Revised Common Lectionary (Semicontinuous)
105 परमेश्वराला धन्यावाद द्या.
त्याच्या नावाचा धावा करा.
राष्ट्रांना तो करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगा.
2 परमेश्वराला गाणे गा; त्याची स्तुतिगीते गा.
तो ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल सांगा.
3 परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा.
तुम्ही लोक परमेश्वराला शोधत आला, सुखी व्हा.
4 शक्तीसाठी परमेश्वराकडे जा.
मदतीसाठी नेहमी त्याच्याकडे जा.
5 तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्याची आठवण ठेवा त्याचे चमत्कार
आणि त्याचे शहाणपणाचे निर्णय याची आठवण ठेवा.
6 तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशज आहात.
तुम्ही याकोबाचे, देवाने निवडलेल्या माणसाचे वंशज आहात.
7 परमेश्वर आपला देव आहे.
परमेश्वर सर्व जगावर [a] राज्य करतो.
8 परमेश्वर देवाच्या कराराची सदैव आठवण ठेवा.
हजारो पिढ्या त्याच्या आज्ञांची आठवण ठेवा.
9 देवाने अब्राहामा बरोबर करार केला.
देवाने इसहाकाला वचन दिले.
10 नंतर त्याने याकोबासाठी नियम केला.
देवाने इस्राएल बरोबर करार केला.
तो सदैव राहील.
11 देव म्हणाला, “मी तुला कनानची जमीन देईन.
ती जमीन तुझ्या मालकीची होईल.”
45 देवाने असे का केले?
त्याच्या माणसांनी त्याचे नियम पाळावे म्हणून त्यांनी त्याची
शिकवण काळजीपूर्वक आचरावी म्हणून,
परमेश्वराची स्तुती करा.
याकोबाची वंशावळ वाढली
31 परमेश्वराने पाहिले की याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम आहे, म्हणून परमेश्वराने लेआला मुले होऊ दिली परंतु राहेलीस मूलबाळ दिले नाही;
32 लेआला मुलगा झाला; तिने त्याचे नाव रऊबेन ठेवले; कारण ती म्हणाली, “परमेश्वराने माझे दु:ख पाहिले आहे; कारण माझा नवरा माझ्यावर प्रेम करीत नाही; परंतु आता कदाचित तो माझ्यावर प्रेम करील.”
33 लेआ पुन्हा गरोदर राहिली आणि तिला आणखी एक मुलगा झाला; ह्या मुलाचे नाव तिने शिमोन ठेवले, कारण ती म्हणाली, “माझ्या नवऱ्याचे माझ्यावर प्रेम नाही हे परमेश्वराने ऐकले आहे म्हणून त्याने मला हा मुलगा दिला आहे.”
34 लेआ आणखी गर्भवती झाली व तिला मुलगा झाला; तेव्हा तिने त्याचे नाव लेवी असे ठेवले; कारण ती म्हणाली, “आता मात्र माझा नवरा माझ्यावर नक्की प्रेम करील कारण मी त्यांना तीन मुलगे दिले आहेत.”
35 त्यानंतर लेआला आणखी एक मुलगा झाला; तिने त्याचे नाव यहूदा ठेवले; करण ती म्हणाली, “आता मी परमेश्वराची स्तुति करीन.” नंतर तिचे जनन थांबले.
30 याकोबापासून आपल्याला मुले होत नाहीत हे पाहिल्यावर राहेल आपली बहीण लेआ हिचा मत्सर करु लागली; तेव्हा राहेल याकोबला म्हणाली, “मला मुले देणारी करा नाही तर मी मरेन.”
2 याकोब राहेलीवर रागावला; तो म्हणाला, “तुला पुत्रवती करायला मी काय देव आहे? देवानेच तुला मुले होऊ नयेत असे करुन ठेवले आहे.”
3 मग राहेल म्हणाली, “तुम्ही माझी दासी बिल्हा उपपत्नी म्हणून घ्या; तुम्ही तिच्याजवळ निजा; मग ती माझ्या मांडीवर बाळंत होईल व तिजपासून मला मूल मिळेल; तिच्यामुळे मग मलाही मुलगा होईल आणि मी आई होईन.”
4 तेव्हा राहेलीने बिल्हा आपला नवरा याकोब ह्याला उपपत्नी म्हणून दिली; आणि याकोब तिजपाशी गेला; 5 तेव्हा बिल्हा याकोबापासून गरोदर राहिली व तिला मुलगा झाला.
6 राहेल म्हणाली, “देवाने माझी प्रार्थना ऐकली आहे. त्याने मला मुलगा देण्याचे ठरवले;” म्हणून तिने त्याचे नाव दान ठेवले.
7 बिल्हा पुन्हा गर्भवती झाली व तिला याकोबापासून दुसरा मुलगा झाला; 8 राहेल म्हणाली, “मी माझ्या बहिणीशी जिद्दीने स्पर्धा करुन कठीन लढा दिला आहे व जय मिळवला आहे.” तेव्हा तिने त्याचे नाव नफताली ठेवले.
9 लेआने असे पाहिले की, आता आपल्याला आणखी मुले होणार नाहीत; तेव्हा तिने आपली दासी जिल्पा हीला आपला नवरा याकोब याला उपपत्नी म्हणून दिली. 10 नंतर जिल्पाला मुलगा झाला; 11 तेव्हा लेआ म्हणाली, “मी कितीतरी भाग्यवान आहे;” तेव्हा तिने त्याचे नाव गाद ठेवले. 12 जिल्पाला आणखी एक मुलगा झाला; 13 तेव्हा लेआ म्हणाली, “आता मला खूप आनंद झाला आहे! इतर स्त्रिया मला धन्य म्हणतील” मग तिने त्याचे नाव आशेर ठेवले.
14 गव्हाच्या हंगामाच्या दिवसात रुबेन शेतात गेला असता त्याला काही विशेष प्रकारची फुले सांपडली [a] त्याने ती फुले आपली आई लेआ हिच्याकडे आणून दिली; परंतु राहेल लेआला म्हणाली, “तुझा मुलगा रुबेन याने आणलेल्या पुत्रदात्रीच्या फुलातून काही फुले कृपा करुन मला दे.”
15 लेआने उत्तर दिले, “अगोदरच तू माझा नवरा घेतलास तर घेतलास, आणि आता माझ्या मुलाने आणलेली पुत्रदात्रीची फुलेही तू माझ्याकडून घेण्याचा प्रयत्न करतेस काय?”
परंतु राहेल म्हणाली, “जर तुझ्या मुलाने आणलेली पुत्रदात्रीची फुले मला देशील तर त्यांच्या मोबदल्यात आज रात्री तुला याकोबापाशी निजावयाला मिळेल.”
16 याकोब शेतावरुन त्या रात्री घरी आला; लेआने त्याला पाहिले व ती त्याला भेटावयास बाहेर गेली; व ती म्हणाली, “आज रात्री तुम्ही माझ्याजवळ निजणार आहात कारण माझ्या मुलाने आणलेली पुत्रदात्रीची फुले राहेलीस देऊन मी त्यांचा मोबदला भरुन दिला आहे.” तेव्हा याकोब त्या रात्रीं लेआपाशी निजला.
17 तेव्हा देवाने लेआची कूस फलदायी केली व ती पुन्हा गर्भवती होऊन तिला पाचवा मुलगा झाला; 18 लेआ म्हणाली, “देवाने माझ्या कृत्याचे मला बक्षीस दिले आहे कारण मी माझी दासी माझ्या नवऱ्याला दिली.” तेव्हा लेआने आपल्या मुलाचे नाव इस्साखार ठेवले.
19 लेआ पुन्हा गरोदर राहिली व तिला सहावा मुलगा झाला. 20 ती म्हणाली, “देवाने मला उत्तम देणगी दिली आहे; आता मात्र माझा नवरा प्रेमाने माझा स्वीकार करील कारण मी त्याला सहा मुलगे दिले आहेत;” म्हणून लेआने त्याचे नाव जबुलून ठेवले.
21 त्यानंतर लेआला एक मुलगी झाली; तिने तिचे नाव दीना ठेवले.
22 मग देवाने राहेलीची प्रार्थना ऐकली; देवाने तिला मुल होणे शक्य केले; 23 म्हणून राहेल गर्भवती झाली व तिला मुलगा झाला; 24 राहेल म्हणाली, “देवाने माझी लाजीरवाणी स्थिती दूर करुन मला मुलगा दिला आहे.” म्हणून राहेलीने त्याचे नाव योसेफ ठेवले.
यहूदी लोक येशूकडे पुरावा मागतात(A)
38 काही नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांच्यापैकी काही जणांनी येशूला म्हटले, “गुरुजी, तुमच्या हातून एखादे चिन्ह पहावे अशी आमची इच्छा आहे.”
39 येशूने उत्तर दिले, “जे लोक देवाशी प्रामाणीक नाहीत, पापी आहेत असे लोक पुराव्यासाठी चमत्कार पाहू इच्छितात. पण योना संदेष्ट्याशिवाय दुसरे चिन्ह तुम्हांला मिळणार नाही. 40 कारण योना जसा तीन दिवस व तीन रात्री माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. 41 जेव्हा तुमच्या पिढीचा न्याय होईल, तेव्हा निनवेचे लोक उभे राहतील, तुमच्याविरूद्ध साक्ष देतील आणि तुम्हांला दोष देतील. कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला. आणि आता तर तुमच्यामध्ये योनापेक्षा महान असा कोणी एक येथे आहे.
42 “न्यायाच्या दिवशी दक्षिणेची राणी [a] या पिढीबरोबर उभी राहून हिला दोषी ठरवील. कारण शलमोनाचे ज्ञान ऐकायला ती पृथ्वीच्या शेवटापासून आली. आणि शलमोनापेक्षा महान असा कोणी येथे आहे.
2006 by World Bible Translation Center