Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
130 परमेश्वरा, मी खूप मोठ्या संकटात आहे
म्हणून मी तुला मदतीसाठी हाक मारीत आहे.
2 माझ्या प्रभु, माझ्याकडे लक्ष दे.
माझ्या मदतीच्या हाकेला ओ दे.
3 परमेश्वरा, तू जर लोकांना खरोखरच त्यांच्यासगळ्या
पापांबद्दल शिक्षा केलीस तर कुणीही माणूस जिवंत राहाणार नाही.
4 परमेश्वरा, तुझ्या माणसांना क्षमा कर.
म्हणजे मग तुझी उपासना करण्यासाठी लोक असतील.
5 मी मदतीसाठी परमेश्वराची वाट पाहतो आहे.
माझा आत्मा त्याची वाट बघत आहे.
परमेश्वर जे सांगतो त्यावर माझा विश्वास आहे.
6 मी माझ्या प्रभुची वाट बघत आहे.
मी सकाळ होण्याची खूप वाट पाहात असलेल्या रक्षकांसारखा आहे.
7 इस्राएल, परमेश्वरावर विश्वास ठेव.
केवळ परमेश्वराजवळच खरे प्रेम मिळते.
परमेश्वर पुन्हा पुन्हा आपला उध्दार करतो आणि
8 परमेश्वर इस्राएलला त्याच्या सर्व पापांबद्दल क्षमा करील.
योसेफ सापळा टाकतो
44 मग योसेफाने आपल्या कारभाऱ्याला आज्ञा देऊन म्हटले, “या लोकांच्या पोत्यात जेवढे अधिक धान्य मावेल व त्यांना देता येईल तेवढे भर; आणि त्या सोबत प्रत्येकाचे पैसेही त्या पोत्यात ठेव. 2 सर्वात धाकट्या भावाच्या पोत्यात पैशाबरोबर माझा विशेष चांदीचा प्यालाही ठेव.” त्याच्या कारभाऱ्याने त्याच्या आज्ञाप्रमाणे सर्वकाही केले.
3 दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी त्या भावांना त्यांच्या गाढवांसहित त्यांच्या देशाला रवाना करण्यात आले. 4 त्यांनी नगर सोडल्यानंतर थोडया वेळाने योसेफ आपल्या कारभऱ्यास म्हणाला, “जा आणि त्या लोकांचा पाठलाग कर आणि त्यांना थांबवून असे म्हण, ‘आम्ही तुमच्याशी भलेपणाने वागलो! असे असता तुम्ही आमच्याशी अशा वाईट रीतीने का वागला. तुम्ही माझ्या स्वामीचा चांदीचा प्याला का चोरल? 5 हा प्याला खास माझा धनी पिण्याकरिता वापरतात; गुप्त गोष्टी समजून घेण्यासाठी तो वापरतात. तसेच देवाला प्रश्न विचारण्याकरिता माझा धनी हया प्यालाचा उपयोग करतात. हा प्याला चोरुन तुम्ही फार वाईट केले आहे.’”
6 तेव्हा तो कारभारी स्वार होऊन व त्यांना गाठून योसेफाने आज्ञा केल्याप्रमाणे बोलला.
7 परंतु ते भाऊ कारभाऱ्याला म्हणाले, “स्वामी असे का बरे बोलतात? आम्ही कधीच अशा गोष्टी करीत नाही! 8 मागे आमच्या पोत्यात मिळालेले पैसे आम्ही आता येताना आठवणीने आणले; तेव्हा खात्रीने आपल्या स्वामीच्या घरातून आम्ही सोने किंवा चांदी चोरणार नाही. 9 या उपर आम्हापैकी कोणाच्या पोत्यात तुम्हाला जर तो चांदीचा प्याला मिळाला तर तो भाऊ मरेल; तुम्ही त्याला मारून टाकावे आणि मग आम्ही सर्वजण आमच्या स्वामीचे गुलाम होऊ.”
10 कारभारी म्हणाला, “ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण करु. जर मला चांदीचा प्याला मिळाला तर मग तो माणूस माझ्या धन्याचा गुलाम होईल; इतर जण जाण्यास मोकळे राहतील.”
सापळा उघडतो; वन्यामीन त्यात अडकतो
11 नंतर हर एक भावाने लगेच आपली गोणी जमिनीवर उतरुन उघडली. 12 कारभाऱ्याने थोरल्या भावापासून सुरवात करुन धाकटया भावाच्या गोणीपर्यंत तपासून पाहिले; तेव्हा त्याला बन्यामीनाच्या गोणीत तो चांदीचा प्याला मिळाला. 13 तेव्हा त्या भावांना भयंकर दु:ख झाले; अति दु:खामुळे त्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि आपल्या गोण्या गाढवांवर लादून ते परत नगरात आले.
14 यहूदा व त्याचे भाऊ परत योसेफाच्या घरी गेले. योसेफ अजून घरातच होता. त्या भावांनी योसेफापुढे लोटांगण घातले. 15 योसफ त्यांना म्हणाला, “तुम्ही असे का केले? मला शकून पाहून गुप्त समजण्याचे विशेष ज्ञान आहे हे तुम्हाला माहीत नाही का? आणि या बाबतीत माझ्यापेक्षा अधिक चांगले ज्ञान इतर कोणालाही नाही!”
16 यहूदा म्हणाला, “महाराज! आम्ही आता काहीच बोलू शकत नाही, व याचा उलगडा करण्याचा दुसरा मार्ग नाही. आम्ही अपराधी नाही हे पटविण्यास दुसरा कोणताच मार्ग नाही. आमच्या दुसऱ्या कोणत्यातरी अपराधाबद्दल देवाने आम्हाला दोषी ठरवले आहे. म्हणून आता बन्यामीनासकट आम्ही सर्वजण महाराजांचे गुलाम झालो आहोत.”
17 परंतु योसेफ म्हणाला, “मी तुम्हा सर्वजणांना गुलाम करणार नाही! फक्त ज्याने चांदीचा प्याला चोरला तोच माझा गुलाम होईल. बाकीचे तुम्ही शांतीने आपल्या बापाकडे जाऊ शकता.”
यहूदा बन्यामीनाकरिता विनवणी करतो
18 मग यहूदा योसेफाकडे जाऊन म्हणाला, “कृपा करुन माझ्यावर रागावू नका परंतु अगदी खरेपणाने व मोकळेपणाने मला आपल्याबरोबर बोलू द्या. आपण फारो राजासमान असून इतके अधिकार आपणाला आहेत हे मी जाणतो. 19 मागच्या वेळी आम्ही येथे असताना आपण आम्हाला विचारले, ‘तुम्हाला बाप किंवा भाऊ आहे का?’ 20 आणि आम्ही आपणास उत्तर दिले, ‘होय! आमचा बाप आहे, परंतु तो आता फार म्हातारा झाला आहे; तसेच आम्हाला एक धाकटा भाऊही आहे. आमच्या बापाच्या म्हातारपणी हा आमचा भाऊ जन्मला म्हणून आमच्या बापाचा त्याच्यावर फार जीव आहे; आणि त्याचा तरुण भाऊ मरण पावला; तेव्हा त्या दोघांच्या आईचा हा एकच मुलगा राहिला आहे; आणि म्हणूनच तो आमच्या बापाचा फार प्रिय व लाडका मुलगा आहे.’ 21 आपण म्हणाला, ‘मग त्या तुमच्या धाकटया भावाला माझ्याकडे घेऊन या; मला त्याला पाहावयाचे आहे.’ 22 आणि आम्ही आपणास म्हणालो, ‘तो धाकटा भाऊ येऊ शकणार नाही, कारण तो बापाला सोडून कोठे जात नाही, जर का बापापासून त्याची ताटातूट झाली तर मग आमचा बाप भयंकर दु:खी होईल व त्या दु:खाने तो मरुन जाईल.’ 23 परंतु आपण आम्हाला बजावून म्हणाला, ‘तुम्ही तुमच्या धाकटया भावला घेऊन आलेच पाहिजे नाही तर मी तुम्हाला पुन्हा धान्य विकणार नाही.’ 24 म्हणून मग आम्ही आमच्या बापाकडे परत गेलो व आपण जे बोलला ते त्याला सांगितले.
25 “काही दिवसानंतर आमचा बाप म्हणाला, ‘मुलांनो, पुन्हा जाऊन आपणासाठी धान्य विकत आणा.’ 26 आणि आम्ही म्हणालो, ‘आम्ही आमच्या धाकट्या भावाला बरोबर घेतल्याशिवाय जाणार नाही कारण तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे आणल्या खेरीज मी पुन्हा तुम्हाला धान्य विकणार नाही असे त्या प्रमुख अधिकाऱ्याने आम्हास बजावले आहे.’ 27 मग आमचा बाप आम्हाला म्हणाला, ‘मुलांनो, तुम्हाला माहीत आहे की माझी बायको राहेल हिच्या पोटी मला दोन मुलगे झाले; 28 आणि त्यातल्या एकाला मी पाहिले तो वन्यपशूद्वारे मारला गेला. पुन्हा तो कोणाच्या दष्टीस पडला नाही. 29 आणि आता माझ्या ह्या दुसऱ्या मुलाला तुम्ही माझ्यापासून घेऊन गेला आणि त्याला जर काही अपाय झाला तर मी भयंकर दु:खी होऊन मरुन जाईन.’ 30 तो मुलगा आमच्या बापाच्या आयुष्यात फार महत्वाचा आहे तेव्हा आता जर का आम्ही आमच्या धाकटया भावाशिवाय घरी गेलो आणि आमच्या बापाने हे पाहिले तर 31 आमचा धाकटा भाऊ आमच्या बरोबर नाही असे पाहून आमचा बाप नक्की मरुन जाईल; आणि आपल्या बापाला भयंकर दु:ख देऊन त्याच्या मरणास आम्ही कारण झालो हा दोष सतत आमच्या माथ्यावर राहील.
32 “हया धाकट्या भावाबद्दल मी माझ्या बापास जामीन राहिलो आहे. मी माझ्या बापास सांगितले, ‘जर मी माझ्या धाकट्या भावाला तुम्हाकडे परत घेऊन आलो नाही तर मग जन्मभर मी तुमचा दोषी राहीन.’ 33 तेव्हा महाराज, मी हात जोडूत तुमची काकूळतीने विनवणी करतो; तुम्हापाशी भिक्षा मागतो, त्या घाकट्या मुलाला त्याच्या भावांबरोबर परत जाऊ द्या. मी येथे राहातो आणि तुमचा गुलाम होतो माझे स्वामी! 34 आणि त्या धाकटया भावशिवाय माझ्या बापाकडे माघारी जाण्याची माझ्यात हिंमत नाही! माझ्या बापाचे काय होईल याची मला भयंकर भीती वाटते, हो स्वामी!”
13 तर तुम्ही जे यहूदी नाही त्यांना मी निश्चितपणे सांगतो कारण मी यहूदीतरांसाठी प्रेषित आहे. मी माझ्या सेवेला मान देतो. 14 या आशेने की, माझ्या हाडामांसातल्यांना ईष्योवान करुन त्यांच्यातील काही जणांचे तारण करावे. 15 जर देवाने त्यांच्या केलेल्या अव्हेराचा परिणाम जगासाठी समेट झाला. तर देवाकडून स्वीकार याचा अर्थ मेलेल्यांतून जिवंत होणे, नाही का? 16 जर प्रथम भाग पवित्र आहे, तर संपूर्ण पिठाचा गोळा पवित्र आहे. जर झाडाचे मूळ पवित्र आहे तर फांद्यासुद्धा पवित्र आहेत.
17 परंतु काही डहाळ्या तोडून टाकण्यात आल्या आणि तुम्ही रानटी जैतून असता कलम करुन लावले गेलात व जैतूनाच्या पौष्टिक मुळाचे भागीदार झालात. 18 तर तुम्ही त्या तोडलेल्या फांद्यांहून मोठे आहात अशी बढाई मारु नका. लक्षात ठेवा, तुम्ही मुळाला आधार देत नाही, तर मूळ तुमचे पोषण करते. 19 आता तुम्ही म्हणाल, “होय, आमचे कलम व्हावे यासाठीच फांद्या तोडल्या होत्या.” 20 त्या त्यांच्या अविश्वासामुळे तोडून टाकण्यात आल्या हे खरे आहे परंतु तुम्ही तुमच्या विश्वासामुळे स्थिर आहात. यास्तव अभिमान बाळगू नका. तर भीति बाळगा. 21 कारण देवाने जर मूळ फांद्याही राखल्या नाहीत तर तो तुम्हांलाही राखणार नाही.
22 अशा प्रकारे तुम्ही देवाचा दयाळूपणा आणि कठोरताही पाहा. जे पतन पावले आहेत त्यांच्याविषयी कठोरता परंतु देवाचा तुमच्याविषयीचा दयाळूपणा, जर तुम्ही त्याच्या दयेत राहिला नाहीत तर तुम्हांला झाडापासून छाटून टाकले जाईल. 23 आणि इस्राएल त्याच्या अविश्वासात राहीले नाही तर तेही कलम पुन्हा लावण्यात येईल. कारण देव त्यांना कलम म्हणून लावण्यास समर्थ आहे. 24 म्हणून तुम्ही जे निसर्गत; रानटी जैतुनांची फांदी म्हणून तोडले गेलात आणि निसर्गक्रम सोडून मशागत केलेल्या जैतुनाच्या झाडास कलम असे लावले गेलात तर किती सहजपणे मशागत केलेल्या जैतुनांच्या फांद्या त्या मूळच्या झाडात कलम केल्या जातील!
25 परंतु बंधूनो, तुम्ही आपल्या शहाणपणावर अवलंबून या रहस्याविषयी अजाण असावे असे मला वाटत नाही. इस्राएली लोकांत अंशतः कठीणपणा आला आहे आणि तो देवाच्या कुटुंबात विदेशी लोकांचा भरणा पूर्ण होईपर्यंत राहणार आहे. 26 आणि नंतर इस्राएलाचे राष्ट्र म्हणून तारण होईल, असे लिहीले आहे,
“मुक्त करणारा सीयोनातून येईल,
तो याकोबाच्या घराण्यातून त्यांची सर्व अभक्ती दूर करील.
27 जेव्हा मी त्यांच्या पातकांची क्षमा करीन.
तेव्हा त्यांच्याशी मी हा करार करीन.” (A)
28 जेथ पर्यंत सुवार्तेचा संबंध आहे ते तुमच्यामुळे शत्रू आहेत परंतु देवाच्या निवडीमुळे त्याने पूर्वजांना दिलेल्या वचनाप्रमाणे देव त्यांच्यावर प्रेम करतो. 29 कारण देवाने ज्यांना बोलाविले आहे आणि तो जे देतो त्याच्याविषयी कधीही आपले मत बदलत नाही.
2006 by World Bible Translation Center