Revised Common Lectionary (Semicontinuous)
याकोब फसवला जातो
15 एके दिवशी लाबान याकोबाला म्हणाला, “तू माझ्या घरी, काही मोबदला न घेता गुलामासारखे काम करीत राहावेस हे योग्य नाही; तू माझा नातलग आहेस; तर तुला मी काय वेतन द्यावे ते सांग.”
16 लाबानाला दोन मुली होत्या; थोरल्या मुलीचे नाव होते लेआ आणि धाकटीचे राहेल.
17 लेआचे डोळे अधू आणि निस्तेज होते. परंतु राहेल सुडौल बांध्याची व दिसावयास सुंदर होती; 18 याकोबाचे राहेलीवर प्रेम जडले होते; म्हणून याकोब लाबानमामास म्हणाला, “तुम्ही मला तुमच्या धाकट्या मुलीशी राहेलीशी लग्न करण्याची परवानगी देणार असाल तर मी तुमच्या घरी सात वर्षे तुमची सेवाचाकरी करीन.”
19 लाबान म्हणाला, “परक्या कोणापेक्षा तिने तुझ्याशी लग्न करावे हे तिच्यासाठी चांगले आहे; म्हणून तू आता माझ्यापाशी राहा.”
20 म्हणून मग याकोब आपल्या मामापाशी राहिला आणि त्याने सात वर्षे त्याची सेवाचाकरी केली; परंतु राहेलीवरील गाढ प्रेमामुळे ती वर्षे त्याला फार थोड्या दिवसासारखी वाटली.
21 सात वर्षेनंतर याकोब लाबानाला म्हणाला, “आता मला राहेल द्या म्हणजे मी तिच्याशी लग्न करीन कारण तुमच्या सेवा चाकरीचा माझा वेळ संपलेला आहे.”
22 तेव्हा लाबानाने तेथील सर्वलोकांस मेजवानी दिली; 23 त्या रात्री लाबानाने आपली थोरली मुलगी लेआ याकोबाच्या स्वाधीन केली; त्या रात्री याकोब व त्याची बायको लेआ यांनी एकत्र निजून विवाहाच्या जीवनाचा आनंद उपभोगला; 24 (लाबानाने आपली दासी जिल्या आपल्या मुलीची दासी म्हणून तिला दिली.) 25 दुसऱ्या दिवशी सकाळी याकोबाने लेआला पाहिले तेव्हा आपण रात्री लेआबरोबर एकत्र निजलो असे त्याला समजले; मग याकोब लाबानाला म्हणाला, “तुम्ही मला फसवले; मला राहेलीशी लग्न करता यावे म्हणून मी अतिशय काबाडकष्ट केले; तुम्ही मला असे का फसवले?”
26 लाबान म्हणाला, “आमच्या देशातील रीतीरिवाजा प्रमाणे आधी थोरल्या मुलीचे लग्न झाल्या शिवाय आम्ही धाकटया मुलीचे लग्न करुन देत नाहीं; 27 तरी परंतु हा लग्न विधी सप्ताह सोहळा साजरा करण्यात सहभागी हो म्हणजे मग मी तुला लग्न करण्यासाठी राहेलही देतो; परंतु त्यासाठी तू आणखी सात वर्षे माझी सेवाचाकरी केली पाहिजेस.”
28 त्याप्रमाणे याकोबाने आठवडाभर तो सर्व लग्न सोहळा पूर्ण केला; मग लाबानाने त्याची धाकटी कन्या राहेल त्याला बायको करुन दिली;
105 परमेश्वराला धन्यावाद द्या.
त्याच्या नावाचा धावा करा.
राष्ट्रांना तो करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगा.
2 परमेश्वराला गाणे गा; त्याची स्तुतिगीते गा.
तो ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल सांगा.
3 परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा.
तुम्ही लोक परमेश्वराला शोधत आला, सुखी व्हा.
4 शक्तीसाठी परमेश्वराकडे जा.
मदतीसाठी नेहमी त्याच्याकडे जा.
5 तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्याची आठवण ठेवा त्याचे चमत्कार
आणि त्याचे शहाणपणाचे निर्णय याची आठवण ठेवा.
6 तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशज आहात.
तुम्ही याकोबाचे, देवाने निवडलेल्या माणसाचे वंशज आहात.
7 परमेश्वर आपला देव आहे.
परमेश्वर सर्व जगावर [a] राज्य करतो.
8 परमेश्वर देवाच्या कराराची सदैव आठवण ठेवा.
हजारो पिढ्या त्याच्या आज्ञांची आठवण ठेवा.
9 देवाने अब्राहामा बरोबर करार केला.
देवाने इसहाकाला वचन दिले.
10 नंतर त्याने याकोबासाठी नियम केला.
देवाने इस्राएल बरोबर करार केला.
तो सदैव राहील.
11 देव म्हणाला, “मी तुला कनानची जमीन देईन.
ती जमीन तुझ्या मालकीची होईल.”
45 देवाने असे का केले?
त्याच्या माणसांनी त्याचे नियम पाळावे म्हणून त्यांनी त्याची
शिकवण काळजीपूर्वक आचरावी म्हणून,
परमेश्वराची स्तुती करा.
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
128 परमेश्वराचे सर्व भक्त सुखी आहेत.
ते देवाच्या इच्छे प्रमाणे जगतात.
2 तू ज्या गोष्टींसाठी काम करतोस
त्या गोष्टींचा तू उपभोग घेशील, तू आनंदी राहाशील आणि तुझ्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतील.
3 घरी तुझी बायको सुफलीत द्राक्षवेलीसारखी असेल.
मेजाभोवती तुझी मुले तू लावलेल्या जैतूनाच्या झाडांसारखी असतील.
4 परमेश्वर अशा रीतीने त्याच्या भक्तांना आशीर्वाद देईल.
5 परमेश्वर तुला सियोनवरुन आशीर्वाद देवो.
परमेश्वराच्या आशीर्वादाचा तू यरुशलेम मध्ये जन्मभर आनंद उपभोगावा अशी आशा करतो.
6 आणि तू तुझी नातवंडे पाही पर्यंत जगशील अशी मी आशा करतो.
इस्राएलमध्ये शांती नांदू दे.
26 जेव्हा आपण कण्हतो तेव्हा आत्माही आपल्या अशक्तपणात आपणांस मदत करतो. कारण कशासाठी आपण प्रार्थना करावी, हे आपणांस माहीतसुद्धा नसते. परंतु आत्मा स्वतः आपणांसाठी शब्दांनी जे व्यक्त करता येत नाही, अशा कण्हण्याने मध्यस्थी करतो. 27 परंतु जो देव आपली अंतःकरणे शोधतो त्याला आत्म्याचा हेतू काय आहे हे माहीत आहे. कारण देवाच्या इच्छेने आत्मा संताच्या वतीने मध्यस्थी करतो.
28 आणि आपणास माहीत आहे की, प्रत्येक गोष्टीत हेतूप्रमाणे आत्मा जे देवावर प्रेम करतात व त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेले असतात त्यांच्यासह जे चांगले आहे ते करण्याचे काम करतो. 29 ज्यांना देवाने अगोदरच निवडले होते त्यांना त्याच्या पुत्राच्या सारखे व्हावे म्हणून नेमले होते. यासाठी की देवाचा पुत्र पुष्कळ बंधूंमध्ये ज्येष्ठ व्हावा. 30 देवाने ज्यांना अगोदरच नेमले होते, ज्यांना बोलाविले होते त्यांना नीतिमान केले आणि ज्यांना नीतिमान केले त्यांना गौरवसुद्धा दिले.
देवाची ख्रिस्त येशूमधील प्रीति
31 यावरुन आपण काय म्हणावे? देव जर आपल्या बाजूचा आहे तर आपल्या विरुद्ध कोण? 32 ज्याने आपल्या पुत्राला राखून ठेवले नाही, परंतु आपणा सर्वांसाठी मरण्यासाठी दिले तो आपणांला पुत्रासह सर्व काही देणार नाही काय? 33 देवाच्या निवडलेल्या लोकांवर आरोप कोण ठेवील? देव हाच एक त्यांना निरपराध ठरवितो. 34 दोषी ठरवितो तो कोण? जो मेला आणि याहीपेक्षा अधिक महत्तवाचे म्हणजे जो उठविला गेला व देवाच्या उजवीकडे बसला आहे, जो आपल्या वतीने मध्यस्थी करतो तो ख्रिस्त येशू आहे. 35 ख्रिस्ताच्या प्रेमापासून आपणांस कोण वेगळे करील? त्रास, कष्ट, छळ, भूक, नग्नता, संकटे किंवा तलवारीने वध हे वेगळे करतील काय? 36 असे लिहिले आहे की,
“दिवसभर आम्ही तुझ्यामुळे वधले जात आहोत.
आम्हांला कापायला नेत असलेल्या मेंढराप्रमाणे समजतात.” (A)
37 तरी या सर्व गोष्टींमध्ये आम्ही ज्याने आम्हांवर प्रीति केली त्याच्याद्वारे अत्यंत वैभवी जय मिळवीत आहोत. 38 कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत, अधिकारी आत्मे हल्लीच्या किंवा भविष्यकाळात, 39 येशूचे सामर्थ्य, उंच किंवा खाली, जगात निर्माण केलेली कुठलीही गोष्ट आपणांस देवाचे प्रेम जे ख्रिस्तामध्ये आढळते त्यापासून वेगळे करु शकणार नाही.
येशूच्या आणखी काही बोधकथा(A)
31 मग येशूने त्यांना आणखी एक बोधकथा सांगितली. तो म्हणाला, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो एका माणसाने घेऊन आपल्या शेतात पेरला. 32 मोहरीचा दाणा सर्व दाण्यांहून लहान आहे. पण तो त्याचे झाड मात्र खूप मोठे येते. इतके की, आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यांवर राहतात.”
33 मग येशूने लोकांना आणखी एक दाखला सांगितला, “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेतले व तीन मापे पिठामध्ये ठेवले तेव्हा ते सर्व पीठ फुगले.”
गुप्त ठेवी आणि मोती यांच्या बोधकथा
44 “स्वर्गाचे राज्य हे जणू काय शेतामध्ये लपवून ठेवलेल्या ठेवीसारखे आहे. एके दिवशी एका मनुष्याला ती ठेव सापडली. त्यामुळे त्या मनुष्याला खूप आनंद झाला. तो ती गुप्त ठेव पुन्हा त्याचा शेतात लपवून ठेवतो व आपले सर्व काही विकून ते शेत विकत घेतो.
45 “आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध घेणाऱ्या व्यापाऱ्यासारखे आहे, 46 एक दिवस त्याला एक अत्यंत सुंदर मोती सापडतो. तेव्हा तो जाऊन आपले सर्व काही विकतो आणि तो मोती विकत घेतो.
माशाच्या जाव्याविषयीची बोधकथा
47 “तसेच, स्वर्गाचे राज्य पाण्यात टाकलेल्या जाळ्यासारखे आहे. जाळ्यात सर्व प्रकारचे मासे सापडतात. 48 ते भरल्यावर माणसांनी ते ओढून किनाऱ्यावर आणले व बसून जे चांगले ते भांड्यात भरले व जे वाईट ते फेकून दिले. 49 या काळाच्या शेवटी असेच होईल. देवदूत येतील आणि वाईटांना नितीमान लोकांतून वेगळे करतील. 50 वाईट लोकांना अग्नीत फेकून देण्यात येईल. तेथे रडणे व दात खाणे चालेल.”
51 येशूने शिष्यांना विचारले, “तुम्हांला या सर्व गोष्टी समजल्या काय?”
तेव्हा ते म्हणाले, “होय.”
52 तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “प्रत्येक नियमशास्त्राचा शिक्षक ज्याला स्वर्गाच्या राज्याविषयी शिकविण्यात आले आहे तो घरमालकासारखा आहे. त्याच्याकडे अनेक जुन्या व नव्या गोष्टी घरातील तिजोरीत ठेवलेल्या आहेत.”
2006 by World Bible Translation Center