Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे दावीदाचे स्तोत्र.
133 जेव्हा देवाचे लोक शांततेने एकत्र नांदतात,
तेव्हा ते खरोखरच खूप चांगले आणि आल्हाददायक असते.
2 ते गोड वास असलेल्या, याजकाच्या डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे,
अहरोनाच्या दाढीतून ओघळणाऱ्या तेलासारखे,
अहरोनाच्या खासकपड्यातून ओघळणाऱ्या तेलासारखे वाटते.
3 हर्मोन पर्वतावरुन सियोनवर पडणाऱ्या हळूवार पावसासारखे वाटते.
सियोन पर्वतावरच परमेश्वराने त्याचे आशीर्वाद, त्याचे शाश्वत जीवनाचे आशीर्वाद दिले.
योसेफाला स्वप्नांचा अर्थ सांगणयास बोलावले जाते
14 मग फारोने योसेफाला तुरुंगातून आणण्यास बोलावणे पाठवले. तेव्हा गारद्यांनी योसेफाल ताबडतोब तुरुंगातून बाहेर आणले. योसेफ दाढी करुन व स्वच्छ कपडे बदलून फारोपुढे येऊन उभा राहिला. 15 मग फारो योसेफास म्हणाला, “मला स्वप्न पडले आहे, परंतु त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की जो कोणी तुला स्वप्न सांगतो तेव्हा तू लगेच स्वप्नांचा अर्थ सांगतोस.”
16 योसेफ म्हणाला, “मी माझ्या कौशल्याने किंवा हुशारीने स्वप्नांचा अर्थ सांगतो असे नाही, तर केवळ देवालाच हे सामर्थ्थ आहे आणि तो देवच फारोच्या स्वप्नांचा अर्थ सांगेल.”
17 मग फारो योसेफला म्हणाला, “स्वप्नामध्ये मी नाईल नदीच्या काठी उभा होतो. 18 तेव्हा नदीतून सात धष्टपुष्ट व सुंदर गाई बाहेर आल्या व गवत खाऊ लागल्या असे मी पाहिले. 19 त्यानंतर सात रोड व कुरुप गाई नदीतून बाहेर येताना मी पाहिल्या. त्यांच्या सारख्या दुबळ्या व कुरुप गाई मी सबंध मिसर देशात कधीच पाहिल्या नव्हत्या. 20 त्या रोड व कुरुप गाईनी आधीच्या धष्टपुष्ट व सुंदर गाई गिळून टाकल्या. 21 तरीही त्या रोड व कुरुपच राहिल्या, त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांनी त्या सात गाई गिळून टाकल्या असे वाटत नव्हते; त्या पूर्वी इतक्याच अशक्त व रोड दिसत होत्या मग मी जागा झालो.
22 “त्यानंतर दुसऱ्या स्वप्नात एकाच ताटाला सात चांगली भरदार व टपोऱ्या दाण्यांची भरगच्च कणसे आली, 23 मग त्यांच्या मागून त्या ताटाला आणखी दुसरी करपटलेली, कुरुप व गरम वाऱ्याच्या झळयामुळे करपलेली सात कणसे आली. 24 व त्यांनी ती चांगली सात कणसे गिळून टाकली.
“ही माझी स्वप्ने मी माझ्या जादुगारांना, ज्योतिष्यांना व पंडितांना सांगितली; परंतु त्यांचा अर्थ कोणालाही सांगता आला नाही; तेव्हा त्यांचा अर्थ काय आहे?”
योसेफ स्वप्नांचा अर्थ सांगतो
25 मग योसेफ फारोला म्हणाला, “महाराज, ह्या दोन्हीही स्वप्नांचा अर्थ एकसारखाच आहे; लवकरच काय होणार आहे हे देव आपणास सांगत आहे; 26 त्या सात चांगल्या गाई आणि ती सात चांगली कणसे म्हणजे सात चांगली वर्षे. दोन्हीही स्वप्ने सारखीच आहेत; 27 त्या दुसऱ्या सात रोड गाई व ती सात रोड कणसे म्हणजे अवघ्या देशावर येणाऱ्या दुष्काळाची सात वर्षे. ती सात वर्षे चांगल्या सात वर्षानंतर येतील. 28 लवकरच काय घडणार आहे हे देवाने आपणास दाखवले आहे. मी संगितल्याप्रमाणेच हे घडून येईल. 29 सात वर्षांच्या सुबत्तेच्या काळात चांगले व भरपूर पीक येईल व मिसर देशभर भरपूर खावयास असेल. 30 परंतु सुकाळाच्या सात वर्षांनंतर सर्व देशभर दुष्काळाची अशी सात वर्षे येतील की त्यामुळे मिसर देशभर पिकलेले धान्य विसरले जाईल; आणि हा दुष्काळ देशाचा नाश करील. 31 आणि भरपूर धान्य असतानाचे दिवस कसे होते याचा लोकांना विसर पडेल.
32 “तेव्हा फारो महाराज, एकाच गोष्टीविषयी आपणाला दोन स्वप्ने पडली ते यासाठी की देव हे सर्व लवकरच व नक्की घडवून आणील, हे आपणास दाखवावे. 33 तेव्हा, फारो महाराज, आपण एखाद्या चतुर व शहाण्या पुरुषाची निवड करुन त्याला सर्व मिसर देशावर प्रशासक म्हणून नेमावे; 34 त्या नंतर शेतकऱ्याकडून धान्य गोळा करण्यासाठी इतर अधिकारी निवडावेत; येत्या सात वर्षांच्या सुकाळात प्रत्येकाने आपल्या धान्याच्या उत्पन्नाचा पांचवा हिस्सा सरकारला द्यावा. 35 अशा रीतीने ही माणसे सुकाळाच्या सात वर्षात पुष्कळ अन्न गोळा करतील आणि गरज पडेपर्यंत नगरात साठवून ठेवतील अशा प्रकारे, फारो, हे अन्न तुझ्या नियंत्रणात राहील. 36 येणाऱ्या दुष्काळातील सात वर्षांच्या काळात त्या धान्याचा उपयोग होईल. तेव्हा मग दुष्काळाच्या सात वर्षात मिसराचा नाश होणार नाही.”
शेवटच्या पीडेसह देवदूत
15 मग मी आणखी एक अदभुत चिन्ह स्वर्गात पाहिले. ते महान आणि चकित करणारे होते. तेथे सात देवदूतांनी सात पीडा आणल्या होत्या. या शेवटच्या पीडा होत्या कारण त्यानंतर देवाचा क्रोध नाहीसा होणार आहे.
2 मी अग्नि काचेच्या समुद्रात मिसळल्यासारखा पाहिला, सर्व लोकांनी ज्यांनी त्या प्राण्यावर, त्याच्या मूर्तीवर आणि त्याच्या नावाच्या संख्येवर विजय मिळविला होता ते सर्व समुद्राजवळ उभे होते. या लोकांकडे देवाने दिलेली वीणा होती. 3 त्यांनी देवाचा सेवक मोशे याचे गीत आणि कोकऱ्याचे गीत गाईले:
“प्रभु देवा, सर्वसमर्था तू महान
आणि अदभुत गोष्टी करतोस.
राष्ट्रांच्या राजा,
तुझे मार्ग योग्य व खरे आहेत
4 हे प्रभु, सर्व लोक तुला घाबरतील
सर्व लोक तुझ्या नावाची स्तुति करतील.
फक्त तूच पवित्र आहेस
सर्व लोक येऊन तुझी उपासना करतील
कारण तुझी नीतीमत्त्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत.”
2006 by World Bible Translation Center