Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 139:13-18

13 परमेश्वरा, तू माझे संपूर्ण शरीर निर्माण केलेस
    मी माझ्या आईच्या गर्भात होतो तेव्हाच तुला माझ्याबद्दल सर्वकाही माहीत होते.
14 परमेश्वरा, मी तुझी स्तुती करतो.
    तू मला अद्भुत आणि अतिशय सुंदररीतीने निर्मिलेस
तू जे केलेस ते खूपच अद्भुत आहे हे मला चांगलेच माहीत आहे.

15 तुला माझ्याबद्दल सारे माहीत आहे
    माझे शरीर आईच्या गर्भात लपून आकार घेत होते तेव्हा तू माझी हाडे वाढत असताना पाहिलीस.
16 माझे अवयव वाढत असताना तू पाहिलेस तू तुझ्या पुस्तकात त्यांची यादी केलीस.
    तू माझी रोज पाहणी केलीस.
    त्यातला एकही अवयव हरवलेला नाही.
17 तुझे विचार मला महत्वाचे आहेत,
    देवा तुला खूप माहिती आहे.
18 मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त असेल.
    आणि जेव्हा माझी झोप संपेल तेव्हा मी तुझ्याजवळच असेन.

उत्पत्ति 33:1-17

याकोब आपले शौर्य दाखवितो

33 याकोबाने वर पाहिले आणि त्याला एसाव येताना दिसला; त्याच्या बरोबर चारशे माणसे होती. तेव्हा याकोबाने आपल्या कुटुंबाचे चार गट पाडले. लेआ व तिची मुले यांचा एक गट, राहेल व योसेफ यांचा आणखी एक गट, आणि त्याच्या दोन दासी व त्यांची आपली मुले यांचे वेगळे दोन गट होते. याकोबाने त्याच्या दासी व त्यांची मुले यांना आघाडीला त्यानंतर त्याच्यामागे लेआ व तिची मुले आणि राहेल व योसेफ यांना सर्वात शेवटी ठेवले.

याकोब स्वतः एसावा पुढे सामोरा गेला म्हणून एसावा समोर पुढे आलेला तोच पहिला होता; आपला भाऊ एसाव याला सामोरा जात असताना त्याने सात वेळा भूमिपर्यंत लवून त्याला नमन केले.

एसावाने जेव्हा याकोबाला पाहिले तेव्हा त्याला भेटण्यास तो धावत गेला आणि आपल्या बाहुंचा विळखा त्याच्या भोवती टाकून त्याने गळयात गळा घालून याकोबाला मिठी मारली. त्याचे चुंबन घेतले, आणि ते दोघे रडले. एसावाने आपल्या समोरील स्त्रिया व मुले पाहून विचारले, “तुझ्या बरोबर ही कोण मंडळी आहे?”

याकोबाने उत्तर दिले, “देवाने मला दिलेली ही मुले आहेत, देवाने माझे कल्याण केले आहे.”

मग याकोबाच्या दोन दासी आपल्या मुलांबरोबर पुढे गेल्या आणि त्यांनी एसावाला लवून नमन केले. त्यानंतर लेआ व तिची मुले, मग राहेल व योसेफ, एसावापुढे गेली आणि त्यांनी त्याला लवून नमन केले.

एसावाने विचारले, “इकडे येताना मला दिसले ते लोक कोण? व त्यांच्या बरोबरची जनावरे कशासाठी?”

याकोबाने उत्तर दिले, “आपण माझा स्वीकार करावा म्हणून देणगी दाखल मी आपणाला दिलेली ही भेट आहे.”

परंतु एसाव म्हणाला, “माझ्या बंघु तू मला काही भेट द्यावयाची नाही, मला माझ्याकरिता भरपूर आहे.”

10 याकोब म्हणाला, “नाही नाही; मी आपणाला आग्रहाची विनंती करतो, आपण जर खरोखर माझा स्वीकार करिता तर मग कृपाकरुन मी आपणाला देतो त्या भेटीचा स्वीकार करा; आपले तोंड मला पुन्हा पाहावयास मिळाले म्हणून मला फार आनंद होत आहे; जणू काय मला देवाचे मुख पाहावयास मिळाले आहे. आपण माझा स्वीकार करिता म्हणूनही मला अतिशय आनंद वाटतो; 11 म्हणून मी आग्रहाची विनंती करतो की मी आपणाला भेट देतो तिचा स्वीकार करा. देवाने माझे कल्याण केले आहे. माझ्यापाशी माझ्या गरजा पुरुन उरेल एवढे आहे.” या प्रमाणे भेटी दाखल दिलेल्या देणग्या घेण्यासाठी याकोबाने एसावास आग्रहाची विनवणी केली म्हणून मग एसावाने त्या देणग्यांचा स्वीकार केला.

12 मग एसाव म्हणाला, “आता तू वाटेस लाग व तुझा प्रवास पुढे चालू ठेव; मीही तुझ्याबरोबर चालतो.”

13 परंतु याकोब त्याला म्हणाला, “माझी मुले नाजुक आहेत हे आपणाला माहीत आहे; आणि माझ्या कळपातली दुभती जनावरे व त्यांची कच्ची बच्ची, करडे कोंकरे, वासरे यांची मला काळजी घेतली पाहिजे. मी जर त्यांच्यावर एकाच दिवशी अधिक दौड लादली तर सगळी जनावरे मरुन जातील; 14 तर माझे स्वामी आपण पुढे निघा; मी माझी गायीगुरे, शेरडेमेंढरे इत्यादी जनावरांना जितके चालवेल आणि माझी लहानमुलेही थकणार नाहीत अशा चालीने चालेन व आपणास सेईर येथे येऊन भेटेन.”

15 तेव्हा एसाव म्हणाला, “मग मी माझ्या माणसातून काही माणसे तुला मदत करण्यासाठी मागे ठेवितो;”

परंतु याकोब म्हणाला, “ही तर माझ्या स्वामीची माझ्यावर कृपा आहे; परंतु माणसे ठेवण्याची तशी गरज नाही.” 16 तेव्हा त्याच दिवशी एसाव सेईरास परत जाण्यास निघाला. 17 याकोब गांवास गेला; तेथे त्याने स्वतःसाठी घर बांधले आणि गुरांढोरांसाठी खोपट्या बांधल्या म्हणून त्या ठिकाणाचे नाव सुक्कोथ पडले.

गलतीकरांस 4:21-5:1

हागार आणि साराचे उदाहरण

21 जे तुम्ही नियमशास्त्राधीन राहू इच्छिता त्या तुम्हांला मला विचारु द्या की, नियमशास्त्र काय म्हणते, ते तुम्हांला माहीत आहे का? 22 असे लिहिले आहे की, अब्राहामाला दोन पुत्र होते. एक त्याला गुलाम मुलीपासून झाला व दुसरा स्वतंत्र स्त्रीपासून जन्मलेला 23 देवाच्या वचनाचा परिणाम म्हणून जन्मला.

24 या गोष्टी दृष्टांतरुप आहेत, त्या स्त्रिया दोन करार आहेत. एक करार सीनाय पर्वतावर झाला. आणि ज्यांच्या नशिबी गुलामगिरी होती अशा लोकांना त्याने जन्म दिला. हा करार हागारशी संबंध दर्शवितो. 25 हागार ही अरबस्तानातील सीनाय पर्वताचे दर्शक हल्लीच्या यरुशलेमचे बाह्यरुप आहे. कारण ती आपल्या मुलासह गुलामगिरीत आहे. 26 परंतु स्वर्गीय यरुशलेम स्वतंत्र आहे. स्वर्गीय यरुशलेम ही आमची आई आहे. 27 कारण असे लिहिले आहे.

“जिने जन्म दिला नाही, त्या मूल नसलेल्या (स्त्रीने) आनंद करावा!
    ज्या तुला प्रसूतिवेदना झालेल्या नाहीत ती तू आनंदाने
घोष कर, आरोळी मार,
कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा
    सोडलेल्या स्त्रीची मुले अधिक आहेत” (A)

28-29 बंधूनो, आता तुम्ही इसहाकासारखी देवाच्या वचनाचा परिणाम म्हणून जन्मलेली मुले आहात, परंतु तो त्यावेळी जसा देहस्वभावाप्रमाणे जन्मला होता व त्याने आत्म्याच्या सामर्थ्याने जन्मलेल्यांचा छळ केला तसे आता आहे. 30 पण पवित्र शास्त्र काय सांगते? “त्या गुलाम मुलीला व तिच्या पुत्राला घालवून दे, कारण गुलाम मुलगा स्वतंत्र स्त्रीच्या मुलाबरोबर वारस होणार नाही.” 31 यासाठी बंधूंनो, आपण गुलाम मुलीची नाही तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.

तुमचे स्वातंत्र्य राखा

आम्ही स्वातंत्र्यात राहावे म्हणून ख्रिस्ताने आम्हांला मुक्त केले, म्हणून स्थिर राहा. आणि नियमशास्त्राच्या जुवाच्या गुलामगिरीचे ओझे पुन्हा लादून घेऊ नका.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center