्ञेप्रमाणे केले.
फारो इस्राएल लोकांचा पाठलाग करितो
5 इस्राएल लोक निसटून गेल्याचे फारोला समजले तेव्हा तो व त्याचे अधिकारी यांचे विचार बदलले व आपण हे काय केले असे त्यांना वाटले. फारो म्हणाला, “आपण इस्राएली लोकांना आपल्या हातून पळून का जाऊ दिले? आता आपण आपल्या गुलामांना मुकलो आहोत!”
6 तेव्हा फारोने आपला रथ तयार करण्यास सांगितले आणि आपल्या लोकांना घेऊन तो निघाला. 7 त्याने सहाशे उत्तम योद्धे व सर्व रथ आपल्या बरोबर घेतले. प्रत्येक रथात एक अधिकारी होता. 8 इस्राएल लोक तर मिसरहून मोठ्या अवसानाने चालले होते, परंतु परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने इस्राएल लोकांचा पाठलाग केला.
9 मिसरच्या लष्करात पुष्कळ घोडेस्वार व रथ होते. त्यांनी इस्राएल लोकांचा पाठलाग करुन इस्राएलींना लाल समुद्र व बालसफोनाच्या दरम्यान पीहहीरोथ येथे तळ दिला होता तेथे त्यांना गाठले.
10 फारो व त्याचे सैन्य आपणाकडे येताना इस्राएल लोकांनी पाहिले, तेव्हा ते अतिशय घाबरले; आणि मदतीसाठी ते परमेश्वराचा धावा करु लागले. 11 ते मोशेला म्हणाले, “तू आम्हाला मिसरमधून येथे रानात मरावयास का आणले? आम्ही शांतीने मिसरमध्ये मरण पावलो असतो आणि आमच्या कबरांसाठी तेथे भरपूर जागा होती; 12 असे होईल हे आम्ही तुला सांगितले होते! मिसरमध्ये आम्ही म्हणालो, ‘आमची चिंता करु नकोस; आम्ही येथेच राहून मिसरच्या लोकांची सेवाचाकरी करु;’ मिसरामधून येथे रानात येऊन मरण्यापेक्षा, आम्ही मिसरमध्ये गुलाम म्हणून राहिलो असतो तर बरे झाले असते.”
13 परंतु मोशेने उत्तर दिले, “भिऊ नका! स्थित उभे राहा आणि परमेश्वर आज तुम्हाला वांचवील ते पाहा. आजच्या दिवसानंतर हे मिसरचे लोक तुम्हाला पुन्हा कधीही दिसणार नाहीत. 14 शांत राहण्यावाचून तुम्हाला काहीच करावे लागणार नाही. परमेश्वर तुमच्याकरिता त्यांच्याशी लढेल.”
15 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुला माझा धावा करण्याची काही गरज नाही! इस्राएल लोकांना पुढे चालण्याची आज्ञा कर. 16 तांबड्या समुद्रावर तुझ्या हातातली काठी उगार म्हणजे समुद्राचे दोन भाग होतील आणि इस्राएल लोक भर समुद्रातील कोरड्या भूमीवरून चालत जाऊन समुद्र ओलांडतील. 17 मी मिसरच्या लोकांची मने कठीण केली आहेत म्हणून ते तुमचा पाठलाग करतील. परंतु फारो व त्याचे सर्व सैन्य, घोडेस्वार व रथ यांच्यापेक्षा मी अधिक सामर्थ्यवान आहे, असे माझे महात्म्य मी तुम्हाला दाखवून देईन. 18 मग मिसरच्या लोकांना समजेल की मी गौरवशाली परमेश्वर आहे, फारो व त्याच्या घोडेस्वारांचा व रथांचा पराभव केल्यावर मिसरचे लोक मला मान देतील.”
9 “या वडिलांना (पूर्वजांना) योसेफाचा मत्सर वाटला. त्यांनी योसेफाला इजिप्तमध्ये एक गुलाम म्हणून विकले, परंतु योसेफाबरोबर देव होता. 10 योसेफावर तेथे खूप संकटे आली पण देवाने त्याला सर्व संकटांतून सोडविले, देवाने योसेफाला ज्ञान व शहाणपण दिले. त्यामुळे इजिप्तचा राजा, फारो, याची मर्जी योसेफाला संपादन करता आली. फारोने योसेफाला इजिप्त देशावर व त्याच्या घरावर अधिपती म्हणून नेमले. 11 मग सर्व इजिप्त व कनान देशावर दुष्काळ पडला. आणि लोकांच्या दु:खाला अंत राहिला नाही. आमच्या पूर्वजांना अन्नधान्य मिळेनासे झाले.
12 “जेव्हा याकोबाने ऐकले की, इजिप्त देशामध्ये धान्य आहे, त्याने आपल्या पूर्वजांना तिथे पाठविले, ही पहिली वेळ होती. 13 ते दुसऱ्या वेळी आले तेव्हा योसेफाने आपली ओळख त्यांना करुन दिली. आणि फारो राजाला योसेफाच्या कुटुंबाची माहिती झाली. 14 मग योसेफाने काही लोकांना आपल्या वडिलांना, आणि त्याच्या कुटुंबातील पंच्याहतर लोकांना इजिप्त येथे बोलावण्यासाठी पाठविले. 15 मग याकोब इजिप्त देशात गेला आणि तो व आपले पूर्वज तेथेच मरण पावले. 16 नंतर त्यांचे मृतदेह शेखेमला नेण्यात आले व तेथेच त्यांना पुरण्यात आले. अब्राहामाने शेखेम येथे हामोराच्या पुत्रांना पुरेपूर मोबदला देऊन विकत घेतलेल्या कबरीत त्यांना पुरण्यात आले.
2006 by World Bible Translation Center