Revised Common Lectionary (Semicontinuous)
योसेफ ओळख देतो
45 आता मात्र अधिक वेळपर्यंत योसेफाला आपले दु:ख रोखून धरता येईना. तेव्हा तेथे हजर असलेल्या सर्व लोकां देखत तो मोठ मोठयाने रडू लागला. तो म्हणाला, “येथील इतर सर्व लोकांना येथून निघून जाण्यास सांगा.” तेव्हा तेथील सर्वजण निघून गेले; केवळ त्याचे भाऊच त्याच्यापाशी राहिले; मग योसेफाने आपली ओळख दिली. 2 तो एकसारखा रडत होता. फारोच्या वाडयातील मिसरच्या लोकांनी व फारोच्या घराण्यातील लोकांनीही त्याचे रडणे ऐकले. 3 मग योसेफ हूंदके देत आपल्या भावांना म्हणाला, “प्रिय भावांनो! तुमचा भाऊ योसेफ-मीच आहे!” मग गहिंवर आवरुन योसेफ पुढे म्हणाला, “माझा बाप खुशाल आहे ना!” परंतु त्याचे भाऊ आश्चर्याने चकित झाले; ते एवढे घाबरले व गोंधळले की त्यांच्या तोंडून शब्द फुटेना!
4 तेव्हा योसेफ आपल्या भावांना पुन्हा म्हणाला, “जरा इकडे माझ्याकडे या; कृपा करुन माझ्याजवळ या अशी मी विनंती करतो.” तेव्हा त्याचे भाऊ त्याच्या जवळ गेले; आणि योसेफ त्यांना म्हणाला, “तुमचा भाऊ योसेफ मीच आहे; होय! ज्या भावाला तुम्ही मिसरच्या लोकांना गुलाम म्हणून विकले तो योसेफ मीच आहे. 5 आता त्याविषयी काही चिंता व काळजी करु नका; किंवा तुम्ही जे केले त्याबद्दल आपल्याला संताप करुन घेऊ नका; मी येथे यावे व त्यामुळे आपणा सर्वांचे प्राण वाचावेत ही देवाचीच योजना होती. 6 हा भयंकर दुष्काळ आता दोन वर्षे पडला आहे आणि आणखी पाच वर्षे पेरणी किंवा कापणी होणार नाही. 7 अशारीतीने या देशात मी अगोदर येऊन तुमच्यासर्वांचे प्राण वाचावेत म्हणून देवाने मला तुमच्या आधी येथे पाठवले आहे. 8 मला येथे पाठवण्यात तुमचा दोष नव्हता तर ही देवाची योजना होती. देवाने मला फारोच्या बापासमान केले आहे; त्यामुळे मी फारोच्या घरदाराचा स्वामी आणि सर्व मिसर देशाचा प्रशासक झालो आहे.”
इस्राएलास मिसरला जाण्याचे निमंत्रण येते
9 योसेफ म्हणाला, “तर आता तोबडतोब माझ्या बापाकडे जाण्यास निघा; माझ्या बापाला सांगा की तुमचा मुलगा योसेफ याने तुम्हाला येणे प्रमाणे संदेश पाठवला आहे.” देवाने मला अवघ्या मिसर देशाचा प्रशासक म्हणजे अधिपति केले आहे. तर आता वेळ न दवडता माझ्याकडे निघून या. 10 तुम्ही माझ्या जवळ गोशेन प्रांतात राहा; तुम्ही, तुमची मुले, नातवंडे तसेच तुमची शेरडेमेंढरे, गुरेढोरे असा तुम्हां सर्वांचे मी स्वगात करतो. 11 येणाऱ्या दुष्काळाच्या पाच वर्षात मी तुमची सर्व प्रकारची काळजी घेईन त्यामुळे तुम्हावर व तुमच्या कुटुंबावर सर्व काही गमावण्याची वेळ येणार नाही.
12 योसेफ आपल्या भावांशी बोलतच राहिला. तो म्हणाला, “मी योसेफच आहे याची आता तुम्हाला खात्री पटली असेल; तुमचा भाऊ बन्यामीन याला खात्री पटली आहे; त्याने मला ओळखले आहे; आणि तुमच्याशी बोलणारा मी खरोखर योसेफच आहे. 13 तेव्हा मिसर देशातील माझी धनदौलत व माझे वैभव आणि तुम्ही येथे जे जे पाहिले आहे त्या संबंधी माझ्या बापाला सांगा; आता लवकर जाऊन माझ्या बापाला माझ्याकडे घेऊन या.” 14 मग योसेफ आपला धाकटा भाऊ बन्यामीन याला मिठी मारुन रडला; आणि बन्यामीनही त्याच्या खांद्यावर डोके ठेऊन रडला. 15 मग योसेफाने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली व त्यांचे मुके घेतले आणि तो रडला; यानंतर त्याचे भाऊ त्याज बरोबर बोलू लागले.
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे दावीदाचे स्तोत्र.
133 जेव्हा देवाचे लोक शांततेने एकत्र नांदतात,
तेव्हा ते खरोखरच खूप चांगले आणि आल्हाददायक असते.
2 ते गोड वास असलेल्या, याजकाच्या डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे,
अहरोनाच्या दाढीतून ओघळणाऱ्या तेलासारखे,
अहरोनाच्या खासकपड्यातून ओघळणाऱ्या तेलासारखे वाटते.
3 हर्मोन पर्वतावरुन सियोनवर पडणाऱ्या हळूवार पावसासारखे वाटते.
सियोन पर्वतावरच परमेश्वराने त्याचे आशीर्वाद, त्याचे शाश्वत जीवनाचे आशीर्वाद दिले.
देव त्याच्या लोकांना विसरला नाही
11 तर मग मी म्हणतो, “देवाने आपल्या लोकांना सोडून दिले आहे काय?” खात्रीने नाही! कारण मीही इस्राएली आहे. अब्राहामापासूनचा, बन्यामिन वंशातला. 2 देवाला ज्यांचे पूर्वज्ञान होते त्या इस्राएली लोकांना त्याने सोडून दिले नाही. एलियासंबंधी पवित्र शास्त्र काय म्हणते ते तुम्हांस ठाऊक नाही काय? तो देवाजवळ इस्राएल लोकांविरुद्ध अशी विनंति करतो की,
29 कारण देवाने ज्यांना बोलाविले आहे आणि तो जे देतो त्याच्याविषयी कधीही आपले मत बदलत नाही. 30 कारण जसे तुम्ही पूर्वी देवाची आज्ञा पाळत नव्हता, परंतु आता तुम्हांला त्यांच्या आज्ञाभंगामुळे देवाची दया मिळाली आहे. 31 त्याचप्रमाणे तेही आता आज्ञा मोडणारे झाले आहेत, यासाठी की त्यांना आता देवाची कृपा मिळावी. 32 कारण देवाने सर्व लोकांना आज्ञाभंगाच्या तरुंगात कोंडले आहे, यासाठी की, त्याने त्यांच्यावर दया करावी.
10 तेव्हा लोकांना जवळ बोलावून त्याने म्हटले, “ऐका व समजून घ्या. 11 जे तोंडाद्वारे आत जाते ते माणसाला अशुद्ध करीत नाही, पण जे तोंडातून बाहेर निघते तेच माणसाला अशुद्ध करते.”
12 नंतर शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, “परूश्यांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा ते रागावले हे आपणांला कळते काय?”
13 पण त्याने उत्तर देऊन म्हटले, “प्रत्येक रोपटे जे माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही ते उपटले जाईल. 14 त्यांना जाऊ द्या. ते आंधळे वाटाडे आहेत. जर एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्याचा प्रयत्न केला तर दोघेही खड्ड्यात पडतील.”
15 पेत्र म्हणाला, “आमच्यासाठी या बोधकथचे स्पष्टीकरण करा.”
16 “तुम्ही अजूनही बुद्धिमंदच आहेत काय?” येशूने त्यांना विचारले. 17 “जे काही तोंडात जाते ते सर्व पोटात जाते व मग बाहेर टाकले जाते. हे तुम्हांला अजून समजत नाही काय? 18 परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंतःकरणातून येतात व त्याच माणसाला डागाळतात. 19 कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंतःकरणातून बाहेर निघतात. 20 माणसाला डागाळणाऱ्या याच गोष्टी आहेत न धुतलेल्या हाताने खाण्याने माणसाला विटाळ होत नाही.”
येशू यहूदी नसलेल्या स्त्रीला मदत करतो(A)
21 नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोनच्या भागात गेला. 22 तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागातून येशूकडे आली. ती स्त्री ओरडून म्हणाली, “प्रभु, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भुताने पछाडली आहे.”
23 पण येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही, तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्याला विनंति केली, “तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे.”
24 पण येशूने उत्तर दिले, “मला देवाने फक्त इस्राएलाच्या हरवलेल्या मेढरांकडे पाठविले आहे.”
25 मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली, ती येशूच्या पाया पडली व म्हणाली, “प्रभु, माझे साहाय्य करा.”
26 परंतु त्याने म्हटले, “मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे बरे नाही.”
27 ती स्त्री म्हणाली, “होय प्रभु, परंतु कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेले उष्टे चूर खातात.”
28 तेव्हा येशूने तिला म्हटले, “बाई, तुझा विश्वास मोठा आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तुला होवो.” आणी तिची मुलगी बरी झाली.
2006 by World Bible Translation Center