Revised Common Lectionary (Semicontinuous)
आसाफाचे स्तोत्र
83 देवा, गप्प राहू नकोस.
तुझे कान बंद करु नकोस.
देवा, कृपा करुन काही तरी बोल.
2 देवा, तुझे शत्रू तुझ्याविरुध्द योजना आखत आहेत.
ते लवकरच हल्ला करतील.
3 ते तुझ्या लोकांविरुध्द गुप्त योजना आखत आहेत.
ते तू ज्या माणसांवर प्रेम करतोस त्या माणसांविरुध्दच्या योजनाची चर्चा करत आहेत.
4 ते शत्रू म्हणत आहेत, “या त्यांचा पूर्णनिपात करु.
यानंतर कोणालाही ‘इस्राएल’ या शब्दाची आठवण सुध्दा येणार नाही.”
13 देवा, तू त्यांना गवतासारखे वाऱ्यावर उडवून लाव वाऱ्याने
वाळलेलं गवत इतरत्र पसरतं तस तू त्यांना पसरवून दे.
14 अग्नी जसा जंगलाचा व डोंगराचा नाश करतो
तसा तू शत्रूचा नाश कर.
15 देवा, वादळात धूळ जशी उडून जाते, तसे तू त्या लोकांचा पाठलाग करुन त्यांना उडवून लाव.
त्यांना गदगदा हलव आणि तुफानात उडवून दे.
16 देवा, आपण खरोखरच अशक्त आहोत हे त्यांना कळून येऊ दे.
नंतर त्यांना तुझ्या नावाचा धावा करायची इच्छा होईल.
17 देवा, त्या लोकांना खूप घाबरवून सोड आणि त्यांना कायमचे लज्जित कर.
त्यांना काळीमा फास आणि त्यांचा नाश कर.
18 नंतर त्यांना तू देव आहेस हे कळेल.
तुझे नाव यहोवा आहे हे त्यांना कळेल.
तू सर्वशक्तिमान देवच सर्व जगाचा देव आहेस
हे ही त्यांना कळेल.
10 परंतु मोशे परमेश्वराला म्हणाला, “परंतु परमेश्वरा मी तुला खरे ते सांगतो; मी काही चांगला वक्ता नाही; मला लोकांसमोर कधीही नीट बोलता आलेले नाही. आणि आता तुझ्याबरोबर बोलल्यानंतरही नाही. तुला माहीत आहे की मी सावकाश व अडखळत बोलतो आणि बोलताना मला योग्य, परिणामकारक शब्द सापडत नाहीत;”
11 मग परमेश्वर त्याला म्हणाला, “माणसाचे तोंड कोणी केले? माणसाला बहिरा, मुका, आंधळा किंवा डोळस कोण करतो? मीच की नाही? मी ‘याव्हे’ आहे! होय ना? 12 तेव्हा मी सांगतो, तू आता जा. तू बोलत असताना मी तुझ्याबरोबर असेन. मी योग्य शब्द तुझ्या मुखात घालीन.”
13 परंतु मोशे म्हणाला, “माझ्या परमेश्वरा! मी तुला कळकळीची विनंती करतो की तू दुसऱ्या कोणाला पाठव. मला नको.”
14 परमेश्वर मोशेवर रागावला! परमेश्वर म्हणाला, “मी तुला आणखी मदत देतो. लेवी कुटुंबातील तुझा भाऊ अहरोन याचा मी उपयोग करतो. तो पटाईत वक्ता आहे. तो अगोदरच तुझ्याकडे येण्यास निघाला आहे. तुला भेटल्यावर त्याला आनंद होईल. 15 तो तुझ्याबरोबर फारोकडे येईल. तू काय बोलावेस ते मी तुला सांगेन: मग ते तू अहरोनाला सांग, आणि मग अहरोन योग्य शब्दात फारोशी बोलेल. 16 आणि अहरोन तुझ्या तर्फे लोकांशी बोलेल; तो तुझे मुख होईल आणि त्याने काय बोलावे हे सांगणारा तू त्याला देवासारखा होशील. 17 तर आता जा! तुझी काठी तुझ्या सोबत घे. मी तुझ्याबरोबर आहे हे लोकांना दाखवण्यासाठी त्या काठीचा व इतर चमत्कारांचा उपयोग कर!”
मोशे मिसरला परत जातो
18 मग मोशे आपला सासरा इथ्रो याच्याकडे परत गेला. तो इथ्रोला म्हणाला, “मला मिसरला माझ्या भाऊबंदाकडे जाऊ द्या. ते अद्याप जिवंत आहेत की नाहीत ते मला पाहू द्या.”
इथ्रो म्हणाला, “तू शांततेने जा.”
19 तेव्हा मोशे अद्याप मिद्यानात असताना देव त्याला म्हणाला, “आता मिसरला परत जाणे तुझ्यासाठी सुरक्षिततेचे आहे. जे लोक तुला ठार मारु पाहात होते ते आता मरण पावले आहेत.”
20 तेव्हा मोशेने आपली बायको व आपल्या मुलांना गाढवांवर बसवले व त्यांना घेऊन तो मिसरला माघारी गेला. त्यांने देवाच्या सामर्थ्याने भरलेली आपली काठी बरोबर नेली.
21 मोशे मिसरचा प्रवास करत आसताना देव त्याच्याबरोबर बोलला, देव म्हणाला, “तू फारोशी बोलताना मी तुला जे चमत्कार करण्याची शक्ती दिली आहे त्यायोगे ते चमत्कार त्याला दाखवण्याची आठवण ठेव. परंतु मी फारोचे मन अतिशय कठीण करीन; तो तुम्हाला जाऊ देणार नाही. 22 मग तू फारोला सांग की 23 परमेश्वर म्हणतो, ‘इस्राएल माझा मोठा मुलगा [a] आहे. आणि मी तुला सांगत आहे की तू माझ्या थोरल्या मुलाला माझी उपासना करण्याकरिता जाऊ दे! जर तू माझ्या प्रथम जन्मलेल्या मुलास म्हणजे माझ्या इस्राएल लोकांस जाऊ देण्याचे नाकारशील तर मी तुझ्या प्रथम जन्मलेल्या म्हणजे थोरल्या मुलास ठार मारीन.’”
मोशेच्या मुलाची सुंता होते
24 मोशे मिसरच्या प्रवासात असताना एके ठिकाणी मुक्कामासाठी थांबला. तेव्हा परमेश्वराने मोशेला त्या ठिकाणी गाठून त्याला ठार मारण्याचा [b] प्रयत्न केला. 25 परंतु सिप्पोराने एक गारगोटीची धारदार सुरी घेतली व तिने आपल्या मुलाची सुंता केली. मग तिने मुलाची अग्रत्वचा घेतली आणि ती मोशेच्या पायावर ठेवून ती त्याला म्हणाली, “तू माझा रक्ताने मिळवलेला नवरा आहेस.” 26 सिप्पोरा असे म्हणाली कारण तिला आपल्या मुलाची सुंता करावी लागली. तेव्हा देवाने मोशेला क्षमा केली व त्याला ठार मारले नाही.
देवासमोर मोशे व अहरोन
27 परमेश्वराने अहरोनाला सांगितले होते, “तू वाळवंटात जाऊन मोशेला भेट,” म्हणून अहरोन देवाच्या डोंगरावर म्हणजे होरेब किंवा सिनाय डोंगरावर जाऊन मोशेला भेटला. मोशे भेटल्यावर अहरोनाने त्याचे चुंबन घेतले. 28 परमेश्वराने मोशेला सांगितलेल्या सर्व गोष्टी मोशेने अहरोनाला सांगितल्या व देवाने त्याला का पाठवले तेही सांगितले; तसेच परमेश्वराने मोशेला जे चमत्कार करून दाखवावयाची आज्ञा दिली होती त्याविषयीही त्याने अहरोनाला सांगितले.
29 मग मोशे व अहरोन यांनी जाऊन इस्राएली वंशजाचे सर्व वडीलधारी एकत्र जमवले. 30 नंतर परमेश्वराने मोशेला सांगितलेल्या सर्व गोष्टी अहरोनाने लोकांस कळवल्या; त्यानंतर मोशेने लोकांसमक्ष चमत्कार करून दाखवले. 31 तेव्हा देवानेच मोशेला पाठवले असल्याबद्दल त्यांची खात्री झाली. देवाने त्यांच्या हालअपेष्टा पाहिल्या आहेत व तो त्यांना भेटण्यास आला आहे हे त्यांना माहीत झाले. तेव्हा त्यांनी नमन करून देवाची उपासना केली.
सार्दीस येथील मंडळीला
3 “सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही:
“जो देवाचे सात आत्मे धरतो व सात तारे धरतो त्याचे हे शब्द आहेत.
“मला तुमची कामे माहीत आहेत, जिवंत असण्याबद्दल तुमचा लौकिक आहे. पण तुम्ही मेलेले आहात. 2 जागे व्हा! जे उरलेले आहेत आणि मरणाच्या ह्यामार्गावर आहेत त्यांना मजबूत करा. कारण माझ्या देवाच्या दृष्टीने तुमची कृत्ये पूर्ण झाल्याचे मला आढळले नाही. 3 म्हणून लक्षात ठेवा, जे तुम्हाला प्राप्त झालेले आहे आणि जे तुम्ही ऐकले आहे त्याप्रमाणे वागा. आणि पश्चात्ताप करा. पण जर तुम्ही जागे होत नाही, तर मी एखाद्या चोरासारख येईन आणि तुम्हाला हे कळणार नाही की मी नेमक्या कोणत्या वेळेला तुमच्याकडे येईन.
4 “तरी तुमच्यात थोडे लोक आहेत जे सार्दीसमध्ये आहेत ज्यांनी स्वतःला स्वच्छ राखले आहे. ते लोक माझ्याबरोबर चालतील. ते पांढरी वस्त्रे घालतील कारण ते पात्र आहेत. 5 प्रत्येक व्यक्ति जी विजय मिळविते, ती त्यांच्यासारखी पांढरी वस्त्रे परिधान करील. मी त्या व्यक्तीचे नाव जीवनाच्या पुस्तकातून काढणार तर नाहीच पण माझ्या पित्यासमोर व त्याच्या देवदूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन, 6 आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
2006 by World Bible Translation Center