Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे दावीदाचे स्तोत्र.
133 जेव्हा देवाचे लोक शांततेने एकत्र नांदतात,
तेव्हा ते खरोखरच खूप चांगले आणि आल्हाददायक असते.
2 ते गोड वास असलेल्या, याजकाच्या डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे,
अहरोनाच्या दाढीतून ओघळणाऱ्या तेलासारखे,
अहरोनाच्या खासकपड्यातून ओघळणाऱ्या तेलासारखे वाटते.
3 हर्मोन पर्वतावरुन सियोनवर पडणाऱ्या हळूवार पावसासारखे वाटते.
सियोन पर्वतावरच परमेश्वराने त्याचे आशीर्वाद, त्याचे शाश्वत जीवनाचे आशीर्वाद दिले.
37 फारो राजाला ही कल्पना फार चांगली वाटली व पटली; तसेच त्याच्या सर्व सेवकांनी एकमताने तिला संमती दिली. 38 फारोने म्हटले, “योसेफापेक्षा अधिक चांगला व योग्य, दुसरा कोणी पुरुष सापडेल काय? देवाचा आत्मा त्याच्यात असल्यामुळे त्याला शहाणपण येते!”
39 तेव्हा फारो योसेफास म्हणाला, “देवाने तुला या सर्व गोष्टी दाखवल्या आहेत, म्हणून तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. 40 म्हणून मी तुला या देशाचा (मिसरचा) अधिपती म्हणजे सर्वात उच्च अधिकारी म्हणून नेमतो. सर्व लोक तुझ्या सर्व आज्ञा पाळितील; या देशात केवळ राजासना पुरता म्हणजे नामधारी राजा म्हणून काय तो मी एक तुझ्यापेक्षा मोठा असेन.”
41 मग फारो योसेफास म्हणाला, “मी तुला आता अवघ्या मिसर देशाचा प्रशासक म्हणून नेमितो.” 42 मग फारोने राजमुद्रा असलेली आपल्या बोटातील अंगठी योसेफाच्या बोटात घातली; तलम तागाच्या वस्त्राचा पोशाख त्याला घातला आणि त्याच्या गाळ्यात एक सोन्याची साखळी घातली. 43 नंतर फारोने योसेफाला संचलनातील दुसऱ्या रथात बसण्यास सांगितले; खास नेमलेले गारदी पुढे चालले होते; ते ललकारून जाहीरपणे सांगत होते, “लोक हो! आपल्या देशाच्या प्रशासक योसेफ, याला लवून मुजरा करा.” अशी रीतीने योसेफाला मिसर देशाचा प्रशासक (प्रमुख अधिकारी) नेमले.
44 फारो योसेफाला म्हणाला, “मी मिसराचा राजा आहे खरा, परंतु तुझ्या हुकुमाशिवाय कोणी आपला हात किंवा पाय हलवू शकणार नाहीं.” 45 फारोने योसेफाला सापनाथ-पानेह असे दुसरे नाव दिले. फारोने ओन शहराचा याजक पेटीफरा याची मुलगी आसनथ ही योसेफाला बायको करुन दिली. अशा रीतीने योसेफ सर्व मिसर देशावर प्रशासक झाला.
46 योसेफ मिसर देशाचा राजा फारो याची सेवा करु लागला तेव्हा तो अवघा तीस वर्षांचा होता; योसेफाने मिसर देशभर दौरा करुन देशाची पाहणी केली. 47 सुकाळाच्या सात वर्षात सर्व देशभर भरपूर पीक आले. 48 योसेफाने सुकाळाच्या सात वर्षात अन्न गोळा करुन त्या त्या शेतातले धान्य जवळच्याच नगरोनगरी साठवून ठेवले. 49 योसेफाने जणू काय समुद्राच्या वाळू इतके धान्य गोळा करुन साठवून ठेवले; ते इतके होते की त्याचे मोजमाप करता येत नव्हते.
50 योसेफाची बायको ही ओन नगराचा याजक पोटीफरा याची मुलगी होती. दुष्काळाच्या सात वर्षांपैकी पहिले वर्ष येण्याअगोदर योसेफ व आसनथ यांना दोन मुलगे झाले. 51 पहिल्या मुलाचे नाव मनश्शे होते; योसेफाने त्याला हे नांव दिले कारण तो म्हणाला, “देवाने मला झालेला त्रास व माझ्यावर झालेला अन्याय, तसेच माझ्या घराकडील सर्व काही यांचा मला विसर पडू दिला.” 52 योसेफाने दुसऱ्या मुलाचे नाव एफ्राईम असे ठेवले कारण तो म्हणाला, “माझ्यावर संकटे आली परंतु देवाने मला सर्व बाबतीत सफल केले.”
दुष्काळ पडण्यास सुरवात होते
53 सात वर्षापर्यंत मिसरमध्ये भरपूर अन्न होते पण ती वर्षे संपली. 54 परंतु सात वर्षानंतर अगदी योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली; तेव्हा कोणत्याच देशात कोठेही कसलेच पीक आले नाही; आणि लोकांना खावयास धान्य मिळेना; परंतु मिसरमध्ये मात्र योसेफाने धान्य साठवल्यामुळे लोकांपाशी खावयास भरपूर अन्न होते. 55 दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली, तेव्हा लोकांनी धान्यासाठी फारोकडे ओरड केली; तेव्हा फारो मिसरच्या लोकांना म्हणाला, “योसेफाला विचारा व तो सांगेल ते करा.”
56 तेव्हा चोहीकडे दुष्काळ पडल्यावर योसेफाने मिसरच्या लोकांना धान्य भांडारातून धान्य विकत दिले. मिसरमध्ये फार वाईट प्रकारचा दुष्काळ पडला होत. 57 मिसरच्या सभोवतालच्या देशातून लोक धान्य विकत घेण्यासाठी योसेफाकडे येऊ लागले कारण त्यावेळी जगाच्या त्या भागात दुष्काळ पडला होता.
19 नंतर अंत्युखिया व इकुन्या येथील काही यहूदी लोक तेथे आले. त्यांनी लोकसमुदायाची मने आपल्या बाजूस वळविली, आणि पौलाला दगडमार केला. त्यात पौल मेला असे समजून त्यांनी त्याला ओढत नेऊन नगराबाहेर टाकले. 20 येशूचे शिष्य पौलाभोवती जमा झाले मग पौल उठून परत शहरात गेला व दुसऱ्या दिवशी ते दोघे दर्बेला गेले.
सिरीयातील अंत्युखियाला परत येणे
21 आणि त्या नगरात त्यांनी सुवार्ता सांगून अनेक लोकांना शिष्य केले. त्यानंतर ते लुस्त्र, इकुन्या आणि अंत्युखिया नगरांना परत आले. 22 आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले. त्यांनी आपल्या विश्वासांत अढळ राहावे म्हणून उत्तेजन दिले. ते म्हणाले, “अनेक दु:खांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.” 23 पौल व बर्णबाने प्रत्येक मंडळीत वडीलजनांची नेमणूक केली. त्यांनी या वडिलांसाठी उपास आणि प्रार्थना केल्या, प्रभु येशूवर विश्वास असलेले असे सर्व वडीलजन होते म्हणून पौलाने व बर्णबाने त्यांना प्रभुच्या हाती सोपविले.
24 पौल आणि बर्णबा पिशीदिया प्रदेशातून गेले नंतर ते पंफुलिया येथे आले. 25 त्यांनी पिर्गा शहरात देवाचा संदेश दिला नंतर ते अत्तालिया शहरात गेले. 26 नंतर तेथून पुढे पौल व बर्णबा सिरीया येथील अंत्युखियात समुद्रमार्गे गेले. जे काम त्यांनी पूर्ण केले होते त्याची सुरुवात त्यांनी अंत्युखियापासूनच केली होती.
27 जेव्हा ते तेथे पोहोंचले, तेव्हा त्यांनी मंडळीला एकत्र बोलाविले आणि देवाने त्यांच्याबाबतीत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्यांना सांगितल्या, तसेच दुसऱ्या देशातील यहूदीतर लोकांमध्ये देवाने कसे दार उघडले ते सांगितले, 28 नंतर ते शिष्यांबरोबर तेथे बरेच दिवस राहिले.
2006 by World Bible Translation Center