Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
130 परमेश्वरा, मी खूप मोठ्या संकटात आहे
म्हणून मी तुला मदतीसाठी हाक मारीत आहे.
2 माझ्या प्रभु, माझ्याकडे लक्ष दे.
माझ्या मदतीच्या हाकेला ओ दे.
3 परमेश्वरा, तू जर लोकांना खरोखरच त्यांच्यासगळ्या
पापांबद्दल शिक्षा केलीस तर कुणीही माणूस जिवंत राहाणार नाही.
4 परमेश्वरा, तुझ्या माणसांना क्षमा कर.
म्हणजे मग तुझी उपासना करण्यासाठी लोक असतील.
5 मी मदतीसाठी परमेश्वराची वाट पाहतो आहे.
माझा आत्मा त्याची वाट बघत आहे.
परमेश्वर जे सांगतो त्यावर माझा विश्वास आहे.
6 मी माझ्या प्रभुची वाट बघत आहे.
मी सकाळ होण्याची खूप वाट पाहात असलेल्या रक्षकांसारखा आहे.
7 इस्राएल, परमेश्वरावर विश्वास ठेव.
केवळ परमेश्वराजवळच खरे प्रेम मिळते.
परमेश्वर पुन्हा पुन्हा आपला उध्दार करतो आणि
8 परमेश्वर इस्राएलला त्याच्या सर्व पापांबद्दल क्षमा करील.
16 योसेफाचे भाऊ त्याजकडे आले आहेत अशी बातमी फारो, त्याच्या घरची मंडळी व त्याचे सेवक यांना समजली त्यामुळे त्या सर्वांना त्याविषयी आनंद झाला. 17 तेव्हा फारो योसेफाला म्हणाला, “तुझ्या भावांना सांग की तुम्हाला गरज असेल तेवढी अन्नसामग्री घेऊन कनान देशास जा; 18 तसेच तुमचा बाप आणि तुमच्या घरची सर्व मंडळी यांना घेऊन माझ्याकडे या; तुम्हाला राहावयास मिसरमधील सर्वात उत्तम प्रदेश मी देईन आणि तुमच्या घरातील मंडळी, यांना आमच्या येथे असलेले उत्तम पदार्थ खावयास मिळतील.” 19 मग फारो म्हणाला, “आपल्या गाड्यांपैकी सर्वात चांगल्या गाड्या तुझ्या भावांना दे व त्यांना सांग की कनान देशास जाऊन तुमचे वडील आणि तुमच्या स्त्रिया व मुले या सर्वांना गाड्यात बसवून मागे घेऊन या; 20 त्यांचे सामान सुमान व जे काही असेल ते सर्व घेऊन येण्यास संकोच धरु नका असे सांग. मिसरमधील उत्तम ते आम्ही त्यांना देऊ शकतो!”
21 तेव्हा इस्राएलाच्या मुलांनी तसे केले; योसेफाने त्यांना फारोने वचन दिल्याप्रमाणे सर्वात चांगल्या गाड्या दिल्या; आणि त्यांच्या प्रवासाकरिता भरपूर अन्नसामग्री दिली; 22 तसेच त्याने प्रत्येक भावाला एक सुंदर पोशाख दिला; व बन्यामीनाला पाच सुंदर पोशाख आणि चांदीची तीनशे नाणी दिली. 23 त्याने आपल्या बापासाठीही देणग्या पाठवल्या. मिसरमधील चांगले पदार्थ गोण्यात लादलेली दहा गाढवी आपल्या बापाकरिता परतीच्या प्रवासासाठी पाठवल्या. 24 मग योसेफाने आपल्या भावांना निरोप दिला; ते निघाले तेव्हा त्याने त्यांना सांगितले, “सरळ घरी जा आणि रस्त्यात एकमेकांशी भांडू नका.”
25 अशा रीतीने त्याचे भाऊ मिसर सोडून कनान देशास आपल्या बापाकडे गेले. 26 त्यांनी आपल्या बापास सांगितले, “बाबा! बाबा! तुमचा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे आणि तो अवघ्या मिसर देशाचा प्रशासक म्हणजे प्रमुख अधिकारी आहे.” हे ऐकून त्यांच्या बापाला भोवळ आली.
त्यांच्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसेना! 27 परंतु त्यांनी त्याला योसेफाने सांगितलेल्या सर्व गोष्टी कळवल्या; मग योसेफाने त्या सर्वांना मिसरला घेऊन जाण्यासाठी पाठवलेल्या चांगल्या गाड्या पाहिल्या तेव्हा त्याच्या जीवात जीव आला व त्याला फारच फार आनंद झाला; 28 इस्राएल म्हणाला, “आता मात्र तुमच्यावर माझा विश्वास बसला आहे की माझा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे; आता मी मरण्यापूर्वी त्याला जाऊन भेटेन!”
येशू एका आजरी माणसाला बरे करतो(A)
8 येशू डोंगरावरून खाली आला. पुष्कळ लोक त्याच्यामागे चालत होते. 2 तेव्हा एक कुष्ठरोग झालेला मनुष्य त्याच्याकडे येऊन वाकून त्याच्या पाया पडून म्हणाला, “प्रभु, तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला शुद्ध करण्यास समर्थ आहात.”
3 मग येशूने आपला हात पुढे करुन त्याला स्पर्श केला व म्हटले, “तू शुद्ध व्हावेस अशी माझी इच्छा आहे,” आणि ताबडतोब तो कुष्ठरोगी बरा झाला. 4 “हे जे घडले ते कुणाला सांगू नकोस, तर जाऊन स्वतःला याजकांना दाखव आणि तू कुष्ठरोगमुक्त झालास ह्याचे प्रमाण म्हणून मोशेने ठरवून दिलेले अर्पण वाहून टाक. ह्यामुळे तू शुद्ध झाल्याचे लोकांना कळेल.”
येशू सेनाधिकाऱ्याच्या नोकराला बरे करतो(B)
5 येशू कफर्णहूम शहरास गेला. जेव्हा त्याने शहरात प्रवेश केला, तेव्हा एक सेनाधिकारी त्याच्याकडे आला 6 आणि विनंती करू लागला की, “प्रभु, माझा नोकर पक्षाघाताने खूपच त्रासलेला आहे व तो माझ्या घरात पडून आहे.”
7 येशू त्याला म्हणाला, “मी येऊन त्याला बरे करीन.”
8 तेव्हा सेनाधिकारी म्हणाला, “प्रभु, आपण माझ्या घरी यावे इतकी माझी योग्यता नाही. आपण फक्त शब्द बोला म्हणजे माझा नोकर बरा होईल. 9 कारण मी स्वतः दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करतो आणि माझ्या हाताखाली देखील अनेक शिपाई आहेत. मी एखाद्याला जा म्हणतो आणि तो जातो आणि दुसऱ्याला ये म्हटल्यावर तो येतो. मी माझ्या नोकराला अमूक कर असे सांगतो आणि तो ते करतो.”
10 येशूने जेव्हा हे ऐकले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले आणि जे त्याच्यामागुन चालत होते. त्यांना तो म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, इस्राएलात इतका मोठा विश्वास असलेला एकही मनुष्य मला आढळला नाही. 11 मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ जण पूर्वेकडून आणी पश्चिमेकडून येतील आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्यासह स्वर्गाच्या राज्यात मेजासभोवती मेजवानीसाठी बसतील. 12 परंतु जे खरे वारस आहेत. ते बाहेरच्या अंधरात टाकले जातील. तेथे रडणे व दात खाणे चालेल.”
13 मग येशू सेनाधिकाऱ्याला म्हणाला, “जा, तू जसा विश्वास धरलास तसे होईल.” आणि त्याच क्षणी त्याचा नोकर बरा झाला.
2006 by World Bible Translation Center