Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरांत जाण्याच्या वेळेचे स्तोत्र.
121 मी वर डोंगरांकडे बघतो.
पण माझी मदत खरोखर कुठून येणार आहे?
2 माझी मदत परमेश्वराकडून,
स्वर्ग व पृथ्वी यांच्या निर्मात्याकडून येणार आहे.
3 देव तुला खाली पडू देणार नाही.
तुझा पाठीराखा झोपी जाणार नाही.
4 इस्राएलचा पाठीराखा झोपाळू होत नाही.
देव कधीही झोपत नाही.
5 परमेश्वर तुझा पाठीराखा आहे
तो त्याच्या महान शक्तीने तुझे रक्षण करतो.
6 दिवसा सूर्य तुला दु:ख पोहोचवणार नाही.
आणि रात्री चंद्र तुला इजा करणार नाही.
7 परमेश्वर तुझे प्रत्येक संकटापासून रक्षण करील.
परमेश्वर तुझ्या आत्म्याचे रक्षण करील.
8 परमेश्वरा तुला जाण्या-येण्यात मदत करील.
परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील.
14 “अशा रीतीने आजची रात्र कायमची तुमच्या आठवणीत राहील. हा दिवस तुम्हासाठी विशेष उत्सवाचा म्हणजे सणाचा दिवस असेल. तुमच्या वंशजांनी येथून पुढे हा सण पिढ्यानपिढ्या कायमचा नियम म्हणून पाळावा. 15 तसेच सणाच्या दिवासांत तुम्ही सात दिवस खमीर न घातलेली भाकर खावी; ह्या सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने आपल्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे व पूर्ण सात दिवस तुम्ही खमीर न घातलेली भाकर खावी. तुम्हातील जर कोणी खमीर घातलेली भाकर खाईल तर त्याला तुम्ही इस्राएल लोकांमधून बाहेर टाकावे. 16 या सणाच्या पहिल्या व शेवटल्या म्हणजे सातव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; ह्या दोन्ही दिवशी स्वयंपाकाच्या कामाशिवाय इतर कोणतेही काम करु नये. 17 बेखमीर भाकरीच्या सणाची तुम्ही आठवण ठेवावी कारण याच दिवशी मी तुम्हा सर्वाना गटगटांनी मिसरदेशातून बाहेर काढून नेले म्हणून तुमच्या सर्व वंशाजांनी हा दिवस पिढ्यान्पिढ्या कायमचा नियम म्हणून पाळावा. 18 तेव्हा पहिल्या महिन्यातील (निसान महिन्यातील) चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळपासून ते त्या महिन्याच्या एकविसाव्या दिवसाच्या संध्याकाळपर्यत तुम्ही बेखमीर भाकरी खाव्या. 19 ह्या सात दिवसात तुमच्या घरात खमीर नसावे; कारण जो कोणी एखादी खमीराची वस्तू खाईल मग तो परदेशी असो किंवा स्वदेशी असो त्याला इस्राएल लोकांमधून बाहेर टाकावे. 20 या दिवशी कोणीही खमीर खाऊ नये; तर तुम्ही कोठेही राहात असला तरी बेखमीर भाकरच खावी.”
21 म्हणून मग मोशेने इस्राएली लोकांच्या सर्व वडीलधाऱ्यां लोकांना एकत्र बोलावले. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एकएक कोकरू घ्यावे; आणि वल्हांडण सणाच्या यज्ञाकरिता त्याचा वध करावा. 22 मग एजोब झाडाच्या पानांच्या जुड्या घेऊन त्या पात्रातील कोकराच्या रक्तात बुचकाळाव्या आणि त्याचे रक्त दाराच्या दोन्ही बाजूंच्या चौकटींना व कपाळ पट्ट्यांवर लावावे. आणि सकाळपर्यंत कोणीही घराबाहेर जाऊ नये. 23 कारण त्यावेळी परमेश्वर मिसरमधील प्रथम जन्मलेल्यांना ठार मारण्यासाठी फिरणार आहे; तो जेव्हा घराच्या दारावरील कपाळ पट्टीवर व दाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला लावलेले रक्त पाहील तेव्हा तो त्या घराचे संरक्षण करील; नाश करणाऱ्याला तुमच्या घरात प्रवेश करु देणार नाही, व तुम्हाला काही अपाय होऊ देणार नाही. 24 तुम्ही या आज्ञेची आठवण ठेवली पाहिजे की तुम्ही व तुमचे वंशज यानी पाळावयासाठी हा नियम कायमचा नियम आहे. 25 परमेश्वर त्याच्या वचनानुसार जो देश तुम्हाला देणार आहे त्यात तुम्ही गेला तर तेथेही तुम्ही हा नियम पाळण्याची आठवण ठेवावी. 26 जेव्हा तुमची मुलेबाळे तुम्हाला विचारतील की ‘हा विधी आपण का करीत आहोत?’ 27 तेव्हा तुम्ही त्यांना सांगा, ‘हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे; कारण आम्ही जेव्हा मिसरमध्ये होतो तेव्हा या दिवशी परमेश्वराने मिसरच्या लोकांना मारले परंतु इस्राएल लोक राहात असलेली घरे ओलाडूंन तो पुढे गेला व त्या घरातील आम्हा सर्वाना त्याने वाचवले त्यानंतर इस्राएल लोकांनी परमेश्वरापुढे नतमस्तक होऊन त्याची उपासना केली.’”
28 परमेश्वाने मोशे व अहरोन यांना आज्ञा दिली होती म्हणून इस्राएल लोकांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे केले.
देवासाठी जगा
11 प्रियजनहो, मी तुम्हाला तुम्ही जणू काय प्रवासी आणि या जगात परके असल्यासारखा बोध करतो की, तुमच्या आत्म्याच्या विरुद्ध नेहमी लढत राहणाऱ्या शारीरिक वासनांपासून तुम्ही दूर राहा. 12 जरी विदेशी लोक तुमच्यावर टीका करतात आणि अपराध केल्याबद्दल दोष देतात तरी तुम्ही आपले वागणे इतके चांगले ठेवा की, तुमची चांगली कामे पाहून विदेशी लोकांनी देवाच्या परत येण्याच्या दिवशी त्याला गौरव द्यावे.
प्रत्येक मानवी अधिकाऱ्याची आज्ञा पाळा
13 प्रभुकरिता प्रत्येक मानवी अधिकाऱ्याच्या अधीन असा. 14 राजाच्या अधीन असा, जो सर्वोच्च अधिकारी आहे आणि राज्यपालांच्या अधीन असा. कारण अयोग्य करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी आणि चांगली कामे करणाऱ्यांना शाबासकी देण्यासाठी प्रान्ताधिपतीने त्यांना पाठविले आहे. 15 म्हणून जेव्हा तुम्ही चांगले काम करता तेव्हा मूर्ख लोकांचे अविचारी बोलणे तुम्ही बंद करता आणि हीच देवाची इच्छा आहे. 16 मुक्त लोकांसारखे जगा. पण तुमच्या मुक्तपणे जगण्याच्या नावाखाली वाईट गोष्टींना वाव देऊ नका. उलट देवाचे सेवक असल्याप्रमाणे जगा. 17 सर्व लोकांचा आदर करा. ख्रिस्तातील तुमच्या बंधूवर्गावर प्रीति करा. देवाप्रती भीतीयुक्त आदर असू द्या. राजाला मान द्या.
2006 by World Bible Translation Center