Revised Common Lectionary (Semicontinuous)
इस्राएल लोकांना त्रास
8 नंतर मिसर देशावर नवीन राजा राज्य करु लागला. योसेफ व त्याची कर्तबगारी याची त्याला माहीती नव्हती. 9 तो आपल्या लोकांना म्हणाला, “ह्या इस्राएल लोकांकडे पाहा; देशात ते फार झाले आहेत! आणि ते आपल्यापेक्षा संख्येने अधिक आहेत व शक्तीमानही झाले आहेत; 10 त्यांची वाढ थांबवावी म्हणून आपण काहीतरी उपाय योजना केलीच पाहिजे. जर एखादा युद्धाचा प्रसंग आला तर हे इस्राएल लोक आपल्या शत्रुला जाऊन मिळतील; आणि मग ते आपला पराभव करुन आपणापासून निसटून जातील.”
11 तेव्हा इस्राएल लोकांस त्रास देऊन त्यांचे जीवन कष्टमय व कठीण करावयाचे असे मिसरच्या लोकांनी ठरविले, म्हणून त्यांनी, गुलामाकडून बिगार कामे करुन घेण्यासाठी जसे मुकादम नेमतात तसे इस्राएल लोकावंर मुकादम नेमले. त्या मुकादमांनी राजाकरिता पिथोम व रामसेस ही दोन शहरे जबरदस्तीने इस्राएल लोकांकडून बांधून घेतली; राजाने या दोन शहरांचा धान्य व इतर वस्तु साठवून ठेवण्यासाठी उपयोग केला.
12 मिसरवासीयांनी इस्राएल लोकावंर अधिक कठीण व कष्टाची कामे लादली; परंतु जसजसे ते त्यांच्यावर अधिक कष्टाची कामे लादू लागले तसतसे इस्राएल लोक अधिकच संख्येने वाढत गेले व अधिकच पसरले; 13 आणि मग मिसरवासीयांना त्यांची अधिकच भीती वाटू लागली; म्हणून त्यांनी त्यांच्यावर अधिक कष्टाची कामे लादली.
14 अशा प्रकारे मिसरवासीयांनी इस्राएल लोकांचे जीवन फारच कठीण काबाडकष्टांचे व हाल अपेष्टांचे केलें; त्यांनी त्यांना विटा बनविण्याची, घाण्याची तसेच शेतीची व इतर अतिशय कठीन व कष्टाची कामे बळजबरीने करायला लावली.
देवाच्या आज्ञा पाळणाऱ्या सुइणी
15 इस्राएली स्त्रिया बाळंत होताना त्यांना मदत करणाऱ्या शिप्रा व पुवा नावांच्या दोन इब्री म्हणजे इस्राएली सुइणी होत्या. मिसरच्या राजाने त्यांना आज्ञा केली. 16 तो म्हणाला, “तुम्ही इब्री स्त्रियांना बाळंतपणात सहाय्य करण्याचे काम चालू ठेवा. त्या स्त्रियांना मुलगी झाली तर तिला जिवंत ठेवा; परंतु त्यांना मुलगा झाला तर त्याला अवश्य मारून टाका.”
17 परंतु त्या सुइणा देवाचे भय व आदर धरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या होत्या म्हणून त्यांनी राजाची आज्ञा मानली नाही; त्यांनी जन्मणाऱ्या मुलांनाही जिवंत ठेवले.
18 तेव्हा मिसरच्या राजाने त्या सुइणींना बोलावून विचारले, “तुम्ही असे का केले? तुम्ही जन्मलेल्या मुलांना का जिवंत ठेवले?”
19 सुइणी म्हणाल्या, “ह्या इब्री म्हणजे इस्राएली स्त्रिया मिसरच्या स्त्रियांपेक्षा फार ताकदवान आहेत; आम्ही सुइणी त्यांच्याकडे जाऊन पोहोंचण्यापूर्वीच त्या बाळंत होतात.” 20 त्या सुइणींच्या कामाबद्दल देवाला आनंद झाला; त्याबद्दल देवाने त्यांचे कल्याण केले वे त्यांची घराणी स्थापित केली;
21 इस्राएल लोकांना अधिक मुले होत राहिली; ते संख्येने फार वाढले व फार बलवान झाले. 22 तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांना आज्ञा दिली, “त्या लोकापैकी ज्यांना मुलगा होईल तो प्रत्येक मुलगा नाईल नदीत फेकून द्या पण मुलगी मात्र जिवंत ठेवा.”
मोशे बाळ
2 लेवी वंशातील एक माणूस होता. त्याने लेवी वंशातीलच मुलगी बायको केली. 2 ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला; तो मुलगा फार सुंदर व देखणा आहे असे पाहून त्याच्या आईने त्याला तीन महिने लपवून ठेवले. 3 तो बाळ मुलगा असल्यामुळे सापडला जाईल व मारला जाईल अशी त्याच्या आईला भीती वाटली. तीन महिन्यानंतर तिने एक लव्हाव्व्याची पेटी तयार केली; ती पाण्यावर तरंगावी म्हणून तिने तिला आतून व बाहेरून डांबर लावले. तिने त्या तान्ह्या बाळाला पेटीत ठेवले; नंतर तिने ती पेटी नदीत उंच लव्हाव्व्यात ठेवली. 4 त्या बाळाची बहीण, त्याचे पुढे काय होते ते पाहण्यासाठी तेथून दूर बाजूला उभी राहिली.
5 त्याच वेळी फारोची मुलगी (राजकन्या) आंघोळ करण्यासाठी नदीवर गेली. तिच्या दासी नदीच्या किनाऱ्यावर फिरत होत्या. राजकन्येने उंच लव्हाव्व्यात ती पेटी पाहिली; आणि एका दासीला तिकडे जाऊन ती पेटी आणण्यास सांतगितले. 6 राजकन्येने ती पेटी उघडली तेव्हा तिला तिच्यात एक लहान बाळ दिसले, ते बाळ रडत होते, म्हणून तिला त्याच्याबद्दल फार वाईट वाटले! ती म्हणाली, “हा बाळ कोणातरी इब्री म्हणजे इस्राएलच्या कुटुंबात जन्मलेला मुलगा आहे.”
7 मग आतापर्यत लपून बसलेली ती बाळाची बहीण राजकन्येकडे गेली व म्हणाली, “या बाळाची काळजी घेण्यासाठी मी जाऊन एखादी इब्रीदाई शोधून आणू का?”
8 राजकन्येने उत्तर दिले, “होय कृपाकरून लवकर घेऊन ये.”
तेव्हा ती मुलगी गेली व त्या बाळाच्या आईलाच घेऊन आली.
9 राजकन्या त्या बाईला म्हणाली, “बाई, ह्या बाळाला घरी घेऊन जा, व माझ्याकरिता त्याला दूध पाज आणि त्याची चांगली काळजी घे; त्याबद्दल मी तुला मोबदला देईन.”
तेव्हा त्या बाईने ते बाळ घेतले आणि त्याची योग्य काळजी घेतली. 10 ते मूल वाढले. मग काही काळानंतर एके दिवशी ती बाई त्या बाळाला घेऊन राजकन्येकडे आली; तेव्हा राजकन्येने ते बाळ घेतले आणि त्याला आपला स्वतःचा मुलगा म्हणून स्वीकारले; तिने त्याचे नांव मोशे ठेवले कारण तिने त्याला पाण्यातून उचलून घेतले होते.
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे दावीदाचे स्तोत्र.
124 परमेश्वर जर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते?
इस्राएल, मला उत्तर दे.
2 लोकांनी आपल्यावर हल्ला केला
तेव्हा जर परमेश्वर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते?
3 आपले शत्रू आपल्यावर जेव्हा रागावले असते
तेव्हा त्यांनी आपल्याला जिवंत गिळले असते.
4 आपल्या शत्रूंचे सैन्य महापुरासारखे आपल्या अंगावरुन गेले असते.
नदी प्रमाणे त्यांनी आपल्याला बुडवले असते.
5 गर्विष्ठ लोकांनी वर वर चढणाऱ्या पाण्याप्रमाणे
आपल्या तोंडापर्यंत येऊन आपल्याला बुडवले असते.
6 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपल्या शत्रूंना
आपल्याला पकडू दिले नाही आणि ठार मारु दिले नाही.
7 जाळ्यात सापडलेल्या आणि
नंतर त्यातून सुटलेल्या पक्ष्याप्रमाणे आपण आहोत.
जाळे तुटले आणि आपण त्यातून सुटलो.
8 परमेश्वराकडून आपली मदत आली.
परमेश्वराने पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण केला.
आपले जीवन देवाला द्या
12 म्हणून बंधूनो, देवाच्या दयेमुळे मी तुम्हांला विनवितो की, तुमची शरीरे देवाला संतोष देणारा जिवंत यज्ञ अशी अर्पण करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. 2 आणि यापुढे या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करु नका, त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीनपणामुळे तुमचा बदल होऊ द्या. यासाठी की देवाची पूर्ण आणि त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हांला कळावे व तिचा तुम्ही स्वीकार करावा.
3 मला देण्यात आलेल्या कृपादानाच्या दृष्टीने मी तुम्हांतील प्रत्येकाला सांगतो की, विचार करण्यास योग्य आहे त्या आपल्या योग्यतेपेक्षा आपणांला अधिक श्रेष्ठ मानू नका. तर देवाने सोपवून दिलेल्या परिमाणाप्रमाणे समंजस असा जो मार्ग त्या दृष्टीने विचार करा. 4 कारण एका शरीरात आपले अनेक अवयव आहेत तरी सर्व अवयवांचे कार्य एकच नसते. 5 त्याचप्रमाणे, आपण पुष्कळ अंग असून ख्रिस्तामध्ये एक शरीर व एकमेकांचे अवयव आहोत.
6 देवाने दाखविलेल्या दयेनुसार आपणांस निरनिराळी दाने आहेत, जर कोणाला देवाचा संदेश देण्याचे दान आहे तर त्याने ते आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने उपयोगात आणावे. 7 जर कोणाला सेवेचे दान असेल तर त्याने सेवेला वाहून घ्यावे, कोणाला शिक्षणाचे दान असेल तर त्याने शिक्षणाला वाहून घ्यावे. 8 कोणाला बोध करण्याचे दान असेल तर त्याने बोध करण्यास वाहून घ्यावे. ज्याला दानधर्म देण्याचे दान असेल त्याने ते सद्हेतूने द्यावे. ज्याला अधिकाराचे दान असेल त्याने दक्षतेने ते काम करावे ज्याला दयेचे दान असेल त्याने आनंदाने दया करावी.
पेत्र म्हणतो की येशू हा ख्रिस्त आहे(A)
13 येशू फिलिप्पाच्या कैसरिया या भागाकडे गेला. तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात?”
14 आणि ते म्हणाले, “काही बाप्तिस्मा करणारा योहान, तर कित्येक एलीया तर दुसरे काही यिर्मया किंवा संदेष्ट्यापैकी एक असे म्हणतात.”
15 मग येशू त्यांना म्हणाला, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?”
16 शिमोनाने उत्तर दिले, “तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.”
17 येशू म्हणाला, “शिमोन, योनाच्या पुत्रा, तू धन्य आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे प्रगट केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे प्रगट केले. 18 आणखी मी तुला असे सांगतो की, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. आणि मृत्युलोकाचा यावर अधिकार चालणार नाही. 19 मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधून ठेवशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. 20 तेव्हा त्यानी शिष्यांस निक्षून सांगितले की, मी ख्रिस्त आहे ते तुम्ही कोणालाही सांगू नका.”
2006 by World Bible Translation Center