Revised Common Lectionary (Semicontinuous)
स्वप्ने पडणारा योसेफ
37 याकोब कनान देशात वस्ती करुन राहिला; येथेच त्याचा बापही राहिला होता. 2 याकोबाच्या वंशाचा हा वृत्तान्त आहे.
योसेफ सतरा वर्षांचा उमदा तरुण होता. शेळ्यामेढ्यांचा सांभाळ करणे हे त्याचे काम होते. आपल्या भावांबरोबर (म्हणजे आपल्या बापाच्या बायका बिल्हा व जिल्पा यांच्या मुलांबरोबर) तो हे काम करीत असे; त्या भावांनी केलेल्या वाईट गोष्टीविषयी त्याने आपल्या बापाला सांगितले. 3 इस्राएल (याकोब) सर्व मुलांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करीत असे कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने योसेफाला एक विशेष सुंदर पायघोळ झगा दिला होता. 4 आपला बाप आपल्या इतर भावांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतो हे त्याच्या भावांना दिसले म्हणून ते योसेफाचा द्वेष करु लागले. यासेफाशी चांगल्या रीतीने बोलणे देखील त्यांनी सोडून दिले.
12 एके दिवशी योसेफाचे भाऊ आपल्या बापाची मेंढरे चारावयास शखेम येथे गेले. 13 याकोब योसेफाला म्हणाला, “तुझे भाऊ शखेम येथे आपल्या मेंढाराबरोबर आहेत; तू तेथे जा.”
योसेफ म्हणाला, “बर, मी जातो.”
14 योसेफाचा बाप म्हणाला, “शखेमाला जा; आणि तुझे भाऊ सुखरुप आहेत का; व माझी मेंढरे ठीक आहेत का ते पाहा व मागे येऊन मला त्यांच्या संबंधी सांग.” अशा रीतीने योसेफाच्या बापाने त्याला हेब्रोन दरीतून शखेमास पाठवले.
15 शखेमाजवळ योसेफ वाट चुकला; तो शेतात इकडे तिकडे भटकताना एका माणसाला आढळला त्या माणसाने त्याला विचारले, “तू कोणाला शोधत आहेस?”
16 योसेफाने उत्तर दिले, “मी माझ्या भावांना शोधत आहे; आपल्या मेंढरांबरोबर ते कोठे आहेत ते आपण मला सांगू शकाल का?”
17 तो माणूस म्हणाला, “ते अगोदरच येथून गेले आहेत; आपण दोथानास जाऊ असे त्यांस बोलताना मी ऐकले.” म्हणून मग योसेफ आपल्या भावांमागे गेला व ते त्याला दोथानात सांपडले.
योसेफ गुलाम म्हणून विकला जातो
18 योसेफाच्या भावांनी योसेफाला दुरुन येताना पाहिले आणि कट करुन त्याला ठार मारण्याचे ठरवले. 19 ते एकमेकांस म्हणाले, “हा पाहा, एकामागे एक स्वप्ने पडणारा योसेफ इकडे येत आहे. 20 आता आपल्याला शक्य आहे तोंवर याला आपण ठार मारुन टाकावे त्याचे शरीर एका कोरड्या खाड्यात फेकून देऊ आणि त्याला कोणाएका हिंस्र पशूने मारुन टाकले असे आपल्या बापाला सांगू; मग त्याची स्वप्ने काही कामाची नाहीत हे आपण त्याला दाखवून देऊ.”
21 परंतु रऊबेनास योसेफाला वाचवावयाला पाहिजे होते; म्हणून रऊबेन म्हणाला, “आपण त्याला ठार मारू नये; 22 त्याला काहीही इजा न करता, त्याला आपण एखाद्या खाड्यात टाकून देऊ;” आपल्या भावांच्या हातातून सोडवून योसेफाला वाचवावयाचे व त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावयाचे असा रऊबेनाचा बेत होता. 23 योसेफ त्याच्या भावजवळ येऊन पोहोंचला तेव्हा त्यांनी त्याच्यावर हल्ला केला; त्यांनी त्याचा विशेष सुंदर पायघोळ झगा फाडून टाकला. 24 नंतर त्यांनी त्याला एका खोल कोरड्या खाड्यात टाकून दिले.
25 योसेफ खाड्यात असताना त्याचे भाऊ भाकरी खावयास बसले. त्यांनी वर नजर करुन पाहिले तेव्हा त्यांना दुरुन एक उंटांचा तांडा दिसला; ते आपल्या, उंटांवर मसाल्याचे अनेक पदार्थ व वनस्पती इत्यादी भारी किंमतीचे पदार्थ लादून गिलादाहून मिसरकडे चालले होते. 26 तेव्हा यहूदा म्हणाला, “आपल्या भावाला ठार मारुन आणि त्याचा खून लपवून ठेवून आपल्याला काय फायदा? 27 आपण त्याला जर ह्या इश्माएली व्यापाऱ्यांना विकून टाकले तर आपल्याला अधिक लाभ होईल; आणि आपल्या स्वतःच्या भावाला ठार मारल्याचा दोषही आपणावर येणार नाहीं;” इतर भावांना हे म्हणणे पटले. 28 ते मिद्यानी व्यापारी जवळ आल्यावर त्या भावांनी योसेफाला खाड्यातून बाहेर काढले व त्या इश्माएली व्यापाऱ्यांस वीस चांदीची नाणी घेऊन विकून टाकले. ते व्यापारी योसेफास मिसर देशास घेऊन गेले.
105 परमेश्वराला धन्यावाद द्या.
त्याच्या नावाचा धावा करा.
राष्ट्रांना तो करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगा.
2 परमेश्वराला गाणे गा; त्याची स्तुतिगीते गा.
तो ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल सांगा.
3 परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा.
तुम्ही लोक परमेश्वराला शोधत आला, सुखी व्हा.
4 शक्तीसाठी परमेश्वराकडे जा.
मदतीसाठी नेहमी त्याच्याकडे जा.
5 तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्याची आठवण ठेवा त्याचे चमत्कार
आणि त्याचे शहाणपणाचे निर्णय याची आठवण ठेवा.
6 तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशज आहात.
तुम्ही याकोबाचे, देवाने निवडलेल्या माणसाचे वंशज आहात.
16 देवाने त्या देशात दुष्काळ आणला.
लोकांना खायला पुरेसे अन्न नव्हते.
17 पण देवाने योसेफ नावाच्या माणसाला त्यांच्या पुढे पाठवले.
योसेफ गुलामा सारखा विकला गेला.
18 त्यांनी योसेफाच्या पायाला दोर बांधले.
त्यांनी त्याच्या मानेभोवती लोखंडी कडे घातले.
19 योसेफाने सांगितलेल्या गोष्टी प्रत्यक्ष घडेपर्यंत तो गुलामच राहिला.
परमेश्वराच्या संदेशामुळे योसेफ बरोबर होता हे सिध्द् झाले.
20 तेव्हा मिसरच्या राजाने त्याला मोकळे सोडले.
राष्ट्रांच्या प्रमुखाने त्याला तुरुंगातून बाहेर काढले.
21 त्याने योसेफाला आपल्या घराचा मुख्य नेमले.
योसेफाने त्याच्या मालकीच्या सर्व वस्तूंची काळजी घेतली.
22 योसेफाने इतर प्रमुखांना सूचना दिल्या.
योसेफाने वृध्दांना शिकवले.
45 देवाने असे का केले?
त्याच्या माणसांनी त्याचे नियम पाळावे म्हणून त्यांनी त्याची
शिकवण काळजीपूर्वक आचरावी म्हणून,
परमेश्वराची स्तुती करा.
5 नियमशास्त्राद्वारे मिळणाऱ्या नीतिमत्वाविषयी मोशे लिहितो, “जो मनुष्य या गोष्टी करतो तो त्याकडून जगेल.” [a] 6 विश्वासाने मिळणारे नीतिमत्व हे सांगते, “तुम्ही आपल्या मनात म्हणू नका की ‘स्वर्गात कोण जाईल?’” (म्हणजे “ख्रिस्ताला खाली आणावयास”) 7 किंवा “‘खाली अधोलोकात कोण जाईल?’” (म्हणजे “ख्रिस्ताला मेलेल्यातून वर आणायला.”)
8 नाही! शास्त्र काय म्हणते? “ते वचन तुमच्याजवळ, तुमच्या मुखात, तुमच्या अंतःकरणात आहे.” [b] ते वचन हे आहे 9 की, जर तू तुझ्या मुखाने “येशू प्रभु आहे” असा विश्वास धरतोस आणि आपल्या अंतःकरणात देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले असा विश्वास धरतोस तुझे तारण होईल 10 कारण नीतिमत्वासाठी मनुष्य अंतःकरणाने विश्वास ठेवतो आणि तारणासाठी विश्वासाने कबूल करतो.
11 शास्त्र सांगते, “जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.” [c] 12 याचे कारण की, यहूदी आणि ग्रीक यांच्यात भेद नाही. कारण प्रभु हा सर्वांचा प्रभु आहे. जे हाक मारतात त्या सर्वांवर दया करण्या इतका तो संपन्र आहे. 13 कारण “जे कोणी प्रभूचे नाव घेऊन हाक मारतील, त्यांचे तारण होईल.” [d]
14 परंतु ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याला हाक मारणे त्यांना कसे शक्य होईल? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर विश्वास ठेवणे त्यांना कसे शक्य होईल? आणि जर कोणी त्यांना उपदेश केला नाही, तर ते कसे ऐकतील? 15 त्यांना पाठविले नाही तर उपदेश करणे त्यांना कसे शक्य होईल? असे लिहिले आहे की, “शुभवार्ता आणणाऱ्याचे पाय किती सुंदर आहेत!”p
येशू सरोवरावरून चालातो(A)
22 स्वतः लोकसमुदायास निरोप देईपर्यंत त्याने शिष्यांना नावेत बसून लगेच आपल्यापुढे पलीकडे जाण्यास सांगितले. 23 लोकांना पाठवून दिल्यावर तो प्रार्थना करण्यास एकांत ठिकाणी डोगरावर गेला, रात्र झाली तेव्हा तो तेथे एकटाच होता. 24 पण त्यावेळी नाव किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर होती व ती लाटांनी हेलकावत होती, कारण वारा समोरून वाहत होता.
25 मग पहाटेच्या वेळी तो पाण्यावरून चालत शिष्यांकडे आला. 26 शिष्य त्याला पाण्यावरून चालताना पाहून घाबरून गेले, त्यांना वाटले, भूतबीत आहे की काय म्हणून ते भूत, भूत असे ओरडू लागले.
27 पण येशू लगेच त्यांना म्हणाला, काळजी करू नका. मी आहे, भीऊ नका.
28 पेत्र म्हणाला, प्रभु जर तो तूच आहेस तर मला पाण्यावरून तुझ्याकडे यायला सांग.
29 येशू म्हणाला, “ये.”
मग पेत्र नावेतून पाण्यात उतरला व पाण्यावरून चालत येशूकडे जाऊ लागला. 30 पण तो पाण्यावरून चालत असतानाच वारा व लाटा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला. बुडताना ओरडला, “प्रभु, मला वाचवा.”
31 आणि लगेंच येशूने आपला हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासू माणसा, तू संशय का धरलास?”
32 मग ते नावेत बसल्यावर वारा थांबला. 33 तेव्हा जे नावेत होते ते त्याला नमन करून म्हणाले, “तुम्ही खरोखर देवाचे पुत्र आहात.”
2006 by World Bible Translation Center