Revised Common Lectionary (Semicontinuous)
22 मग याकोब रात्रीचाच उठला. त्याने आपल्या दोन्ही बायका, दोन्ही दासी आणि अकरा मुले यांस बरोबर घेतले आणि तो यब्बोक नदीच्या उतारापाशी नदी पार करुन गेला. 23 त्याने आपल्या कुटुंबातील सर्वांस नदी पार करुन पाठवले; नंतर त्याचे जे काही होते तेही सर्व त्याने नदी पार करुन पलीकडे पाठवले.
देवाशी झोंबी
24 नदी उतरुन पलीकडे जाण्यात याकोब सर्वात शेवटी होता; परंतु नदी उतरुन जाण्यापूर्वी तो अद्याप एकटाच असताना एक पुरुष आला व त्याने याकोबाशी झोंबी केली. सूर्य उगवेपर्यंत त्याने त्याच्याशी झोंबी केली 25 त्या माणसाने पाहिले की आपण याकोबावर मात करुन त्याचा पराभव करु शकत नाही म्हणून त्याने याकोबाच्या जांघेस स्पर्श केला तेव्हा याकोबाचा पाय जांघेच्या सांध्यातून निखळला.
26 मग तो पुरुष याकोबास म्हणाला, “आता मला जाऊदे,कारण सुर्य वर येत आहे.'
परंतु याकोब म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिलाच पाहिजेस नाहीतर मी तुला जाऊ देणार नाही.”
27 तो पुरुष त्याला म्हणाला, “तुझे नाव काय आहे?”
आणि याकोब म्हणाला, “माझे नाव याकोब आहे.”
28 तेव्हा तो पुरुष म्हणाला, “तुझे नाव याकोब असणार नाही. येथून पुढे तुझे नांव इस्राएल असेल. मी हे नांव तुला देत आहे कारण तू देवाशी व माणसांशी झोंबी केली आहेस आणि तू हरला नाहीस तर जिंकलास.”
29 मग याकोबाने त्याला विचारले, “कृपया तुझे नाव मला सांग.”
परंतु तो पुरुष म्हणाला, “तू माझे नाव का विचारतोस?” त्यावेळी तेथेच त्या पुरुषाने याकोबाला आशीर्वाद दिला.
30 म्हणून याकोबाने त्या जागेचे नाव पनीएल ठेवले. याकोब म्हणाला, “ह्या ठिकाणी मी देवाला तोंडोतोंड पाहिले आहे परंतु माझा जीव वाचवला गेला.” 31 मग पनीएलाहून तो पुढे निघाला तेव्हा सूर्य उगवला. याकोब आपल्या पायामुळे लंगडत चालत होता.
दावीदाची प्रार्थना.
17 परमेश्वरा, न्यायासाठी,
प्रामाणिकपणासाठी माझी प्रार्थना ऐक.
माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
माझी खरी प्रार्थना ऐक.
2 तू माझ्या बाबतीत योग्य ते निर्णय घेशील.
तू सत्य बघू शकतोस.
3 तू माझ्या ह्रदयात खोलवर पाहिलेस.
तू रात्रभर माझ्या बरोबर होतास
तू मला प्रश्न विचारलेस आणि तुला काहीही चूक आढळली नाही.
मी वाईट गोष्टी करण्याची योजना आखलेली नाही.
4 एखाद्याला जितके शक्य आहे तितक्या प्रयत्न पूर्वक
मी तुझ्या आज्ञा पाळायचा प्रयत्न केला.
5 मी तू आखून दिलेल्या मार्गांवरुन गेलो.
माझ्या पायांनी जगण्याचा तुझा मार्ग कधीही सोडला नाही.
6 देवा, मी जेव्हा जेव्हा तुला हाक मारली तेव्हा तेव्हा
तू मला ओ दिलेस म्हणून आता तू माझे ऐक.
7 देवा, जे तुझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना तू मदत करतोस.
ते लोक तुझ्या उजवीकडे उभे राहतात तेव्हा आता तुझ्या एका भक्ताची प्रार्थना ऐक.
15 मी न्यायासाठी प्रार्थना केली, म्हणून परमेश्वरा, मी तुझा चेहरा बघेन
आणि तुला बघून मी पूर्ण समाधानी होईन.
देव आणि यहूदी लोक
9 मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही. पवित्र आत्म्याने बोध केलेला माझा विवेक मजविषयी साक्ष देतो 2 की, मला मोठे दु:ख आहे आणि माझ्या अंतःकरणात सतत वेदना आहेत. 3 कारण माझे भाऊ, वंशाने माझे नातेवाईक यांच्याकरिता शापित व्हावे आणि ख्रिस्तापासून मी वेगळा केलेला असावा अशी मी इच्छा करतो. 4 इस्राएली कोण आहेत? ते देवाचे निवडलेले लोक आहेत. या लोकांकडे देवाचे गौरव आणि देवाने त्यांच्याशी केलेला करार आहे. देवाने त्यांना नियमशास्त्र दिले. आणि उपासना करण्याचा योग्य मार्ग दिला. आणि देवाने त्यांना त्याचे अभिवचन दिले आहे. 5 त्यांचे पूर्वज थोर आहेत. मानवी दृष्टीने सांगताना ख्रिस्त त्यांच्यापासून आला, जो सदासर्वकाळ सर्व लोकांवर धन्यवादित देव आहे. आमेन.
येशू पाच हजारांहून अधिक लोकांना जेवू घालतो(A)
13 मग ते ऐकून येशू तेथून नावेत बसून निघून गेला व नंतर नावेतून उतरून माळरानावर एका निवांत व एकाकी जागी गेला. लोकांनी हे ऐकले तेव्हा ते पायी त्याच्याकडे गेले. 14 मग तो किनाऱ्यावर आला, जेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्याला त्यांच्याबद्दल कळवळा वाटला. म्हणून जे आजारी होते त्यांना त्याने बरे केले.
15 मग संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “ही माळरानावरची उजाड जागा आहे आणि भोजन वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावामध्ये जाऊन स्वतःकरिता अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या.”
16 परंतु येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही. तुम्हीच त्यांना खायला द्या.”
17 तेव्हा ते त्याला म्हणाले, “पाच भाकरी व दोन मासे याशिवाय येथे आमच्याजवळ काहीच नाही.”
18 तो म्हणाला, “त्या इकडे आणा.” 19 मग लोकांना गवतावर बसण्याची आज्ञा केत्यावर त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन वर आकाशकडे पाहून त्यावर आशीर्वाद मागितला. नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकास दिल्या. 20 ते सर्व जेवून तृप्त झाले. मग त्या उरलेल्या तुकड्यांच्या त्यांनी बारा टोपल्या भरुन घेतल्या. 21 स्त्रिया व मुले मोजली नाहीत, पुरूष मात्र पाच हजार होते.
2006 by World Bible Translation Center