Revised Common Lectionary (Semicontinuous)
13 परमेश्वरा, तू माझे संपूर्ण शरीर निर्माण केलेस
मी माझ्या आईच्या गर्भात होतो तेव्हाच तुला माझ्याबद्दल सर्वकाही माहीत होते.
14 परमेश्वरा, मी तुझी स्तुती करतो.
तू मला अद्भुत आणि अतिशय सुंदररीतीने निर्मिलेस
तू जे केलेस ते खूपच अद्भुत आहे हे मला चांगलेच माहीत आहे.
15 तुला माझ्याबद्दल सारे माहीत आहे
माझे शरीर आईच्या गर्भात लपून आकार घेत होते तेव्हा तू माझी हाडे वाढत असताना पाहिलीस.
16 माझे अवयव वाढत असताना तू पाहिलेस तू तुझ्या पुस्तकात त्यांची यादी केलीस.
तू माझी रोज पाहणी केलीस.
त्यातला एकही अवयव हरवलेला नाही.
17 तुझे विचार मला महत्वाचे आहेत,
देवा तुला खूप माहिती आहे.
18 मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त असेल.
आणि जेव्हा माझी झोप संपेल तेव्हा मी तुझ्याजवळच असेन.
प्रसूत होऊन राहेल मरते
16 याकोब व त्याच्या बरोबराचा लवाजमा म्हणजे त्याची, घरची मंडळी व इतर माणसे हे सर्व बेथेल येथून निघाले, ते इफ्राथ (म्हणजे बेथलहेम) गांवाच्या अगदी जवळ आले असताना तेथे पोहोंचण्यापूर्वी राहेलीस प्रसूती वेदना सुरु झाल्या. 17 परंतु राहेलीस यावेळी प्रसूती वेदनांचा अतिशय त्रास होत होता; त्याचवेळी राहेलीची सुईण तिची कठीण अवस्था पाहून तिला म्हणाली, “भिऊ नकोस राहेल, तू आणखी एका मुलास जन्म देत आहेस.”
18 त्या मुलास जन्म देताना राहेल मरण पावली परंतु मरण्यापूर्वी तिने त्याचे नाव “बेनओनी” असे ठेवले; परंतु याकोबाने त्याचे नांव “बन्यामीन” असे ठेवले.
19 एक्राथ (म्हणजे बेथलहेम) गांवाला जाणाऱ्या वाटेजवळ राहेलीस पुरले 20 आणि याकोबाने तिच्या सन्मानाकरिता तिचे स्मारक म्हणून तिच्या कबरेवर एक दगडी स्तंभ उभा केला; तो स्तंभ आजपर्यंत तेथे कायम आहे. 21 त्यानंतर इस्राएलाने (याकोबाने) आपला पुढचा प्रवास चालू केला; आणि एदेर बुरुजाच्या अगदी दक्षिणे कडे आपला तळ दिला.
22 इस्राएल तेथे थोडा काळ राहिला, त्यावेळी रऊबेन, इस्राएलाची म्हणजे आपल्या बापाची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी निजला या विषयी इस्राएलाने ऐकले तेव्हा तो अतिशय संतापला.
इस्राएलाचे कुटुंब
याकोब (इस्राएल) यास बारा मुलगे होते.
23 लेआ हिचे मुलगे-याकोबाचा पाहिला मुलगा रऊबेन आणि शिमोन, लेवी, यहुदा, इस्साखार व जबुलून;
24 राहेल हिचे मुलगे-योसेफ व बन्यामीन;
25 राहेलीची दासी बिल्हा हिचे मुलगे-दान व नफताली;
26 आणि लेआची दासी जिल्पा हिचे मुलगे गाद आशेर पदन अरामात झाले.
27 याकोब मग “किर्याथ अरबा” (म्हणजे “हेब्रोन”) येथीन मम्रे या ठिकाणी आपला बाप इसहाक याजकडे गेला. येथेच अब्राहाम व इसहाक हे राहिले होते. 28 इसहाक एकशे ऐंशी वर्षे जगला. 29 आणि दीर्घ आयुष्यानंतर तो अशक्त होऊन मरण पावला. त्याचे मुलगे एसाव व याकोब यांनी त्याला त्याच्या बापाला पुरले होते त्याच जागी पुरले.
येशू देवाचा निवडलेला सेवक
15 परूशी काय करीत आहेत ते येशूला माहीत होते. म्हणून येशू तेथून गेला. पुष्कळ लोक येशूच्या मागे निघाले व त्याने जे कोणी रोगी होते, त्या सर्वाना बरे केले. 16 आणि त्याने त्यांना निक्षून सांगितले की, तो कोण आहे, हे इतरांना सांगू नका. 17 यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले गेले होते ते पूर्ण होण्यासाठी त्याने असे म्हटले.
18 “हा माझा सेवक,
याला मी निवडले आहे.
मी त्याजवर प्रीति करतो,
आणि त्याच्याविषयी मला संतोष वाटतो.
मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवीन,
आणि तो यहूदीतरांसाठी योग्य न्यायाची घोषणा करील.
19 तो वाद घालणार नाही किंवा ओरडणार नाही,
रस्त्यावर लोक त्याचा आवाज ऐकणार नाहीत.
20 वाकलेला बोरू तो मोडणार नाही
आणि मंदावलेली वात तो विझविणार नाही.
योग्य निर्णयाचा विजय होईपर्यंत तो असे करील.
21 सर्व लोक त्याच्यावर आशा ठेवतील.” (A)
2006 by World Bible Translation Center