Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाची प्रार्थना.
17 परमेश्वरा, न्यायासाठी,
प्रामाणिकपणासाठी माझी प्रार्थना ऐक.
माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
माझी खरी प्रार्थना ऐक.
2 तू माझ्या बाबतीत योग्य ते निर्णय घेशील.
तू सत्य बघू शकतोस.
3 तू माझ्या ह्रदयात खोलवर पाहिलेस.
तू रात्रभर माझ्या बरोबर होतास
तू मला प्रश्न विचारलेस आणि तुला काहीही चूक आढळली नाही.
मी वाईट गोष्टी करण्याची योजना आखलेली नाही.
4 एखाद्याला जितके शक्य आहे तितक्या प्रयत्न पूर्वक
मी तुझ्या आज्ञा पाळायचा प्रयत्न केला.
5 मी तू आखून दिलेल्या मार्गांवरुन गेलो.
माझ्या पायांनी जगण्याचा तुझा मार्ग कधीही सोडला नाही.
6 देवा, मी जेव्हा जेव्हा तुला हाक मारली तेव्हा तेव्हा
तू मला ओ दिलेस म्हणून आता तू माझे ऐक.
7 देवा, जे तुझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना तू मदत करतोस.
ते लोक तुझ्या उजवीकडे उभे राहतात तेव्हा आता तुझ्या एका भक्ताची प्रार्थना ऐक.
15 मी न्यायासाठी प्रार्थना केली, म्हणून परमेश्वरा, मी तुझा चेहरा बघेन
आणि तुला बघून मी पूर्ण समाधानी होईन.
देव नेहमीच त्याच्या लोकांबरोबर असतो
43 याकोबा, परमेश्वराने तुला जन्म दिला. इस्राएला, परमेश्वराने तुला निर्मिले. आता देव म्हणतो, “भिऊ नकोस मी तुझे रक्षण करीन. मी तुला निवडले आहे. तू माझा आहेस. 2 जेव्हा तू अडचणीत असतोस, तेव्हा मी तुझ्या पाठीशी असतो. जेव्हा तू नद्या ओलांडशील तेव्हा इजा होणार नाही. आगीमधून चालताना तुला भाजणार नाही. ज्वाळा तुला पोळणार नाहीत. 3 का? कारण मी स्वतः तुझा परमेश्वर आहे. मी, इस्राएलचा पवित्र देव तुझा तारणहार आहे. मी तुझ्या मोबदल्यात मिसर देश दिला. तुला माझा करण्यासाठी मी इथिओपिआ व सेबा यांचे दान केले. 4 तू माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहेस. म्हणून मी तुझा आदर करतो. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्यासाठी मी सर्व लोक आणि सर्व राष्ट्रे दान करीन.
5 “म्हणून घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या सर्व मुलांना गोळा करून तुझ्याकडे आणीन, मी त्यांना पूर्व आणि पश्चिम दिशेकडून गोळा करीन. 6 मी उत्तरेला म्हणेन: माझे लोक मला परत दे. मी दक्षिणेला सांगेन, माझ्या लोकांना तुरूंगात ठेवू नको. दूरदूरच्या ठिकाणांहून माझ्या मुलांमुलींना माझ्याकडे परत आण. 7 जी माणसे माझी आहेत, जी माझे नाव लावतात, त्या सर्वांना माझ्याकडे आण. मी त्या लोकांना माझ्यासाठी निर्मिले आहे मीच त्यांना घडविले व ते माझे आहेत.”
येशू चार हजारांहून अधिकांना जेवू घालतो(A)
32 मग येशूने आपल्या शिष्यांस आपल्याजवळ बोलावून म्हटले, “मला लोकांचा कळवळा येतो. कारण ते आज तीन दिवस झाले माझ्याजवळ राहिले आहेत आणि त्यांच्याकडे खायला काही नाही, आणि त्यांना उपाशी पाठवावे अशी माझी इच्छा नाही. कारण ते वाटेत कदाचित मूर्च्छित होतील.”
33 शिष्य त्याला म्हणाले, “एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला तृप्त करावे इतक्या भाकरी ह्या दूर रानात आमच्याजवळ कोठून असणार?”
34 तेव्हा येशू म्हाणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?”
ते म्हणाले, “आमच्याकडे सात भाकरी आहेत व काही मासे आहेत.”
35 मग त्याने लोकांना जमिनीवर बसविण्याची आज्ञा केली. 36 मग त्या सात भाकरी व मासे घेऊन त्याने देवाचे उपकार मानले व त्या भाकरी मोडल्या व शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांना दिल्या. 37 तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या सात पाट्या गोळा केल्या. 38 आणि जेवणारे, स्त्रिया व लेकरे सोडून चार हजार पुरूष होते. 39 मग समुदायास निरोप दिल्यावर तो नावेत बसून मगदानाच्या हद्दीत गेला.
2006 by World Bible Translation Center