Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 130

वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र

130 परमेश्वरा, मी खूप मोठ्या संकटात आहे
    म्हणून मी तुला मदतीसाठी हाक मारीत आहे.
माझ्या प्रभु, माझ्याकडे लक्ष दे.
    माझ्या मदतीच्या हाकेला ओ दे.
परमेश्वरा, तू जर लोकांना खरोखरच त्यांच्यासगळ्या
    पापांबद्दल शिक्षा केलीस तर कुणीही माणूस जिवंत राहाणार नाही.
परमेश्वरा, तुझ्या माणसांना क्षमा कर.
    म्हणजे मग तुझी उपासना करण्यासाठी लोक असतील.

मी मदतीसाठी परमेश्वराची वाट पाहतो आहे.
    माझा आत्मा त्याची वाट बघत आहे.
    परमेश्वर जे सांगतो त्यावर माझा विश्वास आहे.
मी माझ्या प्रभुची वाट बघत आहे.
    मी सकाळ होण्याची खूप वाट पाहात असलेल्या रक्षकांसारखा आहे.
इस्राएल, परमेश्वरावर विश्वास ठेव.
    केवळ परमेश्वराजवळच खरे प्रेम मिळते.
परमेश्वर पुन्हा पुन्हा आपला उध्दार करतो आणि
    परमेश्वर इस्राएलला त्याच्या सर्व पापांबद्दल क्षमा करील.

उत्पत्ति 43

याकोब बन्यामीनाला मिसरला देण्यास कबूल होतो

43 त्याकाळी कनान देशात फारच तीव्र दुष्काळ पडला होता. याकोबाच्या मुलांनी मिसरहून आणलेले सगळे धान्य घरातील माणसांनी खाऊन संपल्यावर याकोब आपल्या मुलांना म्हणाला, “तुम्ही पुन्हा मिसरला जा व आपल्याला खाण्यासाठी आणखी धान्य विकत आणा.”

परंतु यहूदा याकोबास म्हणाला, “त्या देशाच्या प्रमुख अधिकाऱ्याने आम्हाला ताकीद दिली; तो म्हणाला, ‘तुम्ही जर तुमच्या धाकटया भावाला तुमच्या बरोबर माझ्याकडे आणले नाही तर मी तुमच्याशी बोलणार देखील नाहीं.’ तेव्हा तुम्ही बन्यामीनाला आमच्याबरोबर पाठवत असाल तरच आम्ही जाऊन धान्य आणू. पण तुम्ही बन्यामीनाला पाठवणार नाही तर मग आम्ही धान्य आणावयास जाणार नाही. तुमच्या धाकटया भावाशिवाय तुम्ही परत मागे येऊ नका असे त्या आधिकाऱ्याने आम्हास बजावून सांगितले आहे.”

इस्राएल (याकोब) म्हणाला, “पण तुम्हाला आणखी एक भाऊ आहे असे त्या प्रमुख अधिकाऱ्याला तुम्ही का सांगितले? आणि त्यामुळे तुम्ही मला पेचात का पाडले?”

त्या भावांनी उत्तर दिले, “त्या प्रमुख अधिकाऱ्याने आम्हा सर्वाविषयी काळजी व चिंता दाखवून मोठया प्रेमाने व कळकळीने आपल्या घरच्या सर्वांविषयी विचारपूस केली, कारण त्याला आपल्या घरच्या सर्वांविषयी माहिती करुन घ्यावयास पाहिजे होती. त्याने आम्हाला विचारले, ‘तुमचा बाप अजून जिवंत आहे का? तुमचा एखादा भाऊ सध्या घरी आहे का?’ आम्ही तर नुसती त्याच्या प्रश्नांची उत्तरे दिली. आम्हाला काय माहीत की तो आमच्या भावाला त्याच्याकडे घेऊन यावयास सांगेल म्हणून.”

मग यहुदा आपल्या बापाला म्हणाला, “बाबा बन्यामीनाला माझ्याबरोबर पाठवा. मी त्याची सगळी काळजी घेईन, कारण आम्हाला धान्य आणावयास मिसराला गेलेच पाहिजे; नाही तर आपण सर्व आपल्या मुलाबाळांसकट मरुन जाऊ. त्याच्या सुरक्षिततेची हमी मी घेतो; तसेच त्याची सगळी जबाबदारीही मी घेतो. मी जर त्याला परत माघारी आणू शकलो नाही तर मग तुम्ही मला जन्माचा दोषी ठरवा. 10 तुम्ही आम्हाला अगोदरच जाऊ दिले असते तर आतापर्यंत धान्य आणण्याच्या आमच्या दोन फेऱ्या झाल्या असत्या.”

11 मग त्यांचा बाप इस्राएल म्हणाला, “हे जर अगदी खरे असेल तर मग तुम्ही बन्यामीनाला तुमच्याबरोबर घेऊन जा; परंतु त्या प्रमुख अधिकाऱ्याकरिता आपल्या देशातून आपण मिळवलेल्या काही किंमती वस्तू, काही पदार्थ म्हणजे थोडा मध, पिस्ते, बादाम, डिंक, गंधरस वगैरे देणग्या भेट म्हणून घेऊन जा. 12 यावेळी दुप्पटीपेक्षा पैसा बरोबर न्या. मागच्यावेळी तुम्ही दिलेला जो पैसा तुमच्या गोण्यामधून परत आला तोही परत घेऊन जा; कारण कदाचित त्या अधिकाऱ्याकडून काही चूक झाली असेल. 13 बन्यामीनाला घेऊन त्या अधिकाऱ्याकडे परत जा. 14 त्या अधिकाऱ्यापुढे तुम्ही जाऊन उभे राहाल तेव्हा सर्व समर्थ देव तुम्हाला सहाय्य करो अशी मी प्रार्थना करतो; तसेच तो बन्यामीनाला व शिमोनाला सुखरुपपणे परत मागे पाठवो यासाठी ही देवाची प्रार्थना करतो. असे घडले नाही तर मग माझ्या मुलांना गमावल्याबद्दल मी शोक करीन.”

15 अशा रीतीने त्या भावांनी प्रमुख अधिकाऱ्याकरिता भेट वस्तू घेतल्या व पहिल्यावेळी घेतले होते त्याच्या दुप्पट पैसे यावेळी संगती घेतले बन्यामीनाला घेऊन ते मिसर देशाला रवाना झाले.

त्या भावांना योसेफाच्या घरी जाण्याचे निमंत्रण दिले जाते

16 मिसरमध्ये त्या भावांच्याबरोबर योसेफाने बन्यामीनास पाहिले; तेव्हा योसेफ आपल्या कारभाऱ्यास म्हणाला, “या लोकांना माझ्या घरी आण. एक चांगला पोसलेला पशू मारुन भोजन तयार कर, कारण हे सर्वजण दुपारी माझ्याबरोबर भोजन करतील.” 17 तेव्हा त्या कारभाऱ्याने त्याला सांगितल्याप्रमाणे भोजनाची सर्व तयारी केली. नंतर त्याने त्या सर्व भावांना योसेफाच्या घरी नेले.

18 योसेफाच्या घरी नेल्यावर ते भाऊ फार घाबरले. ते म्हणाले, “मागच्या वेळी आपल्या पोत्यात आपण दिलेले पैसे परत ठेवण्यात आले म्हणून आपणास येथे आणले आहे, त्यावरुन आपणास दोषी ठरवून ते आपली गाढवे घेतील व आपल्याला गुलाम करतील असे वाटते.”

19 म्हणून मग ते भाऊ योसेफाच्या कारभाऱ्याकडे गेले. 20 ते म्हणाले, “महाराज, आम्ही शपथ घेऊन खरे तेच सांगतो; मागच्या वेळी आम्ही धान्य खरेदी करण्यासाठीच आलो होतो. 21-22 आम्ही घरी परत जाताना एका मुक्कामाच्या ठिकाणी आमची पोती उघडली तेव्हा आमच्या पोत्यात पैसे कसे आले हे आम्हाला माहीत नाही. परंतु ते सगळे पैसे तुम्हाला परत देण्यासाठी आम्ही आमच्या सोबत आणले आहेत; आणि आता यावेळी आणखी धान्य विकत घेण्यासाठी अधिक पैसे आणले आहेत.”

23 परंतु योसेफाच्या घरच्या कारभाऱ्याने उत्तर दिले, “भिऊ नका; माझ्यावर विश्वास ठेवा; तुमच्या व तुमच्या पित्याच्या देवाने तुमच्या पोत्यात देणगी म्हणून ते पैसे ठेवले असतील. मागच्या खेपेच्या धान्याचे पैसे तुम्ही मला दिले याची मला पक्की आठवण आहे.”

नंतर त्या कारभाऱ्याने शिमोनाला तुरुंगातून सोडवून घरी आणले. 24 मग त्या कारभाऱ्याने त्या भावांना योसेफाच्या घरी आणले; त्याने त्यांना पाय धुण्यासाठी पाणी दिले व त्यांनी पाय धुतले. मग त्याने त्यांच्या गाढवांस वैरण दिले. 25 आपण योसेफासोबत भोजन करणार आहो हे त्या भावांना समजले. तेव्हा त्यांनी दुपारपर्यंत काम करुन योसेफाला देण्याच्या भेटीची तयारी केली.

26 योसेफ घरी आला तेव्हा त्या भावांनी त्याच्यासाठी आपल्या सोबत आणलेली भेट अर्पण केली व त्यांनी त्याला भूमिपर्यंत लवून मुजरा केला.

27 मग योसेफाने ते सर्व बरे खुशाल आहेत ना, याची विचारपूस केली. तो म्हणाला, “तुमचे म्हातारे वडील, ज्यांच्याबद्दल तुम्ही मागे मला सांगितले, ते बरे आहेत का? ते अजून जिवंत आहेत ना!”?

28 त्या भावांनी उत्तर दिले, “होय महाराज! आमचे वडील सुखरुप आहेत; ते अजून जिवंत आहेत.” आणि त्यांनी पुन्हा लवून नमन केले.

29 मग योसेफाने आपला सख्खा भाऊ बन्यामीन यास पाहिले. (योसेफ व बन्यामीन यांची आई एकच होती) तो म्हणाला, “तुम्ही मला ज्याच्याविषयी सांगितले तो हाच का तुमचा भाऊ?” नंतर योसेफ बन्यामीनास म्हणाला, “मुला! देव तुझ्यावर कृपा करो!”

30 मग योसेफ घाईघाईने खोली बाहेर निघून गेला. आपला प्रिय भाऊ बन्यामीन याला प्रेमाने घट्ट मिठी मारावी असे त्याला फार वाटले आणि त्याला खूप रडू आले; म्हणून गुपचूप तो आपल्या खोलीत गेला व खूप रडला. 31 मग तोंड धुऊन तो परत आला; मग स्वतःस सावरुन तो म्हणाला, “आता आपण भोजनास बसू या.”

32 योसेफ एकटाच एका मेजावर बसला होता. त्याचे भाऊ दुसऱ्या मेजावर एकत्र बसले; मिसरचे लोक आणखी दुसऱ्या मेजावर बसले कारण इब्री लोकांबरोबर जेवणे चुकीचे आहे असे ते मानीत. 33 योसेफाचे भाऊ त्याच्या समोरील मेजावर बसले. त्यांच्या बसण्याची व्यवस्था त्यांच्या ज्येष्ठतेप्रमाणे केली असल्यामुळे ते चकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले. 34 वाढपी, योसेफाच्या पुढच्या मेजावरील पक्वान्ने घेऊन त्यांना वाढीत होते; परंतु त्यांनी बन्यामीनास इतरापेक्षा पांचपट अधिक वाढले. ते सर्व भाऊ योसेफाबरोबर भरपूर जेवले व मनमुराद प्यायले.

प्रेषितांचीं कृत्यें 15:1-21

यरुशलेम येथील सभा

15 मग काही माणसे यहूदीया प्रांतातून अंत्युखियास आली. ती बंधुजनांना (यहूदीतर) शिक्षण देऊ लागली: “तुमची सुंता झालेली नसेल तर तुमचे तारण होणार नाही. मोशेने आम्हांला हे करायला शिकविले.” पौल व बर्णबा या शिक्षणाविरुद्ध होते. या विषयावर त्या लोकांशी पौलाने व बर्णबाने वाद घातला, म्हणून लोकांनी असे ठरविले की, पौल, बर्णबा व इतर काही जणांना यरुशलेमला पाठवायचे. हे लोक त्या ठिकाणी प्रेषित व वडीलजनांशी या विषयावर अधिक बोलण्यासाठी गेले.

मंडळीने त्यांना प्रवासास जाण्यासाठी मदत केली. हे लोक फेनीके व शोमरोन प्रांतातून जात असता यहूदीतर विदेशी लोक देवाकडे कसे वळले, याविषयी सविस्तर हकीगत त्यांनी तेथील बंधुवर्गाला सांगितली. त्यामुळे ते फार आनंदित झाले. ते जेव्हा यरुशलेमला पोहोंचले तेव्हा तेथील ख्रिस्ती मंडळी, प्रेषित आणि वडीलजन यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी पौल व बर्णबा यांनी आपल्या हातून देवाने जे काम करुन घेतले त्याविषयी सविस्तर सांगितले. परुशी गटातील काही विश्वासणारे उभे राहीले आणि म्हणाले, “यहूदीतर विश्वासणाऱ्यांची सुंता झालीच पाहिजे. तसेच आपण त्यांना मोशेचे नियम पाळण्याविषयी शिकविले पाहिजे!”

मग प्रेषित आणि वडीलजन या समस्येचा अभ्यास करण्यासाठी एकत्र जमले. त्यावर प्रदीर्घ चर्चा झाली. मग पेत्र उभा राहिला. आणि त्यांना म्हणाला, “माझ्या बंधूनो मला माहीत आहे, सुरुवातीला जे काही घडले, ते तुमच्या आठवणीत आहे. जे यहूदी नाहीत, त्या लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी तुमच्यामधून देवाने माझी निवड केली. यासाठी की, त्यांनीही विश्वास धरावा. देव सर्वांचे विचार जाणतो, आणि त्याने या यहूदीतर लोकांचा स्वीकार केला आहे. देवाने जसा आम्हांला पवित्र आत्मा दिला, तसाच त्यांनाही देऊन त्याने हे आम्हांस दाखवूत दिले. देवाच्या दृष्टीने ते लोक आपल्यापेक्षा वेगळे नाहीत. जेव्हा त्यांनी विश्वास ठेवला, तेव्हा त्याने त्यांची ह्रदये शुद्ध केली. 10 मग आता यहूदीतर लोकांच्या मानेवर जड जू तुम्ही का ठेवीत आहात? तुम्ही देवाला राग आणीत आहात काय? आपण व आपले वाडवडील (पूर्वज) हे ओझे वाहण्याइतके सशक्त नव्हतो. 11 आम्ही असा विश्वास धरतो की, आम्ही आणि हे लोक प्रभु येशूच्या कृपेमुळे तारले जाणार आहोत.”

12 मग सगळे लोक शांत झाले, ते पौल व बर्णबाचे बोलणे ऐकू लागले. पौलाने व बर्णबाने लोकांना सांगितले की, देवाने त्यांच्याद्वारे यहूदीतर लोकांमध्ये चमत्कार व अदभूत कृत्ये केली. 13 पौलाने व बर्णबाने आपले बोलणे संपविले. मग याकोब बोलला. तो म्हणाला, “माझ्या बंधूनो, माझे ऐका. 14 शिमोन (पेत्र) याने यहूदीतर लोकांना देवाने आपले प्रेम कसे दाखविले ते सांगितले. पहिल्यांदाच देवाने यहूदीतर लोकांना स्वीकारले. आणि त्यांना आपले लोक बनविले. 15 संदेष्टेयांच्या शब्दांनी सुद्धा याला सहमती दर्शविली:

16 ‘मी (देव) यानंतर परत येईन
    मी दाविदाचे घर पुन्हा बांधीन
    ते पडलेले आहे
त्याच्या घराचे पडलेले भाग मी पुन्हा बांधीन
    मी त्याचे घर नवे करीन
17 मग इतर सर्व लोक देवाचा शोध करतील
    सर्व यहूदीतर लोकसुद्धा माझे लोक आहेत असे मी मानतो.
प्रभु (देव) असे म्हणाला,
    व हे करणारा तोच आहे.’ (A)

18 ‘या सर्व गोष्टी सुरुवातीपासूनच माहीत आहेत.’

19 “म्हणून मला वाटते जे यहूदीतर बंधु देवाकडे वळले आहेत, त्याना आपण तसदी देऊ नये. 20 त्याऐवजी आपण त्यांना एक पत्र लिहू या. आपण त्यांना या गोष्टी सांगू:

मूर्तिपुढे ठेवलेले अन्न खाऊ नका.

    (त्यामुळे अन्न अशुद्ध होते)

कोणत्याही प्रकारचे अनैतिक पाप करु नका.

रक्त चाखू नका गुदमरुन मारलेले प्राणी खाऊ नका.

21 त्यांनी या गोष्टी करु नयेत, कारण अजूनसुद्धा प्रत्येक शहारात यहूदी लोक आहेत जे मोशेचे नियम शिकवितात. बऱ्याच वर्षांपासून दर शब्बाथ दिवशी सभास्थानातून मोशेचे नियम वाचण्यात येतात.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center