Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 83:1-4

आसाफाचे स्तोत्र

83 देवा, गप्प राहू नकोस.
    तुझे कान बंद करु नकोस.
    देवा, कृपा करुन काही तरी बोल.
देवा, तुझे शत्रू तुझ्याविरुध्द योजना आखत आहेत.
    ते लवकरच हल्ला करतील.
ते तुझ्या लोकांविरुध्द गुप्त योजना आखत आहेत.
    ते तू ज्या माणसांवर प्रेम करतोस त्या माणसांविरुध्दच्या योजनाची चर्चा करत आहेत.
ते शत्रू म्हणत आहेत, “या त्यांचा पूर्णनिपात करु.
    यानंतर कोणालाही ‘इस्राएल’ या शब्दाची आठवण सुध्दा येणार नाही.”

स्तोत्रसंहिता 83:13-18

13 देवा, तू त्यांना गवतासारखे वाऱ्यावर उडवून लाव वाऱ्याने
    वाळलेलं गवत इतरत्र पसरतं तस तू त्यांना पसरवून दे.
14 अग्नी जसा जंगलाचा व डोंगराचा नाश करतो
    तसा तू शत्रूचा नाश कर.
15 देवा, वादळात धूळ जशी उडून जाते, तसे तू त्या लोकांचा पाठलाग करुन त्यांना उडवून लाव.
    त्यांना गदगदा हलव आणि तुफानात उडवून दे.
16 देवा, आपण खरोखरच अशक्त आहोत हे त्यांना कळून येऊ दे.
    नंतर त्यांना तुझ्या नावाचा धावा करायची इच्छा होईल.
17 देवा, त्या लोकांना खूप घाबरवून सोड आणि त्यांना कायमचे लज्जित कर.
    त्यांना काळीमा फास आणि त्यांचा नाश कर.
18 नंतर त्यांना तू देव आहेस हे कळेल.
    तुझे नाव यहोवा आहे हे त्यांना कळेल.
तू सर्वशक्तिमान देवच सर्व जगाचा देव आहेस
    हे ही त्यांना कळेल.

निर्गम 7:14-25

पाण्याचे रक्त होते

14 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोचे मन कठीण झाले आहे; तो इस्राएल लोकांना जाऊ देत नाही. 15 उद्या सकाळी फारो नदीवर जाईल; तू साप झालेली काठी बरोबर घे आणि नाईल नदीच्या काठी त्याला भेटावयास जा. 16 त्याला असे सांग, ‘इब्री म्हणजे इस्राएल लोकांचा देव परमेश्वर याने मला तुझ्याकडे पाठवले आहे व त्याच्या लोकांना त्याची उपासना करावयास रानात जाऊ दे, असे तुला सांगण्यास मला बजावले आहे. आतापर्यंत तू परमेश्वराचे ऐकेले नाहीस. 17 तेव्हा परमेश्वर म्हणतो की मी परमेश्वर आहे हे त्याला अशावरून कळेल: मी नाईल नदीच्या पाण्यावर ह्या माझ्या हातातील काठीने तडाखा मारीन तेव्हा नदीच्या पाण्याचे रक्त होईल. 18 मग पाण्यातील सर्व मासे मरतील. नदीला घाण सुटेल आणि मिसरचे लोक नदीचे पाणी पिऊ शकणार नाहीत.’”

19 परमेश्वर मोशेला म्हाणाला, “आपली काठी मिसरमधील नद्या, नाले, तलाव व जेथे पाणी भरून ठेवतात त्या जागेवर उगारण्यास अहरोनास सांग म्हणजे त्याने तसे केल्यावर सर्व पाण्याचे रक्त होईल, घरातील लाकडांच्या व दगडांच्या भांड्यात भरलेल्या पाण्याचे देखील रक्त होईल.”

20 तेव्हा मोशे व अहरोन यांनी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केले. अहरोनाने आपली काठी उगारली नाईल नेदीवर मारली. त्याने हे फारो व त्याचे अधिकारी यांच्यासमोर केले. तेव्हा नदीतल्या सर्व पाण्याचे रक्त झाले. 21 नदीतले मासे मेले व तिला घाण सुटली. त्यामुळे मिसराचे लोक नदीचे पाणी पिऊ शकेनात. अवघ्या मिसरभर रक्तच रक्त झाले.

22 मिसरच्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर तसेच केले. तेव्हा परमेश्वराने संगितल्याप्रमाणे फारोचे मन कठीण झाले. 23 मोशे व अहरोन यांनी केलेल्या चमत्काराकडे फारोने लक्ष दिले नाही; तो मागे फिरला व आपल्या घरी निघून गेला.

24 मिसरच्या लोकांना नदीचे पाणी पिववेना म्हणून त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी झरे खणले.

बेडकांची पीडा

25 परमेश्वराने नाईल नदीला दिलेल्या तडाख्याला सात दिवस होऊन गेले.

मत्तय 12:22-32

येशूचे सामर्थ्य देवाकडून आहे(A)

22 मग काही माणसांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या माणसाला बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला. 23 सर्व लोक चकित झाले, ते म्हणाले, “हा दाविदाचा पुत्र असेल काय?”

24 परूश्यांनी लोकांना हे बोलताना ऐकले. परूशी म्हणाले, “भुते काढण्यासाठी येशू बालजबूल सैतानाचे सामर्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भुतांचा प्रमुख आहे.”

25 परूशी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते. म्हणून येशू त्यांना म्हणाला, “आपसात लढणारी राज्ये नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही. 26 आणि जर सैतानच सैतानला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे, त्यांच्यात फूट आहे मग त्याचे राज्य कसे टिकेल? 27 आणि मी जर बालजबुलाच्या सहाय्याने भुते काढतो तर तुमची मुले कोणाच्या सामर्थ्याने भुते काढतात. म्हणून तुमचे स्वतःचे लोक तुम्हांला चूक ठरवितील. 28 परंतु मी जर देवाच्या साहाय्याने भुते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यापर्यंत आले आहे हे निश्र्चित समजा. 29 किंवा एखाद्या बलवान मनुष्याच्या घरात शिरून, त्याच्या घरातील सर्व वस्तूची चोरी जर कोणाला करायची असेल तर प्रथम त्या बलवान मनुष्याला तो बांधून टाकील व मग तो चोरी करील. 30 एखादा मनुष्य जर माझे समर्थन करीत नसेल, तर तो माझ्याविरुद्ध आहे. जो मनुष्य माझ्याबरोबर काम करीत नाही तो माझ्याविरुद्ध काम करीत आहे.

31 “म्हणून मी तुम्हांला सांगतो, मनुष्यांना ते करीत असलेल्या सर्व पापांची क्षमा करण्यात येईल. ते जे काही वाईट बोलतील त्याबद्दलही क्षमा करण्यात येईल पण जर कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल, तर त्याला क्षमा करण्यात येणार नाही. 32 एखादा मनुष्य जर मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल तर त्याला क्षमा करण्यात येईल पण जो कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल त्याला क्षमा होणार नाही. त्याला या काळीही क्षमा होणार नाही व भविष्यातही होणार नाही.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center