Revised Common Lectionary (Semicontinuous)
जळते झुडूप
3 मोशेच्या सासऱ्याचे नाव इथ्रो असे होते. मोशे त्याची शेरडेमेंढरे चारणारा मेंढपाळ होता. एके दिवशी मोशे वाळवंटाच्या पश्चिमेला होरेब डोंगर म्हणजे सिनाय डोंगर ह्या देवाच्या डोंगराकडे आपली मेंढरे घेऊन गेला. 2 त्या डोंगरावर त्याने एका जळत्या झुडूपात परमेश्वराच्या दूताला पाहिले.
मोशेने असे पाहिले की झुडूप जळत होते परंतु ते जळून खाक होत नव्हते तर जसेच्या तसेच होते. 3 तेव्हा मोशे स्वतःशी म्हणाला, “हे झुडूप जळत असून जळून नष्ट का होत नाही हे मी जरा जवळ जाऊन पहातो.”
4 मोशे झुडूपाजवळ येत होता हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा झुडूपातून देवाने मोशेला हाक मारून म्हटले, “मोशे मोशे!”
आणि मोशे म्हणाला, “मी इथे आहे.”
5 तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तू आहेस तेथून झुडूपाजवळ येऊ नकोस, तर तुझ्या पायातले पायताण काढ; कारण तू पवित्र भूमिवर उभा आहेस. 6 मी तुझ्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब यांचा देव आहे.”
देवाकडे पाहाण्यास मोशेला भीती वाटली म्हणून त्याने आपले तोंड झाकून घेतले.
7 परमेश्वर म्हणाला, “मिसरमध्ये माझ्या लोकांना कसा त्रास भोगावा लागत आहे; आणि मिसरच्या लोकांनी त्याचा कसा छळ चालविलेला आहे, हे मी पाहिले आहे; त्या लोकांच्या हाका मी ऐकल्या आहेत; लोकांचे हाल व दु:ख मला समजले आहे. 8 आता मी खाली जाऊन माझ्या लोकांचा मिसरच्या लोकांपासून बचाव करीन; मी त्यांना ह्या देशातून काढून जेथे त्यांना कसलाही त्रास होणार नाही अशा चांगल्या देशात [a] जेथे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी असे विविध प्रकारचे लोक राहतात, तेथे घेऊन जाईन. 9 मी इस्राएल लोकांचे आक्रोश ऐकले आहेत आणि मिसरच्या लोकांनी त्यांचे जीवन कसे कष्टमय व कठीण केले आहे तेही पाहिले आहे. 10 तेव्हा मी आता तुला फारोकडे पाठवीत आहे! तर तू आता त्याच्याकडे जा! आणि माझ्या लोकांना म्हणजे माझ्या इस्राएल लोकांना मिसरमधून तुझ्या पुढाकाराने घेऊन ये!”
11 परंतु मोशे देवाला म्हणाला, “मी कोणी मोठा माणूस नाही! मी साधा माणूस आहे! तेव्हा फारोकडे जाऊन इस्राएल लोकांना मिसरमधून घेऊन यावयाच्या पात्रतेचा माणूस मी नाही, तर मग मी हे कसे करु शकेन?”
12 देव म्हणाला, “हे तू करु शकशील, कारण मी तुजबरोबर असेन मी तुला पाठवीत आहे याचा पुरावा असा असेल; तू इस्राएल लोकांना मिसरमधून बाहेर आणल्यावर या डोंगरावर येऊन माझी उपासना करशील.”
13 मग मोशे देवाला म्हणाला, “परंतु मी जर इस्राएल लोकांकडे जाऊन म्हणालो, ‘तुमच्या पूर्वजांचा देव याने मला तुमच्याकडे पाठवले आहे;’ तर मग ते लोक विचारतील ‘त्याचे नाव काय आहे?’ मग मी त्यांना काय सांगू?”
14 मग देव मोशेला म्हणाला, “त्याचे नाव ‘जो मी आहे तो मी आहे’ [b] असे आहे, हे त्यांना सांग. तू इस्राएल लोकाकंडे जाशील तेव्हा ‘मी आहे’ ने मला पाठवले आहे असे त्यांना सांग. 15 देव मोशेला आणखी म्हणाला, याव्हे हा तुमच्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहामचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे असे तू त्यांना सांग. माझे नांव नेहमीच ‘याव्हे’ असेल. इस्राएल लोक पिढ्यानपिढ्या मला त्याच नांवाने ओळखतील; ‘त्याच याव्हेने मला तुमच्याकडे पाठवले आहे’ असे त्यांना सांग!”
105 परमेश्वराला धन्यावाद द्या.
त्याच्या नावाचा धावा करा.
राष्ट्रांना तो करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगा.
2 परमेश्वराला गाणे गा; त्याची स्तुतिगीते गा.
तो ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल सांगा.
3 परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा.
तुम्ही लोक परमेश्वराला शोधत आला, सुखी व्हा.
4 शक्तीसाठी परमेश्वराकडे जा.
मदतीसाठी नेहमी त्याच्याकडे जा.
5 तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्याची आठवण ठेवा त्याचे चमत्कार
आणि त्याचे शहाणपणाचे निर्णय याची आठवण ठेवा.
6 तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशज आहात.
तुम्ही याकोबाचे, देवाने निवडलेल्या माणसाचे वंशज आहात.
23 नंतर इस्राएल मिसरमध्ये आला.
याकोब हामच्या देशातच राहिला.
24 याकोबाचे कुटुंब खूप मोठे झाले.
ते त्यांच्या शत्रूंपेक्षा खूप बलवान झाले.
25 म्हणून मिसरचे लोक याकोबाच्या कुटुंबाचा द्वेष करु लागले.
त्यांनी त्याच्या गुलामांविरुध्द योजना आखल्या.
26 म्हणून देवाने त्याचा सेवक मोशे आणि
देवाने निवडलेला त्याचा याजक अहरोन यांना पाठविले.
45 देवाने असे का केले?
त्याच्या माणसांनी त्याचे नियम पाळावे म्हणून त्यांनी त्याची
शिकवण काळजीपूर्वक आचरावी म्हणून,
परमेश्वराची स्तुती करा.
9 तुमची प्रीति प्रामाणिक असावी. जे वाईट त्याचा द्वेष करा व बऱ्याला चिकटून राहा. 10 बंधूप्रेमाच्याबाबतीत एकमेकांशी ममतेने वागा, आदराच्या बाबतीत स्वतःपेक्षा इतरांचा बहुमान करा. 11 आस्थेविषयी आळशी होऊ नका. आत्म्यात उत्सुक असा. प्रभूची सेवा करा. 12 आपल्या घरात आनंदी राहा. संकटात सहनशील राहा. चिकाटिने प्रार्थना करा. 13 पवित्र जनांच्या गरजा भागवा. आदरातिथ्य करण्यात तत्पर असा.
14 जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या. शाप देऊ नका. 15 जे आनंद करतात त्यांच्याबरोबर आनंद करा. रडणाऱ्यांबररोबर रडा. 16 एकमेकांबरोबर ऐक्याने रहा, गर्व करु नका. त्याऐवजी नम्र लोकांच्या सहवासात रहा. स्वतःस शहाणे समजू नका.
17 कोणाचीही वाईटाबद्दल वाईट अशी फेड करुन नका. सर्व लोकांच्या दृष्टीने चांगले ते करण्याचा प्रयत्न करा. 18 शक्य असेल तर ते तुमच्यावर अवलंबून असल्याने सर्व लोकांबरोबर शांतीने राहा. 19 प्रिय बंधूंनो, सूड उगवू नका, देवाच्या रागाला वाट द्या. असे लिहिले आहे, “सूड घेणे माझ्याकडे आहे. मी फेड करीन असे प्रभु म्हणतो. [a]
20 “तुमचा शत्रू भुकेला असल्यास
त्यास खावयास द्या,
तहानेला असेल तर
प्यावयास द्या.
कारण असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखाऱ्यांची रास कराल.” [b]
21 वाइटाने जिंकले जाऊ नका तर चांगल्याने वाइटास जिंका.
येशू म्हणतो की त्याने मेलेच पाहिजे(A)
21 तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यास दाखवू लागला की, आपण यरूशलेमला जावे आणि वडील यहुदी नेते व मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून पुष्कळ दु:खे सोसावी व जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविले जावे याचे अगत्य आहे.
22 तेव्हा पेत्राने त्याला जवळ घेऊन निषेध करून म्हटले, “प्रभु, या गोष्टीपासून देव तुझी सुटका करो. या गोष्टी तुझ्या बाबतीत कधीही घडणार नाहीत!”
23 परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यामागे हो, तू मला अडखळण आहेस. कारण तू देवाच्या गोष्टींकडे लक्ष लावीत नाहीस तर मनुष्यांच्या गोष्टींकडे लक्ष लावतोस.”
24 तेव्हा येशूने आपल्या शिष्यांस म्हटले, “जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे. 25 कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्याला गमावील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्याला मिळवील. 26 जर मनुष्याने सर्व जग मिळविले आणि अनंतकालिक जीवन गमावले तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जिवाचा काय मोबदला देईल? 27 कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या दूतांसहित येणार आहे. आणि तेव्हा तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल. 28 मी तुम्हांला खरे सांगतो की, येथे उभे राहाणाऱ्यातले काही जण असे आहेत की, ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”
2006 by World Bible Translation Center