Revised Common Lectionary (Semicontinuous)
वल्हांडण
12 मोशे व अहरोन अद्याप मिसरमध्ये असताना परमेश्वर त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, 2 “हा तुमच्या वर्षाचा पहिला महिना असे. [a] 3 ही आज्ञा इस्राएलच्या सर्व जनसमूहासाठी आहे; ह्या महिन्याच्या दहाव्या दिवशी प्रत्येक माणसाने आपल्या कुटुंबातील माणसाकरिता एक कोकरा घ्यावा. 4 जर तो संपूर्ण कोकरा, घरातील माणसांना सरणार नसेल तर त्याने आपल्या भोजनात वाटेकरी होण्यासाठी आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांना निमंत्रण द्यावे. 5 तो कोकरा, एक वर्षाचा नर असावा व तो पूर्णपणे निरोगी असावा तो कोकरा मेंढ्यातला किंवा बकऱ्यातला असावा. 6 ह्या पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत त्या मेढ्याची किंवा बकऱ्याची निगा राखावी व त्यावर लक्ष ठेवावे. चौदाव्या दिवशी सर्व इस्राएल लोकांनी कातरवेळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर व अंधार पडण्यापूर्वी आपापल्या मेंढ्याचा किंवा बकऱ्याचा वध करावा. 7 त्यांचे रक्त गोळा करून ते ज्या घरात त्याचे मांस खाणार आहेत त्याच्या दाराच्या कपाळ पट्ट्यांवर व दोन्ही बाजूंच्या चौकटींना लावावे.
8 “त्याच रात्री तो मेंढा किंवा बकरा विस्तावावर भाजावा आणि कडू भाजी व बेखमीर भाकरी बरोबर त्याचे सर्व मांस खाऊन टाकावे; 9 तुम्ही त्याचे मांस कच्चे किंवा पाण्यात शिजवून खाऊ नये तर विस्तवावर भाजून खावे; त्याची मुंडी, पाय व आतंडी ही सुद्धा भाजून खावीत. 10 त्या रात्रीच ते सर्व मांस खावे; त्यातले काहीही सकाळपर्यंत ठेवू नये आणि जर काही उरलेच तर ते आगीत जाळून टाकावे.”
11 ते खाण्या अगोदर तुम्ही प्रवासास जाण्याच्या तयारीने अंगावर कपडे घालावेत, पायात जोडे घालावेत आणि हातात काठी घ्यावी आणि मग घाईघाईने ते मांस खावे; कारण हा परमेश्वराचा वल्हांडण सण आहे.
12 “आज रात्री मी मिसर देशभर फिरेन आणि त्यातील प्रथम जन्मलेल्या मुलांना व जनावरांतील नरांना मी मारून टाकीन, आणि मिसरमधील सर्व दैवतांना धडा शिकवून दाखवीन की मी परमेश्वर आहे. 13 परंतु तुमच्या घरांच्या दारावरील रक्त ही एक विशेष खूण असेल. मी जेव्हा ती पाहीन तेव्हा ते घर ओलांडून मी पुढे जाईन. मी मिसरच्या लोकांना मारीन तेव्हा कोणतीही विनाशकारी पीडा तुम्हांवर येणार नाही व तुम्हाला अपाय करणार नाही.
14 “अशा रीतीने आजची रात्र कायमची तुमच्या आठवणीत राहील. हा दिवस तुम्हासाठी विशेष उत्सवाचा म्हणजे सणाचा दिवस असेल. तुमच्या वंशजांनी येथून पुढे हा सण पिढ्यानपिढ्या कायमचा नियम म्हणून पाळावा.
149 परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वराने ज्या नवीन गोष्टी केल्या त्याबद्दलचे नवे गाणे गा.
ज्या सभेत त्याचे भक्त भेटतात त्या सभेत त्याचे गुणगान करा.
2 इस्राएलाच्या लोकांना त्यांच्या निर्मात्याबरोबर आनंदोत्सव साजरा करु द्या.
सियोनच्या लोकांना त्यांच्या राजाबरोबर आनंद उपभोगू द्या.
3 त्या लोकांना डफाच्या आणि
वीणेच्या तालावर नाच करुन देवाची स्तुती करु द्या.
4 परमेश्वर त्याच्या लोकांबरोबर सुखी आहे.
देवाने त्याच्या विनम्र लोकांसाठी अद्भुत गोष्ट केली, त्याने त्याचा उध्दार केला.
5 देवाच्या भक्तांनो तुमच्या विजयाबद्दल आनंदी व्हा.
झोपी गेल्यावरही आनंदी राहा.
6 लोकांना देवाजवळ त्याचे गुणगान करु द्या
आणि त्यांना त्यांच्या तलवारी हातात घेऊ द्या.
7 त्यांना त्यांच्या शत्रूंना शिक्षा करु द्या.
त्यांना त्या लोकांना शिक्षा करु द्या.
8 देवाचे लोक त्या राजांना आणि
महत्वाच्या लोकांना साखळंदडाने बांधतील.
9 देवाने आज्ञा केल्याप्रमाणे देवाचे लोक त्यांना शिक्षा करतील.
देवाचे सगळे भक्त त्याला मान देतात.
परमेश्वराचे गुणगान करा.
लोकांवर प्रीति करणे हाच एक नियम
8 एकमेकांवर प्रीति करण्याशिवाय कोणाच्याही ऋणात राहू नका. कारण जो इतरांवर प्रीति करतो, त्याने नियमशास्त्र पाळले आहे. 9 “व्यभिचार करु नको, खून करु नको, चोरी करु नको, वाईटाचा लोभ धरु नको” [a] या आज्ञांमुळे मी असे म्हणतो आणि आणखी एखादी आज्ञा असेल तर ती आज्ञा “जशी आपणांवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर” [b] या शब्दात सामावलेली आहे. 10 प्रीति शेजाऱ्याचे वाईट करीत नाही, म्हणून प्रीति नियमशास्त्राची पूर्णता आहे.
11 आणि तुम्ही हे करा कारण तुम्हांस ठाऊक आहे की, आपण ज्या काळात राहतो त्यातून तुम्ही उठावे अशी वेळ आली आहे, कारण जेव्हा आम्ही विश्वास ठेवला त्यापेक्षाही आमचे तारण अधिक जवळ आले आहे. 12 रात्र जवळ जवळ संपत आली आहे आणि “दिवस” जवळ आला आहे. म्हणून आपण अंधाराची कामे बाजूला टाकूया आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करु. 13 दिवसा आपण जसे काळजीपूर्वक वागतो, तसे वागूया. खादाडपणात, मद्यपानात, लैगिकतेत, स्वैरपणात, भांडणात, द्वेषात नको, 14 तर त्याऐवजी येशू ख्रिस्ताला परिधान करा. आणि आपल्या पापी वासना मध्ये गुंतून राहू नका.
जेव्हा एखादी व्यक्ती तुमचे वाईट करते(A)
15 “जर तुझा भाऊ अगर तुझी बहीण तुझ्यावर अन्याय करील, तर जा अणि त्याला किंवा तिला तुझ्यावर काय अन्याय झाला ते सांग आणि तोही एकांतात सांग. जर त्यांने किंवा तिने तुझे ऐकले तर त्याला किंवा तिला आपला बंधु किंवा बहीण म्हणून परत मिळविले आहेस. 16 पण जर तो किंवा ती तुझे एकत नसेल तर एकाला किंवा दोघांना तुझ्याबरोबर घे, यासाठी की जे काही झाले त्याविषयी साक्ष द्यायला दोन किंवा तीन जण तेथे असतील, [a] 17 जर तो मनुष्य लोकांचेही ऐकणार नाही तर मंडळीसमोर ही गोष्ट मांड. जर तो मनुष्य मंडळीचेही ऐकाणार नाही, तर मग तो देवाचा नाही, असे समज किंवा एखाद्या जकातदारासारखा समज.
18 “मी तुम्हांला खरे सांगतो, जेव्हा तुम्ही जगात न्याय कराल तेव्हा तो देवाकडून झालेला न्याय असेल. जेव्हा तुम्ही एखाद्याला क्षमा कराल तेव्हा ती देवाकडून झालेली क्षमा असेल. 19 “तसेच मी तुम्हाला सांगतो की, जर तुमच्यापैकी दोघांचे एखाद्या गोष्टीविषयी एकमत झाले तर त्याकरिता प्रार्थना करा. म्हणजे तुम्ही जी गोष्ट मागाल तुमचा स्वर्गीय पिता तिची पूर्तता करील. 20 हे खरे आहे काऱण तुमच्यापैकी जर दोघे किंवा तिघे माझ्या नावात एकत्र जमले असतील तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.”
2006 by World Bible Translation Center