Revised Common Lectionary (Semicontinuous)
8 सर्व जगातील लोक तू केलेल्या विस्मयजनक गोष्टींनी आश्चर्यचकित झाले आहेत.
सूर्योदय आणि सुर्यास्त आम्हाला खूप आनंदी बनवतात.
9 तू जमिनीची काळजी घेतोस तू तिच्यावर सिंचन करतोस
आणि तिला धान्य उगवायला सांगतोस.
देवा तू झरे पाण्याने भरतोस
आणि पिकांना वाढू देतोस.
10 तू नांगरलेल्या जमिनीवर पाऊस पाडतोस.
तू शेतजमीन पाण्याने भिजवतोस.
तू जमीन पावसाने भुसभुशीत करतोस.
आणि तू त्यावर छोट्या रोपट्यांना उगवू देतोस.
11 तू नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या हंगामाने करतोस
तू भरपूर पिकांनी गाड्या भरतोस.
12 वाळवंट आणि डोंगर गवताने भरले आहेत.
13 आणि कुरणे मेंढ्यांनी झाकली गेली आहेत.
दऱ्या धान्यांनी भरल्या आहेत.
प्रत्येक जण आनंदाने गात आहे आणि ओरडत आहे.
याकोब लाबानास फसवितो
25 मग योसेफाच्या जन्मानंतर याकोब लाबानाला म्हणाला, “आता मला माझ्या स्वतःच्या घरी जाऊ द्या. 26 मला माझ्या बायका व माझी मुले द्या; मी कष्टाने तुमची सेवाचाकरी करुन ती मिळवली आहेस, मी चौदा वर्षे तुमची चांगली सेवा केली आहे हे तुम्ही जाणता.”
27 लाबान म्हणाला, “थांब, तुझी इच्छा असेल तर मला थोडे बोलू दे. परमेश्वराने केवळ तुझ्यामुळे मला आशीर्वादित केले आहे हे मी जाणतो. 28 तर मी तुला काय वेतन देऊ हे मला सांग म्हणजे ते मी तुला देईन.”
29 याकोबाने उत्तर दिले, “मी अतिशय कष्टाने तुमची सेवाचाकारी केली आहे हे तुम्ही जाणता; आजपर्यंत मी काळजी घेतल्यामुळे तुमचे कळप वाढले आहेत व ते चांगले पोसलेले आहेत; 30 मी जेव्हा तुमच्याकडे आलो तेव्हा तुम्हापाशी फार थोडी शेरडेमेंढरे होती; परंतु आता तुम्हापाशी किती तरी कळप आहेत; ज्या ज्या वेळी मी तुमच्यासाठी काही केले त्या प्रत्येक वेळी परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित केले आहे. आता मात्र मी स्वतःसाठी काही करण्याची व माझ्यासाठी घर बांधण्याची वेळ आली आहे.”
31 लाबानेने विचारले, “तर मग मी तुला काय देऊ?”
याकोबाने उत्तर दिले, “तुम्ही मला काही द्यावे असे मला नको आहे. मला फक्त मी केलेल्या सेवाचाकरीचा मोबदला पाहिजे; एकढी एकच गोष्ट करा, म्हणजे मग मी पूर्वीप्रमाणे आपले कळप चारीन व सांभाळीन; 32 परंतु आजच मला तुमच्या सगळ्या कळपात जाऊ द्या म्हणजे त्यांच्यात फिरुन त्यातील मेंढरापैकी ठिबकेदार व पट्टे असलेली मेंढरे व बकरे आणि काळ्या रंगाची मेंढरे तसेच शेरडांपैकी ठिबकेदार व पट्टे असलेली शेरडे मी बाजूला करीन; हेच माझे वेतन असेल. 33 त्यानंतर कधीही तुम्ही पाहाल तर मी प्रामाणिक आहे किंवा नाही हे सहज तुम्हाला दिसेल, तुम्ही कधीही येवून माझे कळप पाहू शकात; जर त्यात तुम्हाला ठिबकेदार व पट्टे नसलेली शेरडे व काळी नसलेली मेंढरे आढळली तर ती मी चोरली असे तुम्हाला समजेल.”
34 लाबानाने उत्तर दिले, “ठीक आहे, हे मी मान्य करतो; तू म्हणतोस तसे आपण करु;” 35 परंतु त्याच दिवशी लाबानाने ठिबकेदार व बांडे एडके तसेच ठिबकेदार व बांड्या शेळ्या आणि मेंढरापैकी काळी मेंढरे कळपातून काढून लपवली; गुपचूप ती आपल्या मुलांच्या हवाली केली व त्यांवर लक्ष ठेवून त्यांना सांभाळण्यास सांगितले; 36 तेव्हा त्याच्या मुलांनी ती ठिबकेदार व पट्टे असलेली सर्व जनावरे घेऊन मजला करीत तीन दिवसांच्या अंतरावरील दुसऱ्या जागी नेली; याकोब मात्र मागे राहून उरलेली म्हणजे ठिबके पट्टे व काळी नसलेली जनावरे सांभाळीत राहिला.
खरे शहाणपण
13 तुमच्यामध्ये कोण शहाणा व ज्ञानाने भरलेला आहे? त्याने त्याचे शहाणपण त्याच्या चांगल्या वागणुकीने दाखवावे. नम्रतेने केल्या जाणाऱ्या कृतीद्वारे त्याने आपले शहाणपण दाखवावे. 14 पण जर तुमच्या ह्रदयात कटूरता, मत्सर व स्वार्थी उद्देश असतील तर तुम्ही तुमच्या शहाणपणाची फुशारकी मारू शकणार नाही. कारण तसे करणे म्हणजे खोटेपणाच्या आड सत्य लपविण्यासारखे आहे. 15 कारण अशा प्रकारचे शहाणपण वरून, स्वर्गातून आलेले नाही, तर ते पृथ्वीवरचे आहे. अधार्मिक आणि सैतानी आहे. 16 कारण जेथे मत्सर व स्वार्थी ध्येये आढळतात तेथे अव्यवस्थितपणा व सर्व प्रकारचे वाईट व्यवहारही आढळतात. 17 पण वरून लाभलेले शहाणपण मुळात शुद्ध, शांतिदायक, समजूतदारपणाचे आणि मनमोकळे असून ते दयेचे व चांगली कामे यांना उत्तेजन देणारे असते. तसेच ते पक्षपात न करणारे व कळकळीचे असते. 18 जे लोक शांततेच्या मार्गाने शांति स्थापन करण्याचा प्रयत्न करतात त्यांना सरळ, नीतिपूर्ण वागण्यामुळे मिळणाऱ्या चांगल्या गोष्टींचा लाभ होतो.
2006 by World Bible Translation Center