Revised Common Lectionary (Semicontinuous)
आसाफाचे स्तोत्र
83 देवा, गप्प राहू नकोस.
तुझे कान बंद करु नकोस.
देवा, कृपा करुन काही तरी बोल.
2 देवा, तुझे शत्रू तुझ्याविरुध्द योजना आखत आहेत.
ते लवकरच हल्ला करतील.
3 ते तुझ्या लोकांविरुध्द गुप्त योजना आखत आहेत.
ते तू ज्या माणसांवर प्रेम करतोस त्या माणसांविरुध्दच्या योजनाची चर्चा करत आहेत.
4 ते शत्रू म्हणत आहेत, “या त्यांचा पूर्णनिपात करु.
यानंतर कोणालाही ‘इस्राएल’ या शब्दाची आठवण सुध्दा येणार नाही.”
13 देवा, तू त्यांना गवतासारखे वाऱ्यावर उडवून लाव वाऱ्याने
वाळलेलं गवत इतरत्र पसरतं तस तू त्यांना पसरवून दे.
14 अग्नी जसा जंगलाचा व डोंगराचा नाश करतो
तसा तू शत्रूचा नाश कर.
15 देवा, वादळात धूळ जशी उडून जाते, तसे तू त्या लोकांचा पाठलाग करुन त्यांना उडवून लाव.
त्यांना गदगदा हलव आणि तुफानात उडवून दे.
16 देवा, आपण खरोखरच अशक्त आहोत हे त्यांना कळून येऊ दे.
नंतर त्यांना तुझ्या नावाचा धावा करायची इच्छा होईल.
17 देवा, त्या लोकांना खूप घाबरवून सोड आणि त्यांना कायमचे लज्जित कर.
त्यांना काळीमा फास आणि त्यांचा नाश कर.
18 नंतर त्यांना तू देव आहेस हे कळेल.
तुझे नाव यहोवा आहे हे त्यांना कळेल.
तू सर्वशक्तिमान देवच सर्व जगाचा देव आहेस
हे ही त्यांना कळेल.
फारोसमोर मोशे व अहरोन
5 मोशे व अहरोन इस्राएल लोकांशी बोलल्यानांतर फारोकडे गेले व त्याला म्हणाले, “इस्राएल लोकांचा देव [a] म्हणतो, ‘माझ्या लोकांना माझ्या सन्मानाकरिता उत्सव करावयास रानात जाऊ द्यावे.’”
2 परंतु फारो म्हणाला, “हा परमेश्वर कोण आहे? आणि मी त्याचे का ऐकावे? मी इस्राएल लोकांना का जाऊ द्यावे? तुम्ही परमेश्वर म्हणता तो कोण आहे हे मला माहीत नाही. म्हणून इस्राएल लोकांस मी जाऊ देत नाही.”
3 मग अहरोन व मोशे म्हणाले, “इब्री लोकांचा म्हणजे इस्राएल लोकांचा देव आम्हाशी बोलला आहे. म्हणून आम्हाला रानात तीन दिवसांच्या वाटेवर जाऊ द्यावे आणि तेथे आमचा देव परमेश्वर या करिता यज्ञार्पण करु द्यावे अशी आम्ही आपणाला विनंती करतो. आणि आम्ही जर असे केले नाही तर कदाचित् त्याला फार राग येईल व तो रोगराईने किंवा तलवारीने आमचा नाश करेल.”
4 परंतु फारो त्यांना म्हणाला, “हे मोशे, हे अहरोना, तुम्ही त्रास निर्माण करून घेत आहात! तुम्ही लोकांना काम करू देत नाही; तुम्ही त्यांच्या कामात अडथळा आणीत आहात! त्या गुलामांना आपल्या कामावर माघारी जाण्यास सांगा! 5 येथे खूप कामगार आहेत आणि त्यांना काम करण्यापासून तुम्ही रोखत आहात!”
फारो लोकांना शिक्षा देतो
6 त्याच दिवशी इस्राएल लोकांचे काम अधिक खडतर करण्यासाठी फारोने मुकादमांना व नायकांना आज्ञा दिली. 7 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही ह्या लोकांना विटा बनविण्याकरिता आज पर्यंत सतत गवत दिलेले आहे. परंतु आता त्यांना लागणारे गवत त्यांना स्वतः शोधून आणण्यास सांगा. 8 तरी परंतु पूर्वी इतक्याच विटा त्यांनी बनविल्या पाहिजेत. ते आळशी झाले आहेत आणि म्हणूनच त्यांच्या देवाला यज्ञ करण्यासाठी त्यांना जाऊ देण्याविषयी ते मला विचारत आहेत. 9 तेव्हा त्यांच्यावर अधिक काम लादून त्यांना सतत कामात ठेवा. म्हणजे मग मोशेच्या खोट्या गोष्टी ऐकण्यास त्यांना वेळ मिळणार नाही.”
10 म्हणून मिसरचे मुकादम व इस्राएली किंवा इब्री नायक इस्राएल लोकांकडे जाऊन म्हणाले, “फारोने तुम्हाला विटा बनविण्यासाठी लागणारे गवत न देण्याचे ठरवले आहे. 11 तेव्हा तुम्हाला लागणारे गवत तुम्ही स्वतःच आणले पाहिजे म्हणून आता जाऊन तुमच्यासाठी गवत आणा परंतु पूर्वीइतक्याच विटा तुम्ही बनविल्या पाहिजेत.”
12 म्हणून मग इस्राएल लोक गवत शोधण्याकरिता सर्व मिसर देशभर पांगले. 13 त्यांच्यावर नेमलेले मुकादम त्यांच्याकडून अधिक काम करवून घेऊन पूर्वी इतक्याच विटा तयार करण्याकरिता त्याच्या मागे सतत तगादा लावीत. 14 मिसरच्या मुकादमांनी लोकांवर इब्री म्हणजे इस्राएली नायक नेमले होते. लोकांनी केलेल्या कामासाठी त्यांना जबाबदार धरले जाई. मिसरचे मुकादम इस्राएली नायकांना मारीत व म्हणत, “तुम्ही पूर्वी जेवढ्या विटा बनवीत होता तेवढ्या आता का बनवीत नाही? तुम्ही जर त्यावेळी तेवढ्या विटा करीत होता तर मग आताही तेवढ्याच विटा करु शकला पाहिजे!”
15 मग इस्राएली नायक तक्रार घेऊन फारोकडे गेले व म्हणाले, “आम्ही जे तुमचे सेवक त्या आमच्याशी तुम्ही अशाप्रकारे का वागत आहा? 16 तुम्ही आम्हाला गवत देत नाही परंतु पूर्वी इतक्याच विटा बनविण्याचा हुकूम करता. आणि आता आमचे मुकादम आम्हाला मारतात. अशा रीतीने तुमचे लोक जे करीत आहेत ते चुकीचे आहे.”
17 फारोने उत्तर दिले, “तुम्ही लोक आळशी आहा. तुम्हाला काम करायला नको आणि म्हणूनच तुम्हाला जाऊ देण्याविषयी तुम्ही मला विचारता आणि त्या करिताच तुम्हाला येथून निघून जायला आणि तुमच्या परमेश्वराला यज्ञ करावयास पाहिजे. 18 आता आपल्या कामावर माघारी जा. आम्ही तुम्हाला गवत देणार नाही परंतु पूर्वी इतक्याच विटा तुम्ही केल्या पाहिजेत.”
19 आपण संकटात आहोत हे इस्राएली नायकांना समजले. कारण पूर्वी इतक्याच विटा करून देणे त्यांना शक्य नव्हते.
20 फारोच्या भेटीनंतर परत जाताना त्यांना मोशे व अहरोन भेटले; ते नायकांसाठीच थांबले होते. 21 तेव्हा ते मोशे व अहरोनास म्हणले, “आम्हाला जाऊ द्यावे असे फारोला विचारून तुम्ही मोठे वाईट केले. फारो व त्याचे अधिकारी यांच्या मनात आमच्या विरुद्ध द्वेष निर्माण केल्याबद्दल परमेश्वर तुम्हाला शिक्षा करो. आम्हास मारून टाकण्यास तुम्ही त्यांना चांगले निमित्त दिले आहे.”
मोशे देवाकडे तक्रार करतो
22 मग मोशे परमेश्वराची प्रार्थना करीत म्हणाला, “प्रभु तुझ्या लोकांसाठी ही वाईट गोष्ट तू का केलीस? तू मला इकडे का पाठवलेस? 23 मी फारोकडे जाऊन तू मला सांगितलेल्या गोष्टी त्याला सांगितल्या. परंतु त्या वेळेपासून तो लोकांशी अधिक कठोरपणे वागत आहे. आणि त्यांच्या मदतीकरिता तू काहीच केले नाहीस!”
6 तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी आता फारोचे काय करतो ते तू बघशील; मी माझ्या महान सामर्थ्याचा त्याच्या विरुद्ध उपयोग करीन; मग तो माझ्या लोकांना जाऊ देईल. तो त्यांना जाऊ देण्यास एवढा तयार होईल की तो त्यांना बळजबरीने घालवून देईल।”
2 मग देव मोशेला म्हणाला, 3 “मी परमेश्वर आहे मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना दर्शन दिले; त्यांनी मला ‘एल-शदाय’ असे नाव दिले; त्यांना ‘याव्हे’ (म्हणजे ‘परमेश्वर’) हे माझे नाव माहीत नव्हते. 4 त्यांच्याशी पवित्र करार करून मी त्यांना कनान देश देण्याचे वचन दिले. ते त्या देशात राहिले परंतु तो देश त्यांचा स्वतःचा नव्हता; ते तेथे उपरे होते. 5 आता मला इस्राएल लोकांच्या त्रासाविषयी, मिसरमधील त्यांच्या गुलामगिरी विषयी समजले आहे आणि त्यांच्याशी केलेल्या पवित्र कराराची मला आठवण आहे. 6 तेव्हा त्यांना सांग, मी म्हणतो, ‘मी तुमचा परमेश्वर आहे; मी तुम्हास वाचवीन व तुम्हांस स्वतंत्र करीन; तुम्ही मिसरच्या लोकांचे गुलाम राहणार नाही. मी माझ्या महान सामर्थ्याचा उपयोग करून मिसरच्या लोकांना भयंकर शिक्षा करीन व मग तुम्हाला सोडवीन. 7 तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन. मी तुमचा देव परमेश्वर आहे आणि मी तुम्हाला मिसरमधून सोडविले आहे हे तुम्हाला समजेल. 8 मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी मोठा करार करून त्यांना वचन दिले की मी त्यांना एक विशेष देश देईन; तेव्हा त्या देशात मी तुम्हाला नेईन व तो देश तुम्हाला कायमचे वतन करून देईन. मी परमेश्वर आहे.’”
9 तेव्हा मोशेने हे सर्व इस्राएल लोकांना सांगितले. परंतु लोकांना एवढे काम करावे लागत होते की त्यामुळे त्यांना मोशेचे म्हणणे ऐकावयास उत्सुकता नसे म्हणून ते त्याचे ऐकेनात.
10 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, 11 “जा व फारोला सांग की त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिलेच पाहिजे.”
12 परंतु मोशेने उत्तर दिले, “इस्राएल लोकांनी माझे ऐकण्यास नाकारले! तेव्हा फारोही नक्कीच माझे ऐकणार नाही! मी अजिबात चांगला वक्ता नाही.”
13 परंतु परमेश्वर मोशे व अहरोन यांच्याशी बोलला आणि त्याने त्यांना इस्राएल लोकाकडे जाऊन त्यांच्याशी बोलण्याची, तसेच फारोकडे जाऊन त्याच्याशी बोलणी करण्याची आणि इस्राएल लोकांना मिसर मधून बाहेर घेऊन जाण्याची आज्ञा दिली.
फिलदेल्फिया येथील मंडळीला
7 “फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही:
“जो पवित्र, सत्य, जो दाविदाची किल्ली ठेवतो त्याचे हे शब्द आहेत, जे तो उघडतो, ते कोणी बंद करु शकणार नाही आणि जे तो बंद करतो ते कोणी उघडू शकणार नाही.
8 “मला तुमची कामे माहीत आहेत, पाहा मी तुमच्यासमोर दार उघडे करुन ठेवले आहे. जे कोणीही बंद करु शकणार नाही. मला माहीत आहे की, तू दुर्बळ आहेस, तरी तू माझा शब्द पाळला आहेस, आणि माझे नाव नाकारले नाहीस. 9 जे सैतानाच्या सभास्थानाचे आहेत, ते स्वतःला यहूदी समजतात पण ते यहूदी नाहीत तर ते खोटारडे आहेत. मी त्यांना तुमच्याकडे आणून तुमच्या पाया पडायला लावीन. आणि त्यांना समजेल की मी तुमच्यावर प्रीति केली आहे. 10 धीराने सहन करण्याविषयी तुम्ही माझी आज्ञा पाळली आहे. म्हणून सर्व जगावर जो संकटाचा समय येणार आहे त्यापासून मी तुम्हांला राखीन. हा त्रास जे लोक या पृथ्वीवर राहातात त्यांची परीक्षा होण्यासाठी होईल.
11 “मी लवकर येत आहे, जे तुझ्याकडे आहे त्याला घट्ट धरुन राहा यासाठी की कोणीही तुझा मुगुट घेऊ नये. 12 जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिराचा खांब बनवीन. तो पुन्हा कधीही त्याला सोडणार नाही. मी त्याच्यावर माझ्या देवाचे नाव व माझ्या देवाच्या शहराचे नाव नवे यरुशलेम असे लिहीन. जे माझ्या देवापासून स्वर्गातून खाली येत आहे. आणि मी त्याच्यावर माझे नवे नाव लिहीन. 13 आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
2006 by World Bible Translation Center