Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाची प्रार्थना.
17 परमेश्वरा, न्यायासाठी,
प्रामाणिकपणासाठी माझी प्रार्थना ऐक.
माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
माझी खरी प्रार्थना ऐक.
2 तू माझ्या बाबतीत योग्य ते निर्णय घेशील.
तू सत्य बघू शकतोस.
3 तू माझ्या ह्रदयात खोलवर पाहिलेस.
तू रात्रभर माझ्या बरोबर होतास
तू मला प्रश्न विचारलेस आणि तुला काहीही चूक आढळली नाही.
मी वाईट गोष्टी करण्याची योजना आखलेली नाही.
4 एखाद्याला जितके शक्य आहे तितक्या प्रयत्न पूर्वक
मी तुझ्या आज्ञा पाळायचा प्रयत्न केला.
5 मी तू आखून दिलेल्या मार्गांवरुन गेलो.
माझ्या पायांनी जगण्याचा तुझा मार्ग कधीही सोडला नाही.
6 देवा, मी जेव्हा जेव्हा तुला हाक मारली तेव्हा तेव्हा
तू मला ओ दिलेस म्हणून आता तू माझे ऐक.
7 देवा, जे तुझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना तू मदत करतोस.
ते लोक तुझ्या उजवीकडे उभे राहतात तेव्हा आता तुझ्या एका भक्ताची प्रार्थना ऐक.
15 मी न्यायासाठी प्रार्थना केली, म्हणून परमेश्वरा, मी तुझा चेहरा बघेन
आणि तुला बघून मी पूर्ण समाधानी होईन.
22 तीन दिवसानंतर याकोब पळून गेल्याचे लाबानास कळाले. 23 तेव्हा त्याने आपली माणसे एकत्र जमवली आणि याकोबाचा पाठलाग सुरु केला. सात दिवसांनतर गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाजवळ त्याला याकोब सापडला. 24 त्या रात्री देव लाबानाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “लाबाना, सावधान! तू याकोबाशी बोलताना प्रत्येक शब्द संभाळून वापर.”
चोरलेल्या कुलदेवतांचा शोध
25 दुसऱ्या दिवशी सकाळी लाबानाने याकोबाला गाठले; याकोबाने डोंगरावर आपला तळ दिला होता म्हणून लाबानानेही आपल्या बरोबरच्या माणसांसह गिलादाच्या डोंगराळ भागात आपला तळ दिला.
26 लाबान याकोबाला म्हणाला, “तू मला का फसवलेस? युद्धात धरुन नेलेल्या स्त्रियां प्रमाणे तू माझ्या मुलींना का घेऊन आलास? 27 तू मला न सांगता का पळून गेलास? तुला जायचे आहे असे तू मला सांगितले असतेस तर नाचगाणी बजावणी व संगिताची धामधूम या सहित मी तुला मेजवानी दिली असती; 28 अरे, तू मला माझ्या लाडक्या नातवांचा व माझ्या प्रिय मुलींचा निरोप घेण्याची संधी ही दिली नाहीस की त्यांची चुंबने घेण्यास सवड दिली नाहींस! तू हा अगदी मूर्खपणा केलास! 29 खरे तर अपाय करण्याची माझ्यात ताकद आहे परंतु गेल्या रात्री तुझ्या बापाचा देव माझ्या स्वप्नात आला आणि मी तुला कोणत्याच प्रकारे अपाय करु नये म्हणून त्याने मला ताकीद दिली आहे; 30 तुला तुझ्या बापाच्या घरी जायचे आहे हे मला माहीत आहे आणि म्हणूनच तू जाण्यास निघालास परंतु तू माझ्या घरातील कुलदेवाता का चोरल्यास?”
31 याकोबाने उत्तर दिले, “मी तुम्हाला न सांगता निघालो कारण मला भीती वाटली; मला विचार आला की तुम्ही तुमच्या मुली माझ्यापासून घेऊन जाल; 32 परंतु मी तुमच्या कुलदेवता मुळीच चोरल्या नाहीत. जर येथे माझ्याबरोबर असणाऱ्या कोणी तुमच्या कुलदेवता घेतल्या आहेत असे तुम्हाला आढळले तर ती व्यक्ती ठार केली जाईल; तुमची माणसे या बाबतीत माझे साक्षी असतील; तुमच्या कोणत्याही चीजवस्तूसाठी तुम्ही झडती घेऊ शकता; जे काही तुमचे असेल ते घेऊन जा.” (राहेलीने लाबानाच्या कुलदेवाता चोरल्या होत्या ते याकोबास माहीत नव्हते.)
33 म्हणून मग लाबानाने याकोबाच्या छावणीची झडती घेतली; त्याने याकोबाच्या तंबूची व नंतर लेआच्या तंबूची झडती घेतली; त्यानंतर त्याच्या घरातील कुलदेवता सापडल्या नाहीत. त्यानंतर लाबान राहेलीच्या तंबूत गेला. 34 राहेलीने त्या कुलदेवता आपल्या उंटाच्या कंठाळीत लपवून ठेवल्या होत्या आणि ती त्यांच्यावर बसली होती. लाबानाने सगळा तंबू शोधून पाहिला परंतु त्या कुलदेवता कोठेही सापडल्या नाहीत.
35 आणि राहेल आपल्या बापाला म्हणाली, “बाबा, मी आपल्यासमोर उभी राहू शकत नाही म्हणून माझ्यावर रागावू नका, कारण माझा मासिक धर्म आला आहे.” अशी रीतीने लाबानाने तळाची कसून तपासणी केली परंतु त्याला कुलदेवता सापडल्या नाहीत.
36 मग याकोबाला फार राग आला. तो म्हणाला, “मी काय वाईट केले आहे? मी कोणता करार मोडला आहे? माझा पाठलाग करण्याचा आणि मला थांबविण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? 37 माझ्या मालकीच्या सर्व चीजवस्तू तुम्ही तपासून पाहिल्या आहेत आणि तुम्हाला तुमच्या मालकीची एकही चीजवस्तू आढळली नाही; जर तुम्हाला तुमचे काही मिळाले असेल तर ते मला दाखवा; ते या ठिकाणी समोर ठेवा म्हणजे तुमची आमची माणसे ते बघतील. तुमच्या व माझ्यामध्ये कोण खरा आहे हे या माणसांना ठरवू द्या. 38 मी तुमची वीस वर्षे सेवाचाकरी केलेली आहे. त्या सर्व काळात एकही करडू किंवा कोकरु मेलेले जन्मले नाहीं; आणि तुमच्या कळपातील एकही एडका मी खाल्ला नाही. 39 एखाद्या वेळी जर एखादी मेंढी जनावरांनी ठार मारली तर ती मी नेहमीच माझ्या कळपातून भरुन दिली. मी कधीही मेलेले जनावर तुमच्याकडे घेऊन आलो नाही आणि यात माझा काही दोष नाही असे म्हणालो नाही. दिवसा व रात्री मी तुमच्या कळपाची काळजी घेतली. 40 दिवसा सूर्याच्या उन्हातापाने माझी शक्ती क्षीण होई व रात्री थंडीगारठ्यामुळे माझ्या डोळ्यातील झोंप काढून घेतली जाई. 41 वीस वर्षे एखाद्या गुलामासारखी मी तुमची सेवाचाकरी केली; पाहिली चौदा वर्षे तुमच्या दोन मुली जिंकण्यासाठी आणि शेवटची सहा वर्षे तुमचे कळप वाढावेत म्हणून मी कष्ट केले; आणि त्या काळात दहा वेळा तुम्ही माझ्या वेतनात फेरबदल केला; 42 परंतु माझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव आणि इसाहाकाचा देव (म्हणजे ‘भय’) माझ्या संगती होता. जर देव माझ्याबरोबर नसता तर तुम्ही मला रिकामेच माझ्या घरी पाठवले असते; परंतु देवाने मला झालेला त्रास पाहिला; देवाने मी कष्टाने केलेले काम पाहिले आणि काल रात्री देवाने सिद्ध करुन दाखवले की मी रास्त माणूस आहे.”
आभाराची प्रार्थना
8 सुरुवातीलाच तुम्हां सर्वांसाठी येशू ख्रिस्ताद्वारे मी देवाचे आभार मानतो, कारण तुमचा विश्वास जगात सगळीकडे जाहीर होत आहे. 9 देव माझा साक्षी आहे, ज्याची सेवा मी आत्म्याने त्याच्या पुत्राची सुवार्ता सांगून करतो. मी तुमची नेहमी आठवण करतो. 10 माझ्या प्रार्थनेत मी नेहमी मागतो, जर देवाची इच्छा असेल तर शेवटी मला तुम्हांला भेटता येणे शक्य व्हावे. 11 मला तुम्हांला भेटण्याची फार इच्छा आहे. यासाठी की काही आध्यात्मिक दानांविषयी तुम्हांबरोबर सहभागी व्हावे आणि तुम्ही बलवान व्हावे. 12 म्हणजे जोपर्यंत मी तुमच्यामध्ये आहे तोपर्यंत आपण एकमेकांना विश्वासामध्ये मदत करु. माझ्या विश्वासामुळे तुम्हांला व तुमच्या विश्वासामुळे मला फायदा होईल.
13 बंधूनो, पुष्कळ वेळा तुम्हांला भेट देण्याची मला इच्छा झाली. यासाठी की, जसे मला यहूदीतरांमध्ये मिळाले, तसे तुमच्यामध्येसुद्धा फळ मिळावे. परंतु आतापर्यंत मला तुमच्यापर्यंत येण्यास अडथळे आले हे तुम्हांला माहीत असावे.
14 मी सर्व लोकांची-ग्रीक आणि ग्रीक नसलेले, शहाणे आणि मूर्ख-सेवा केली पाहिजे. 15 त्यासाठीच तुम्ही जे रोममध्ये आहात त्या तुम्हांला सुद्धा सुवार्ता सांगण्याची माझी फार इच्छा आहे.
2006 by World Bible Translation Center